कोणताही व्यवसाय निष्कंटक नसतो. राजाला नोकर-चाकर, प्रासाद-रंगशाळा, अलंकार-जामदारखाना सारे काही असते. असे असूनही त्याला सुखाची झोप येतेच असे नाही. जास्त जबाबदाऱ्या, जास्त लोकप्रियता किंवा अधिक उपद्रवशक्ती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य फुले-आणि काटे या दोन्हींनीही भरलेलं असतं. नुसते फुलांचे हार किंवा नुसताच काट्याचा रस्ता जगात अस्तित्वात नसतो, सुखदु:खांचे प्रमाण कमी-जास्त असेल, यश-अपयश यांच्या फूटपट्ट्याही बदलत असतील, पण या जगातील सर्वच प्रवासात फुलांचा गंध येतो-त्याच वेळेस काट्यांनी रक्तबंबाळही व्हावे लागते. मिळालेले सन्मान ही दु:खावरची फुंकर असते, आणि सोसावे लागते ते ते सारे अहंकाराच्या उपशमनार्थ असते.

आपल्या देशातील प्रत्येक संपादक टिळक-आगरकर यांचाच वारसा सांगतात. पण मुळातच टिळक-आगरकर ही ब्रह्मकमळासारखी केव्हा तरी फुलणारी फुले. शिवाय ते संपादक नव्हतेच. हजारो गनीम अंगावर घेऊन लढणाऱ्या सेनापतींजवळील अनेक हत्यारापैकी वृत्तपत्र हे एक हत्यार त्यांनी वापरले एवढेच. शिवाय पत्रकार होण्यावाचून त्यांना पर्यायही नव्हता. हेतुपुरस्सर आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्या झालेल्या सुखासीन देशबांधवांना उकळत्या तेलाहून दाहक असणारे त्यांचे शब्द जागे करू शकणार होते. त्यामुळे ते संपादक झाले. त्यांचे नाव घेताना किंवा त्यांची जातकुळी सांगताना दहादा विचार करायला हवा. केवळ आपल्यालाही उडता येते म्हणून चिलटाने गरुडाची बरोबरी करण्यात काय अर्थ आहे? लोकमान्यतेचे हार त्यांच्या गळ्यात पडले, पण त्यासाठी मंडालेतील एकांत कोठडीत स्वत:चे रक्तही त्यांना जाळून प्यावे लागले. गळ्यात पडलेल्या प्रत्येक हारासाठी रक्ताच्या थेंबाथेंबाने किंमत चुकवताना मागे उरल्या त्या त्याच्या उग्र, दाहक डोळ्यांच्या आठवणी. आणि त्याच उग्र डोळ्यांच्या दाहकतेला हायलंडर फलटणीही शरण आल्या होत्या.

आज अनेक संपादक आहेत. त्यापैकी बहुतेकजण शब्दांचे सौदागर आहेत. कुणाचे तरी शब्द स्वस्तात विकत आणावेत आणि कुणाच्यातरी ते गळ्यात मारावेत असा हा साधा व्यापार आहे. पुष्कळ संपादकांना शब्द प्रसन्नच नाहीत. पुष्कळजण लिहीतच नाहीत आणि त्यांनी लिहिले तरी फारसे कोणी वाचीतही नाहीत. कोळशाची किंवा बर्फाची वखार काढावी तशा पुष्कळांनी शब्दांच्या वखारी काढल्या. म्हणून त्या शब्दांना रेखीव असा काही अर्थच नसतो. प्रस्थापित राज्यकर्ते, समाजरचना किंवा विषमता याविरुद्ध संपादकाच्या मनात खरोखरीच राग निर्माण झाला असेल तरच तो त्याच्या शब्दातून वा वृत्तपत्रातून व्यक्त होणार ना! कुणावर तरी राग करण्यासाठी कुणावर तरी मनभरून प्रेमही करावे लागते. आणि प्रेम करणे काय इतके सोपे आहे? ज्याला हिशेब नाही असे प्रेम करता येण्याचं भाग्य फार थोड्यांनाच लाभते. आपल्या देशावर, धर्मावर, भाषेवर, आप्तस्वकीयांवर असं मनभरून प्रेम केलं की कधी कधी शब्द गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गंध-मखमाली होतात. आणि प्रसंगी तेच शब्द ठिणग्याही होतात. खऱ्या प्रेमात द्वेष, राग हे आपोआपच सामावलेले असतात. काहीच जमत नाही म्हणून वृत्तपत्र व्यवसायात येणाऱ्या माणसाचे राग-लोभही कोमट असतात. म्हणून त्याचे शब्दही गिळगिळीत होतात. एखादा संपादक लोकप्रिय होतो याचा अर्थ तो प्रेम करीत असलेला विषय लोकांना पसंत आहे, असा नसतो. संपादकाची कितीतरी मते अमान्य असूनही वाचक त्याच्यावर खूष असतात. कारण त्याच्या शब्दातून अस्सल असंतोषाचा बाणेदारपणा जाणवत असतो. एकदा आपल्या शब्दांच्या तावडीत वाचक सापडला की त्याला कोणत्याही लांबच्या प्रवासाला नेण्याची त्या शब्दात ताकद असते. प्रामाणिकपणाचा स्पर्शसुद्धा माणसाला मोहात टाकतो. कारण दिवसेंदिवस प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला आहे. सगळ्याच अस्सल गोष्टी हळूहळू दिसेनाशा झाल्या आहेत. अन्नात, वस्त्रात, औषधात, सगळ्यातच भेसळ असते. तशीच माणसांच्या विचारातही आता भेसळ होऊ लागली आहे. दिखाऊ परखडपणाच्या आड शरणागत भेकडपणा खाली मान घालून बसलेला असतो. अशाही परिस्थितीत कुठेकुठे एकाकी लढणारे, जखमांनी विव्हळ झालेले-परंतु युद्धाची नशा चढलेले लहानमोठे संपादक दिसतात. विचार त्यांचाच करायचा.

आता ही गोष्ट खरी की वरील आदर्शात मी कुठे बसत नाही. मोठे व्हायचेच नाही असं एकदा स्वीकारलं की आपोआपच आपल्या शत्रूंची संख्याही मर्यादित होते. एका माणसावर एका वेळेस तीनचार माणसंच हल्ला करू शकतात आणि बाकीची हल्ला करणार्यांच्यावरच हल्ला करीत असतात, तसंच हे आहे. लहान पत्रकाराची लढाई सोपी असते. त्याला संपूर्ण नष्ट करून टाकणे सहसा शक्य होत नाही. त्याचे व्यवसायाचे साधन म्हणजे त्यांची लेखणी. बाकीच्या लहान-मोठ्या गोष्टींचा नाश करता आला तर त्याच्या लेखणीचा नाश करता येतो. महापुरात लव्हाळी वाचावीत आणि वटवृक्ष उन्मळून पडावेत तसेच छोट्या वृत्तपत्रकाराचे होते. तो आपल्या अंगाबरोबर जगत राहू शकतो! गुरगुरू शकतो, संधी पाहून आव्हाने देऊ शकतो आणि पुन:पुन्हा सर्वनाशाला तयार होतो.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply to sakul Cancel reply

This Post Has 6 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..