गेली काही वर्षे महाराष्ट्रात धरण-कालवे अशा रुळलेल्या सिंचन वाटा सोडूनही अनेक प्रयोग उपक्रम होत आहेत. त्या त्या उपक्रमातून गाव पातळीवरील/ शेत पातळीवरील पाण्याची गरज निश्चित करणे व त्यानुसार जलसंधारणाच्या कामाची आखणी व कार्यवाही करणे असे काम गेली काही वर्षे सुरु आहे. कोकण व सह्याद्रीला लागून असलेला प्रदेशाच्या तुलनेत अत्यल्प पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात ह्या प्रयोगांमुळे पाण्याच्या विषयातील अनिश्चितता दूर होण्यास मदत झाली आहे. तर काही ठिकाणी नीट योजना केल्यामुळे व अश्या प्रयोगामुळे खात्रीशीर सिंचन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कडे समृद्धीची पावले दिसू लागली आहेत.

असेच एक दुष्काळी गाव होते गाढे-जळगाव, तालुका-जिल्हा औरंगाबाद. २०१२ च्या दुष्काळात पावसाची अवकृपा झाली. कोरडा दुष्काळ पडला. शिवारं उघडी पडली. कोणी दावणीची जनावरं विकली, ज्यांना शक्य झालं त्यांनी नातेवाईकांकडे पाठवली. कसबसे दिवस काढले. त्याच गावातील एक शेतकरी हरी ठोंबरे. त्यांची दोन एकरावरील मोसंबी करपून गेली. २०१३ मध्ये त्यांनी २२ गुंठे जमिनीवर शेततळे बनवले. तेवढ्या आधारावर त्यांची मोसंबीची बाग तरली. त्यानंतर त्यांनी सव्वा एकर जमिनीवर दोन शेततळी घेतली. आता त्यांनी दोन एकरांत मोसंबी, चार एकरांत डाळिंब, आणि दोन एकरात द्राक्ष अशी लागवड केली आहे. केवळ शेततळे केल्यामुळे ठोंबरे यांच्या शेतीला, घराला स्थैर्य आले. आता त्यांनी शेती संबंधी काही व्यावहारिक शिक्षण घेण्यासाठी मुक्त विद्यापीठात नोंदणीही केली आहे.

पूर्वी ह्या परिसरात ज्वारी, मका, कपाशी अशी पिके घेतली जायची. पण जसेजसे पाणी उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढले तसेतसे लोकांनी पारंपारिक पिके सोडून फळपिके घेण्याला सुरुवात केली. सुरुवातीच्या शेतकऱ्यांची उदाहरणे पाहून गावाला शेततळ्याचे महत्व पटले. सध्या गाढे-जळगाव गावात सर्व मिळून भरपूर शेततळी घेतली. आज एप्रिल महिन्यात सुद्धा ८० ते ९० शेततळी आपल्याला भरलेली दिसतील. गावात एकंदर सव्वा लाख डाळींबांची लागवड आहे. त्याचा स्वाभाविक आणि चांगला परिणाम गावाच्या शेतीवर झाला आहे. त्या माध्यमातून गावात समृद्धी आली आहे. सुरुवातीला ठोंबरे यांनी मुंबई, नाशिक, अकोला अशा बाजारपेठांत आपला माल विकला. आता ते बांगला देशात त्यांची फळे निर्यात करीत आहेत. समृद्ध शेतकऱ्यांच्या कडे चारचाकी वाहने आली आहेत.

त्याच गावात विठ्ठल ठोंबरे नावाचे एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. डिसेंबर नंतर त्यांच्या विहिरीला जेमतेम पिण्यासाठी पाणी असायचे. त्यांनी शेततळे बांधूनच शेती करण्याचा निश्चय केला. सगळी मिळून एक हेक्टर इतकीच शेती. त्यातही त्यांनी २० गुंठे जमिनीवर शेततळे खोदले. ते वगळता जेमतेम एकरभर जमीन लागवडीसाठी उरली. त्यावर त्यांनी डाळिंब घेतले. त्यांना दरसाल साडेदहा लाख उत्पन्न मिळते. ज्या गावात एक पीक निघायची मारामार होती, ज्या गावातील शेतीच्या जीवावर बारा महिने चूल पेटण्याची शाश्वती नव्हती त्याच गावात फळशेतीमधून आज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते आहे. ह्या सुबत्तेमुळे गाव परिसरात अन्य उद्योग व्यवसाय उभे राहिले आहेत. हे गाव औरंगाबाद – जालना रस्त्यावरील असल्यामुळे एक चांगले हॉटेल तिथे उभे राहिले आहे. गणेश सादरे नावाच्या एमबीए झालेल्या तरुणाने काढलेले “फूड जंक्शन” उपहारगृह देखील लक्ष वेधून घेणारे आहे.

महाराष्ट्रात काही काळापूर्वी सिंचन म्हटले की धरण, कालवे, लिफ्ट हेच शब्द समोर यायचे. अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी, पोपटराव पवार यांचे हिवरेबाजार अशी मोजकी उदाहरणे एखादे प्रेक्षणीय स्थळ असल्यासारखी फक्त ‘बघितली’ जात होती. आज गाव पातळीवर केलेल्या नियोजनामुळे शेततळी, नाला बंडिंग, छोटे बंधारे आदि पारंपारिक मार्गांचा उपयोग करत गावागावात, विशेषत: अल्प व बेभरवशी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात पाण्याच्या उपलब्धतेचे खात्रीलायक नियोजन होऊ लागले आहे. एकट्या मराठवाड्यात ३८हजार शेततळ्यांची योजना असून त्यातील सुमारे अर्धी शेततळी खोदून झाली आहेत. सतत पाण्याची टंचाई असलेल्या मराठवाड्या सारख्या भागात ह्या जलसंधारणाच्या योजनाच स्थानिक लोकांसाठी, विशेषत: शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार आहेत.

हिरण्य सूर्यवंशी

(माहिती साभार लोकसत्ता व चित्र साभार महाराष्ट्र टाइम्स )

सौजन्य – MH+ve फेसबुक पेज

Leave a Reply

This Post Has 3 Comments

  1. फारच छान माहिती!

  2. मीही शेतकरी नाही. पण राज्यातील, देशातील महत्त्वाच्या बातम्या वाचायच्या, विशेष लक्ष वेधून घेणा-या बातम्यांसंबंधी अधिक काही मिळाले तर वाचत राहायचे, असा माझा शिरस्ता. त्यानुसार गेली काही वर्षे शेतक-यांच्या आत्महत्यांनी अस्वस्थ होऊन त्यावर काही सकारात्मक बातम्या मिळतात का ते पाहत असताना मा. मुख्यमंत्र्यांनी कर्जबाजारी शेतक-यांना माफी देण्याऐवजी ”जलयुक्त शिवार” ही कल्पना मांडली. ज्यांनी शेतक-यांच्या नावावर वर्षानुवर्षे लूट केली त्यांनी कोलाहल केला. पण राजेंद्रसिंहासारख्या विधायक कार्यकर्त्याने सकारात्मक पाठिंबा दिला. त्यामुळे आशा निर्माण झाली. पण त्यांच्या कल्पनेतील गावक-यांच्या सहकारातून गावतळी उभी होताना दिसत नव्हती. उलट कंत्राटदारांनी ते काम ताब्यात घेतल्याचे दिसू लागले. त्यामुळे नाराज होऊन राजेंद्रजींनी दूर राहायचे ठरविले.तेव्हा वाटले, झाले, पुन्हा जुन्या मार्गांनी ही चांगली कल्पना मागे पडणार.
    पण त्याचवेळी नाना पाटेकर आणि मकरंद अनास्पुरे यांनी ठिकठिकाणच्या शेतक-यांना धीर देण्यासाठी पुढाकार घेतला आणि सत्यजित भटकळ आणि आमीरखान यांनी गावक-यांना प्रोत्साहित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याला गावक-्यांनी चांगला प्रतिसाद दिला. दूरचित्रवाहिन्यांवर त्याची फिल्मी जाहिरातही होत राहिली आणि प्रसिद्ध नट कुलकर्णींचे लेखही वृत्तपत्रात येऊ लागले. त्यातून काही तरी चांगले निश्चित घडते आहे हा दिलासा मिळाला. आज हा लेख वाचल्यावर आणखी छान वाटले.
    मला वाटते माझ्यासारख्या दुरून सहानभूतीने पाहणा-यांनी जे चांगले आहे त्याचे सार्वत्रिक कौतुक केले पाहिजे. सक्षद्ध शेतक-यांना ”जे मेहनत करतात त्यांना देव मदत करतो”, याचा अनुभव यंदाच्या पावसाबद्दलच्या बातम्या ख-या ठरल्या तर (अलिकडे तांत्रिक प्रगतीमुळे त्या ख-या ठरतात) येईल आणि राज्यात कृषिक्रांती होईल अशी आशा वाटते.

  3. काहीतरी चांगलं समजलं. समाधान वाटलं. माझा जन्म मुंबईतला. शेतीतले काही कळत नाही. तर, शेततळे म्हणजे नक्की काय ? त्याचा एवढा उपयोग कसा होतो ?