दुसऱ्या भागात आपण वाचलं की १९८८ जूनअखेरची पार्टी परिषद अत्यंत यशस्वी झाल्याचे डिंडिम वाजविण्यात आले तरी परिषदेनंतर लगेच विरोधकांनी आपल्या छुप्या विरोधाची मोहीम उघडपणे सुरू केली. यात गोर्बाचेव यांच्यानंतर क्रमांक दोनचे पुढारी येगोर लिगाचेव यांचाच मोठा पुढाकार आहे. गेली दोनतीन वर्षे पॉलिट ब्यूरोपर्यंतच आपला विरोध मर्यादित ठेवण्याचा संयम त्यांनी सोडून दिला असून परिषदेत फक्त काही प्रमाणात उघडपणे झालेला विरोध, परिषद संपताच ठिकठिकाणी होणऱ्या सभा-परिषदांतून आणि प्रसारमाध्यमांतून मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊ लागला.

आता पुढे =>

या विरोधाला लवकरच संघटित स्वरूप येण्याची चिन्हे दिसू लागताच गोर्बाचेव सावध झाले आणि विरोधकांना कोणकोणती वृत्तपत्रे व नियतकालिके विशेष अनुकूल आहेत याची आपण नोंद घेत आहोत, असे त्यांनी रागाच्या भरात जाहीरपणे सांगून टाकले! गोर्बाचेव यांच्या नव्या सुधारणांच्या कार्यक्रमाला ‘दुसरी क्रांती’ व गोर्बाचेव स्वतः हे ‘दुसरे लेनिन’ असल्याची प्रशस्ती एका बाजूला सुरू झाली असतानाच दुसरीकडे विरोधाचे व वरिष्ठ पातळीवरील सत्तास्पर्धेचे राजकारणही तापत जालले. जुलमी व अत्याचारी राजवटीचा स्तालिनवाद त्याज्य असला तरी स्तालिनने या मागासलेल्या राष्ट्राला अवघ्या दहा-बारा वर्षांत सामर्थ्यशाली राष्ट्र बनविले, हिटलरच्या आक्रमणाला समर्थपणे तोंड देण्याइतके प्रभावी नेतृत्व दिले, या स्तालिनच्या पराक्रमाचा विसर पडून चालणार नाही, अशी भूमिका घेऊनही टीकाकारांनी गोर्बाचेव यांच्यावर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. तसेच भ्रष्टाचारविरोधी मोहिमेच्या प्रारंभी ब्रेझनेव यांचे कुटुंबीय व जामात चोर्बोनोव यांच्यावर लक्षावधी रुबल्सची लाच खाल्ल्याचे आरोप ठेवण्यात आले. चोर्बोनोव व त्यांचे साथीदार यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला भरून त्याची सुनावणी सुरू झाली. त्यामुळेही ज्यांना आरोपांची धास्ती वाटू लागली होती त्यांनी गोर्बाचेवच्या विरोधात आपले डावपेच आखायला सुरुवात केली. तर गोर्बाचेव यांनीही आपल्या प्रतिडावपेचांना गती देऊन विरोधकांचे पंख कापून टाकण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी एप्रिलच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहण्याऐवजी जूनअखेरच्या परिषदेला दोन महिने पूर्ण होण्याच्या आतच अत्यंत तातडीने मध्यवर्ती समिती व सुप्रीम सोविएत यांच्या खास सभा ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी बोलावल्या व सर्व सत्ता स्वतःच्या हाती केंद्रित करण्याची व प्रमुख विरोधकांना बाजूला करून आपल्या समर्थकांची बाजू मध्यवर्ती समितीत मजबूत करण्याची कारवाई मोठ्या तडफदारपणे केली आणि सर्वांना चकित करून टाकले.

या तडकाफडकी केलेल्या कारवाईत गोर्बाचेव यांनी सुप्रीम सोविएतचे अध्यक्ष व जुने वयोवृद्ध पुढारी आंद्रे ग्रोमिको यांचा वृद्धापकाळाच्या सबबीवर राजीनामा घेतला आणि उपाध्यक्ष देमाचेव व इतर तिघे प्रमुख विरोधक यांना पॉलिट ब्यूरोतून वगळून टाकले. आपल्या टीकाकारांचे नेते लिगाचेव यांना मात्र डच्चू देण्याऐवजी कृषि आयोगाच्या अध्यक्षपदाचे नवे पद निर्माण करून ते त्यांच्याकडे सोपविले. एप्रिलपर्यंत धान्य व इतर कृषिविषयक उत्पादन यांत वाढ करून टंचाईच्या समस्येवर परिणामकारक इलाज करण्यात लिगाचेव यांना यश आले नाही तर त्या परिस्थितीची जबाबदारी त्यांच्यावर टाकून त्यांची शक्ती खच्ची करण्याचा हा गोर्बाचेव यांचा डाव असावा असे बोलले जात आहे. त्यात तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याचाच अर्थ असा की गोर्बाचेव यांचे नेतृत्व व त्यांचा दुसऱ्या क्रांतीचा सुधारणांचा कार्यक्रम हा वरवर पाहता मोठा आकर्षक वाटला तरी त्यात त्यांना हमखास यश मिळेलच असे खात्रीपूर्वक आज तरी सांगणे कठीण आहे. सर्वसामान्य जनतेने पिढ्यानुपिढ्या सहन केलेले टंचाईचे व रांगांचे राज्य, मालाचा निकृष्ट दर्जा, असंतोष गेल्या दोनअडीच वर्षांतील ‘पेरेस्त्रोइका’च्या प्रचारमोहिमेने कमी झालेले नाही. भ्रष्टाचाराची, नोकरशाही पद्धतीच्या कारभाराची व पार्टी पुढाऱ्यांच्या सुखासीन वर्गाच्या वर्चस्वाची परिस्थितीही राहणार, कम्युनिस्ट पार्टीखेरीज इतर कोणत्याही पक्षाला परवानगी मिळणार नाही, मार्क्सवाद-लेनिनवाद पोथीनिष्ठ तत्त्वज्ञानाच्या चौकटीबद्दल खुली चर्चा करावयाची नाही – या निर्बंधांमुळे काही पुढाऱ्यांचा स्तालिनवादी म्हणून किंवा ब्रेझनेववादी म्हणून काटा काढण्याचे प्रकार यापुढील काळात होणारच नाहीत असेही कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. अशा स्थितीत जनतेचा असंतोष कमी होण्याऐवजी ग्लासनोस्तच्या खुल्या चर्चेतूनच पेरेस्त्रॉइकाच्या मोहिमेचा पराभव होण्याची शक्यता आहे. त्यावरच गोर्बाचेवप्रणीत दुसऱ्या क्रांतीचे यशापयश अवलंबून आहे. या बाबतीत प्रत्यक्ष सोविएत युनियनमध्ये गोर्बाचेव यांना टंचाई व रांगांचे राज्य कमी करण्यात किती यश येते व विरोधकांना निष्प्रभ करण्याचे त्यांचे प्रयत्न कितपत यशस्वी होतात हे येत्या काही महिन्यांत ठरणार आहे.

गोर्बाचेव यांच्या धोरणातील आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेशी संबंध सुधारणे, चीनशी पुनः सरकारी व पार्टी-पातळीवर संबंध सुधारणे व आंतरराष्ट्रीय शीतयुद्धाचा तणाव कमी करणे, या पावलांची सकारात्मक चिन्हे दिसू लागली होती. मध्यम शक्तीच्या प्रक्षेपणास्त्रांच्या विध्वंसाबाबत व अण्वस्त्रांवरील नियंत्रणाबाबत अमेरिकेशी करारमदार होण्याच्या दृष्टीने गोर्बाचेव यांनी चांगली पावले उचलली होती व अमेरिकेचे अध्यक्ष रेगन यांच्याबरोबर झालेल्या शिखर-परिषदा या घटनाही स्वागतार्ह होत्या. त्यापैकीच अफगाणिस्तानाहून फौजा काढून घेण्याची सोविएतची घोषणा ही एक महत्त्वाची घटना होती. परंतु अफगाण बंडखोरांना मदत देण्याचे धोरण अमेरिकेने व पाकिस्तानने बदलले नाही. उलट बंडखोरांचे हल्ले वाढू लागले. त्यामुळे रशियन फौजा अफगाणिस्तानातून काढून घेण्याची प्रक्रिया मध्येच थांबविण्याची घोषणा गोर्बाचेव यांनी अचानकपणे केली आहे. हीसुद्धा त्यांच्या धोरणांची एक प्रकारची पीछेहाटच आहे, असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.

सोविएत युनियनमधील या प्रचंड उलधापालथीचे परिणाम त्या राष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीवर होणे अपरिहार्य आहे. तसेच जूनअखेरच्या परिषदेनंतर दोनच महिन्यांत गोर्बाचेव यांनी ग्रोमिको यांना डच्चू देऊन स्वतःकडे अध्यक्षपद घेतले व स्वतःच्या विरोधकांना इशारा म्हणून ग्रमिकोबरोबरच उपाध्यक्ष देमिचेव यांना व इतर तीन प्रमुख पुढाऱ्यांना पोलिट ब्यूरोतून वगळले. या सत्तांतराची घटना इतकी अचानक घडून आलेली आहे की त्यामुले सर्वच कम्युनिस्ट पक्षांचे नेते दिङ्मूढ झाले आहेत. मात्र त्यांची प्रतिक्रिया हा लेख लिहून होईपर्यंत हाती आलेली नाही.

परंतु जून-परिषदेनंतरच्या भारतातील दोन प्रमुख कम्युनिस्ट पक्षांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या असून त्यावरून त्यांनी आपली नेहमीची परंपराच पुढे चालविल्याचे दिसून येते. या दोन पक्षांपैकी राजेश्वरराव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) व त्याचे पुढारी यांनी पूर्वी त्यांचा पक्ष एकसंध असताना जे मॉस्कोवरील अंधश्रद्धेचे व्रत घेतले ते एखाद्या हिंदू पतिव्रतेप्रमाणे अजून कायम ठेवले आहे. ग्लासनोस्त व पेरेस्त्रोइका या गोर्बाचेव यांच्या कार्यक्रमाला गती आल्यापासूनच्या दोन वर्षांत ‘भाकप’ने आपल्या ‘न्यू एज’, ‘पार्टी लाइफ’ वगैरे नियतकालिकांतून ‘प्रावदा’ वगैरे सोविएत नियतकालिकांतील उतारे देणारी वार्तापत्रे व लेख प्रसिद्ध करण्यालाच आपले धोरण मानले असून सोविएत नेते म्हणतील तेच अंतिम सत्य ही आपली जुनी परंपरा कायम राखली आहे. फार काय पण गोर्बाचेवप्रणीत ‘ग्लासनोस्त’ हे टीका-आत्मटीकेच्या मार्क्सवादी सिद्धांताच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे उत्तम उदाहरण असल्याचे प्रशस्तिपत्रही दिले आहे.

याउलट, आता भारतीय कम्युनिस्ट चळवळीतील प्रमुख पक्ष बनलेल्या मार्क्सवादी पक्षाने मात्र पूर्वीची मॉस्कोनिष्ठा व नंतरची चीननिष्ठा या दोहोंना सोडचिठ्ठी दिल्यामुळे स्वतंत्रपणे विचार करून सोविएत युनियनमधील घडामोडींवर टीका करणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी (१९८७) ऑक्टोबर क्रांतीच्या ७० व्या वाढदिवसाच्या प्रसंगी गोर्बाचेव यांनी केलेल्या विस्तृत भाषणाच्या वेळीच मार्क्सवादी पक्षाने या टीकेला प्रारंभ केला; व आता जून-परिषदेनंतर त्या आधी केलेल्या टीकेला पुष्टी देणारा मध्यवर्ती अहवाल ‘मार्किस्ट’ या मार्क्सवादी पक्षाच्या तात्त्विक चर्चेच्या नियतकालिकाच्या जून-जुलै १९८८ च्या (पण ऑगस्ट-अखेर प्रसिद्ध झालेल्या) अंकात प्रकाशित झाले आहेत. या टीकेचा मुख्य आशय असा की सोविएत युनियनमध्ये आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. तिच्यावर मात करण्यासाठी सोविएत युनियनने अंतर्गत प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय परिस्थितीबाबत अमेरिकेशी मिळते घेण्याचे मवाळ धोरण स्वीकारले आहे. यात जर्मनी, जपान वगैरेंच्या आर्थिक समृद्धीच्या ‘चमत्कारानं’ दिपून गेलेल्या गोर्बाचेव यांच्या नेतृत्वाला अमेरिकन साम्राज्यवाद्यांच्या युद्धखोरीचा धोकाही कमी वाटू लागला असून अविकसित व साम्राज्यवाद्यांवर अवलंबून राहणाऱ्या तिसऱ्या जगातील लोकांच्या स्वातंत्र्य-लढ्याचे महत्त्वही गोर्बाचेव आता कमी लेखू लागले आहेत. भारतातील राजीव सरकारला पाठिंबा देणे हे त्याच अपप्रवृत्तीचे उदाहरण असल्याचेही मार्क्सवादी पक्षाच्या ठरावात म्हटले आहे. तसेच अंतर्गत परिस्थितीतील नोकरशाही पद्धतीचा वरचष्मा, लोकशाही हक्कांची पायमल्ली, वगैरे प्रकारांवरही योजिलेला, पार्टीचे महत्त्व कमी करणे हा उपाय लेनिनच्या शिकवणुकीविरुद्ध आहे, अशीही मार्क्सवादी पक्षाची टीका आहे. जून परिषदेत पार्टी व सोविएत संस्था यांचे प्रमुख निराळे असावेत ही सूचना गोर्बाचेव यांनी विरोधकांशी तडजोड म्हणून मागे घेतली व सर्व पातळ्यांवर पार्टी व सोविएत समित्यांचा प्रमुख एकच असावा, असा निर्णय घेण्यात आला, याची दखल मात्र मार्क्सवादी पक्षाच्या ठरावात घेण्यात आलेली नाही. (त्यानंतर, एप्रिलपर्यंत निवडणुकीची वाट न पाहता सप्टेंबरच्या अखेर, म्हणजे दोनच महिन्यांत, विरोधकांचा जोर वाढू लागलेला पाहून गोर्बाचेव यांनी अध्यक्ष ग्रोमिको यांचा राजीनामा घेऊन सुप्रीम सोविएतचे अध्यक्षपद स्वतःच्या हाती घेतले व अप्रत्यक्षपणे विरोधकांना धडा शिकविण्याचा इशारा दिला. या तडकाफडकी घडलेल्या सत्तांतर-नाट्याबद्दल ‘भाकप’ व ‘मार्क्सवादी’ अशा दोन्ही पक्षांची, वा जगातील इतर कम्युनिस्ट पक्षांची प्रतिक्रिया हा लेख लिहून होईपर्यंत (दि. ५ आक्टोबर) प्रसिद्ध झालेली नव्हती, पण ती त्या त्या पक्षांच्या आताच्या मॉस्कोबद्दलच्या धोरणाच्या परंपरेला अनुसरूनच राहणार हे उघड आहे.)

या संदर्भात काही वर्षांपूर्वी ‘भाकप’मधून बाहेर पडलेले सर्वात जुने व ज्येष्ठ असे भारतीय कम्युनिस्ट नेते कॉ. डांगे व अलिकडेच ‘भाकप’ने निलंबित केलेले विचारवंत मोहित सेन यांची प्रतिक्रिया गोर्बाचेव-प्रणीत धोरणाचे सहर्ष स्वागत करण्याची असून राजीव गांधींच्या सरकारला मिळालेला सोविएत युनियनचा पाठिंबाही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मोहित सेन यांनी तर राजेश्र्वरराव प्रभृति ‘भाकप’च्या नेत्यांना मार्क्सवाद कधी समजलाच नाही, टिप्पणीही केली आहे!

पण कोणत्या पक्षाची प्रतिक्रिया काय आहे, यापेक्षा खुद्द सोविएत युनियनमध्ये गोर्बाचेव यांच्या हाती सर्व सत्ता आल्यानंतर ते ‘ग्लासनोस्त’ची मोहीम चालू ठेवतात की ती आवरती घेतात आणि आर्थिक समृद्धीच्या दृष्टीने त्यांचा पुनर्रचनेचा कार्यक्रम किती वेगाने व किती प्रमाणात पुढे जातो यावर आणि विरोधकांना त्यांच्यावर मात करण्यात कितपत यश येते यावरच त्यांचे सोविएत युनियनमधील व सोविएत पार्टीचे आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीतील स्थान नजिकच्या भविष्यकाळात ठरणार आहे.

परंतु सोविएत युनियनमध्ये गोर्बाचेव यांच्या राजवटीचे वा आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीचे भवितव्य काही असले तरी गोर्बाचेव यांनी सुरू केलेल्या ‘ग्लासनोस्त’सारख्या प्रकारांना यापुढील काळात सर्वच कम्युनिस्ट पक्षांच्या नेत्यांना तोंड द्यावे लागेल असा मोठा संभव आहे; आणि ती मोहीम सुरू झाली म्हणजे डांगे, राजेश्वरराव, बी.टी. रणदिवे, नंबुद्रीपाद, ज्योती बसू, मोहित सेन प्रभृति सर्वच जुन्या व वृद्ध नेत्यांना नव्या रक्ताचे कार्यकर्ते त्यांच्या पूर्वीच्या धोरणात वेळोवेळी मारलेल्या कोलांट्या उड्यांबाबत जाब विचारल्यांवाचून राहणार नाहीत. आणि या नेत्यांकडून चुकीची प्रांजळ कबुली मिळाली नाही तर हे कार्यकर्ते स्वतःचं सोविएतमधील ग्लासनोस्तचे अनुकरण करून त्यांच्या चुकांवर प्रकाशझोत टाकतील अशी दाट शक्यता आहे.

समाप्त

********

लेखक- प्रभाकर उर्ध्वरेषे; अंक- मौज;  वर्ष- १९८८

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply