एकही डबा नसलेल्या इंजीनाचे मालक राजसाहेब ठाकरे हे मोबाइलच्या युगात आउटडेटेड झालेल्या गजराच्या घड्याळाचे मालक शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेणार आणि तीही पुण्यात घेणार आहेत म्हटल्यावर अनेकांनी रामदास फुटाणेंना फोन करून आपापल्या जागा बूक केल्या. पवार आणि ठाकरे हे दोघेही गर्दी जमवण्यातले दर्दी असल्यानं हे साहजिकच होतं. आधी ही मुलाखत 3 जानेवारीला होणार होती, मग ती 6 जानेवारीला ठरली. आता ती आणखी पुढं ढकलली आहे. ही ढकलाढकली पवाराकंडून होते आहे की ठाकरेंकडून ते माहिती नाही. पण लेखकानं नेहमीच काळाच्या पुढे राहिलं पाहिजे आणि उद्याचं आजच जगाला सांगितलं पाहिजे,या अपेक्षांना या आगामी मुलाखतीतला काही भाग आत्ताच देऊन टाकत आहोत- 

राज- नमस्कार, सुरू करू या?

पवार- अरे असं विचारायचं नसतं, सुरू करून टाकायचं. (टाळ्या)

राज- बरं, तुम्ही जे बोलता ते करत नाही आणि जे करायचं असतं त्याविषयी चकार शब्दही बोलत नाही..

(हशा)

पवार- खोटं आहे हे. मी या मुलाखतीसाठी येतो म्हणालो आणि आलोसुध्दा. विचारा फुटाणेंना.

(जोरदार हशा)

राज- हे म्हणजे अगदीच चणे-फुटाणे झालं. मी मोठ्या मोठ्या गोष्टींविषयी बोलतोय. तुम्ही मोदींवर टीका करता आणि मोदी मात्र तुम्हाला आपले राजकीय गुरू म्हणतात. तुमच्या पाठींब्याच्या भरवशावर फडणवीस सेनेला शिंगावर घेतात. तुम्ही नेमके कुठं आहात? सत्ताधारी पक्षात की विरोधकांसोबत?

(टाळ्या)

पवार- एक लक्षात घ्या. भाजपला हवं असेल तर त्यांना मी पाठींबा देईन असं म्हणालो होतो मी, पाठींबा दिला नाही. तुम्हीच आत्ता म्हणालात ना, मी जे बोलतो ते करत नाही. पाठींबा देतो असं म्हणालो याचा अर्थ मी पाठींबा देणार नाही. समजा मी दिला आणि त्यांनी घेतला, तर कोण उघडा पडेल?

राज- म्हणजे पाठींबा दिला तरी तुम्ही मोठे आणि नाही दिला तरीही तुम्हीच मोठे. याला राजकीय हुषारी म्हणायचं,धूर्तपणा म्हणायचं की दगाबाजी?

पवार- तुम्हाला पान्हा चोरणारी गाय माहिती आहे का? तुमचं आयुष्य शिवाजी पार्कात गेलं, तुम्हाला माहिती नसणारच. मी सांगतो, ऐका. गायीचं दूध काढताना धार कमी कमी होत जाते, दूध काढणाराला वाटतं की तिच्या आचळातलं दूध संपलं आता. पण दूध काढून झालं आणि वासराला सोडलं की ते लुचू लागतं,म्हणजे दूध शिल्लक असतं तिच्याकडे. वासरांसाठी पान्हा चोरणाऱ्या गायीच्या या वृत्तीला तुम्ही काय म्हणता? वात्सल्य! आणि तेच मी जर माझ्या वासरांसाठी केलं तर तुम्हाला त्यात राजकीय हुषारी,धूर्तपणा,दगलबाजी..असं काहीबाही दिसतं.

(तुफान टाळ्या) हा लेख punashcha.com वर प्रसिद्ध झाला आहे. 

राज- तुम्ही कुठलीही गोष्ट पूर्ण सांगत नाही…

पवार- उदाहरणार्थ?

राज- खूप देता येतील. तुमचं नाव शरदचंद्र पवार आहे, तेसुध्दा तुम्ही कधी पूर्ण सांगितलं नाही.

(हशा आणि टाळ्या)

पवार- मग तुम्हाला कसं कळलं?

राज- कळलं इथून तिथून

पवार- हाच प्रॉब्लेम आहे. माझ्याविषयी लोकांना इथून तिथून काही तरी सतत कळत असतं आणि लोकांना ते खरं वाटतं.

राज- ते खरं नसतं असं तुमचं म्हणणं आहे का?

पवार- ते खोटं असतं असं माझं म्हणणं आहे.

राज- खरं नसणं आणि खोटं असणं यात काय फरक आहे?

पवार- तुमच्या पक्षाविषयी बोलताना लोक हल्ली, यांचं काही खरं नाही, असं म्हणतात, पण ते खोटं आहे असं तुम्ही म्हणता. कळला का फरक?

(टाळ्या, टाळ्या आणि टाळ्या…)

राज- मागं एकदा अण्णा हजारे तुमच्या भ्रष्टाचाराचे ट्रकभर पुरावे देणार होते.

पवार- अण्णा लष्करात होते तेव्हा तिथं ते ट्रक चालवायचे त्यामुळे त्यांना पुराव्यांविषयी बोलताना ट्रक आठवला तर ते साहिजकच म्हणावं लागेल.

(हशा)

राज- अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातले संबंध नेमके कसे आहेत?

पवार- कुठल्याही बहिण-भावाचे असावेत तसेच आहेत. कधी भांडतात, कधी प्रेमानं राहतात, कधी दोघेही माझ्याकडे एकमेकांविषयी तक्रारी करतात आणि कधी कौतुक करतात.

राज- बरं, थेट प्रश्न विचारतो. तुमचा राजकीय वारस कोण आहे या दोघांपैकी?

पवार- वारस कधी ठरवायचा असतो?

राज- कधी?

पवार- एखादी व्यक्ती निवृत्त होणार असेल, सूत्रं खाली ठेवणार असेल, तेव्हा. एवढ्यात तरी माझा तसा काही विचार नाही.

(टाळ्या)

राज- तुम्ही म्हणता, तुमचा पक्ष छोटा आहे, पंतप्रधानपदाचा विचारही करणं शक्य नाही. प्रफुल्ल पटेल म्हणतात की साहेब पंतप्रधान होणारच, त्यांना पंतप्रधान झाल्याचं पाहणं हे माझं स्वप्न आहे.

पवार- प्रफुल्लनं काय स्वप्न पाहावीत हा त्याचा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी काय स्वप्न पाहावीत हे मी कधी सांगत नाही. मी स्वतः काय बोललो ते महत्त्वाचं आहे.

राज- खरंच तुम्हाला पंतप्रधान होण्यात आता रस नाही?

पवार- शिवसेना फुटावी, सैनिकांनी उद्धवचं नेतृत्व अमान्य करावं आणि ते तुमच्याकडे यावं, असं तुम्हाला वाटत नाही का?

राज- छे,छे..मी कधी बोललो का असं?

पवार- तेच म्हणतोय मी, सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात.

(टाळ्या)

राज- आज तुमची मुलाखत मी घेतो आहे, तुम्ही मला उलट प्रश्न विचारू नका.

पवार-(मिश्कील हसत) बरं, तुम्ही विचारा.

राज- ते जे पाठीत खंजीर खूपसण्याचं प्रकरण होतं…

पवार- अहो आता यशवंतराव नाहीत, वसंतदादा नाहीत आणि गोविंदरावही नाहीत..जाऊद्या ना आता ते!

राज- पण तो खंजीर आहे ना तुमच्याकडे अजून?

पवार- (हणुवटीखाली पालथी मूठ धरत, थोडे विचारमग्न होतात) राज, आपण पुण्यात आहोत तेव्हा पुलंचं नाव एकदा तरी निघायलाच हवं.

राज- हो,अर्थातच.

पवार- पुलं म्हणायचे की, धरावे असे पाय आता राहिलेच नाहीत. तू खंजीराचा विषय काढलास म्हणून सांगतो, खंजीर खुपसाव्या अशा पाठीच आता राजकारणात राहिलेल्या नाहीत.

(प्रचंड टाळ्या)

राज- नारायण राणेंविषयी तुम्हाला काय वाटतं?

पवार- त्यात मला काय वाटायचं? त्यांचं त्यांना काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. तुमचे मित्र आहेत ते तुम्ही त्यांनाच विचारा.

राज- पत्रकार फडणवीसांना भाजपमधले शरद पवार म्हणतात..

(हशा आणि टाळ्या)

पवार- जोपर्यंत ते मला राष्ट्रवादीतले फडणवीस म्हणत नाहीत तोवर मला काळजीचं कारण नाही.

(दुप्पट हशा आणि टाळ्या) हा लेख punashcha.com वर प्रसिद्ध झाला आहे. 

राज- तुम्ही भुजबळांना वाऱ्यावर सोडलं, असा आरोप केला जातो.

पवार- भुजबळ यातून बाहेर पडतील असा मला विश्वास आहे.

राज- फारच ठोकळेबाज उत्तर झालं हे.

पवार- प्रकरण न्यायालयात असल्यानं मी जास्त काही बोलू शकत नाही.

राज- हा उत्तराचा आणखी एक ठोकळा

पवार- ज्यांनी केलं त्यांनी निस्तरावं, मी काही त्यांना ते करायला सांगितलं नव्हतं,जरा अतीच केलं त्यांनी,थोडं सांभाळून करायला हवं होतं…

राज- आता कसं बोललात!

पवार- मी हे असं उत्तर द्यावं अशी तुमची अपेक्षा आहे, पण मी तसं काहीही बोलणार नाही.

(टाळ्या)

राज- तुमच्या काखेत एक फाईल असते नेहमी, त्यात काय असतं, याची अनेकांना उत्सुकता आहे.

पवार- काही विशेष नसतं. जे विशेष असतं ते मी लिहून ठेवत नाही, मनात ठेवतो.

(हशा)

राज- शेवटचा प्रश्न. २०१९ मध्ये काय होईल असं वाटतं तुम्हाला?

पवार- निवडणुका!

(हशा आणि टाळ्या)

पवार- तुमचे प्रश्न संपले असतील तर मी एक प्रश्न विचारू का?

राज- आता तरी मी पहाटे लवकर उठतो का, असं विचारायचं आहे ना तुम्हाला?

पवार- हाच तर प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्हाला प्रश्न बरोबर कळतात, तुमच्याकडे उत्तरं नाहीत.

(टाळ्या,टाळ्या आणि टाळ्या)

तंबी दुराई

www.punashcha.com/tambidurai या लिंकवरून तंबी च्या सशुल्क ब्लॉगचे सभासद व्हा आणि फक्त ५० रुपयात वर्षभरात तंबीचे ५२ लेख वाचा.

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 39 Comments

 1. भन्नाट भन्नाट भन्नाट !! जबरदस्त !!! मजा आली वाचताना. शब्दांचे अजिंक्य इमले.

 2. तंबी माझे all time favourite, एवढं विनोदाचं अंग असणारा, सगळ्या नेत्यांची वागण्याबोलण्याची शैली आत्मसात केलेला,सर्वांची बिंग माहीत असलेला,हसतखेळत टोपी उडवणारा, कुठल्याच पक्षाची तळी उचलतोय असं न वाटता सगळ्यांना शालजोडीतले देणारा, निर्विष विनोदकार अगदी एकमेवाद्वितिय.

 3. आयला! तुम्ही जर मला भेटलात तर मी तुम्हाला एक हॅट (टोपी नाही) भेट देईल, ती बीरबल व बैलाचं सोंग घेणारा, ही गोष्ट आठवा. कारण का देईल? तर गाईचा पान्हा चोरण्याचे उदाहरण…लय भन्नाट उदाहरण दिले…अफलातुन….जुग जुग जियो.

 4. खंजीर खुपसावा, खंजीराने खुपसाव्या – यातलं एक कुठलं तरी ठेवा.
  बाकी भन्नाट.

 5. अप्रतिम , अहो, कुठे गायब होतात इतके दिवस , मजा आली राव मुलाखत वाचुन !!

 6. मस्तच!तंबी दूराई ग्रेट

 7. व्वा. एकदम शालजोडीतले मारले आहेत

 8. अगदी ठणठणपाळची आठवणींचा गहीवर जागावा एवढे अस्सल ‘तंबी दुराई’पण या लेखणात असते. मी तर fan आहे बुवा आपला…

 9. धम्माल!!!

 10. मुलाखत अक्षरश: तंबी दुराईचीच अस्सल वाटावी आणि आम्ही ती मनापासून वाचावी अशी आहे. मी कितीही त्यावर लिहिलं तरी ते कमी आहे.
  मंगेश नाबर