संपूर्ण भिजलेलं असं कुत्र तुम्ही पाहिले आहे का? स्वत:चं अंग फडफडून तुषारांची चौफेर उधळण करून ते पाहता पाहता नखशिखांत कोरडे होते! याच कारणामुळं विमान-तंत्रज्ञांना कुत्र्याचा हेवा वाटत असे. विमान-तंत्रज्ञांना आंघोळ केल्यावर टॉवेल वापरण्याचा कंटाळा आला होता म्हणून त्यांना कुत्र्याचा हेवा वाटत होता असं मात्र नाही. त्यांची समस्या वेगळीच होती.

‘बर्फा’ची नव्हे मृत्यूची मगरमिठी!

अलीकडे जेट विमान फार उंचावरून जवळ जवळ १२-१३ किलोमीटर्स उंचीवरून उडतात ही गोष्ट सर्वांना ठाऊकच आहे. तेथे हवा एवढी थंड असते की. विमानाच्या पंखावर बर्फाचे थरच्या थर जमू लागतात. त्यामुळे विमानावर निरूपयोगी बर्फाचा टनावारी भार पडतो. (विमानात निरुपयोगी वजन थोडे जरी वाढले तरी इंधन खर्च भराभर वाढत जातो.) हा एक तर तोटा होतोच पण विमानाच्या पंखांचा व शेपटीचा गणिताने निश्चित केलेला आकारही बेडौल होऊन जातो व त्यामुळे हवेच्या लाटांवर पेललेल्या विमानाची उद्धरण शक्ती झपाट्याने कमी होते. जर हा बर्फ दूर करण्याचा मार्ग शोधता आला नाही तर विमानाला आपले उड्डाण ५-७ मिनिटातच आटोपते घ्यावे लागते. शीतप्रदेशात हिवाळ्यात तर ही समस्या अतिशयच कठीण होते.

विविध मार्ग

यावर अनेक उपाय करण्यात आले. पण ते एकतर पुरेसे परिणामकारक नव्हते किंवा खर्चिक होते. उदाहरणार्थ विमानावरून गरम हवा खेळवण्याची पद्धत किंवा विमानाच्या शरीरात विद्युतप्रवाह खेळविण्याची पद्धत. ही पद्धत अतिशय खर्चिक आहे त्यामुळे दर चौरस मीटर क्षेत्रफळावर ताशी १५-२० युनिट वीज खर्च होते. म्हणजे विमानाची १०-२० टक्के शक्ती यावरच खर्च होई. पाण्याने (अर्थात बर्फानेही) न भिजू शकणारा पापुद्रा किंवा द्रवतरंग विमानावर चढविण्याचे प्रयत्नही निष्फळच ठरले. म्हणून आजतागायत विमानावरील बर्फ दूर करण्याचे जुनेच खर्चिक मार्ग चोखळण्यात येत आहेत.

तरुण सोविएत वैज्ञानिकाला यश

शेवटी ही बिकट समस्या तरुण सोविएत वैज्ञानिक इगोर लेविन या विद्यार्थ्यावर सोपविण्यात आली. त्याने दीर्घ विचार करून असा निष्कर्ष काढला की, विमानाच्या कातडीला मधून मधून जोराचा धक्का दिल्यास ही समस्या किफायतशीरपणे सुटू शकेल. म्हणजे मग कुत्र्याप्रमाणेच विमानालाही स्वत:चे अंग कोरडे करता येईल. विमानाच्या आतील बाजूस कॉईल्स बसवून त्यातून जोराचा प्रवाह मधून मधून सोडल्यास विमानाच्या कातडीत विरुद्ध ‘भोवरे’ प्रवाह (एडी करंट्‌स) तयार होतात व त्या हादऱ्याने बर्फ निघून जाते असे लेविनने सप्रयोग सिद्ध केले. यासाठी पूर्वीपेक्षा फारच कमी शक्ती पूर्वीच्या केवल एक सहाशे अंश पुरेशी होती. जी गोष्ट अनेक दशके इतरांना जमली नाही, ती तरुण सोविएत विद्यार्थ्याने करून दाखवली.

आता या शोधाचा वापर विमानामध्येच नव्हे तर ध्रुवानजीक बर्फाळ समुद्रात फिरणाऱ्या जहाजांवरही करण्यात येत आहे. तेथे जहाजांवर असेच बर्फ जमा होते. तसेच या शोधाचा वापर हिमग्रस्त भूमीवरील यंत्रसामग्रीच्या रक्षणासाठीही करण्यात येत आहे. लेविन यांच्या शोधाचे पेटंट खरेदी करण्यासाठी अनेक पाश्चात्य कंपन्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

श्री. जतींद्र कऱ्हाडकर

सृष्टीज्ञान सप्टेंबर १९७५

image credit: wagwalking.com

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 6 Comments

  1. माहितीपूर्ण !

  2. विलक्षण! अलौकिक प्रतिभा!

  3. छान! कुत्र्याचे उदाहरण चपखल वाटले. बारीक निरिक्षण केले तर मोठ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं निसर्गात आपल्या जवळच आढळतात हे दिसून आलं

  4. वा !! उत्तम माहिती.. या तंत्राला Electro Impulse De-icing System (EIDS) किंवा Pulse Wave De-icing system म्हणतात एवढीच माहिती होती.. त्याची पार्श्वभूमी व शोधकर्त्याचे नाव माहित नव्हते. लेख वाचून छान वाटले.

  5. SUPERB !

  6. अतिशय उदबोधक माहिती
    धन्यवाद