मंदिराला उद्ध्वस्त केल्यानंतर तिथे वादग्रस्त ढांचा उभारण्यात आला, या महत्त्वाच्या पूर्वपक्षावर रामजन्मभूमी आंदोलनाचे सारतत्त्व आधारलेले आहे. या आंदोलनाच्याही पूर्वी अयोध्येत पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले होते. प्रो. बी. बी. लाल यांच्या चमूने, ज्यात डॉ. के. के. मोहम्मदही होते, जे पुरातत्त्वीय पुरावे गोळा केलेत, त्याने सिद्ध केले की, त्या वादग्रस्त जागी आधीपासून अस्तित्वात असलेल्या वास्तूचा विध्वंस करण्यात आला होता.
मूळ मल्याळम भाषेत लिहिलेल्या ‘जान एन्ना भारतीयन’ (मी, भारतीय) या पुस्तकात डॉ. मोहम्मद यांनी इतिहासाचे पुनर्विलोकन करण्याच्या शास्त्रीय पद्धतीची संपूर्ण प्रक्रिया विशद केली आहे. अयोध्येच्या विषयावर चर्चा करताना किंवा तो मांडताना या पुस्तकातील प्रस्तुत काही अंश महत्त्वाचे सिद्ध होऊ शकतात. हा लेख ऑर्गनायझर या साप्ताहिकात प्रसिद्ध झाला आहे. त्याचा हा अनुवाद.

हा भाग सांगितल्याशिवाय माझ्या जीवनाची कहाणी पूर्ण होणार नाही. यात कुणाच्या धार्मिक भावना दुखविण्याचा उद्देश नाही किंवा दुसर्‍या कुणाच्या भावना भडकविण्याचाही. या दोन्हींसाठी या लिखाणाचा कुणीही वापर करू नये.
१९९० साली अयोध्येचा मुद्दा चांगलाच तापला होता. त्यापूर्वी, १९७८ साली पुरातत्त्वशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला अयोध्येचे सर्वेक्षण करण्याची संधी मिळाली. प्रो. बी. बी. लाल यांच्या नेतृत्वात जी चमू अयोध्येचे सघन सर्वेक्षण करणार होती त्या चमूचा दिल्लीच्या स्कूल ऑफ आर्किऑलॉजीचा एक विद्यार्थी म्हणून मीही एक सदस्य होतो. तिथे आम्हाला पूर्वी अस्तित्वात असलेल्या मंदिराच्या स्तंभांना आधार देणारे विटांचे पायवे सापडले. असले काही आढळणे वादग्रस्त असेल असे त्या वेळी कुणालाही वाटले नाही. पुरातत्त्वीय तज्ज्ञ म्हणून पुरेशा ऐतिहासिक दृष्टिकोनातून आम्ही सर्व वस्तुस्थिती तपासली.

बाबरी मशिदीच्या भिंतींमध्ये मंदिराचे स्तंभ चिणलेले तिथे होते. हे स्तंभ ब्लॅक बसॉल्ट नावाने ओळखल्या जाणार्‍या एका विशिष्ट दगडांपासून तयार केलेले होते. या स्तंभाच्या तळाशी ‘पूर्ण कलश’ कोरलेला होता. ११ व्या व १२ व्या शतकात अशी पद्धती होती. मंदिराच्या शिल्पशास्त्रात पूर्ण कलशाला समृद्धीच्या आठ पवित्र प्रतीकांपैकी एक मानले जाते. १९९२ साली ही मशीद उद्ध्वस्त होण्यापूर्वी एक-दोन नाही, तर असे १४ स्तंभ तिथे होते. मशीद पोलिस संरक्षणात असली आणि आत कुणालाही जाण्याची परवानगी नसली तरी आम्ही संशोधन चमूचे सदस्य असल्याने आम्हाला कुणी रोखले नाही. त्यामुळे मी त्या स्तंभांना अगदी जवळून नीट न्याहाळू शकलो. प्रो. बी. बी. लाल यांच्या नेतृत्वातील चमूत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेचे अधिकारी होते, तसेच आम्ही स्कूल ऑफ आर्किऑलॉजीचे १२ विद्यार्थी होतो. आम्ही अयोध्येत विविध ठिकाणी उत्खनन करत दोन महिने घालविले. मीर, जो बाबरचा सरसेनापती होता त्याने उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचेच अवशेष वापरून ही मशीद बांधली. हे मंदिर एकतर त्याने उद्ध्वस्त केलेले असावे अथवा दुसर्‍या कुणीतरी आधीच उद्ध्वस्त केलेले असावे.

मशिदीच्या मागे तसेच बाजूला उत्खनन करताना विटांचा चबुतरा आढळला. यावर ब्लॅक बसॉल्टचे ते स्तंभ उभे असावेत. या वस्तुस्थितीच्या आधारे मी १९९० साली असे विधान केले होते की, बाबरी मशिदीच्या खाली एखादे मंदिर अस्तित्वात असावे. त्या वेळेपर्यंत वातावरण चांगलेच तापलेले होते. दोन्ही बाजूंकडील मध्यममार्गी मंडळी तडजोड करण्याची धडपड करीत होती. परंतु, कडक भूमिका घेतलेल्या विश्‍व हिंदू परिषदेने रामजन्मभूमीचा मुद्दा आधीच आपल्या विषयपत्रिकेवर घेतलेला होता. मुस्लिमांमध्ये जे मध्यममार्गी होते त्यांनी विचार करणे सुरू केले होते की, अयोध्या हिंदूंना सोपवून हा वाद संपविणे योग्य राहील. काही मुस्लिम नेतेदेखील याच मताचे होते; परंतु हे सांगण्याची कुणी हिंमत दाखविली नाही. मला चांगले लक्षात आहे की, काही मुस्लिम नेत्यांचे म्हणणे होते की, अयोध्या हिंदूंना सोपविल्यास विश्‍व हिंदू परिषदेच्या शिडातील वाराच काढून घेण्यासारखे होईल. या अशा आवाजांना त्यावेळी महत्त्व मिळाले असते तर वातावरण निवळण्यास मदतच झाली असती. परंतु, काही डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी विरोध करणार्‍या मुस्लिमांची बाजू उचलून धरली आणि संपूर्ण प्रकरणाचा विपर्यास करून टाकला.
एस. गोपाल, रोमिला थापर आणि बिपन चंद्र यांच्या नेतृत्वाखालील काही इतिहासकारांनी रामायणाच्या ऐतिहासिकतेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणे सुरू केले. रामायण घडलेच नाही, असा त्यांचा दावा होता. त्यांचा मुद्दा होता की, १९व्या शतकापूर्वी मंदिर उद्ध्वस्त केल्याची कुठेच नोंद नाही. त्यांनी तर असेही घोषित करून टाकले की, अयोध्या हे मुळात बौद्ध व जैनांचे केंद्र होते. या गटाला प्रो. आर. एस. शर्मा, अक्तार अली, डी. एन. झा, सूरज भान, इरफान हबीब यासारखे लोक येऊन मिळाल्याने या गटाची ताकद आणखीनच वाढली. या सर्वांमध्ये सूरज भान हेच काय ते एकमेव पुरातत्त्व तज्ज्ञ होते. आर. एस. शर्मांच्या गटातील इतिहासकारांनी बाबरी मशीद कृती समितीच्या बाजूने तज्ज्ञ म्हणून अनेक अधिकृत बैठकींमध्ये भाग घेतला.

भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे (आयसीएचआर) अध्यक्ष असलेल्या इरफान हबीब यांच्या नेतृत्वाखाली बाबरी मशीद कृती समितीच्या अनेक बैठकी झाल्यात. आयसीएचआरचे सदस्य-सचिव एम. जी. एस. नारायणन यांनी आयसीएचआरमध्ये बाबरी मशीद कृती समितीच्या बैठकी आयोजित करण्यावर आक्षेप घेतला. पण, इरफान हबीबने त्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केले. वामपंथी इतिहासकारांच्या या गटाचा वृत्तपत्रे, नियतकालिके यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. त्यामुळे अयोध्येच्या वस्तुस्थितीवर प्रश्‍नचिन्ह लावणार्‍या त्यांच्या प्रकाशित लेखांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संभ्रम उत्पन्न झाला. हे इतिहासकार आणि नियतकालिके जणू काही त्यांची मुखपत्रेच झाली होती आणि ज्या मध्यममार्गी मुसलमानांची या वादाच्या तोडग्याला सहमती होती, त्यांना परावृत्त करण्यात हीच मंडळी जबाबदार होती. दुर्दैवाने या वातावरणामुळे बाबरी मशीद कृती समितीला कायदेशीरपणा प्राप्त झाला. बाबरी मशीद कृती समिती युद्धखोर झाली. सामान्य मुस्लिम जो एका वळणावर हिंदूसाठी आपला दावा सोडून देण्याच्या कल्पनेशी सहमत होता, तो मुस्लिम आता हळूहळू आपला विचार बदलवू लागला.

त्याचा परिणाम असा झाला की, आता मध्यममार्गी मुसलमानदेखील म्हणू लागले की, आम्ही मशिदीवरचा दावा सोडू शकत नाही. कम्युनिस्ट इतिहासकारांच्या ढवळाढवळीने त्यांची बुद्धी भरकटत गेली. या दोन गटांच्या एकत्रित खोडसाळपणामुळे तोडगा निघण्याची दारे नेहमीसाठी बंद झाली. ही तडजोड मान्य झाली असती तर ते या देशातील हिंदू-मुस्लिम संबंधाच्या इतिहासात एक महत्त्वाचे व ऐतिहासिक वळण ठरले असते. त्यामुळे इतरही वादग्रस्त मुद्यांवर स्वाभाविक तोडगा काढणे शक्य झाले असते. या वाया गेलेल्या संधीने एक गोष्ट स्पष्ट झाली की, केवळ हिंदू व मुसलमानांमधील कट्टरवादीच नाही, तर हे कम्युनिस्ट कट्टरवादीदेखील देशासाठी धोकादायक आहेत. मी मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष बघितले आहेत, हे अयोध्येच्या वस्तुस्थितीबाबतचे माझे विधान १५ डिसेंबर १९९० रोजी प्रकाशित झाले. तोपर्यंत दोन्ही बाजूंकडील इतिहासकार व पुरातत्त्व तज्ज्ञ यांच्यात तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते.
मी चेन्नई येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणमध्ये उपअधीक्षक म्हणून कार्यरत होतो. त्या वेळी इरावतम महादेवन (आयएएस) यांचा इंडियन एक्स्प्रेसमधील एक लेख माझ्या वाचनात आला. त्यांनी सिंधू शिलालेखांबाबत बरेच लिखाण केले आहे आणि एक मान्यताप्राप्त विद्धान म्हणून त्यांची कीर्ती आहे. निवृत्तीनंतर ते प्रचंड खपाच्या दिनमणी या तमिळ वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम बघायचे.

त्यांनी लिहिले होते : खाली मंदिराचे अस्तित्व आहे याबाबत इतिहासकारांना अजूनही शंका असेल तर, ती शंका दूर करण्यासाठी पुन्हा एकदा उत्खनन व्हायला हवे. परंतु, एक ऐतिहासिक चूक दुरुस्त करण्यासाठी ऐतिहासिक वास्तू (बाबरी मशीद) पाडायलाच हवी, असे म्हणणे चूक आहे. मी त्यांच्या समतोल मताचा आदर केला आणि त्यांची प्रशंसा करणारे पत्र लिहिले. त्यात मी उल्लेख केला की, १९७६-७७ साली तिथे ज्या चमूने उत्खनन केले, त्याचा मी सदस्य होतो. ‘‘एका ऐतिहासिक चुकीच्या दुरुस्तीसाठी बदला म्हणून एखादे स्मारक उद्ध्वस्त करणे चूक आहे, हे तुमचे म्हणणे स्तुत्यच आहे. तुम्ही तुमचे उदार मत मांडले आहे.’’ त्यांना पत्र मिळाले. लगेच ते तमिळनाडू सचिवालयाच्या क्लाईव्ह इमारतीतील माझ्या कार्यालयात आले. माझे पत्र प्रकाशित करण्याची ते परवानगी मागू लागले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही सरकारी नोकर असल्यामुळे सरकारच्या परवानगीशिवाय अशा संवेदनशील मुद्यावर लिहिणे आत्महत्या करण्यासारखे आहे. तुमचे वरिष्ठ तुम्हाला परवानगी देणार नाही, हे निश्‍चित आहे. असे असले तरी सत्याला झाकून ठेवायला नको. योग्य तो निर्णय घ्या.’’

आम्ही पुरातत्त्व अधीक्षक बी. नरसिंहय्या यांच्याशी चर्चा केली आणि ठरविले की, अशी महत्त्वाची माहिती झाकून ठेवणे योग्य नाही. प्रो. बी. बी. लाल यांच्या नेतृत्वात आम्ही विटांचा चबुतरा शोधून काढला होता, तेव्हा नरसिंहय्या हे महाअधीक्षक होते. परंतु आम्हाला कट्टरवादी हिंदूंच्या हातातील खेळणे व्हायचे नव्हते. सर्व प्रकारच्या जातीयवादी शक्तींपासून आम्हाला सारखे अंतर ठेवायचे होते. शेवटी, इंडियन एक्स्प्रेसच्या सर्व आवृत्त्यांमध्ये ‘संपादकांना पत्र’ या सदरात माझे ते विधान प्रकाशित झाले. तद्वतच, ते इतर भाषेतील सर्व वृत्तपत्रांमध्येही आले. मला अनेक फोनकॉल्स आलेत- धमकविणारे आणि अभिनंदन करणारेही. परंतु, ठरविल्याप्रमाणे माझ्या भोवती जे काही चालले होते, त्यापासून मी स्वत:ला अलिप्त ठेवले. त्या काळात चेन्नईत आम्ही युनेस्को प्रायोजित सिल्क रूट परिषद आयोजित केली होती. के. टी. नरसिंहन आणि मी याचे आयोजक होतो. दिल्लीवरून संयुक्त संचालक (संस्कृती) आर. सी. त्रिपाठी आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे महासंचालक एम. सी. जोशी त्यात भाग घेण्यासाठी आले होते. परिषद उत्तम रीतीने पार पाडल्याबद्दल दोघांनीही माझे कौतुक केले. डॉ. जोशी म्हणाले, ‘‘जर अलिगडचा तो प्राध्यापक इथे असता तर त्याला लाजीरवाणे झाले असते.’’ ते डॉ. इरफान हबीबबाबत बोलत होते. डॉ. जोशींनी माझी वैयक्तिक माहितीदेखील डॉ. त्रिपाठींना दिली.

त्यानंतर डॉ. जोशी म्हणाले, ‘‘आता आम्हाला तुमच्या प्रेस स्टेटमेंटबद्दल प्रश्‍न आहेत. सरकारच्या परवानगीशिवाय तुम्ही या अशा महत्त्वाच्या मुद्यांवर सार्वजनिक पत्रक कसे काय काढले? आम्ही तुम्हाला या क्षणी चौकशी प्रलंबित (पेंडिंग इक्वायरी) ठेवून निलंबित करीत आहोत.’’
मी म्हणालो, ‘‘सर, मला माहीत होते की, या अशा बाबतीत मला परवानगी मिळणार नाही. मी लोकहितास्तव खरे बोललो.’’
मी त्यांना एक संस्कृत वचनही ऐकविले- ‘लोकसंग्रामेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि|’
‘‘तुम्ही मला शिकवता का? मी अलाहाबादचा ब्राह्मण आहे.’’ त्रिपाठी ओरडले. पुढे म्हणाले, ‘‘मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता निलंबित करतो.’’ मी शांतपणे म्हणालो, ‘‘स्वधर्मे निधनं श्रेय:|’’ (म्हणजे कर्तव्य करीत असताना अगदी मृत्यूदेखील श्रेयस्कर असतो.) त्रिपाठी शांत झाले व म्हणाले, ‘‘मोहम्मद, तुमची ठाम भूमिका स्तुत्य आहे. परंतु, तुमच्यावर कारवाई करावी म्हणून वरून माझ्यावर दबाव आहे.’’ मी म्हणालो, ‘‘मला माहीत आहे सर, सर्व परिणामांचा पूर्ण विचार करूनच मी ते स्टेटमेंट जारी केले होते.’’ तरीही जोशींचे काही समाधान होईना. ते म्हणाले, ‘‘तुम्ही वृत्तपत्रात तुमचे नाव, पद, पत्ता का टाकले?’’ मी म्हणालो, ‘‘मी विचार केला की ते आवश्यक आहे. कारण, कुणी असा विचार करू नये की हा मोहम्मद कुणी क्षुल्लक व्यक्ती आहे.’’
दुसर्‍या दिवशी महादेवन त्या दोघांना भेटले आणि त्यांनी माझा निलंबनाचा आदेश बदलवून माझी बदली चेन्नईहून गोव्याला केली.

६ डिसेंबर १९९२ रोजी गोव्यातील बॉम जेझस चर्चच्या रेक्टरशी चर्चा करीत होतो. याच चर्चमध्ये सेंट झेव्हियरचे पवित्र अवशेष ठेवले आहेत. तेवढ्यात बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्याची बातमी आली. त्याच्या पुढील वर्षी बाबरी उद्ध्वस्त करण्याच्या पहिल्या वर्धापनदिनी कट्टरपंथी हिंदू ओल्ड गोव्यातील चर्चेसवर हल्ला करतील, अशी भीती फादर रिगो यांनी बोलून दाखविली. आम्ही दोन चमू तयार केल्या. एका चमूने बॉम जेझस चर्चमध्ये फादर रिगो यांच्या नेतृत्वात मुक्काम ठोकला आणि दुसरी चमू माझ्या नेतृत्वात सेंट कॅथेड्रल आणि सेंट आसिसी येथे रात्रभर पहारा देत बसलो. भारतीय धर्मनिरपेक्षतेचा तो एक रोमांचक अनुभव होता. राष्ट्रीय स्मारकांच्या रक्षणासाठी मुस्लिम, हिंदू व ख्रिश्‍चन पहारा देत उभे होते.
अयोध्येतील विध्वंसात जी अत्यंत महत्त्वाची शिल्पाकृती बाहेर आली, ती म्हणजे विष्णुहरि शिला. या शिलालेखावर ११-१२व्या शतकातील संस्कृतमध्ये नागरी लिपीत लिहिले होते की, हे मंदिर, ज्याने वाली व दशमुखीला (रावण) ठार केले, त्या विष्णूला (राम हा विष्णूचा अवतार आहे), समर्पित आहे.

१९९२ साली डॉ. वाय. डी. शर्मा व डॉ. के. एम. श्रीवास्तव यांनी जेव्हा घटनास्थळाचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना विष्णूचे अवतार, शिव, पार्वती इत्यादींच्या मातीच्या लहान लहान मूर्ती आढळल्या. या कुशाण काळातील (१०० ते ३०० इ. स.) होत्या. २००३ साली जेव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा उत्खनन करण्यात आले तेव्हा मंदिराच्या स्तंभांना आधार देण्यासाठी निर्मित ५० हून अधिक विटांचे चबुतरे सापडले. साधारणत: मंदिराच्या शिखरावर असणारे ‘अमलक’ आणि अभिषेकाचे तीर्थ वाहून जाण्यासाठी असलेले ‘मकर प्रणाली’देखील उत्खननात सापडले. बाबरी मशिदीच्या समोरील परिसर समतल केल्यानंतर मंदिराशी संबंधित २६३ शिल्पाकृती सापडल्याचा अहवाल उत्तरप्रदेशचे पुरातत्त्व संचालक डॉ. रागेश तिवारी यांनी सादर केला.

उत्खननात उघड झालेले पुरावे तसेच ऐतिहासिक शिल्पाकृतींचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण या निष्कर्षाप्रत आले की, बाबरी मशिदीच्या खाली एखादे मंदिर अस्तित्वात होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठदेखील याच निष्कर्षावर पोहोचले. उत्खनन निष्पक्ष व्हावे म्हणून १३१ उत्खननकर्त्यांमध्ये ५२ मुस्लिमांना घेतले होते. एवढेच नाही, तर बाबरी मशीद कृती समितीच्या पुरातत्त्वीय इतिहासकार व प्रतिनिधींच्या (नामे सूरज भान, मंडल, सुप्रिया वर्मा व जया मेनन) उपस्थितीत उत्खनन करण्यात आले. उत्खनन याहून अधिक निष्पक्ष करता आले असते काय?

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वामपंथी इतिहासकारांच्या कोलांटउड्या सुरूच होत्या. या आधीही त्यांनी आपल्या भूमिका बदलल्या होत्या आणि त्याची त्यांना खंतही नव्हती. या त्यांच्या सततच्या भूमिका बदलण्यामागचे कारण म्हणजे बाबरी मशीद कृती समितीचे प्रतिनिधी म्हणून जे त्या उत्खननाला उपस्थित होते ते फक्त इतिहासकार होते. त्यातल्या तीन-चार जणांना पुरातत्त्वशास्त्राचे थोडेफार ज्ञान होते. असे असले तरी पुरातत्त्वशास्त्राचा जो परीघ आहे, त्याबाबत मात्र ते सर्व अज्ञानीच होते. त्यामुळे प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. बी. आर. मणी यांच्यासारख्यांपुढे तर ते केवळ खुजेच होते. बाबरी मशीद कृती समितीचे प्रतिनिधित्व करणारे जेएनयू व अलिगड विद्यापीठातील जे कुणी होते, त्यांना पुरातत्त्व शास्त्राचे ज्ञान नव्हते. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे जे शास्त्रज्ञ होते, त्यांनी या लोकांना काही किंमतच दिली नाही. पुरातत्त्व विभागाला सत्य आणि निष्पक्षपणा सर्वोपरी होता.

दरम्यान, विहिंपशी जवळीक सांगणार्‍या पुरातत्त्व विभागाच्या एका अधिकार्‍याने डॉ. मणी यांचे स्थान बळकवण्याचा प्रयत्न केला. यात तो यशस्वी झाला असता तर मंदिराचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या उत्साहात अयोध्या एका वेगळ्या वादात सापडली असती. परंतु, पुरातत्त्व विभाग नमला नाही आणि डॉ. मणी यांना पदावरून काढण्यात आले नाही. पुरातत्त्व विभागाने पुन्हा एकदा आपला निष्पक्षपणा सिद्ध केला. केंद्रात भाजपा सत्तेत असूनही पुरातत्त्व विभागाने जवाहर प्रसाद नामक भाजपा आमदाराचा, मंदिराचा विस्तार करण्याचा प्रयत्न मोठ्या धाडसाने थांबविला, म्हणून बाबरी मशीद समितीचे एक प्रमुख नेते सय्यद शहाबुद्दीन यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांना पत्र लिहून पुरातत्त्व विभागाचे कौतुक केले. हे शासकीय पत्र पुरातत्त्व विभागाच्या महासंचालकांनी मला अग्रेषित केले. मी सय्यद शहाबुद्दीन यांना सविस्तर उत्तर लिहिले. त्यात अयोध्या मुद्याचाही उल्लेख होता. मी लिहिले की, प्रो. बी. बी. लाल यांच्या नेतृत्वात मी अयोध्या उत्खननात भाग घेतला होता आणि बाबरी मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष मी पाहिले आहेत. मी त्यांना विनंती केली की, त्यांनी हे सत्य समजून घ्यावे आणि अयोध्या प्रश्‍न सुटण्याच्या दृष्टीने मुसलमानांमध्ये अनुकूलता निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांनी मला आश्‍वस्त केले की, पुढील बैठकीत मुस्लिम नेत्यांसमोर मी ही वस्तुस्थिती मांडून चर्चा करीन. बैठकीनंतर त्यांनी मला कळविले की, मशीद हिंदूंना सोपविण्यास एकही जण तयार नाही. नंतर माझी त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. परंतु, बाबरी मशीद हिंदूंना सोपविण्यास शहाबुद्दीन तयार नव्हते.

भेटीनंतर परत येताना मी खोलवर चिंतन करीत होतो. जर भारत एक मुस्लिमबहुल सेक्युलर देश असता (तसा मुस्लिमबहुल देश कधीही सेक्युलर राहूच शकत नाही) आणि जर एखाद्या मुस्लिम नेत्याने मंदिराच्या (जे एक राष्ट्रीय स्मारक आहे) परिसरात अवैधपणे मशीद बांधण्याचा प्रयत्न केला आणि एका हिंदू अधिकार्‍याने त्याला विरोध केला, तर किती मुसलमान त्या अधिकार्‍याच्या पाठीशी उभे राहतील? भारताच्या पंथनिरपेक्ष-वृत्तीची ही महानता आहे.
अपवाद दाखविता येतील- की काही ठिकाणी मुसलमानांची सामूहिक हत्या करण्यात आली वगैरे. परंतु, सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केला असता मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो- हिंदूंमधील जातीयवाद हा काही त्यांचा मूळ स्वभाव नाही. बरेचदा एखाद्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून तो बाहेर येतो. गोधराच्या घटनेच्या संदर्भातही हे लागू आहे.

जर्मनीच्या एका आंतरराष्ट्रीय उत्खननाच्या चमूसोबत मी एकदा ओमानमधील सलाला गावी गेलो होतो. जमिनीत गाडल्या गेलेल्या अल बलिद शहराचे उत्खनन करायचे होते. तिथे मला काही केरळी लोक भेटले. ते सिमी या प्रतिबंधित संघटनेचे समर्थक होते. त्यांनी मला त्यांच्या एका कार्यक्रमाला आमंत्रित केले. त्यातील काहींना माझे अयोध्येबाबतचे विचार माहीत होते. परंतु मी त्यांच्यासमोर काही अटी ठेवल्या. मी येईन व बोलीन. माझ्या विचारांवर तुम्ही प्रश्‍न विचारू शकता. परंतु मी इथे जर्मनीच्या निमंत्रणावरून आलेलो असल्यामुळे तिथे कुठलीही अप्रिय घटना घडावयास नको. शिस्त पाळली गेली पाहिजे आणि विरोधी मताचा आदर केला पाहिजे. त्यांनी मान्य केले आणि मी तिथे रामजन्मभूमीचा विषय मांडला. भाषणाच्या प्रारंभी मी इस्लामच्या सहिष्णू काळाविषयी बोललो. पवित्र कुराणातील मी देत असलेले संदर्भ पाहून त्यांना आश्‍चर्य वाटले. नंतर मी उत्खनन व त्यात सापडलेल्या शिल्पाकृतींबाबत सविस्तर बोललो. त्यांनी अतिशय लक्षपूर्वक ते ऐकले. माझ्या भाषणाचा समारोप मी असा केला :
‘‘मुस्लिमांना मक्का आणि मदिना जसे महत्त्वाचे आहे, तसेच हिंदूंना अयोध्या. मक्का किंवा मदिना दुसर्‍यांच्या ताब्यात असल्याचा मुस्लिम विचारदेखील करू शकणार नाही. हिंदूबहुल देश असतानाही त्याचे मंदिर मुस्लिमांच्या ताब्यात असल्याचे पाहून भारतातील हिंदू जो अपमान सहन करीत आहे, त्या हतबल हिंदूंच्या आक्रोशाकडे मुसलमानांनी लक्ष दिले पाहिजे. हिंदूंची श्रद्धा आहे की, बाबरी मशीद रामाचे जन्मस्थान आहे आणि या जागेचा पैगंबर मोहम्मद यांच्याशी काहीही संबंध नाही. या स्थानाचा सहाबीस किंवा खुलाफौर रसयिदिन्सशी तसेच तबिऊन किंवा औलिया वा सलाफ-अस-सलिहशी काहीही संबंध नाही. केवळ मोगल राजा बाबराशी संबंध आहे. मग त्या मशिदीला एवढे महत्त्व का म्हणून द्यायचे?’’

नंतर मी माझ्या लहानपणची एक घटना त्यांना सांगितली- ‘‘जेरुसलेमची बैतुल मुकद्दस ज्यूंच्या हातात गेली, तेव्हा आम्ही कोदुवल्लीच्या जुम्मा मशिदीत गोळा झालो होतो आणि अल्लाहने बैतुल मुकद्दस आमच्या ताब्यात द्यावी म्हणून आक्रोश केला होता. बैतुल मुकद्दस दुसर्‍याच्या ताब्यात गेली म्हणून जी वेदना आमची होती, तीच वेदना सामान्य हिंदूंची आहे. मी सुशिक्षित आणि प्रगतिशील हिंदूंबाबत बोलत नाहीये. मी उत्तर भारतातील सामान्य हिंदूंबाबत बोलत आहे. जे श्रीरामाच्या दर्शनासाठी कडाक्याच्या थंडीत, अंगावर सदरादेखील न घालता, अनवाणी पायाने, कितीतरी किलोमीटर अंतर चालत येतात, त्यांच्याबाबत बोलत आहे. आम्ही त्यांच्या वेदना, त्यांच्या धार्मिक भावनांचा थोडा तरी आदर करू शकणार नाही का?’’

उपस्थित श्रोतृवृंद विचारात पडला होता. मी पुढे म्हणालो- स्वातंत्र्यानंतर मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र देश वेगळा करून देण्यात आला. त्या वेळी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून सहजच घोषित करता आले असते. परंतु, गांधीजी, नेहरू, पटेल, आझाद यासारखे महान नेते असल्यामुळे त्यांनी हे घडू दिले नाही. मुस्लिम अल्पसंख्यकांना स्वतंत्र देश दिल्यानंतरही त्यांनी भारताला सेक्युलर देश म्हणून घोषित केले. तुम्हाला ही अशी हृदयाची विशालता जगात कुठेही आढळणार नाही. या कृतीसाठी पंचा नेसणार्‍या त्या वृद्ध मानवाला सेक्युलॅरिझमच्या वेदीवर आपले प्राण अर्पण करावे लागले.

उपस्थितांना विचार करण्यास उसंत मिळावी म्हणून मी थोडा थांबलो. त्यानंतर भाषण आटोपत मी म्हटले- ‘‘भारत जर मुस्लिमबहुल भूमी असती तर तो सेक्युलर राहिला असता का?’’ समोरून काहीच उत्तर आले नाही. मी म्हणालो, ‘‘नसता राहिला. भारत जर मुस्लिमबहुल देश असता आणि अल्पसंख्य हिंदूंना स्वतंत्र देश दिल्यावर, त्याने आपणहून स्वत:ला सेक्युलर म्हणून घोषित केलेच नसते. ही उदार वृत्ती हिंदुत्वात स्वभावत:च आहे. सहिष्णुता हा हिंदुत्वाचा स्वभाव आहे. आम्ही या स्वभावाला समजून घेतले पाहिजे. आम्ही या मानसिकतेचा आदर केला पाहिजे. भारतात हिंदूंऐवजी दुसर्‍या कुठल्या धर्माच्या लोकांची बहुसंख्या असती, तर मुसलमानांची काय दशा झाली असती, याचा तुम्ही विचार केला तर बरे होईल. प्रत्येकाने या अशा ऐतिहासिक वस्तुस्थितीला समजून घेतले पाहिजे आणि तडजोडीसाठी तयार राहायला हवे. तरच आम्ही खर्‍या अर्थाने सेक्युलर देश बनू शकतो. मी या विचारांना ‘उलट चिंतन’ (रीव्हर्स थिंकिंग) असे म्हणतो. तुम्ही हिंदू असाल तर तुम्ही मुसलमान असल्याची कल्पना करा आणि समस्येकडे बघा. तुम्ही मुसलमान असाल तर तुम्ही हिंदू असल्याची कल्पना करा आणि समस्येकडे बघून, ती सोडविण्याचा प्रयत्न करा. आम्ही सर्व वेगवेगळ्या धर्माचे आहोत, हा एक अपघात आहे, योगायोग आहे हे लक्षात ठेवा.’’

समोरून एक प्रश्‍न आला- ‘‘आम्ही या तीनही जागा हिंदूंना सोपविल्या आणि नंतर विहिंपने तीन हजार जागांची मागणी केली तर? त्यांची यादी फारच मोठी नाही का?’’
मी उत्तरलो- ‘‘आपण सलोख्याच्या, समेटाच्या मार्गावर आहोत. वाटाघाटीतून शांततेची पहाट उगवेल, अशी आपल्याला आशा आहे. अवाजवी मागण्यांच्या विरुद्ध उभे राहण्याची मुसलमानांना गरजच पडणार नाही. हिंदूच ते काम करतील. हिंदुत्वाची हीच तर महानता आहे. हे लक्षात ठेवा की, बजरंग दल, विहिंप, रामसेना इत्यादी कट्टरपंथी हिंदू संघटनांना सर्वसामान्य हिंदू समाजात स्वीकार्यता नाही.’’
बाबरी मशिदीवरील दावा सोडून ती हिंदूंना सोपविल्याने समस्या सुटू शकते, या माझ्या प्रतिपादनाशी उपस्थित श्रोतृवृंद सहमत झाला असल्याचे मला जाणवले. पण उघडपणे कुणीच मान्य केले नाही. बरेचदा शरीराच्या हावभावावरून मनातील भाव समजून येतात. कार्यक्रमानंतर आयोजकांनी मला एका लहानशा खोलीत नेले आणि विचारले- ‘‘तुम्ही ही सर्व वस्तुस्थिती सय्यद शहाबुद्दीनसारख्या वरिष्ठ नेत्यांना का सांगत नाहीत?’’
तोपर्यंत मी शहाबुद्दीन यांना ओळखत नव्हतो. नंतर शाह सुरी मकबर्‍याच्या घटनेनंतर मी त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यानंतर मी त्यांना माझे म्हणणे सविस्तर लिहून पाठविले होते. असो.
भारतात अनेक पंथ-संप्रदाय आहेत. युरोपात संप्रदायनिष्ठा बर्‍याच प्रमाणात कमी झाली आहे. पश्‍चिमेकडे जे संप्रदाय आजही अस्तित्वात आहेत ते केवळ वारसा व संस्कृती म्हणून. लक्षात ठेवा, हिंदूंमधील वाढत्या असहिष्णुतेविरुद्ध बहुसंख्य हिंदूंनीच आवाज उठविला आहे. तसेच दादरी येथे जे घडले अशा अत्याचारांविरुद्धदेखील. पुरस्कार परत करून त्यांनी वाढत्या असहिष्णुतेला आळा घातला आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती व आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारतात जीवनाच्या प्रत्येक अंगावर धर्माचा प्रभाव आहे. प्रत्येक धर्माचे त्याचे स्वत:चे असे शिल्पशास्त्र आणि बांधकाम तंत्रज्ञान असते. या सर्व सांस्कृतिक आदानप्रदानाचा भारतात संगम झाला आहे. या सर्व परिवर्तनाची आधारशिला हिंदू संस्कृती आहे. बौद्ध आणि जैन संप्रदाय हिंदुत्वाच्या शाखा आहेत. इस्लामिक वास्तुशास्त्राने हिंदू-बौद्ध-जैन आधारशिलेचे सौंदर्य वाढविले आहे. या सौंदर्याला ख्रिश्‍चन वास्तुशास्त्राने अधिक संपन्न केले आहे. कुतुबमिनार व ताजमहाल ही याची उदाहरणे आहेत. मिनार व घुमट यांचे उगमस्थान इराण, इराक व तुर्कस्थान आहे. परंतु, त्यांच्याकडे कुतुबमिनारच्या तोडीची एकही वास्तू नाही. का? ताजमहालची कमीतकमी एखादी प्रतिकृतीदेखील ते का बांधू शकले नाहीत? भारत हे करू शकला. कारण, आम्ही भारतीय हस्तकलेचे इस्लामिक वास्तुकलेशी मिश्रण करू शकलो. आम्ही संयुक्त संस्कृतीत जगत आहोत. प्रत्येक मोहम्मदामध्ये ब्रह्मदत्त असावा आणि प्रत्येक ब्रह्मदत्तात मोहम्मद. आम्ही भारतात अशी संयुक्त संस्कृती निर्माण केली पाहिजे.

अनुवाद : श्रीनिवास वैद्य
– डॉ. के. के. मोहम्मद
निवृत्त पुरातत्त्व संचालक (उत्तर भारत)

image credit: google

Leave a Reply

This Post Has 6 Comments

  1. अतिशय उत्तम लेख, समतोल पणाने मांडला आहे.

  2. indian culture and its specialties are part of our real life and it is necessary for our future generation

  3. इतक्या प्रामाणिक, सविस्तर आणि माहितीपूर्ण लेखाबद्दल विनम्र आभार!!

  4. संशोधन पूर्ण लेख आहे.

  5. इतक्या प्रामाणिक पणे केलेले संशोधन आणि त्या वरील निष्ठा अत्यंत कौतुकास्पद, आदरणीय.

  6. वाह, फारच मस्त