तो दिवस होता ख्रिस्ताब्द १८९३ (श्रीशके १८१५) च्या श्रावण महिन्यातील शेवटच्या आठवड्याचा. श्री. वैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्या घरात एक सभा त्या दिवशी भरणार होती. सभेची वेळ झाली तशी एकामागून एक निमंत्रित मंडळी येऊ लागली. प्रथम आले महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, त्यांचे मागोमाग बाळासाहेब नातू, गणपतराव धोटवडेकर, नंतर लखूशेठ दंताळे, बळवंत नारायण सातव, नाना नारायण भोर वकील, खंडोबा तरवडे, नानासाहेब खाजगीवाले, बळवंत नारायण कोकाटे, मामा हसबनीस, दगडुशेठ हलवाई, गंगाधर रावजी खैर, रामभाऊ बोधने वगैरे मंडळी येऊन त्यांनी आपल्या जागा भूषविल्या.

सभेच्या संचालकांनी प्रथम मागे झालेल्या हिंदू-मुस्लिम दंग्याची रूपरेषा सांगितली. हे सर्व दंगे मुसलमान समाज जादा शेफारल्यामुळेच झाल्याचे सांगून त्याची झळ साऱ्या हिंदुस्थानातच कशी पसरली याचे समग्र निवेदन केले. या  सर्व विचारमंथनातूनच प्रत्येकाचा खाजगी असलेला श्रीगणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपाचा असा मोठ्या थाटामाटात साजरा करावा असे कायम ठरले. तत्पूर्वी कै. सरदार कृष्णाजी काशिनाथ तथा नानासाहेब खाजगीवाले यांनी आपण गेल्या वर्षी म्हणजे १८९२ सालात ग्वाल्हेर संस्थानात गेलो असता तेथे श्रीगणेशोत्सव दरबारी डामडौलात कसा साजरा केला जातो याचे खुमासदार वर्णन करून प्रत्येकाचे मनात आपणही तशाच स्वरूपाचा उत्सव पुण्यामध्ये साजरा करावा अशी प्रभावी वृत्ती निर्माण केली. यंदा काहीही झाले तरी आपण सार्वजनिक उत्सव साजरा करायचाच असा निर्धार करून सभा संपली.

सार्वजनिक गणेशोत्सव चालू करण्याचे पहिले मानाचे पान कै. नानासाहेब खाजगीवाले यांनाच मिळाले. वरील सभेत ठरल्याप्रमाणे ख्रिस्ताब्द १८९३ सालात श्री. खासगीवाले, धोटवडेकर आणि रंगारी असे तीन सार्वजनिक गणपती बसून सार्वजनिक गणेशोत्सवाचे पुण्याहवाचन झाले आणि ते वाद्यांच्या गजरात मोठ्या समारंभाने मिरवीत नेऊन विसर्जन करण्याची चाल सुरू झाली.

वरील तीन गणपतीची अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या थाटाची मिरवणूक निघाली. या मिरवणुकीबरोबर श्री. काशिनाथ ठकुजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेला एक मेळाही होता. मिरवणूक चालू झाली. यामध्ये श्री. खासगीवाले यांचा गणपती प्रथम होता, असे सांगतात. दुसर्‍या वर्षी १८९४ मध्ये सार्वजनिक गणपतींची संख्या खूपच वाढली. अर्थात मानापमानचा प्रसंग निर्माण झाला. रे-मार्केट (फुले मंडई ) मध्ये कोणाचा गणपती पहिल्या क्रमांकाला असावा याबद्दल वाद निर्माण झाला. तेव्हा श्री. ब्रह्मगिरीबुवा यांनी लोकमान्य टिळकांस व महर्षी अण्णासाहेब यांना बोलावून आणले. दोघांनी वादाचे स्वरुप समजावून घेतले. विचारविनिमय करून त्यांनी आपला अखेरचा निर्णय जाहीर केला की, ‘पुण्याची ग्रामदेवता श्रीकसबा गणपती आणि श्रीजोगेश्वरी यांचे गणपती अग्रभागी असावेत. त्यांच्या मागे सरदार खासगीवाल्यांचा गणपती असावा.’ ही शक्कल सर्वांस पटली आणि वाद निकालात निघाला. तेव्हापासून आजतागायत श्रीकसबा गणपतीचा मान पहिला व जोगेश्वरी गणपतीचा मान दुसरा चालू आहे. त्याचप्रमाणे शेवटून तिसरा श्री.  रंगारी, दुसरा दगडू हलवाई आणि शेवटी मंडईचा गणपती असा क्रम ठरला आहे.

सार्वजनिक गणपती बसविण्याचा आणि विसर्जनासाठी गणपती एकत्र करून समारंभाने मिरवीत नेण्याची ही प्रथा कै. टिळकांना एकदम पसंत पडली. अशाप्रकारे गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची कल्पना त्यांनी उचलून धरली. पहिल्याच वर्षी ‘केसरी’च्या मंगळवार दिनांक २६-९-१८९३ च्या अंकात उत्तेजनपर स्फुट लिहून ‘‘यंदाच्या साली ज्या गृहस्थांनी ही खटपट केली त्यांचे लोकांनी आभार मानले पाहिजेत’’ असे म्हणून श्रीगणेशोत्सवाला प्रोत्साहन दिले. या लिखाणाच्या प्रभावाने ख्रिस्ताब्द १८९४ मध्ये १०० आणि १८९५ त दीडशेच्या वर गणपती बसल्याचा उल्लेख सापडतो.

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव चालू करण्याचा मान जरी कै. नानासाहेब खासगीवाले यांच्याकडे जात असला तरी गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात ज्ञानसत्राचे स्वरूप देण्याचा मान कै. लोकमान्य टिळकांकडेच जातो. इंग्रजी शिक्षणामुळे लोकांचे आचारविचार नष्ट होऊ लागले होते. धर्माबद्दल उदासीनता येऊ लागली होती. ही गोष्ट काही चांगली नाही, तरी याला काय उपाययोजना करावी, असा विचार अनेक विचारवंतांच्या मनात घोळत असता, श्रीगणपती उत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले तर त्याचा चांगलाच परिणाम होईल असे कै. लोकमान्यांना वाटले. हा उत्सव दहा दिवस करावा, म्हणजे त्यात कीर्तने, प्रवचने, व्याख्याने, मेळे वगैरे विविध प्रकारांनी मेलेल्या मनाच्या हिंदू समाजामध्ये चांगली जागृती येईल, ही कल्पना त्यांना पटली आणि श्रीगणेशोत्सवाला अभिनव असे सार्वजनिक रूप देऊन कै. लोकमान्य टिळकांनी स्वत: सार्वजनिक गणपती ख्रिस्ताब्द १८९४ मध्ये श्री. सरदार विंचुरकर यांच्या वाड्यात बसविला. हाच केसरी संस्थेचा गणपती. त्यावेळी या गणपतीला ‘लॉ क्लास’चा गणपती म्हटले जात असे. त्यावेळी टिळक याच वाड्यात राहत असल्याने पटांगणात मंडप घालून त्यात हा उत्सव साजरा होऊन कै. टिळक आपल्या या स्वत:च्या गणपतीपुढे एखादे तरी व्याख्यान देत आणि इतरत्रही व्याख्यानासाठी जात.

१८९५ मध्ये विंचुरकरांच्या वाड्यात लो. टिळकांचे ‘महाभारतातील दोन महापुरुष’ या विषयावर भाषण झाले. त्यात त्यांनी श्रीकृष्ण आणि भीष्माचार्य हे दोन त्यावेळचे प्रमुख राजकारणी पुरुष होते असे सांगून त्यांच्या अंगच्या सद्गुणांचे वर्णन केले. १८९४ ते १९०३ पर्यंत विंचुरकरांच्या वाड्यातील गणपतीपुढे ह. भ. प. पांगारकर, प्रो. जिनसीवाले, शि. म. परांजपे, केळकर, खाडिलकर, इत्यादी नामवंत वक्त्यांची भाषणे झाली.

ख्रिस्ताब्द १९०४ पासून केसरी संस्थेचा गणेशोत्सव गायकवाड वाड्यात साजरा होऊ लागला. या उत्सवात कै. टिळकांनी ‘‘देह आणि आत्मा’’ या विषयावर एक विस्तृत भाषण केले. त्यात त्यांनी शास्त्रज्ञांनी आधुनिक प्रयोगांनी आत्म्याचे शरीराहून भिन्नत्व आणि अविनाशीत्व मान्य केलेले आहे; प्राचीन उपनिषद्कारांनी केवळ आपल्या विचारांच्या जोरावर आत्म्याचे  हेच स्वरूप कसे सांगितले आहे याचे विवरण केले.

ह्या उत्सवास असे सार्वजनिक स्वरूप देण्यात कै. टिळकांचा असा हेतू होता की, या योगाने आपला हिंदु समाज जो विस्कळीत होत चाललेला आहे तो संघटित होईल, व त्यामुळे राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीत जास्त पुढे पाऊल आपल्याला टाकता येईल, लोकांत धार्मिक आणि राजकीय जागृती निर्माण होईल. लोकमान्यांच्या या प्रभावी पुरस्कारांमुळे या उत्सवाचा त्वरित सर्वत्र प्रसार झाला आणि लोकमान्यांच्याच हयातीत गणेशोत्सव हे एक राजकीय चळवळींचे फार मोठे प्रभावी साधन ठरले.

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव

पुणे शहरात श्रीगणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात प्रथम १८९३ साली करण्यात आला, तरी मुंबईत मात्र तो दोन वर्षे उशिरानेच म्हणजे १८९५ साली सुरू करण्यात आला. कारण त्यावेळी हिंदू-मुसलमानांतील दंगली चालू होत्या. पुढे दंगे जरी बंद झाले तरी दंगलीनंतरची होणारी धरपकड आणि संभाव्य अभियोग यामुळे मुंबईची जनता अतिशय चिंताग्रस्त होती. यामुळे १८९३ साली उत्सवास सुरुवात झाली नाही. १८९४ मध्ये पुण्यात मोठ्या धुमधडाक्याने गणेशोत्सव चालू झाला तरी देखील मुंबईतील हिंदू जनता सरकारच्या धोरणाबद्दल साशंकच होती. १८९५ मध्ये पुण्यातील सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाचे अनुकरण अनेक शहरांतून-गावांतून होऊ लागल्याचे पाहून मुंबईच्या नागरिकांनाही थोडा थोडा धीर येत चालला आणि त्याच वर्षी त्यांनी गणेशोत्सवाचा श्रीगणेशा अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपतीची स्थापना करून केला. उत्सव सुरू झाल्यावर १८९६ मध्ये महाभयंकर अशा प्लेगच्या धामधुमीने आणि १८९७ त लोकमान्य टिळकांवरील अभियोगामुळे या दोन वर्षी म्हणण्यासारखा उत्सव झालेला नव्हता.

ख्रिस्ताब्द १८९५ मध्ये मुंबई येथील जिंतीकरांच्या चाळीत सार्वजनिक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे ठरले त्यावेळी एका हिंदू पोलीस अधिकार्‍याने बरीच शिवीगाळ करून उत्सवाच्या मानेला नख लावण्याचे ठरविले होते. पण आमच्या विघ्नहर्त्या विनायकाने हे ‘पोलीसी विघ्न’ कमिशनरांच्या सौजन्याने दूर करून आपला उत्सव करून घेतला. इतर ठिकाणीही मेळे व गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने पार पडला. कै. शांताराम नारायण वकील यांच्या चाळीत डॉ. मो. गो. देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे सर्व मेळेवाल्यांचे भजन झाले, आट्या पाट्यांचे खेळ झाले. गणेशोत्सव ठिकठिकाणी साजरा करण्याचे कामी ना. दाजीसाहेब खरे, प्रो. जिनसीवाले, डॉ. खेर, रावसाहेब पावगी इत्यादी लोकांचे अतिशय साह्य झालेले आहे. कुंभारवाड्यातील श्री. पांडोबा लक्ष्मण सुर्वे यांच्याकडे बसलेली श्रीगजाननाची मूर्ती अतिशय देखणी आणि प्रेक्षणीय होती. सदर मूर्ती पहाण्यासाठी हजारो प्रेक्षक गेलेले होते.

मुंबई शहरातील श्रीगणेशोत्सव व्यवस्थित होण्यासाठी आणि लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिक पुढार्‍यांनी अतिशय श्रम घेतले होते. दि. २०-८-१८९८ रोजी गिरगावातल्या पेंडसे यांच्या बंगल्यात श्री. गो. वा. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील पुढार्‍यांची एक सभा झाली. सभेला १५० पेक्षा जास्त नागरिक जमले होते. श्री. ग. ल. पागे यांनी आपण पोलीस कमिशनरांची भेट घेऊन दोघांत झालेली बोलणी सभेपुढे मांडली. उत्सव यथासांग पार पाडावा असे सर्वानुमते ठरून सभा संपली. त्यानुसार मुंबईत ठिकठिकाणी सर्वानुमते गणपती बसविण्यात आले. लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून चांगल्या मेळ्यांचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सुमारे साठ ते सत्तर मेळे निघाले होते.

मंगळवार दि. २३-८-१८९८ रोजी गिरगावातील गोरेगावकर बिल्डिंगमध्ये श्री. ग. पां. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली ह. भ. प. ल. रा. पांगारकर यांचे ज्ञानेश्वरी या विषयावर रसाळ व्याख्यान झाले. या उत्सवाचा विशेष म्हणजे गोरेगावकर बिल्डिंगमध्ये पानसुपारीच्या वेळी न्यायमूर्ती म. गो. रानडे हे दि. २७-८-१८८८ रोजी उपस्थित होते. शांतारामाच्या चाळीतही मेळेवाल्यांचा मेळावा जमला होता. दि. २९-८-१८९८ रोजी गिरगावकर बिल्डिंगमध्ये श्री. माधवराव बोडस यांचे सरदार बाबासाहेब सांगलीकर यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान झाले. बोडसांनी आपल्या व्याख्यानात उत्सवावर तोंडसुख घेणार्‍यांची भरमसाठ विधाने खोडून काढून श्रीगणेशोत्सवाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. समुदायांनी श्रीगजाननाची भक्ती करण्याची प्रथा आपल्या थोर साधुसंताच्या काळापासूनच चालत आल्याने आम्ही हा उत्सव साजरा करतो असेही त्यांनी भाषणात उद्गार काढले.

दि. २८-८-१८९८ ला जिंतीकरांच्या वाडीतील सार्वजनिक गणपतीपुढे श्री. गजानन भास्कर वैद्य यांचे डॉ. गो. बा. खेर यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान झाले. त्यांच्या भाषणाचा विषय ‘हिंदूधर्म आणि ब्राह्मणांचे गुरुत्व’ हा होता. त्यांनी आपल्या भाषणात ‘ज्ञानात, मोक्ष:’ यासंबंधी आपले विचार मांडले. हिंदूधर्म हाच एक सर्वांगाने परिपूर्ण आणि जगात मान्य होणारा धर्म आहे असे सांगून त्याचे महत्त्व वर्णन केले.

१८९३ ते १९०३ ही दहा वर्षे सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाची बालपणाची वर्षे होत. लहान बाळ जसे प्रारंभी नुसते वाढतच जाते व नंतर चालू-बोलू लागते, त्याप्रमाणे या दहा वर्षात उत्सवांची संख्या खूप झपाट्याने वाढत गेली. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर इतर प्रांतात आणि बृहन्महाराष्ट्रातही लहानसहान गावापर्यंत याचे लोण पोचले. उत्सवाचे प्रमुख अंग जे मेळे त्यांचा प्रारंभ दुसर्‍या-तिसर्‍या वर्षापासूनच झाला. व्याख्याने, पुराणे, प्रवचने, कीर्तने यांच्याशिवाय तर उत्सवाच्या अस्तित्वाची जाणीवच होत नसल्याने यांची जोड उत्सवाला अगदी आरंभापासूनच होती. मेळे, व्याख्याने, कीर्तने यांच्या स्वरूपात पुढे कालमानाप्रमाणे बदल घडत गेला, तरी पण प्रारंभी यांचे स्वरूप प्रामुख्याने धार्मिक विचारांचेच असल्याने ते तात्कालीन शासनाच्या नजरेवर येणारे नव्हते. मुंबईमध्ये दंगा नुकताच होऊन गेल्यामुळे १८९४-९५ या दोन वर्षात तेथील पोलीस कमिशनरने कसून चौकशी केली तरी देखील त्याला त्यात काहीच वावगे न दिसल्यामुळे त्याने उत्सवाला हरकत घेतली नाही. त्यामुळेच मुंबईमध्ये गणेशोत्सवाने चांगलेच मूळ धरले. १८९७ मध्ये लो. टिळकांच्यावर राजकीय अभियोग झाला, त्यांना शिक्षा झाली आणि इतरत्र या अभियोगाचे सरकारी दडपशाहीचे सत्र सुरू झाले. याकारणाने वक्त्यांच्या भाषणांना व मेळ्यातील गाण्यांना धार चढत चालली तरी तिची तीक्ष्णता बेताबेताचीच होती. उत्सवातील चर्चेचे मुख्य विषय हिंदू धर्म, त्याचे स्वरूप, त्याची सुधारणा आणि हिंदू धर्म प्रसार हेच असत.

सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाचा दुसरा कालखंड १९०३ ते १९२० पर्यंतचा अठरा वर्षांचा असून त्यात तीन विभाग पडतात. १९०८ मध्ये लो. टिळकांना तुरुंगात डांबून ठेवीपर्यंतचा पहिला भाग, १९०८ ते १९१४ हा टिळक सुटून येईपर्यंतचा दुसरा भाग, आणि टिळकांच्या सुटकेपासून त्यांच्या कैलासवासापर्यंतचा तिसरा भाग असे ठोकमानाने तीन भाग दिसून येतात. या तीन भागांपैकी पहिला भाग सर्व अतिशय गाजला. भाद्रपद महिना येण्याच्या आधीच १-२ महिने मेळ्यांच्या व इतर कार्यक्रमांच्या पूर्वतयारीची जोरदार धांदल उडे आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दहा दिवसांत सगळे वातावरणच उत्सवातील कार्यक्रमांच्या घोषणांनी दुमदुमून जाई. हिंदूधर्म सुधारणा संघटना, धर्मप्रसार वगैरे विषय मागे पडले तरी त्यांचा लोप झालेला नव्हता. त्यांचा विचार यथापूर्व चालूच होता, तरी पण स्वदेशी, बहिष्कार, मद्यपान-निषेध या विषयांवर विशेष भर दिला जाऊ लागला.

धार्मिक चर्चात्मक व्याख्याने त्या त्या वक्त्यांची चालूच होती. त्या वक्त्यांनी आपली दिशा बदलली असे नसून स्वदेशी व बहिष्कार यांचा प्रचार करणारे नवे व्याख्याते पुढे येऊन जुन्या व्याख्यात्यांत ही नवी भर पडली. यातील नव्या कल्पनांचे उदाहरण म्हणजे श्री. अंताजी दामोदर काळे यांचा ‘पैसा फंडा’च्या कल्पनेचा उल्लेख करण्याजोगा आहे.

श्री. काळे यांना १८९९ च्या दुष्काळातील हृदयद्रावक दृष्य पाहून ‘पैसाफंडा’ची कल्पना सुचली. आणि तिचा त्यांनी पाच-सहा वर्षे प्रचार केला. १९०५ मध्ये ‘पैसा फंडा’ला अधिकृत असे स्वरूप आले आणि पैसा फंड मंडळाची निर्मिती होऊन पैसा फंडाचा प्रसार जोराने सुरू झाला. गणेशोत्सवात त्याच्या आधीपासून जो स्वदेशीचा उपदेश चालू होता त्याला या पैसा फंडाच्या कल्पनेने दुजोराच मिळाला. गणपती उत्सवातील विषयात ‘पैसा फंडा’वर व्याख्याने होऊ लागली आणि पैसा फंड जमविण्यात येऊ लागला. बंगालच्या चळवळीमुळे स्वदेशीचा मूळ पाया त्या प्रांतात घातला गेला असला तरी महाराष्ट्रात स्वदेशीचा प्रचार कै. सार्वजनिक काकांचे वेळेपासूनच चालू होता. त्या प्रचाराला गणेशोत्सव हे उत्तम असे साधन मिळाले. मात्र प्रारंभीच्या स्वदेशीच्या उपदेशाला बहिष्काराची जोड नव्हती. ती मात्र बंगालच्या चळवळीमुळे मिळून स्वदेशी आणि बहिष्कार यांचा संयुक्त प्रचार सुरू झाला. १९०५ सालापासून गणेशोत्सवात परदेशी मालावर – विशेषत: साखर व कापड या दोन जिनसांवर बहिष्कार अतिशय निष्ठापूर्वक घालण्यात येऊ लागला. या स्वदेशी आणि बहिष्कार याबद्दल लोक शपथा घेऊ लागले.

अशा रीतीने श्रीगणेशोत्सवाच्या आरंभीच्या कार्यक्रमात स्वदेशी माल वापरणे, परदेशी मालावर बहिष्कार घालणे आणि ‘पैसा फंड’ जमविणे ही प्रभावी कार्य प्रामुख्याने होत असत.

श्रीगणेश मूर्तींचे विडंबन

श्रीगणपती ही आपणा हिंदूंची अत्यंत पूज्य अशी देवता आहे. तिचे स्वरूप शुद्ध कसे असावे याबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. अथर्ववेदात श्रीगपत्यथर्वशीर्षात पुढीलप्रमाणे वर्णन आहे-

एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्‌।

रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्‌।।

रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्‌।।

रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम्‌।।

आपण गणेश चतुर्थीला ज्या मूर्तीचे पूजन करतो त्याचे नाव ‘सिद्धिविनायक’ असे आहे व त्याच्या पूजेतील ध्यान, मंत्रात शुद्ध स्वरूप कसे असावे हे सांगितले आहे.

एकदन्तं शूर्पकर्ण गजवक्त्रं चतुर्भुजम्‌।

पाशांकुशधरं देवं ध्यायेत्‌ सिद्धिविनायकम्‌।।

कोंकणी लोक गीतात खालीलप्रमाणे वर्णन आढळून येते.

गण चालला शिवपूजेला।

गणाचा घोडा उंदीर झाला।।

गण म्हणजे गणपती व त्याचे वाहन उंदीर असे वरील गीतावरून दिसते. अनेकांची अशीच कल्पना आहे. उंदरावर आरुढ झालेल्या काही मूर्ती आढळतात. पण ही अशी कल्पना कशी निर्माण झाली हे एक रहस्यच आहे. ‘श्रीगणपति स्तोत्रा’त सहाव्या अध्यायात शेवटच्या ओळीत ‘‘जानाम्यतो मूषक वाहन त्वाम्‌’’ असा उल्लेख आहे. पण ही स्तोत्रे वेदानंतर अनेक वर्षांनी रचलेली आहेत. तेव्हा अर्थवशीर्षात सांगितल्याप्रमाणे गणपतीचे वाहन उंदीर त्याच्या ध्वजावरील ते एक विशिष्ट चिन्हच आहे आणि तेच खरे आहे.

आजकालचे विकृत स्वरूप

प्राचीन काळी श्रीगजाननाची मूर्ती ही विकृत स्वरूपात आढळून येत नसे. पण अलीकडे या सुंदर ध्यानाचे काही वेळा विडंबन केलेले दिसून येते. असे विडंबनाचे स्वरूप तीन प्रकारांनी निर्माण केले जाते.

(१) श्रीगणेश मूर्तीस एकाद्या धंद्याचे स्वरूप देणे. उदाहरणेच द्यायची झाल्यास ती अनेक देता येतील. एका गावात पोलीसाचे गणवेशात मूर्ती तयार केलेली होती, एकाने तिला पोस्टमनच बनविले होते, एके ठिकाणी शेतकर्‍याचे वेषांत गजानन गुरे हाकीत असून श्रीसरस्वतीदेवी त्याचे पाठीमागून एका टोपलीत न्याहारी घेऊन जात असल्याचे चित्रित केले होते. अशा प्रकारे धंद्यांचे दिग्दर्शन करणारे जर गणपती निर्माण होऊ लागले तर त्या त्या धंद्याच्या अनुरोधाने लागणारी विविध हत्यारे, वस्तू त्याच्या चार हातांत शोभू लागून त्या त्या व्यवसायाला आवश्यक असणारी पार्श्वभूमी आणि बैठक यांतही बदल होणे अपरिहार्यच आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली तर ती मंगलमूर्ती ओंगळ आणि अत्यंत गलिच्छ स्वरूपात त्याच्या भक्तांस नक्कीच पहावी लागणार. मूर्तीकाराने आजपर्यंत एखादे न्हाव्याचे किंवा वहाणा शिवणारे चांभाराच्या देशांत निर्माण केलेली नाही हे केवळ त्या विघ्नहर्त्याचे सुदैवच म्हणावे लागेल! अलीकडील काही मूर्ती पाहून त्याही वेशात गणेशाला ‘अवतार’ घ्यावा लागेल. ‘कालाय तस्मै नम:’ दुसरे काय?

(२) काही वेळा मूर्तीकार मूर्ती निर्माण करताना त्यांच्या नजरेसमोर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे चित्र असते. जसे, ‘तुकाराम’ वेशात गणपती, ‘ज्ञानेश्वर’ रूप गणपती, रामाचे भूमिकेत, सुभाषचंद्र, शिवाजी महाराज वगैरे रूपांतही मूर्ती असतात. माझ्या संग्रही मुंबईच्या सार्वजनिक गणपतीचे चित्र होते. त्यांतील श्रीगणपती महात्मा गांधींचे स्वरूपात तकलीवर सूत काढीत होते. बाजूस पंडित नेहरूही आसनस्थ होते.

(३) काही काही मूर्ती चित्रपटातील लोकप्रिय दृश्यावर तयार करण्यात येतात. काही चित्रपटसंस्था जे सार्वजनिक गणपती बसवितात त्यातूनच आपल्या आगामी चित्रपटाची प्रसिद्धी करतात. उदा. ‘सेहरा’ गणपती, (बरसात) गणेश, ‘रामजोशी’ वगैरे. त्याचप्रमाणे आधुनिक पाश्चात्य पोषाखांतही मूर्ती तयार करतात. कॅरम खेळणारा धुम्रपान करणारा, इत्यादी प्रकारही आम्ही पाहिल्याचे आठवते.

कधी कधी निर्मात्याला असे वाटते की, नेहमी नेहमी उंदरावर बसणारा गणपती का म्हणून तयार करावा? मातीचा झाला म्हणून, काय त्याला भावना नाहीत? त्यालाही एकाच वाहनाचा कंटाळा येणारच. आपण नाही का नवीन नमुन्यांची अत्याधुनिक वेगवान वाहने वापरीत! मग त्या बिचार्‍या गणपतीवरच काय म्हणून उंदीर वाहन वापरण्याची सक्‍ती? झाले. आमच्या मूर्तीकाराला गणपतीची दया आली. त्याने महागडी वाहने-मोटार सायकल, स्कूटर वगैरे त्याला वापरण्यास भागच पाडले! सकल विद्यानिधी असूनही बिचार्‍या गजवदनाला चार घोडे असणार्‍या रथाचे सारथ्य करण्याचे नशिबात आले. ‘कर्मणो गति गहन:’ दुसरे काय.

त्याचप्रमाणे विद्येच्या माहेरघरांत-पुण्यनगरीत काही वर्षांपासून काही सार्वजनिक गणपतींना विविध ढंगाचे, रंगाचे पोषाख, चढविले जातात असे समजते. उदा.-सफेद आभ्य्रातील गणपती, गोरक्षनाथ गणपती, प्रसिद्ध मल्लाच्या आणि शिकारी वेशातील गणपती. अशा प्रकारचे अनेक पोषाख गणराजाला चढविले जातात आणि त्याला अनुरूप अशी सभोवतालच्या सजीव पशुपक्षी आणि वनस्पतीही ठेवतात.

यावरील सर्व प्रकारांकडे जर आपण कलात्मक दृष्टिकोनांतून पाहिले तर आपण मूर्तीकाराचे आणि व्यवस्थापक मंडळाचे कौतुकच करतो. त्यांत आपल्याला काहीच आक्षेपार्ह वाटत नाही. पण जर का आपण भाविक नजरेने, एक हिंदू देवता आणि विधियुक्त मंत्राने प्राणप्रतिष्ठा केलेली उत्सवमूर्ती या स्वरूपात तिकडे पाहिले तर निश्चितपणे आपल्या धार्मिक मनाला तडा जातो, मूर्तीचे विडंबन केल्याचे वाटते. सनातनी आणि पुराणमतवादी जी मंडळी आहेत त्यांना मनोमन असे वाटते की, त्या पवित्र मंगलमूर्तीची अशी विटंबना होणे योग्य नाही. त्यांच्या मताने त्यांना त्या मूर्ती या देवता न वाटता प्रदर्शनातील चित्रेच वाटतात. त्यांच्या धार्मिक भावना दुखावतात. शिवाय लोकांच्या धार्मिक समजांनाही जबरदस्त धक्का बसतो. ज्ञान देणार्‍या आणि सर्व शुभकार्यात ज्या देवतेला अग्रपुजेचा अग्र हक्क आज अनेक वर्षे देण्यात आला आहे, अशा या मंगलमूर्तीचे त्याच्याच उत्सवात असे भयानक विडंबन होणे ही गोष्ट अत्यंत अनिष्ट अशी आहे. पारतंत्र्याच्या काळात त्या वेळचे ब्रिटिश सरकार, अशा काही गोष्टी जर त्यांच्या अधिकार्‍यांच्या लक्षात कोणी आणून दिल्या तर त्यांना ताबडतोब आळा घालीत असे. आता लोकशाही स्वराज्य आहे, तेव्हा आता तर अशा गोष्टीची जपणूक शासनाने फारच काटेकोरपणाने केली पाहिजे असे मला वाटते. पण वाटून उपयोगच काय? अहो, आमचे शासन पडले धर्मातीत.

पुण्यात गणेशमूर्तीचे विडंबन होऊ नये म्हणून काही प्रयत्न केलेले वाचले आहेत. तिकडे आता पाश्चात्य पोशाखांतील आणि विडंबन केलेल्या मूर्तीवर बंदी घालण्यात आल्यामुळे अशा विकृत मूर्ती तयार करण्यास पुष्कळसा आळा बसलेला आहे. श्रीगजाननाच्या मूर्ती पूर्व परंपरेस आणि रूढीस धरूनच असाव्यात, त्यांना अधार्मिक स्वरूप देऊन मूर्तीची विटंबन करू नये असे शासनाने प्रसिद्ध केलेले आहे. काही वेळा अशा विडंबन झालेल्या मूर्तीच्या सार्वजनिक प्रदर्शनास बंदीही करण्यात आलेली आहे, असा उल्‍लेख ‘‘श्रीगणेशोत्सवाची साठ वर्षे’’ या ग्रंथात आहे.

निवेदक : श्री. बाळासाहेब बगाडे

साभार: ‘प्रसाद’ ऑगस्ट १९६८

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply to R Narayanan Cancel reply

This Post Has 17 Comments

 1. विडंबनाचा मुद्दा २००% पटलाय. बाकी लेखही उत्तम.

 2. लेखाबाबत मत नोंदवले.
  पण
  मला पुनश्च व्हाट्सअप गृृपवरुन रिमूव का केले ते कळले नाही.
  कारण कळेल काय?

 3. अतिशय उद्बोधक असा लेख वाचायला मिळाला.
  धन्यवाद !

 4. khupach mahttwachi mahiti milali. Mukhya mhanje ha itka lokapriya utsw suru honyamagchi waishishtypurna samajik paristhiti mothi vilakshan ani lakshat ghenyasarkhi aahe.
  Dhanyawad !

 5. इतका जुना आणि माहितीपूर्ण लेख वाचायला मिळाला,धन्यवाद. हा लेख फेसबुकवरच्या ग्रुपवर मला शेअर करता येईल का? मी प्रयत्न केला पण ग्रुपवर करायला जमत नाही. म्हणून विचारले :: स्वाती काळे

 6. सभासद झाल्यावर पुनश्चच्या वाचनाची सुरुवात या लेखाने झाली. 50 वर्षांपूर्वीचा अतिशय माहितीपूर्ण लेख वाचायला मिळाला, धन्यवाद.

 7. Very few content is available here, even to subscribers. Website should have proper index, menus etc. so that we can have a look at it at a glance. When we have no idea about what has been posted before, WHAT are we supposed to SEARCH ?

  1. तुम्ही २०१८ चे सभासद असल्यामुळे १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ याकाळात प्रसिद्ध होणारे लेख आपल्याला वाचता येतील. दर आठवड्यात दोन लेख अशी सध्याची वारंवारता आहे. त्याशिवाय मी काही लेख अवांतर या सदराखाली देतो. तेही तुम्ही वाचू शकता. २०१७ च्या लेखांची सुची website वर उपलब्ध आहे. २०१८ चे तेव्हढे लेख झाले की त्यांचीही सुची करू. अजून काही शंका असतील तर जरुर विचारा. त्याचे स्वागत आहे.

 8. I have a dream: learn this wondwrfull language.
  I’m brazilian and I don’t understand this text.
  Jay Ganesha!

  1. thanks for the comment. u can learn this language. if u r interested, mail me back.

 9. वाह, १९६८ चा लेख वाचायला मिळाला…

  1. कृपया आवडलेले लेख समाजमाध्यमांवर शेअर करा जेणेकरून लोकांना ते वाचायला मिळतील. आपला उद्देश जुने चांगले लेख जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. या लेखात तर छान डोळे उघडणारी माहिती आहे.

 10. A very detailed and interesting article with so many hitherto unknown facts about the celebration of Ganeshotsav . Kudos to the writer who has painstakingly gathered all the information. This celebration has spread even in our state TN. As the writer has rightly pointed out in all such celebration Bhakti is lacking and unwanted elements have crept into.

  1. great to see that u r reading marathi articles. how come? very much interested to know 🙂
   also do share such articles on social media which u find interesting. our moto is to reach upto max readers. thanks…