वसंतागमनाची चाहूल सृष्टीच्या बदलात दिसायला लागते. त्याला कॅलेन्डर बघायची गरज नसते. हा बदल पत्र, पुष्प, फल यांच्या गंध रंगातून देखील जाणवायला लागतो. त्यातलाच एक गंध असतो आंब्याचा- आम्रफळाचा. जो वेडावून टाकतो… भले हल्ली बारोमास आंब्याचा रस उपलब्ध असतो. पण त्याला प्रत्यक्ष आम्रफलाच्या रंग स्वादाची सर अजून तरी नाही. पुढचं कोणी सांगावं?

पण तोपर्यंत आंबा तो आंबाच.

इथे हे पण सांगायला हवे की आंबा म्हटलं की केवळ हापूस नाही तर केसर, बदाम, तोतापुरी ते थेट रायवळ आंब्यापर्यंत जे शे-दीडशे प्रकार आहेत ते सर्व येतात.

तर ही आम्रप्रशस्ती पूर्वापार चालत आलेली आहे. म्हणून तर आंब्याच्या मोहोराला वसंताचे अग्रपुष्प म्हटलं आहे. काही ठिकाणी हा मोहोर खाण्याचा विधी आहे. त्याला साजेसे नाव देखील आहे- आम्रपुष्प भक्षण! त्यानंतर छोट्या छोट्या कैऱ्या येतात त्याला बाळ कैरी म्हणतात. त्याला लगडूनच मग कैऱ्याचा घोस आणि वाढतं ऊन यायला लागतं आणि मग एक दिवस ह्या कैऱ्यावर सूक्ष्म पिवळसर झाक यायला लागते आणि आता आंब्याची आढी लावायला सुरुवात होते.

मग एकदम दिसतो ते सुकुमार पिकलेला आंबा! हे आम्रकौतुक जिथे जिथे म्हणून आंबा पिकतो तिथे तिथे दिसतं. बांगलादेशचा राष्ट्रीय वृक्ष आंबा आहे तर पाकिस्तानात आंब्याला ‘शान-ए-खुदा’ असंही म्हणतात. पण ह्या सर्वात बहार आणली आहे ती आपल्या रामदासस्वामींनी. त्यांना आंब्याचे अप्रुप वाटणं साहजिकच आहे कारण हा एक असा संतमाणूस आहे ज्याने ऐहिक गोष्टीत पुरेपूर स्वत: रस घेतलाच पण ते इतरांना पण शिकवलं. त्यांनी म्हटलंय-

सौजन्य – लोकसत्ता

ऐका ऐका थांबा थांबा। कोण फळ म्हणविले बा।

सकळ फळांमध्ये आंबा। मोठे फळ।।

त्याचा स्वाद अनुमाळेला। रंग रूप हे कळेना

भूमंडळी आंबे नाना । नाना ठायी।।

असं म्हणून रामदास आंब्याच्या तऱ्हा पण सांगतात –

आंबे एक रंगी दुरंगी। पाहो जाता नाना रंगी।

अंतरंगी बाह्यरंगी। वेगळाले।।

आंबे वाटोळे लांबोळे।

चापट कळकुंबे सगळे।।

भरीव नवनीताचे गोळे। ऐसे मऊ।।

आंबे वाकडे तिकडे। खरबड नाकाडे लंगडे।

केळी कुहिरे तुरजे इडे। बाह्यकार।।

नाना वर्ण नाना स्वाद। नाना स्वादामध्ये भेद।।

नाना सुवासे आनंद। होत आहे।।

त्यापुढे जाऊन रामदास म्हणतात-

आंबे लावावे लाटावे। आंबे वाटावे सुटावे।

आंबे वाढिता सुटावे। कोणातरी

हा झाला रामदासांचा देशस्थी वाणाचा प्रकार तर आपले विंदा करंदीकर म्हणजे अस्सल कोकणे. त्यांनी आम्रसेवनाला आम्रयोग असंच म्हटलं आहे. त्यासाठी त्यांचा ‘आम्रयोग’ लेखच वाचायला हव पण त्याचा वाणवळा पहा. ते म्हणतात-

‘आंबा प्रथम हाताळी खावा. त्याला थोडे आंजारावे गोंजारावे. त्याच्या त्या नितळ सालीवरून हात फिरवावा. डेखापासून चोचीपर्यंत एक हळुवार मींड घ्यावी. त्याच्या नकट्या नाकाचे थोडे कौतुक करावे. मग तो धुतला नाही तरी चालेल. आंबा हा स्वभावत:च स्वच्छ असतो, एखाद्या अजाण निरागस पोरासारखा. मग त्याच्याशी थोडे बोबडे बोलावे. एकदा तरी हवेत उडवून हलक्या हातांनी झेलून घ्यावे. मग मनामध्ये मंत्र पुटपुटावा, ‘‘झेलला तरी चेंडू नव्हे, तोलला तरी माल नव्हे, सोलली तरी साल नव्हे; कच्चा म्हणून कैरी नव्हे, खाल्ला म्हणून वैरी नव्हे.’’ मग आंबा डोळ्यांनी खावा, डोळ्यांच्या जवळ न्यावा, डोळ्यांवरून फिरवून घ्यावा. त्याच्या रंगात रंगून जावे. मग त्याला नाकाने खावे. त्याच्या वासात विरून जावे आणि गंधाची धुंदी चढल्यावर मग हळूच डेख काढावे. हे आपण केव्हा केले ते आपल्यालाही कळू नये. कळले तर पाप लागते!

ही झाली आम्रप्रस्तावना. पण खरा सदुपदेश विंदा पुढेच करतात- ते म्हणतात-

सौजन्य – गुगल प्लस

‘पण खुर्चीवर बसून नुसते हापुसचे आंबे खाणाऱ्या हतभागी लोकांना हा आम्रयोग अजूनही अशात आहे. ते एक पाखंडी कर्मकांडामध्ये गुंतलेले आहेत. पांढरपेशा आचारसंहितेच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला खरा आंबा खाताच येत नाही. आंबा खाताना आपले सर्वांग त्याच्यात सहभागी व्हावे लागते. शिष्टाचारांचा बळी दिल्याशिवाय आंब्याचा रस मिळाला तरी रसास्वाद मिळणे अशक्य असते. मुंबईमध्ये फक्त मुले तेवढीच खऱ्या अर्थाने आंबे खाऊ शकतात. त्यांच्या गालावर साटे चढतात. कपड्यावर मानचिन्हे उमटतात. नाकावर आंबा खाल्ल्याचा कैफ असतो. आंबे खाल्ल्यावर त्यांच्या संबध शरीराचा एक मोठा आंबा बनतो. आम्रयोगाचे ज्ञान नसूनही ती आम्रब्रह्मापर्यंत पोचलेली असतात. ज्ञानावाचूनही माणसाला मोक्षापर्यंत कसे पोचता येते याचा तो एक साक्षात्मा असतो. मोठी माणसे आंबा कधीच खात नाहीत. ती फक्त एका महत्त्वाच्या कौटुंबिक शिष्टाचारात सहभागी होतात!’

ह्याच्यापुढे विंदा हापुसचं, रायवळ आंब्याचं सेवन कसं करतात आणि कसं करायला हवं ते सांगतात. ते आता मुळातून पहावे हे बरे. पण सांगायचं आहे ते वेगळेच. यंदा विंदाची जन्मशताब्दी साजरी होते आहे. त्यात कवितावाचन हे आलंच पण कुणा कल्पकाला हा आम्रयोगाचा सोहळा प्रत्यक्षात करून पहायला काय हरकत आहे?

पाहिजे तर सुरुवात मी करून दाखवतो.

मग केव्हा बोलावता?

तेव्हा आता आंब्याचे दिवस पुन्हा सुरू झाले आहेत!

——-***——

कव्हर फोटो सौजन्य :- टाईम्स ऑफ इंडिया

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 6 Comments

  1. आम्रयोग!….क्या बात है!👍👌विंदा लाजबाब!

  2. ठीक.

  3. विंदाचा लेख अप्रतिमच! आता देवगडमध्ये तऱ्हे तर्हेचे आंबे खाल्ले तरी देवगड हापुसला तोड नाही.

  4. Surekh lekh junya athavani jagya zhalya lahanpanichya

  5. आंब्यासारखाच सुमधुर लेख!

  6. VINDA mhanje VINDHACH ! kiti sahaj, sundar shabdat sampurna chitra dolysamor ubhe kele ahe . APRATIMN !!!!