पहिल्या भागात आपण वाचलं की पाश्चात्य भांडवलशाही देशांशी तुलना केल्यास, सोविएत युनियन, चीन, पूर्व जर्मनी, विएतनाम, क्युबा ही कम्युनिस्ट राजवट असलेली राष्ट्रे मागे पडली होती. त्याचप्रमाणे कम्युनिझम राबवणारी चीन आणि रशिया ही बलाढ्य राष्ट्रे एकमेकांच्या विरोधात उभी होती. पैकी चीनने तर चक्क भांडवलशाहीवादी अमेरिकेचा गोट जवळ केला होता. आणि एकंदर कम्युनिस्ट राष्ट्रांची आर्थिक प्रगती खुंटल्यासारखी झाली.

आता पुढे =>

१९८२ साली ब्रेझनेवचे निधन झाले, त्या वेळी ही अशी परिस्थिती होती. त्यानंतर आंद्रेपोव व चेर्नेको या दोन वृद्ध नेत्यांची प्रत्येकी जेमतेम दीड वर्षांची कारकीर्द त्यांच्या मृत्यूने समाप्त झाली. त्या तीन वर्षांतही कम्युनिस्ट जगाची परिस्थिती सुधारली नाही. उलट आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील त्या गटाचा तणाव व शस्त्रास्त्रस्पर्धा वाढतच राहिली.

अशा या पार्श्वभूमीवर १९८५ साली मिखाइल गोर्बाचेव यांनी सोविएत नेतृत्वातील सत्तास्पर्धेत बाजी मारून पार्टीचे सरचिटणीसपद काबीज केले. त्या वेळी ते ५४ वर्षांचे होते. म्हणजे स्तालिनने १९२३-२४ मध्ये सर्वोच्चपद हाती घेतले, त्यानंतर साठबासष्ट वर्षांनी प्रथमच सोविएत युनियनला तुलनात्मक दृष्ट्या तरुण व तडफदार नेतृत्व लाभले. त्याचे परिणामही लवकरच दिसून आले. तसे पाहिले तर गोर्बाचेव यांनी ब्रेझनेवच्या कारकीर्दीत किंवा आंदेरपोव व चेर्नेको यांच्या राजवटीत निदान उघडपणे तरी त्या राजवटींविरुद्ध संघर्ष केलेला नव्हता किंवा पुढे त्यांनी ज्या गैरप्रकारांविरुद्ध व अपप्रवृत्तींविरुद्ध संघर्ष सुरू केला तशी काही बंडखोरी ते सत्तेवर येईपर्यंत त्यांनी केलेली नव्हती.

परंतु मार्च १९८५ मध्ये पार्टीचे सरचिटणीसपद काबीज केल्यावर गोर्बाचेव यांनी थोड्याच दिवसांत आपली नवी विचारसरणी पुढे मांडण्याला सुरुवात केली. सोविएत युनियनमधील अतंर्गत परिस्थिती सुधारली पाहिजे व परराष्ट्रीय धोरणाला निराळे वळण लावून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील शीतयुद्धाचे वातावरणही निवळले पाहिजे, हे उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी ‘पेरेस्त्रोइका’ म्हणजे पुनर्रचनेची घोषणा दिली. परंतु सर्वांगीण परिवर्तनाच्या या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी आधी सगळ्या पूर्वेतिहासाचा निचरा झाला पाहिजे व लोकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अन्याय यासंबंधीच्या असंतोषाची मोकळी चर्चा होणे अगत्याचे आहे, ही जाणीव बाळगून त्यांनी ‘ग्लासनोस्त’ची कम्युनिस्ट चळवळीत अभूतपूर्व अशी ही एक घोषणा दिली.{ सदर लेख आपण punashcha.com वर वाचत आहात }

गोर्बाचेव यांनी या दोन्ही नव्या घोषणा देताना प्रथम थोड्या सावधगिरीने पावले टाकली. पूर्वीच्या ब्रेझनेव यांच्या करकीर्दीत माजलेल्या नोकरशाही कारभारावर व भ्रष्टाचारावर टीका करतानाही ब्रेझनेवचे व पूर्वीच्या इतर सर्वोच्च नेत्यांचे नाव न घेता फक्त प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे दिग्दर्शन केले. पण आपल्या या सर्वोच्च नेत्यानेच पूर्वितहासावर व सद्यःस्थितीवर टीका करून मोकळ्या चर्चेचे आवाहन केल्यावर लोकांच्या मनातील दडपण हळूहळू दूर झाले. मग घट्ट दाबून ठेवलेल्या भांड्यावरील झाकण दूर करताच कोंडलेली वाफ एकदम बाहेर पडावी तशी लोकांच्या असंतोषाला प्रसारमाध्यमांतून व सभा-परिषदांतून वाचा फुटू लागली. यात मुख्यतः धान्याची व खाद्यापदार्थांची, दैनंदिन गरजांच्या वस्तूंची आणि घरांची टंचाई, रांगांचे राज्य, उपभोग्य वस्तूंचा निकृष्ट दर्जा, सार्वजनिक सेवांमध्ये फोफावलेली नोकरशाही प्रवृत्ती व सामान्य जनतेविषयीची बेपर्वाईची व तुच्छतेची वृत्ती यांविषयी अक्षरशः हजारो तक्रारी व गऱ्हाणी लोकांनी नावांनिशी वेशीवर टांगली. त्याचबरोबर पार्टीचे नेते व कार्यकर्ते यांचा एक खास सवलतींचा व सुखसोयीचा उपभोग घेणारा वर्ग तयार झाला असून या भ्रष्टाचाराची गंगोत्री थेट ब्रेझ्नेवसारख्या वरिष्ठ नेत्यापर्यंत पोचल्याचे लोक उघडपणे बोलू व लिहू लागले. तसेच पार्टीतील अंतर्गत लोकशाही, टीका व आत्मटीका, वगैरे मार्क्सवाद-लेनिनवादाच्या मूलभूत सिद्धांतांना पार्टीच्या कारभारात वाव उरलेला नसून सोविएत शासनाच्या संस्थांना वार्टी पुढाऱ्यांच्या हातांतील खेळण्यांचे स्वरूप आले आहे, असेही लोकांनी निर्भयपणे सांगण्याला सुरुवात केली. गेल्या दोन वर्षात या ग्लासनोस्त-मोहिमेला इतकी मोठी गती आली की सोविएत युनियनने अनेक क्षेत्रांत केलेली मोठी प्रगतीही काही काळ लोक विसरले व एकूण धोरणावर प्रतिकूल टीकेचा माराच सुरू राहिला.

लोकांच्या असंतोषाची कोंडलेली वाफ अशी बाहेर पडल्यावर मग गोबार्चेव व त्यांचे समर्थक यांनी आता या असंतोषाला विधायक व पुनर्रचनात्मक वळण लावण्याच्या उद्दिष्टाने जून १९८८ च्या अखेरीस पार्टीची एक खास विस्तारित परिषद बोलावली. या परिषदेतही लोकांच्या असंतोषाला वाचा फोडण्याला वाव देण्याबरोबरच यापुढील काळात सध्याच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्याला जोरदार आवाहन करणे हा गोर्बाचेव यांचा हेतू होता. तो समोर ठेवून त्यांनी परिषदेतील खुल्या चर्चेचे नियंत्रण केले.

या परिषदेने एक अत्यंत महत्त्वाचा व उल्लेखनीय निर्णय असा घेतला की स्तालिनच्या काळातील अत्याचारांवर, दहशतवादावर व कटकारस्थानांवर क्रुश्चेव्हच्या अहवालात बत्तीस वर्षांपूर्वी पुष्कळ प्रकाशझोत टाकण्यात आला असला तरी स्तालिनने ट्रॉट्स्की, बुखारिन, कामेनेव प्रभृति या आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर जे धादांत खोटे आरोप ठेवून त्यांचा काटा काढला होता, त्यांच्याबद्दलचे संपूर्ण सत्य आजपर्यंत उजेडात आले नव्हते. म्हणून पार्टी-परिषदेने बुखारिन, कामेनेव प्रभृतींच्या काही चुका झाल्या असल्या तरी देशद्रोह, घातपात वगैरे त्यांच्यावरील आरोप मागे घेण्याचा व ट्रॉट्स्कीखेरीज इतर अनेक नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करून त्यांना मरणोत्तर पार्टी-सदस्यत्व पुनः बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रॉट्स्कीच्या चुका मात्र अधिक गंभीर असल्यामुळे त्याचे राजकीय नव्हे पण व्यक्तिगत पातळीवर पुनर्वसन करण्यात यावे – असे ठरविण्यात आले. तसेच स्तालिनच्या हत्याकांडाला बळी पडलेल्या हजारो सामान्य कार्यकर्त्यांना व सामान्य लोकांना श्रद्धांजली म्हणून एक हुतात्मा-स्मारक उभारण्यात यावे असाही एक निर्णय घेण्यात आला.

परंतु पूर्वेतिहासाची चिकित्सा व सद्यःस्थितीची मीमांसा एवढे करूनच ही परिषद संपविण्यात आली नाही. गेल्या साठ वर्षांत निर्माण झालेल्या अपप्रवृत्ती व गैरप्रकार यांमुळे घसरलेली पार्टीची व राष्ट्रीय प्रगतीची गाडी पुनः रुळावर आणायला हवी यासाठी लोकशाही जिंकावी व न्यायाची पुनःस्थापना करण्यावर आणि आर्थिक समृद्धीचे व लोकांचे राहणीमान वाढविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या अर्थव्यवस्थेतील व राजकीय पद्धतीतील पुनर्रचनेच्या कार्यक्रमावरही परिषदेने शिक्कमोर्तब केले. लोकशाही पद्धतीच्या कारभाराला व भ्रष्टाचाराला पायबंद घालावा, वाढवावा, घरांची टंचाई दूर करण्यासाठी गृहनिर्माणाच्या मोठ्या योजनांची शीघ्रगतीने अंमलबजावणी करावी, टंचाईमुळे निर्माण झालेल्या रांगांच्या राज्याची परिस्थिती नाहीशी करावी आणि सार्वजनिक सेवांचा दर्जा वाढविण्यासाठी कसून प्रयत्न करावा – असे आर्थिक समृद्धीच्या कार्यक्रमाचे स्वरूप गोर्बाचेव यांनी सुचविलेल्या पेरेस्त्रोइकाच्या घोषणेत अपेक्षित आहे. त्यात मतभेद होण्याचेही कारण नसल्यामुळे गेल्या दोन-अडीच वर्षात या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे जोरदार प्रयत्नही गोर्बाचेव यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. परंतु ग्लासनोस्त-मोहिमेला तसा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला तसा या सुधारणांच्या कार्यक्रमांना मिळालेला नाही, हे परिषदेत मान्य करण्यात आले. सोविएत युनियनमधील टंचाई, रांगांचे राज्य, सार्वजनिक सेवांचा खालावलेला दर्जा, पार्टीच्या पुढाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा खास वर्ग (Privileged class) वगैरे वास्तव परिस्थितीसंबंधीच तपशील हीच या परिषदेतील चर्चेची पार्श्वभूमी होती.{ सदर लेख आपण punashcha.com वर वाचत आहात }

सर्व सत्ता सोविएतांच्या हाती – लेनिन

या एकूण गंभीर परिस्थितीच्या कारणांची मीमांसा करताना गोर्बाचेव यांनी आपल्या प्रारंभीच्या भाषणातच ‘सर्व सत्ता सोविएतांच्या हाती’ या ऑक्टोबर क्रांतीच्या वेळीच लेनिनने दिलेल्या घोषणेचे पुरुज्जीवन केले. किंबहुना, या सिद्धांताची योग्य प्रकारे अंमलबजावणी न झाल्यामुळेच नोकरशाही पद्धतीच्या कारभाराचे प्रस्थ माजले आहे आणि पार्टीच्या पुढाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे अवास्तव महत्त्व वाढून त्यांच्यामध्ये सुखासीनता, चैनबाजी व भ्रष्टाचार यांची वाढ झाली आहे, हे ग्लासनोस्तच्या मोहिमेत लोकांनी पुढे मांडलेले विदारक सत्य गोर्बाचेव यांनी मान्य केले. ही परिस्थिती बदललीच पाहिजे, असे त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केले. त्यासाठी त्यांनी काही निश्चित सुधारणांच्या आणि निवडणुकीच्या व इतर काही कायद्यांत बदल करण्यासंबंधीच्या सूचनाही पुढे मांडल्या. यांपैकी एक महत्त्वाची सूचना म्हणजे अध्यक्षीय पद्धती अंगीकारण्याची. यात राष्ट्राध्यक्षाचे अधिकार वाढविण्याची कल्पना अभिप्रेत आहे. परंतु ती पद्धती कशी असावी, अमेरिका वा फ्रान्स यांच्या अध्यक्षीय पद्धतीपेक्षा निराळे असे काय करावे, हे गोर्बाचेव यांनी सांगितलेले नाही. तसेच सोविएत संस्थांवर पार्टी-समित्या व पुढाऱ्यांचे वर्चस्व व दडपण राहता कामा नये व सोविएत संस्थांमार्फत लोकांचा सहभाग वाढवून कारभाराचे खरेखुरे लोकशाहीकरण करावे, यासाठी सर्व पातळ्यांवरील पार्टी-समित्या व सोविएत संस्था यांचे प्रमुख निराळे असावे, ते प्रमुख सगळे पार्टीचे न राहता पार्टीबाहेरच्या कार्यकर्त्यांचे प्रमाण मोठे असावे, एकापेक्षा अधिक उमेदवारांना निवडणुकासठी उभे राहण्याची मुभा असावी व मतदानासाठी गुप्त मतदानपद्धती सुरू करावी, अशाही गोर्बाचेव यांनी सूचना केल्या. यांपैकी अध्यक्षीय पद्धती, निवडणुकीत एकापेक्षा अधिक उमेदवार, गुप्त मतदानपद्धती या सूचना परिषदेने मान्य केल्या, पण पार्टी-समित्या व सोविएत संस्थांचे प्रमुख निराळे असावे या सूचनेला विरोध झाला आणि अगदी खालपासून ते थेड सुप्रीम सोविएतच्या पातळीपर्यंत पार्टी-समित्या व सोविएतप्रमुख हा एकच असावा असा काही विरोधकांनी आग्रह धरला आणि आश्चर्याची गोष्ट अशी की पार्टी-संघटनेची पकड सैल करण्याऐवजी अधिक घट्ट करणारा पार्टी-कार्यकर्त्यांचा (हितसंबंधी लोकांचा) हा हट्ट यांच्या हाती अधिक सत्ता केंद्रित करण्याचीही सोय झाली. ती असी की एप्रिलमध्ये निवडणुकी होतील तेव्हा पार्टीचे सरचिटणीस व सुप्रीम सोविएतचा खराखुरा सत्ताधारी अध्यक्ष हा एकच राहण्याची व्यवस्था मान्य झाल्यामुळे गोर्बाचेव त्या पदावर राहणार हे परिषदेतच उघड झाले.

याखेरीज अर्थव्यवस्थेत काही महत्त्वचे बदल ‘पेरेस्त्रोइका’मध्ये सुचविण्यात आले हेत. त्यालाही काही प्रमाणात विरोध होता. तरीही परिषदेकडून गोर्बाचेव यांनी त्या सुधारणांना संमती मिळवली. शेतीच्या क्षेत्रात आधीच काही प्रमाणात पूरक खाजगी शेतीला व त्यातून अधिक उत्पन्न मिळविण्याला प्रोत्साहन मिळविण्याचा  उपक्रम यशस्वी झाला आहे; तीच पद्धती अधिक व्यापक करून सामुदायिक शेतीला अधिक लहान उद्योगधंदांना व व्यापाराला लागू करावी, असा या सूचनांचा आशय आहे. तसेच परदेशी भांडवल, तंत्रज्ञान व व्यवस्थापन यांनाही काही प्रमाणात मुभा असावी असेही ‘पेरेस्त्रोइका’त सुचविले आहे. सर्वसामान्यपणे हा कार्यक्रम मान्य झाला असला तरी यामुळे भांडवलधारी पद्धतीचाच चंचुप्रवेश पुनः करण्यात येत आहे असे गोर्बाचेव यांच्या टीकाकारांचे म्हणणे असून त्या सूचना अंमलात आणण्याला पार्टी-परिषदेत काही प्रमाणात विरोध झालाच, पण नंतरही विरोधकांची प्रचारमोहीम वाढत गेली.{ सदर लेख आपण punashcha.com वर वाचत आहात }

यांतून शेवटी निष्पन्न झाले ते असे की जूनअखेरची पार्टीपरिषद अत्यंत यशस्वी झाल्याचे डिंडिम वाजविण्यात आले तरी परिषदेनंतर लगेच विरोधकांनी आपल्या छुप्या विरोधाची मोहीम उघडपणे सुरू केली. यात गोर्बाचेव यांच्यानंतर क्रमांक दोनचे पुढारी येगोर लिगाचेव यांचाच मोठा पुढाकार आहे. गेली दोनतीन वर्षे पॉलिट ब्यूरोपर्यंतच आपला विरोध मर्यादित ठेवण्याचा संयम त्यांनी सोडून दिला असून परिषदेत फक्त काही प्रमाणात उघडपणे झालेला विरोध, परिषद संपताच ठिकठिकाणी होणऱ्या सभा-परिषदांतून आणि प्रसारमाध्यमांतून मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊ लागला.

क्रमशः

********

पुढील भाग वाचा सोमवारी दिनांक ७ मे रोजी.

लेखक- प्रभाकर उर्ध्वरेषे; अंक- मौज;  वर्ष- १९८८ 

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. ग्लासनोस्त व पेरीस्त्रोयका मुळे भारत व जगावर नक्की काय बदल/परिणाम झाले हे जाणून घ्यायला आवडेल.