काही माणसं जन्माला येतानाच ‘सुखी माणसाचा’ वॉश अँड वेअर सदरा घालून येतात. ‘वॉश अँड वेअर’ असं म्हणायचं, पण या थोर लोकांनाही गरज पडणार नाही असे यांचे योग. किंवा तशी गरज पडलीच तर लाँड्रीचे दुकान यांच्या इमारतीत तळमजल्यावर असतं. वरच्या मजल्यावरून नुसत्या टाळ्या वाजवल्या तरी या महाभागांना एकदम ‘तव्यावरची पोळी’ म्हणतात, त्याप्रमाणे गरम गरम कपडा घरपोच मिळतो. यांचा वाणी घरपोच सामानात, साध्या दळलेल्या मिठाच्या ऐवजी चुकूनही ‘खडे मीठ’ पाठवणार नाही. या सुखी माणसांना ‘मिठाला जागवणारा’ फक्त वाणीच भेटतो असं नाही, तर खुर्च्यांना वेत बसवून देणाराही, दिलेल्या तिथीवर काम करून देणारा भेटतो. पावसाळ्यात ह्यांची घरं नेमकी ‘पलंग ठेवला’ तिथं गळत नाहीत. घराला नवीन रंग दिल्यावर भिंतीला टेकून डोक्याच्या तेलाचे भिंतीवर नकाशे उठवणारे पाहुणे या सुखी माणसांच्या घरी येत नाहीत. डबेवाल्याकडून या मंडळींचा डबा कधी बदलून दुसऱ्या पत्त्यावर जात नाही. सुखी माणसांची मुलं नाकात चिंचोका अडकवून घेत नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांना दातांचाही त्रास होत नाही. या माणसांची बुशशर्टची बटन्स जशी संपावर जात नाहीत त्याचप्रमाणे घाईत असताना चपलेचा अंगठाही ‘अचानक’ हाफ-डे कॅज्युअल घेत नाही. या पुण्यवंतांना चष्म्याचा नंबर पहिल्याच फटक्यात अचूक देणारा चष्मेवाला भेटतो. या असामी जर कधी सिनेमाला गेल्या तर उंच मानेचा माणूस यांच्याच खूर्चीसमोर येत नाही. इतकेच नव्हे तर मध्यंतरात यांनी जर शेंगदाणे घेतले तर त्यातला शेवटचा दाणा खवट निघत नाही. रेल्वेस्टेशन या मंडळींच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असतं तर बसस्टॉप कुजबुजण्याच्या अंतरावर असतो. या महाभागांच्या घराजवळ नुसतीच ‘इंडियन एअरलाइन्स’ची बस थांबते असं नाही तर पोस्टाची मोबाईल बस योजना ‘भारत सरकारनं’ या जमातीसाठी सुरू केली असावी अशी शंका येते. सुखी माणसांची सासुरवाडी यवतमाळसारक्या लांबच्या गावी असते. पण बायकोचा मामाच असिस्टंट स्टेशनमास्तर असतो, त्यामुळे तिकीट घरपोच.

अशा मोजक्याच भाग्यवंतांपैकी एक, किंबहुना एकमेव असा दिनेश वाईकर. हा राहतो त्या इमारतीसमोर फिरत्या पोस्टाची गाडी नुसतीच येऊन उभी राहत नाही तर त्या गाडीतला एक कर्मचारी वाईकरांच्या घरी येऊन पत्रं गोळा करून नेतो.

आयुष्यात इतर गोष्टी लाभल्या तरीही घरमालक लाभणं म्हणजे शनिचा खडा लाभण्यासारखं. वाईकर त्या बाबतीतही भाग्यवान ठरलाय. इतर भाडेकरूंपेक्षा त्याला जास्त सवलती मिळतात. वाईकरांचं एस. टी. मध्ये कुणीही नात्यातलं नाही, पण तिथंही त्याला रांगेत उभं राहण्याची पाळी येत नाही. किंबहुना रांगेचा शाप त्याला कुठेही भोगावा लागलेला नाही. एक डॉक्टर तसा अनेकांचा फॅमिली डॉक्टर असतो. पण त्या बाबतीतही चौकोनी चेहरा करून त्याला कधी वेटिंग हॉलमध्ये थांबायची पाळी आली नाही.

केव्हातरी खनपटीला बसून मी त्याला विचारलं, “तुझं गोत्र अत्री का?”

“मी कधी गोत्राचा विचारच केला नाही. मध्येच तुला गोत्र का आठवलं?”

“अत्री म्हणजे सगळ्यांशी मैत्री, असा एक वाक्प्रचार आहे.”

“मला कुठे खंडीभर मित्र आहेत!”

“खंडीभर नसतील. पण तू माणसं जिथं जिथं जोडलीस ती सगळी तुझ्यासाठी झटतात.”

“तसा मी भाग्यावान आहे, पण…”

“काय झालं? …”

“यातली काही भाग्य कष्टसाध्य आहेत.”

“म्हणजे कशी?”

“आता आमचे मालक इतरांपेक्षा माझ्यावर जास्त लोभ करतात.”

“तेच. कसं?”

“सांगतो. दर महिन्याला एक तारखेला मालकांचा भय्या सकाळी आठ वाजता दारात हजर होतो. दोन वर्षांपूर्वीची हकीकत. मालकांचे वडील आजारी आहेत असं मला समजलं. मी संध्याकाळी मालकांच्या घरी गेलो. वडिलांची चौकशी केली. काही मदत लागली तर कळवा म्हणालो ‘अधूनमधून गप्पा मारायला येत जा, त्यांना एकटं वाटतं.’ असं मालक म्हणाले. मी मग एक दिवसाआड रोज संध्याकाळी मालकाकडे महाभारत वाचून दाखवायला जाऊ लागलो. मला केव्हातरी समग्र भारत वाचायचं होतंच. ते मालकांच्या वडिलांना वाचून दाखवायच्या निमित्तानं झालं तरी. नाहीतर निष्कारण चालढकल करण्यात आपण खूप आयुष्य वाया घालवतो. महाभारतानंतर रामायणाचा विचार होता. पण त्यापूर्वी मालकाचे वडील गेले. तेव्हापासून मालकाचा भय्या दाराशी येईनासा झाला. आपण भाडं थोडंच चुकवणार आहोत. आपल्याला एक-दोन दिवसांची सवलत हवी असते. ती मिळाली. स्वार्थ-परमार्थ…”

“तुम्हाला इतका वेळ बरा मिळाला.”

“वपु, अशी कल्पना करा. सकाळी आरामात सात वाजता उठायचं. चहा, दाढी, आंघोळ आठ वाजेपर्यंत. नंतर पंधरा मिनिटं चक्क टिवल्याबावल्या. साडेनऊ वाजता साधारणपणे तुम्ही घर सोडत असाल तर सकाळी सव्वा तास वेळ उरतो. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत टिवल्याबावल्या. रात्री नऊला जेवण असेल तर दोन तास मिळतात. नऊ ते साडेनऊ जेवण. पुन्हा दहा वाजेपर्यंत अर्धा तास उरतो. दहा वाजता जनगणमन. रोज पावणेचार तास मिळतात. त्या वेळेचा आपण काय उपयोग करतो? कुणाला तीन तास रिकामे, कुणाला दोन, कुणाला अडीच. पण त्याचं आपण काय करतो? पावणेचार तासांप्रमाणे वर्षात सत्तावन्न दिवस होतात. एका वर्षात आपण दोन महिने वाया घालवतो. मग उभ्या आयुष्यात असं वेस्टेज किती होईल? कॉलेजचा कोर्स होईल, म्हणूनच ‘वेळ मिळत नाही’ म्हणणाऱ्या माणसांवर माझा विश्वास नाही.”

मी पटकन म्हणालो, “वाईकर, यू आर ग्रेट.”

“ग्रेट वगैरे असं काही नसतं हो, आणि तसं काही असलंच तर तो ग्रेटनेस मिळवणं अशक्य नसतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी करून आयुष्य सोपं करता येतं.”

“तेच कसं?”

“माझ्या घरासमोर पोस्टाची गाडी थांबते. हा भाग नशिबाचा. एकदा धुमधडाक्यात पाऊस पडत होता. मी चहाचा कप घेऊन गॅलरीत उभा होतो. मला एकाएकी त्या व्हॅनमध्ये काम करणाऱ्या माणसांची कीव आली. ती गाडी सुटायच्या आत मी त्यांना किटलीभर घरचा चहा करून पाठवला. त्याची जाणीव ठेवून त्यांचा माणूस घरी येऊन माझी पत्रं न्यायला लागला.”

जरा वेळ थांबून वाईकर म्हणाला, “अगदी छोटी छोटी पथ्यं आपण पाळत नाही. आपलं किंवा आपल्या घरातल्यांचं आजारपण संपलं की डॉक्टरची आपण आठवणही ठेवत नाही. माझ्या फॅमिली डॉक्टरला माझं दर महिन्याला एक पत्र जातं. केवळ ख्यालीखुशाली कळवण्यासाठी. आजार बरा झाल्यानंतर आभाराचं पत्र जातं. याउलट आरसीव्हीपीलाही दाद न देणारे महाभाग इथं आहेत.”

“तुमचा शब्दनशब्द पटतोय.”

“एस. टी. तला पी.आर.ओ. असाच परिचयाचा झाला. मला वर्षातून कमीत कमी चार वेळा एस. टी.नं प्रवास करावा लागतो. ड्रायव्हरनं जर गाडी कौशल्यानं चालवली असेल तर माझं लगेच कौतुकाचं पत्र पी.आर.ओ. ला जातं. ड्रायव्हरच्या नावासहित. सुमारे दोन डझन पत्रं मिळाल्यावर त्यानं भेटायला बोलावलं. ओळख झाली, वाढली. आता नो प्रॉब्लेम.”

मी थक्क होऊन बघत होतो. वाईकर म्हणाला, “माणसाला जन्माला घालण्यामागे, त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काही देते. बाकीचं आपण मिळवायचं. दिवसाचे अकरा तास हे हात जर राबले तरच एक तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे. आपणही नियतीला मदत करायची असते. मग काही कमी पडत नाही. हे हात मदतीसाठी आहेत, सगळ्यांच्या. The best helping hand is at the end of your arms.”

अंक – निवडक कालनिर्णय – १९७३-२००९

image credit: write angle triangle

 

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 70 Comments

  1. मस्तच ,,, व पु ग्रेट,,, Best helping hand is at the end of your arm

  2. मुळात वाईकरांनी दुसऱ्यांची स्वतःहून मदत केली होती ती पण विना अपेक्षा , त्याचंच फळ त्यांना भेटलं

  3. हे फक्त व .पु.च लिहू शकतात .आनंद वाटला .

  4. व पु द ग्रेट !

  5. अप्रतिम

  6. खुपच सुंदर लेख…..तितकाच विनोदी खुप हसलो

  7. Punashcha ह्या मराठी भाषेतील पहिल्या डिजीटल नियतकालिकामध्ये वसंत पुरुषोत्तम काळे यांचा ” नियतीलाही मदत लागते ” हा लेख प्रकाशित केल्या बद्दल वपु चाहत्यांकडून पुनश्च संपादकीय मंडळास धन्यवाद !!

  8. खूप सुंदर लेख, मजा आली वाचताना

  9. bhari लेखक तसेच आपली निवड

  10. अतिशय सुरेख आणि उद्बोधक लेख … आपल्याला जे लोक भाग्यवान वाटत असतात ते खरं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी वेळ काढून जाणिवपूर्वक करत असल्यामुळे त्यांचे आयुष्य सुकर झालेले असते …