असे म्हणतात की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौध्दिकानंतर एका कार्यकर्त्याने गोळवलकरांना संघाच्या विचारसरणीत काही बदल सुचवले होते. त्यावर गुरूजी म्हणाले, ‘बदलला की संघ संपला हे लक्षात ठेव’.

कम्युनिस्ट पक्षालाही हे वर्णन तंतोतंत लागू होते. मिखाइल गोर्बाचेव यांनी ११ मार्च १९८५ रोजी रशियाच्या पॉलिटब्युरोचे महासचिव म्हणून सूत्रे हाती घेतली आणि २५ डिसेंबर १९९१ रोजी राजीनामा देऊन रशियाची सूत्रे बोरिस येल्तसिन यांच्या हाती सोपवली. आपल्या कारकिर्दीच्या सहा वर्षात गोर्बाचेव यांनी  पक्षाची पारंपरिक ताठर भूमिका सोडून  देऊन ग्लासनोस्त (खुली चर्चा) व  पेरेस्त्रॉइका (पुनर्रचना) यांची मात्रा दिली आणि जनतेत असलेला अनेक वर्षाचा असंतोष उफाळून आला. परिणामस्वरूप २६ डिसेंबर १९९१ रोजी रशियाचे विघटन होऊन प्रजासत्ताकातील छोट्या छोट्या राष्ट्रांना स्वातंत्र्य देण्यात आले. या गोष्टीला आता सव्वीस वर्षे झाल्यावरही रशियाची ताकद आणि ताठा टिकून आहे. पण या सर्व घडामोडी घडत असताना त्यांचा काय अर्थ काढला जात होता, त्याकडे पाहण्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा दृष्टीकोन कसा होता, याचे विवेचन करणारा एक दीर्घ लेख १९८८ साली मौजेत प्रसिध्द झाला होता. जुने विचारवंत आणि एकेकाळी स्वतः कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असलेले  श्री. प्रभाकर उर्ध्वरेषे यांनी हा लेख लिहिल्याने त्याचे महत्व अधिक आहे.

१ मे कामगार दिनाच्या निमित्ताने, कामगारांच्या कल्याणाचा वसा घेऊन स्थापन झालेल्या सोविएत रशियाच्या विघटनाचा पाया कसा घातला गेला ? त्याची पार्श्वभूमी काय होती ? याचा उहापोह करणारा पहिला भाग आज वाचा.

********

अलीकडे सोविएत युनियनने सेऊल ऑलिम्पिक्समध्ये १३२ पदके मिळविण्याचा  विक्रम केल्यामुळे त्या राष्ट्राचे नाव फार गाजले. परंतु सोविएत युनियनचा क्रीडाक्षेत्रातील पराक्रम ही गोष्ट तशी गेल्या चारसहा ऑलिम्पिक महोत्सवांमुळे जगाला परिचित झाली हे. तसेच ज्या इतर कम्युनिस्ट देशात भांडवलदारी-सरंजामदारी पद्धतीतील कामगार-शेतकऱ्यांची पिळवणूक संपलेली आहे, तेथे वृद्धांची व बालकांची विशेष काळजी घेतली जाते, शिक्षण व आरोग्यसेवा सर्वांना विनामूल्य उपलब्ध आहे, वगैरे वैशिष्ट्यांबद्दलही पुष्कळ सांगितले जाते, त्यांत बरेच तथ्य आहे यात शंका नाही.

परंतु त्याचबरोबर गेल्या दोनतीन वर्षात सोविएत युनियनचे नवे सर्वोच्च नेते मिखाईल गोर्बाचेव यांनी जे काही फार मोठे, अगदी मूलभूत स्वरूपाचे बदल सोविएत युनियनमध्ये घडवून आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत व त्याचे जे दूरगामी स्वरूपाचे परिणाम गेल्या दोनतीन महिन्यांत दिसून आले आहेत, त्यामुळे फक्त सोविएत युनियनच्या जनतेमध्येच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीलाच मोठा हादरा बसला आहे. यापूर्वी १९५६ साली क्रुश्चेव्हने स्तालिनच्या कृष्णकृत्यांचा पंचनामा करणारा अहवाल दिला. त्या वेळचा एक आणि सोविएत-चीनचे वितुष्ट निर्माण झाले तो एक, असे दोन मोठे हादरे यापूर्वीच जागतिक कम्युनिस्ट चळवळीला बसले आहेत. त्यामुळे या चळवळीची व्याप्ती काही प्रमाणात वाढली असली तरी तिच्यात मॉस्को व बीजिंग ही दोन परस्परांमध्ये वैमनस्य असलेली धर्मपीठे निर्माण झाली आहेत. शिवाय काही पंथ-उपपंथ निर्माण होऊन एक आंतरराष्ट्रीय, संघटित व एकसंघ चळवळ हे तिचे स्थान इतिहासजमा झाले आहे. परंतु एकसंघ नसली तरी जागतिक कम्युनिस्ट चळवळ आजही काही सामर्थ्यहीन किंवा शक्तिशून्य झालेली नाही. पण आता मिखाईल गोर्बाचेव यांनी आपल्या राष्ट्राला ग्लासनोस्त (खुली चर्चा) व  पेरेस्त्रॉइका (पुनर्रचना) या दोन मात्रांचे जे जालीम डोस दिले आहे, त्यामुळे आज अस्तित्वात असलेली कम्युनिझमची संकल्पनाच, आहे त्या स्वरूपात टिकून राहील की नाही, अशी समस्या संपूर्ण कम्युनिस्ट जगापुढे निर्माण झाली आहे. विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षांत रशियन क्रांतीमुळे कम्युनिझमचा जागतिक राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याला प्रारंभ झाला. तो आता त्याच शतकाच्या अखेरच्या बारा-पंधरा वर्षांत नहीसा होणार नसला तरी एकविसाव्या शतकात प्रवेश करताना अगदी नव्या स्वरूपातील कम्युनिझमचे मानवतेला दर्शन घडेल अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. { सदर लेख आपण punashcha.com वर वाचत आहात }

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि गोर्बाचेव

गोर्बाचेव यांच्या नवीन विचारसरणीमुळे आणि ग्लासनोस्त व पेरेस्त्रॉइका यांवर आधारित मूलभूत सुधारणांच्या कार्यक्रमामुळे होत असलेल्या परिवर्तनाला अनेक राजकीय निरीक्षकांनी ‘दुसरी क्रांती’ असे नाव दिले आहे. तसेच भांडवलशाही व साम्यवाद या दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्थांमधील अपूर्णता आता स्पष्ट झाली आहे. गोर्बाचेव-प्रणीत पेरेस्त्रोइकामुळे त्या दोन अर्थव्यवस्थांमधील अंतर कमी होण्याला व त्यांचे सहजीवन वाढीला लागण्याचा मोठा संभव निर्माण झाला आहे, असेही मत गालब्रेथसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अर्थशास्त्रज्ञांनी व काही समाजशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. अर्थात कम्युनिझमच्या स्वरूपातील मूलभूत परिवर्तन आणि  भांडवलशाही व साम्यवादी अर्थव्यवस्थेचे वाढते सह-अस्तित्व, यांसारखी भाकिते खरी ठरणार की नाही व ठरल्यास किती प्रमाणात हा बदल मूलगामी स्वरूपाचा असेल हे आजच सांगणे कठीण आहे. परंतु गेली दीडदोन वर्षे गोर्बाचेव यानी आपल्या ग्लासनोस्त व पेरेस्त्रोइकाची गती वेगाने वाढवली. विशेषतः सप्टेंबर ३० व ऑक्टोबर १ या दोन तारखांना जे सत्तांतराचे नाट्यमय बदल त्यांनी घडवून आणले ते जगाला स्तिमित करणारे आहेत व आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीला पूर्वी बसलेल्या हादऱ्यांपेक्षाही मोठे, भूकंपासारखे धक्के देणारे आहेत यात शंका नाही.

तसे पाहिले तर मिखाईल गोर्बाचेव हे सोविएत कम्युनिस्ट पार्टीतील अगदीच नवे नेते आहेत असे नाही. लेनिनच्या मृत्युसमयी (१९३४) जोसेफ स्तालिनने सत्तास्पर्धेतील ट्रॉट्स्की, बुखारिन प्रभूती या आपल्याइतक्याच (किंबहुना काकणभर अधिकच) प्रभावी प्रतिस्पर्ध्यांवर मात करून सत्ता बळकावली तेव्हा तो तरुण व तडफदार नेता होता. तसा तडफदार नेता स्तालिनच्या मृत्यूनंतर (१९५३) गेल्या ३२ वर्षांत सोविएत युनियनला लाभला नव्हता. स्तालिननंतर अल्पकाळ मॅलेंकोव तेथील पार्टी व शासन यांचा प्रमुख बनला, पण तो इतका दुर्बल व प्रभावहीन निघाला की त्याला दूर करून निकिता क्रुश्चेव्ह याने सत्ता हाती घेतली. तो बदल फारसा आश्चर्यकारक नव्हता. पुढे जवळजवळ एक दशकापर्यंत मोठा दरारा निर्माण करून क्रुश्चेव्हने आपली कारकीर्द गाजवली. स्तालिनला क्रूरकर्मा ठरवून संपूर्ण सोविएत इतिहासाच्या पुनर्लेखनाचा प्रारंभ त्याने केला ह्यामुळे तर त्याचे नाव सर्वतोमुखी झालेच, पण स्तालिनच्या कारकीर्दीत सोविएत अर्थव्यवस्था ही अमेरिकेच्या समृद्ध समाजाच्या तुलनेने पारच मागे राहिली होती. तो ‘बॅकलॉग’ भरून काढण्याचीच नव्हे तर त्या क्षेत्रातही अमेरिकेला मागे टाकण्याला आपण प्रतिज्ञाबद्ध आहोत व एवढी प्रगती केवळ दहापंधरा वर्षातच गाठण्याचा आपला निर्धार आहे, ही क्रुश्चेव्हची बढाईही कितपत खरी ठरते अशा उत्सुकतेने सर्व जग त्याच्या राजवटीकडे पाहू लागले. पण या क्रुश्चेव्हच्या कारकीर्दीतच सोविएत युनियन व चीन या दोन मोठ्या राष्ट्रांतील वैमनस्य विकोपाला गेले. चीनसारखे राष्ट्र अमेरिकेकडे झुकण्याला सुरुवात झाली तेव्हाच एकसंघ अशा आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीला मोठा तडा गेला व आगामी वीसपंचवीस वर्षांत जागतिक कम्युनिझमची शक्ती जागतिक भांडवलदारी-साम्राज्यवादी शक्तीवर मात करण्यात यशस्वी होईल ही शक्यता संपुष्टात आली. त्यामुळे व आर्थिक समृद्धीच्या क्षेत्रातील प्रगतीचे आश्वासन पूर्ण करण्याबाबत अपयश आल्यामुळेही पुन्हा सोविएत कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वातील सत्तास्पर्धेच्या तीव्रतेला मोठी धार आली. क्रुश्चेव्हने मॅलेंकोवची अचानकपणे उचलबांगडी करून स्वतःच्या हाती सत्ता घेतली व स्तालिनला इतिहासजमा केले. त्या क्रुश्चेव्हलाही १९६४ साली लिओनिद ब्रेझनेव या दुसऱ्या नेत्याने त्याच इतिहासाच्या अडगळीत फेकून दिले.

आज गोर्बाचेव यांनी जे परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत, तसाच सुधारणांचा कार्यक्रम अंमलात आणण्याचा कार्यक्रम क्रुश्चेव्ह यांनीही हाती घेतल्यामुळेच त्यांच्या प्रतिस्पर्धांनी उठाव केला व त्यातूनच ब्रेझनेव यांनीही हाती घेतल्यामुळेच त्यांच्या प्रतिस्पर्धांनी उठाव केला व त्यातूनच ब्रेझनेव यांनी सत्ता काबीज केली, असा गौप्यस्फोट नुकताच क्रुश्चेव्हच्या पुत्राने केला आहे.

ब्रेझनेव यांची अठरा वर्षांची दीर्घ कारकीर्द फारशा अंतर्गत परिवर्तनासाठी गाजली नाही. परंतु त्या काळात अमेरिकेशी असलेली अणुशस्त्रांची स्पर्धा प्रचंड प्रमाणात वाढली. शीतयुद्धाचे वातावरण पुष्कळच गरम झाले व सोविएतच्या अप्रत्यक्ष नियंत्रणाखालील हंगेरी, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया आदी पूर्व युरोपच्या कम्युनिस्ट राष्ट्रांतील हस्तक्षेपासारख्या घटना वाढत गेल्या. चीनबरोबर वैमनस्य सुरू झाले आणि आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीचे विघटनही वाढत राहिले. ब्रेझनेव यांच्या आयुष्याच्या अखेरच्या पाचसहा वर्षांत तर ते वृद्धापकाळामुळे जवळजवळ विकलांग झाले होते. त्यांची शक्ती फार क्षीण झाल्यामुळे त्यांचे काही निकटवर्ती सहकारी हेच त्यांच्या नावाने सत्तेची सूत्रे सांभाळत होते. ब्रेझनेवच्या या एकूणच कारकीर्दीत सोविएतमध्ये स्तालिनच्या कारकीर्दीसारखे अत्याचार व दहशतवादी प्रकार घडण्याला आळा बसला असला, तरीही सोल्झेनित्सिनसारख्या लेखकाची हद्दपारी, साखारोवसारख्या श्रेष्ठ शास्त्रज्ञावरील व अनेक बुद्धिजीवीवरील निर्बंध, मतभेद व्यक्त करणाऱ्यांसाठी व नेतृत्वावर, पार्टीवर व शासनावर टीका करण्याऱ्यांसाठी छळछावण्या, आपला देश सोडून इस्रायल जाऊ इच्छिणाऱ्या हजारो ज्युंना परवानगी नाकारणे वगैरे प्रकार वाढत गेले. त्याचबरोबर घरांची व दैनंदिन गरजांच्या वस्तूंची (खाद्यपदार्थ, पादत्राणे, साबण वगैरे) टंचाई वाढत गेली, उत्पादनवाढीचे प्रमाण घटले आणि मालाचा व सार्वजनिक सेवांचा दर्जा निकृष्ट होता, त्यात सुधारणा झाली नाही. त्याचबरोबर पार्टीचे प्रशासनावरील वर्चस्व वाढून नोकरशाही पद्धतीच्या कारभाराचा व भ्रष्टाचाराचाही वाढत्या प्रमाणावर सुळसुळाट होत गेला. ब्रेझनेवच्या कारकीर्दीतच सोविएत युनियनने अफगाणिस्तानातील बाब्रस कर्माल या कम्युनिस्ट नेत्याचीच राजवट उलथून पाडण्यासाठी लष्करी हस्तक्षेप केला. जवळजवळ दीड लाखांची फौज त्या देशात घुसवली. कर्माल सरकारच्या आमंत्रणावरूनच आपण ही लष्करी कारवाई करीत आहोत असा एकीकडे कांगावा करीत कर्माललाच ठार मारले आणि आपल्या हस्तकांची सत्ता तेथे प्रस्थापित केली. या कारवाईत सोविएतला फार मोठे अपयश आले. अफगाण जनतेनेच या नव्या परकीय हस्तकांच्या राजवटीविरुद्ध बंडखोरी सुरू केली आणि लाखो बंडखोरांनी शेजारच्या पाकिस्तानात आश्रय घेतला. त्या निमित्ताने अमेरिकेने पाकिस्तानला व पाकिस्तानमार्फत या बंडखोरांना लक्षावधी डॉलर्सची आर्थिक मदत व प्रचंड प्रमाणावर शस्त्रास्त्रांची मदत केली आणि बंडखोरांनी अफगाणिस्तानातील सोविएतच्या हातचे बाहुले असलेल्या नजीबुल्ला सरकारला जेरीस आणले. यात चीननेही सोविएतविरोधी धोरणापायी अफगाण बंडखोरांना व त्यांच्या पाठीराख्या पाकिस्तानला व अमेरिकेलाच पाठिंबा दिला.{ सदर लेख आपण punashcha.com वर वाचत आहात }

तिकडे युरोपमध्ये सोविएत युनियन व इतर कम्युनिस्ट राष्ट्रांची प्रगती होण्याऐवजी त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत होती. त्याच काळात पूर्वेकडे चीनमध्ये माओ जे दुंगच्या सांस्कृतिक क्रांतीत स्तालिनच्या राजवटीपेक्षाही भीषण अत्याचाराचे व दहशतवादाचे प्रकार घडले. इतकेच नव्हे तर शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांतही मोठा विध्वंस व हिंसाचार वाढून अराजकाची परिस्थिती निर्माण झाली. तसेच व्हिएतनामसारख्या लहानशा राष्ट्राने आधी फ्रेंच व नंतर अमेरिकन साम्राज्यवाद्यांचा पराभव करून स्वातंत्र्य मिळविले आणि दक्षिण व उत्तर व्हिएतनामचे एकीकरणही घडवून आणले. पण त्याच वेळी कांपुचिआ या लहान राष्ट्रातील पोल पॉट या कम्युनिस्ट हुकूमशहानेही अत्याचाराची व हत्याकांडाची परिसीमा गाठली तेव्हा तिथे बंडाचा उठाव झाला. हेम सरीन यांची नवीन कम्युनिस्ट राजवट सत्तेवर आली. या प्रकरणी चीनने पोल पॉटची बाजू घेतली. इतकेच नव्हे तर त्याला चीनमध्ये आश्रय दिला. कांपुचिआतील नवीन राजवटीला लष्करी मदत करण्याबद्दल ‘धडा शिकविण्यासाठी’ व्हिएतनामवर आक्रमण केले. ही समस्या आजही सुटलेली नाही. शिवाय खुद्द चीनमध्येही माओच्या मृत्यूनंतर डेंग सियाओ पिंग यांच्या नव्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक क्रांतीने केलेली हानी भरून काढून आर्थिक व सामाजिक पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असला तरी सोविएत युनियनबरोबर वैमनस्य, अमेरिकेशी व पाकिस्तानशी दोस्ती व भारताशी शत्रुत्व या चीनच्या परराष्ट्रीय धोरणात अजून फारसा बदल झालेला नाही.

सोविएत युनियनमधील ब्रेझनेवच्या कारकीर्दीत त्या राष्ट्राच्या धोरणामुळे व चीनसारख्या कम्युनिस्ट राजवटीतील गैरप्रकारांमुळे त्या दोन राष्ट्रांतच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कम्युनिझममध्ये बऱ्याच विकृती निर्माण होत गेल्या. त्या चळवळीची जागतिक शक्ती कमी होत गेली. याउलट, याच कालखंडात खुद्द अमेरिकेच्या व त्याचबरोबर जपान, पश्चिम जर्मनी या भांडवलदारी देशांच्या आर्थिक समृद्धीत मोठीच नेत्रदीपक वाढ झाली. त्यांच्या तुलनेने सोविएत युनियन, चीन, पूर्व जर्मनी, विएतनाम, क्युबा वगैरे कम्युनिस्ट राष्ट्रांना आर्थिक समृद्धीची फार वरची पातळी तर गाठता आली नाहीच; पण इंग्लंड, फ्रान्स, इटली वगैरे भांडवलदारी जगात दुय्यम प्रतीच्या गणल्या जाणाऱ्या राष्ट्रांच्याही तुलनेने कम्युनिस्ट राष्ट्रे फार मागे पडली. त्यांची आर्थिक प्रगती खुंटल्यासारखी झाली.

क्रमशः

********

पुढील भाग वाचा गुरुवारी दिनांक ३ मे रोजी.

लेखक- प्रभाकर उर्ध्वरेषे; अंक- मौज;  वर्ष- १९८८ 

 

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply