महाराष्ट्र टाइम्स नावाचे नवे मराठी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाच्या मालकांनी काढले (आजच्या भाषेत ‘लॉंच’ केले.) तो काळ.

टाइम्सचे मराठी भावंड ही अपूर्वाईची गोष्ट होती.

निघते, अशी आवई उठली तेव्हापासून मराठी वाचकांत आणि विशेषत: मराठी वाचकांत आणि विशेषत: मराठी वृत्तपत्र जगतात एकच हलचल सुरू झाली. संपादक कोण होणार, कोण कोण या नव्या दमदार दैनिकात जाणार, दैनिक कसे असणार. तर्कांना ऊत आला.

तेव्हाचे महाराष्ट्राचे दिग्गज राजकारणी (दिग्गज आजचे नव्हेत, खरे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री वगैरे होऊन धावून जाणारे; तेही साक्षात, पंतप्रधान नेहरूंच्या बोलावण्यावरून) यशवंतराव चव्हाण यांच्या सल्ल्यानेच सर्व ठरत आहे असे बोलले जाऊ लागले. त्यांच्या मर्जीतील पत्रकार मंडळींची नावे घेतली जाऊ लागली.

मग नेमणुका होऊ लागल्या. संपादक व्दा. भ. कर्णिक झाले. त्याच्या हाताखाली गोविंद तळवलकर, मा. पं. शिखरे दाखल झाले. माधव गडकरी आले, दि. वि. गोखले आले. रोज नवे नवे रिकामे टेबल भरू लागले. बहुतेक सगळे मुरलेले आणि अनुभवी होते. काही नवे होते.

बोरीबंदरसमोरची टाइम्सच्या भव्य इमारतीतली नव्या दैनिकाची कचेरी बघता बघता गजबजली.

दैनिकाचे ‘डमी’ अंक निघू लागले. हे विकण्यासाठी नव्हते.

या काळात मी जवळच्या फोर्ट भागात दिवसभर भटकून तेथल्या दुकानांच्या भपकेदार शो-विंडोज बघण्यात माझा बेकारीचा काळ सुखाने वाया घालवत होतो. पाय दुखले की जवळच्या इराणी हॉटेलात ब्रून-मस्का आणि चहा मारावा की निघालो पुन्हा नव्या निरुद्देश पायपिटीला.

जवळच टाइम्सच्या इमारतीत नवे मराठी दैनिक निघत होते त्याच्या बातम्या उडत उडत कानावर होत्या.

एकदा त्याच भागात होतो तर संपादक झालेल्या व्दा. भ. कर्णिकांना भेटावे आणि संपादक झाल्याबद्दल अभिनंदन करावे असे वाटून महाराष्ट्र टाइम्सच्या कचेरीत पोचलो. कर्णिक आमच्या विजया जयवंतच्या (पुढे खोटे-मेहता) नात्यातले. विजया तेव्हा रंगायन या प्रयोगशील नाटक संस्थेची सर्वेसर्वा होती आणि मी या संस्थेचा नाटककार-उपाध्यक्ष. कर्णिकांची ओळख विजयामुळे झालेली होती आणि जुन्या जमान्यातले एक खंदे पत्रकार आणि एक मोकळे गप्पिष्ट गृहस्थ म्हणून मला ते आवडले होते.

अपेक्षेप्रमाणे कचेरीत पहावे तिकडे उत्साह ओसंडत होता. मराठी पत्रकारितेत इतिहास घडवण्याचे फार महत्त्वाचे काम आपल्या शिरी आल्यासारखे सर्वांचे चेहरे तेजस्वी दिसत होते. कुणी कामात तर कुणी कामाच्या बतावणीत होते तर कुणी रांगेत नहालेल्या घोड्यासारखे नुसतेच टेबलाशी तृप्तीने निथळत येणाऱ्याजाणाऱ्यांकडे हसत बसून होते.

कर्णिक त्यांच्या केबिनमध्ये भेटले. त्यांचे चेहरा मूळचाच आनंदी, त्यात ते टाइम्सच्या भावंडाचे संपादक झालेले. त्यामुळे माझेही त्यांनी ‘या महाराज’ म्हणून तोंडभर हसत स्वागत केले. मी त्यांचे अभिंनदन केले. त्यांना भेटून अभिनंदन करणारे त्या दिवसांत अनेक असतील; फरक इतकाच होत की, इतरांचे अभिनंदन सहेतुक असणार, माझे निर्हेतुक होते. कर्णिक मुळात उत्साहमूर्ती, त्यात दीर्घ काळानंतर नव्याने काही करून दाखवण्याचे आव्हान मिळाल्याने उत्तेजित होते. त्यांचा स्वभाव बोलका, त्यात भोवतालचे नवे नवे वातावरण, त्यामुळे त्यांना किती बोलू आणि किती नको असे झाले होते. माझा स्वभाव ऐकणारांचा. ते बोलत होते, मी ऐकत होतो. टाइम्सच्या कँटीनमधला चहा समोर होता.

बरेच बोलणे झाल्यावर मध्येच अचानक गंभीर चेहरा करून कर्णिक थांबले. म्हणाले, ‘‘माझी एक इच्छा आहे. (स्तब्धता) तुम्ही आमच्याकडे या.’’

दिवस नवी माणसे घेण्याचे; त्या हेतूने कुणी कुणी कर्णिकांना भेटत असतील. मी तसेच काही मनात ठेवून आलो असलो पाहिजे, असे कर्णिकांना वाटले असेल तर त्यांचे चुकले नव्हते. पण महाराष्ट्र टाइम्स ही माझ्या कल्पनेपलीकडली उडी होती. एक तर पत्रव्यवसाय मी पत्करला होता तो पदवीअभावी त्या काळात उपलब्ध असलेला एकमेव बौद्धिक व्यवसाय म्हणून आणि घरची चूल चालवण्यासाठी पैसे लागत होते म्हणून. त्यात कसलीच महत्त्वाकांक्षा मला नव्हती. पत्रव्यवसायाशिवाय इतरही बरी वाईट कामे मी केली होती. त्यातलेच ते एक काम म्हणून मी ते मिळाले तेव्हा आणि तसे करीत आलो होतो. माझे मन खरे लेखनात होते आणि त्यावर घरची चूल चालू शकत नव्हती.

त्यात टाइम्सचे भावंड म्हटल्यावर पदवीची अट असणार हे तर गृहीत होते.

मी कर्णिकांना म्हणालो. ” मला पदवी नाही.  ”

कर्णिक म्हणाले ‘‘ते बघू. तुम्ही अर्ज करा.’’

टाइम्सचे भावंड म्हणजे पगार चांगले. मिळणार नव्हतीच पण समजा नोकरी मिळाली तर दर महिन्याची पैशाची गरज भागून वर देणी चुकवता आली असती. बायकोच्या चेहऱ्यावर निष्कर्जी झाल्याचे समाधान लग्नानंतर प्रथमच दिसले असते. कर्णिक म्हणतात तर करू या असे म्हणून मी अर्ज केला. शिक्षणाच्या कॉलमात नॉनमॅट्रिक असे लिहिले. मग मलाच ते बरे न वाटून ते खोडले आणि नुसती एक रेघ मारली. म्हणजे, शिक्षण जवळजवळ नाही. (एखाद्या पदवीपर्यंत न शिकल्याची खंत या वेळी प्रथमच आणि अखेरची चावली.) माझ्याहून कमी वयाच्या होतकरू उमेदवारांबरोबर मला चाचणी परीक्षेला बसविण्यात आले आणि मी नापास झालो.

हे मला सांगतानाची कर्णिकांची दु:खी मुद्रा अजून आठवते. खरे म्हणजे यात मला अनपेक्षित किंवा धक्का बसावा असे काही नव्हते, पण कर्णिकांनी तो बसू नये अशी काळजी घेत मला निकाल ऐकवला.

जे घडले त्याचे मला काहीच वाटले नाही, असे मात्र नाही. तो नकार मला झोंबला. आणि तरी माझ्यावर कसला अन्याय झाला असे वाटले नाही. हात दाखवून आपणच अवलक्षण करून घेतले ते करून घ्यायला नको होते. कर्णिकांची इच्छा होती म्हणून काय झाले, इतकेच वाटले. मी घरी गेलो.

महाराष्ट्र टाइम्स थाटामाटात सुरू झाला. मीही त्याचा वाचक झालो. अधूनमधून बोरीबंदरकडे असलो की कर्णिकांना त्यांच्या कचेरीत भेटत असे. चहा मिळे आणि कर्णिकांच्या दिलखुलास जुन्या आठवणी कानी पडत. कर्णिक मानवेंद्रनाथ रॉय यांचे भक्त. पण नेहरू, पटेल, जिना, आंबेडकर यांना त्यांनी जवळून पाहिलेले आणि ऐकलेले. त्यांच्या एकेक आठवणी ते रंगून सांगू लागले की, त्या ऐकताना माझ्या पुढ्यातला चहा कधी थंड होऊन जाई कळत नसे.

नव्या दैनिकाचा जम अपेक्षेप्रमाणे उत्तम बसला होता आणि ते जोमाने वाटचाल करू लागले होते.

एकदा असाच दुपारच्या वेळी मी चहाची वेळ साधून वाट वाकडी करून महाराष्ट्र टाइम्सच्या कचेरीकडे झुकलो आणि कर्णिकांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. ते कामात होते. बहुधा अग्रलेख लिहीत असावेत; मला पाहून तोंडभर हसून त्यांनी ‘या महाराज’ असे माझे स्वागत केले. चहा मागवला. मी त्यांच्या कामात व्यत्यय आणल्याचे मला दिसले त्यामुळे मी फार वेळ थांबणार नव्हतो. कर्णिकांनी नाटकाच्या, विजयाच्या, रंगायनच्या चौकश्या केल्या. बोलता बोलता मध्येच, आठवण व्हावी तसे तिसरेच काही विचारण्याची कर्णिकांना सवय होती तसे त्यांनी एकदम विचारले, ‘‘ते जाऊ दे महाराज पण सांगा. आमचा पेपर तुम्हांला कसा वाटतो?’’

विचार न करता मी म्हटले, ‘‘चांगला वाटतो.’’

कर्णिकांचा हसरा चेहरा गंभीर झाला. ते म्हणाले, ‘‘मला समाधान नाही. दैनिकाला ह्युमन फेस हवा. ते कोरडे आणि रुक्ष असता कामा नये. त्याने वाचकाशी संवाद केला पाहिजे. त्याचा मित्र बनले पाहिजे. आमच्या पेपरमध्ये ते नाही. सगळे रुक्ष रुक्ष. कोरडे. आखीव रेखीव. जान वाटत नाही. काहीतरी वेगळे केले पाहिजे.

यावर मी काय म्हणणार? मी त्या दैनिकाचा कोणीच नव्हतो. मी उगीच होकारार्थी मान हलवली.

कर्णिक अजून गंभीर चेहरा करून म्हणाले, ‘‘तुम्ही विचार करून काही सुचवा ना.’’

कर्णिकांचा मी चाहता, त्यात त्यांचा चहा पिणारा. त्यांना बरे वाटावे म्हणून त्यांच्यासारखा गंभीर चेहरा करून म्हणालो, ‘‘बघतो.’’

मी कर्णिकांचा निरोप घेतला आणि टाइम्सच्या इमारतीतून बाहेर पडतानाच हा विषय डोक्यातून गेला. मला माझे बेकारीचे व्याप काय कमी होते?

पुन्हा काही काळ गेला. बोरीबंदरच्या जवळपास होतो. कर्णिकांकडे पोचलो. आज त्यांना वेळ दिसत होता. इतर विषय बोलून झाले. म्हणजे बोलणारे अथार्त कर्णिकच. माझा चहा घेऊन संपला होता. मी जाण्यासाठी उठणार तर कर्णिकांकडून माझ्या दिशेने गुगली आला, ‘‘आमच्या कामाचे काय झाले महाराज?’’

काम? कर्णिकांचे कसले काम?

मला आठवण्याआत कर्णिकांनी आठवण दिली, ‘‘ह्यूमन फेस. विचार करून सांगणार होतात.’’

कर्णिक म्हणाले त्यावरून आधीची भेट आठवली, बोलणेही आठवले; पण माझ्या आठवणीप्रमाणे मी कसलाच विचार करण्याचे कबूल केले नव्हते. कर्णिक मला विचार करून सांगा असे आधल्या भेटीत निरोप देताना म्हणाले होते.

मी विचार केलेला नाही हे कर्णिकांना सांगणे माझ्या जिवावर आले. काहीतरी म्हणायचे म्हणून मी (कर्णिकांसारखी) विचारपूर्ण मुद्रा करून सावकाश म्हणालो, ‘‘असे करता येईल.’’

‘‘काय?’’ कर्णिक.

आता यानंतर मी जे बोललो ते त्यावेळी मला कसे सुचले. याचा शोध घेतो तर कल्पनेचे मूळ माझ्या बेकारीत होते. नोकरी नव्हती. घरी बसून घेणेकरी भेटत. घरात हवे नको बघावे लागे. शेजारी ‘काय, आज कामावर गेला नाहीत?’ विचारत. ते नको म्हणून मी सकाळी ऑफिसच्या वेळेला घरातून निघत असे आणि लोकल ट्रेनने चर्चगेटला येत असे. पुढे चालत फ्‍लोरा फाउंटन गाठी आणि त्या भागातल्या दुकानांच्या सजवलेल्या शो विंडोजपैकी एकेका शो विंडोपुढे रेंगाळत जमेल तेवढा वेळ काढी. दुकाने तीच. शो विंडोजमध्ये मांडलेल्या वस्तूही बहुधा आधी पाहिलेल्याच असत तरी नव्या नजरेने नव्याने त्या पहाण्यात वेळ जाई. क्‍वचित दुकानात जाऊन नुसत्या चौकश्या करून बाहेर पडत असे. फुटपाथवर त्या काळात ‘इंपोर्टेड’ वस्तूंची दुकाने असत त्यांत छानछान ऐकीव गॅजेट्‌सचे नुसतेच खोके मांडलेले असत. (वस्तू सुरक्षित जागी ठेवलेल्या असत.) हे खोके न्याहाळत मूळ वस्तूंची कल्पना करणे हेही एक दृष्टिसुख होते. रस्त्यात इतरही मनोरंजक गोष्टी दिसत. तऱ्हेतऱ्हेची माणसे जी आधी पाहिलेली नसत. जाहिरातींची नवनवी होर्डिंग्ज, नवनवे वेडे आणि जुनेच भिकारी. फूटपाथवरचे देशी माल विकणारे हुषार फेरीवाले आणि माल खपवण्याच्या आणि नवख्या गिऱ्हाइकाला गंडवण्याच्या त्यांच्या नवनवीन युक्त्या, फूटपाथवरचे जुन्या पु्स्तकांचे स्टॉल्स, वाटेतली सिनेमा थिएटरे आणि तिथे लागलेल्या चित्रपटांचे चित्ताकर्षक फलक, याशिवाय काळे, गोरे, लाल आणि पिवळे टूरिस्ट, रस्त्यावरची नैमित्तिक भांडणे आणि हुज्‍जती, रहदारीने भरलेला रस्ता ओलांडण्याचा आत्मविश्वास नसलेले आणि अखेर घाईघाईने डोळे मिटून कसा तरी तो ओलांडणारे मुंबईला नवखे, हे सर्व बघत मी जहांगीर आर्ट गॅलरीत पोचे. तिथे एक चांगले महागडे कँटीन होते, त्याचे तऱ्हेतऱ्हेचे वास घेत गॅलरीत फिरणे ही चैन असे. गॅलरीतली सर्व चित्रप्रदर्शने आणि त्यांचे प्रेक्षक अभ्यासण्यात सहज दोन एक तास निघून जात, की रीगल सिनेमासमोरच्या इराणी रेस्टॉरंटमध्ये ब्रूनमस्का मारून मी निघे, गेट वे ऑफ इंडियाकडे वळे. हा मुख्यत: निरुद्योग्याचांच भाग. तिथले चणे खात निरुद्देश रेंगाळणारे (माझ्यासारखे) निरुद्योगी, कुणीतरी घातलेले दाणे खात घुमणारी कबुतरे, जवळच्या ताजमहाल हॉटेलमध्ये शिरणारे व बाहेर पडणारे रंगीबेरंगी परदेशी स्‍त्रीपुरुष आणि मुख्यत: समुद्र बघण्यात संध्याकाळ होई. थकल्यासारखे वाटले तर ताजमहाल हॉटेलच्या लॉबीत गुबगुबीत सोफ्यात जरा वेळ फुकट आणि मजेत बसण्याचेही एक सुख असे. एखादी डुलकी काढता येई. (तशा जागी ओळखीचे कुणी भेटण्याचा तो काळ नव्हता.) की वॉर्डन रोडवरच्या रंगायनच्या नाटकी वर्तुळात पोचण्याची वेळ झालेली असे. मी तिकडे जाणाऱ्या बसला रांग लावी.

यातच महाराष्ट्र टाइम्सची कचेरी आणि कर्णिकांचा चहा, कधी मधी.

कर्णिकांना मी जे म्हटले ते म्हणताना माझ्या डोक्यात माझा हा दिनक्रम असावा. चेहऱ्यावर आणलेले गांभीर्य कायम ठेवून मी म्हटले, ‘‘तुमचे रिपोर्टर्स बातम्या मिळवण्यासाठी, कार्यक्रम कव्हर करण्यासाठी शहरात फिरतच असतात.’’

कर्णिक म्हणाले, ‘‘फिरतात.’’

मी म्हणालो, ‘‘फिरताना त्यांना इतरही बरेच पहायला मिळते. (मला मिळत असे म्हणून.)

कर्णिक म्हणाले, ‘‘मिळत असणार. पण महाराज, त्यांनी पहायला हवे. जो बघत नाही त्याला काय दिसणार?’’

यावर मी खुशाल म्हणालो, ‘‘असे होणार नाही. (माझे होत नसे.) तर यातले वेगळे आणि मजेदार पैलू टिपून दिवसाअखेरी लिहून द्यायचे. हेच एकत्र करून सदर करून छापले तर शहराचे किती पैलू त्यात येतील. या शहरासारखे रंग बदलणारे दुसरे शहर नाही. कालचे आज नसते. रोज नवीन. फक्‍त ते बघणारा पाहिजे. हाच ह्यूमन फेस.’’

कर्णिक विचारात. हळूहळू उत्तेजित होऊ लागलेले.

‘‘सदर रोज येऊ शकेल,’’ मी ‘‘नव्हे, रोज यावे म्हणजे वाचकांना त्याची सवय होईल. वळण पडेल. आणि एकेकाने एक दिवस लिहिले तरी आठवडा सहज जाईल.’’

कर्णिकांचा चेहरा उजळत होता. ते म्हणाले, ‘‘छान सूचना आहे. फक्‍त तुम्ही आता म्हणालात ते मला कागदावर लिहून द्या. एक पानभर पुरे झाले. एवढे प्लीज करा.’’

‘‘देतो.’’ चहाच्या ऋणातून मुक्त झाल्यासारखे मला हलके वाटत होते.

रंगायनच्या नाटकवाल्यांचा निरोप घेऊन रात्री बराच उशिरा घरी पोचलो. झोप येण्याआधी पंधरा की वीस मिनिटे बसून मी कर्णिकांना बोललो त्याची एक नोट मराठीत लिहिली. दुसऱ्या दिवशी कर्णिकांपुढे ती ठेवली. ते खूष झालेसे दिसले. मी दिलेला कागद त्यांनी एक नजर फिरवून टेबलाच्या खणात लोटला. माझे आभार मानले. खरे तर मी तसे काहीच विशेष केले नव्हते.

बरेच दिवसनंतर मी कर्णिकांकडे फिरकलो नाही. मी लिहून दिले त्याचे पुढे काय झाले याची चौकशी मी केली नाही. माझे काय मी केले होते आणि ते महाराष्ट्र टाइम्ससाठी नव्हते, कर्णिकांसाठी होते. कर्णिकांच्या चेहऱ्यावरच्या खुषीत मला सर्व काही मिळाले होते.

आणि असाच कधी तरी जवळपास होतो म्हणून कर्णिकांची आठवण झाली, वेळ होताच; म्हणून महाराष्ट्र टाइम्समध्ये शिरलो. मला पाहून कर्णिकांचा चेहरा जरी जास्तच उजळला. जणू ते माझी वाट पहात असावेत. आज मी अवांतर बोलणी काढणार त्याआधीच कर्णिक चिंताक्रांत चेहरा करून म्हणाले, ‘‘काय करावे, आमच्या लोकांकडे काही वेगळे करण्याची इच्छाच नाही.’’

संदर्भ माझ्या ध्यानी आला नाही. कोणते लोक? आणि काय वेगळे करायचे?

कर्णिकांच्या स्वरात आता सहसा न येणारा उव्देग होता काहीतरी गंभीर घडले आहे असे मला त्यावरून वाटले. ‘‘काय झाले?’’ मी काळजीने विचारले.

‘‘काय होणार?’’ कर्णिक. ‘‘आमचे लोक तयार नाहीत.’’ त्यांनी असे म्हणून टेबलाचा खण उघडला आणि एक कागद बाहेर काढला.

लांबूनच मी ओळखले. ते मी लिहून दिलेले टिपण होते.

कागद टेबलावर समोर ठेवून कर्णिक स्वत:शी बोलल्यासारखे म्हणाले, ‘‘काय करावे, नेमल्या कामापलीकडे काही करण्याची इच्छाच या माणसांना नाही. तुम्ही इतकी चांगली सूचना केलीत पण ती अमलात आणणारे नाहीत.’’

चीनची लढाई हरलेल्या त्यांच्या आवडत्या नेहरूंसारखे ते काही वेळ बसून राहिले.

माझे, एक कागद आणि त्यावर लिहिण्याला लागलेली दहा-पंधरा मिनिटे यांशिवाय काहीच गेले नव्हते त्यामुळे कर्णिकांच्या दु:खात मी सहभागी होऊ शकत नव्हतो. जाऊ द्या, नाही तर असे काही मी सांत्वनादाखल त्यांना म्हणणार तो पुढ्यातला मी लिहून दिलेला कागद कर्णिकांनी माझ्याकडे सारला आणि म्हणाले, ‘‘घ्या. तुमच्या एवढ्या चांगल्या सूचनेचे काही करून दाखवण्याची जबाबदारी आता तुम्हीच घ्या म्हणजे झाले.’’

मी? भलतेच! मी मनाशी किंचाळायचेच बाकी ठेवले.

‘‘नाहीतरी कल्पना तुमचीच आहे. मुंबईत तुम्ही फिरता, तर तुम्ही आमच्यासाठी हे रोजचे सदर लिहायचे.’’

हा बाँबगोळा कर्णिकांनी माझ्यासाठी मी येण्याआधीपासून तयार ठेवला होता, हे आता माझ्या लक्षात आले. मीही आयता त्यांच्या ‘गुहेत’ चालून आलो होतो.

‘‘मग कधीपासून सुरू करता बोला,’’ कर्णिक माझी मजा बघत असावे तसे पण शांतपणे.

मला जमणार नाही, हे याचे सरळ आणि प्रामाणिक उत्तर होते. बेकारीत, लिहिण्याशी संबंधित इतर अनेक पापे मी केली. पण वर्तमानपत्रात सदर कधीच लिहिले नव्हते. इतकेच नव्हे, तर कधी लिहीन असेही मानले नव्हते. माझ्या दृष्टीने हे लेखनातले नीच काम होते.

तसे मी कर्णिकांना म्हणू शकत नव्हतो, पण माझ्या चेहऱ्यावर हे आले असावे; कारण कर्णिक पुढे म्हणाले, ‘‘तर बोला महाराज. कधीपासून सुरू करू या? तुम्ही म्हणालात तसे. सदर रोज येणार. विषयांना तोटा नाहीच. सदरासाठी संपादकीय पानावर जागा करू. चांगलेसे नाव सुचवा आणि लगेच लिहायला घ्या. कधी घेता?’’

आता काय?

हल्ला अपेक्षित नसल्याने मी त्याच्या प्रतिकाराची तयारी केली नव्हती. आणि एरवी मोकळ्याढाकळ्या कर्णिकांनी एखाद्या मुत्सद्द्याला लाजवील असा बिनतोड डाव माझ्यावर केला होता.

‘‘पण मी हे तुमच्या रिपार्टरसाठी सुचवले होते.’’ मी अंग झटकण्याचा प्रयत्न करून पाहिला.

‘‘होय ना. त्यांना आपण सुचवून पाहिले, पण कुणास उत्साहच नाही तर काय करणार. त्यांना पाट्याच टाकायच्या आहेत,’’ कर्णिक.

‘‘पण म्हणून एक छान कल्पना वाया जाणे बरे नाही, हे तुम्ही सुद्धा मान्य कराल आणि कल्पना तुमची आहे साहेब. ते काही नाही, सुरुवात करा. मी जाहीर करून टाकतो.’’

‘‘नको,’’ मी घाईने अडवले. ‘‘आधी मला जरा विचार करू दे.’’

‘‘ठीक आहे. पण आता मागे फिरायचे नाही.’’ कर्णिक. ‘‘ठरले ते ठरले.’’

म्हणजे तुम्हीच ठरवलेत! मी, मनात, जरा कातावून.

कर्णिकांनी एकदा काही मनावर घेतले की ते मध्ये थांबत नाहीत, असे मी ऐकले होते त्याचा प्रत्यय हा असा येईल असे वाटले नव्हते.

कर्णिकांनी त्याच भेटीत उरलेला तपशील नक्‍की करून टाकला. (त्यांनी तो आधीच मनात नक्‍की केला असला पाहिजे.) तीन चार दिवसांचा मजकूर आधी लिहून द्यायचा. तो कधी नवा मजकूर पोचला नाही तर छापण्यासाठी राखीव राहील. मग सदर सुरू करायचे. रोज सकाळी लिहून माझ्या घराजवळ रहाणाऱ्या महाराष्ट्र टाइम्सच्या सहसंपादकांहाती द्यायचे. ते कचेरीत पोचवतील. रविवारी सदरला सुट्टी असेल. रविवारच्या अंकात मी इंग्रजी चित्रपटांवर लिहायचे. एकूण मेहनताना त्या काळात इतर मराठी दैनिक देत त्यापेक्षा बरा. (आता नक्‍की आकडा आठवत नाही.)

मी नुसताच स्तिमित ऐकत होतो.

‘‘मग ठरले तर?’’ कर्णिक कीर्तनाचा समारोप करावा तसे.

‘‘प्रयत्न करतो.’’

‘‘प्रयत्न नको, कामाला लागा.’’

कर्णिक खरेच या कल्पनेने चार्ज झालेले दिसत होते. मी निरुत्साही तर त्यांच्या उत्साहाला पारावार नव्हता.

घरी जाताना, भलतेच काहीतरी मी कर्णिकांच्या नादाला लागून अंगावर घेतले हे मी मान्य केले. मी अंगावर घेतले नाही. माझ्या भिडस्त स्वभावामुळे माझ्या अंगावर आले असेही वाटत होते. कर्णिकांनी माझेच पाय माझ्या गळ्यात अडकवले होते. आता सुटका दिसत नव्हती. कबूल करून चुकलो होतो. सदर पुरते फसल्याने होणारी पुढील बेअब्रू दिसत होती. रोज लिहिण्याची मला सवय असली तरी ते एखाद्या सदराचे लेखन नव्हे. ते माझ्या पद्धतीने चालणारे लेखन. कथा, एकांकिका, नाटक. जे त्याच्या नियमाने होत होते. सक्‍ती नव्हती. रोज छापले जाण्याची घाई नव्हती. ठरावीक वेळी कुणाच्या हातात पडेल अशा बेताने ते लिहिले जात नव्हते. सुचले नाही तर लिहिले जात नसे, लिहिलेले पुन्हा खोडले जात असे. फाडून टाकले जात असे आणि त्यामुळे कसलाच उशीर होत नसे आणि कुणाचे बिघडत नव्हते.

ही कसली नवी बला मी गळ्यात घेऊन फसलो. या विचाराने त्या रात्री मला झोप लागली नाही. झोप नव्हती आणि जबाबदारी घेतली होती म्हणून सलामीचे पहिले चार पाच विषय शोधू लागलो तर विषयांना काय तोटा म्हणणारा मी. मला रोजच्या सदराला माझ्या मते चालेल असा एकही विषय दिसेना. मराठी दैनिकाचा वाचक म्हणजे नक्‍की कोण? मराठी येणारा आणि वाचणारा कुणीही. तो कोकणातला, देशावरचा, खेड्यातला, शहरातला. स्‍त्री, पुरुष, तरुण, वृद्ध, महाराष्ट्रातलाच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरचाही. त्याला एक असा चेहरा नाही. मग सदर कुणासाठी? सर्वांसाठी. सर्वांना रुचेल, वाचावासा वाटेल असा विषय कुठला? कुठलाच नाही. सुचे तो विषय यांतल्या कुणाच्या ना कुणाच्या कामाचा नाही असे मी ठरवी. तळमळत रात्र काढली.

सकाळी महाराष्ट्र टाइम्सच्या कचेरीत पोचून, मी लिहीत नाही असे कळवून टाकावे असे ठरवून पहाटे झोपलो.

पण आता माझ्या स्वभावातला एक मोठा दोष मला हे करू देणार नव्हता. मी तसा, प्रवाह नेईल तसा आणि तिकडे वहात जाणारा. प्रवाहाला प्रतिकार करण्याचा उत्साह माझ्यात नव्हता. प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्यांचा धश्चोटपणा मला मनातून आवडे पण तो माझ्यात मला तोवर कधी सापडला नव्हता. विनाप्रतिकार वाहण्याचे सुख माझ्या सवयीचे. याबरोबरच, अचानक संकट आले तर पळ काढणे, माघार घेणेही मला कधी जमले नव्हते. बिनडोक जनावरासारखा मी अशा वेळी असे तिथेच डटून त्या संकटासमोर बुद्दूसारखा उभा राही. ते सरळ अंगावर घेई. (वयाने इतर बदल झाले असले तरी आजही हे एवढे असेच आहे.)

तर मी महाराष्ट्र टाइम्सच्या कचेरीत दुसऱ्या दिवशी गेलो नाही, मला जमणार नाही असे कळवले नाही, मी मनाने विषयांमागे लागलो. कागदामागून कागद खरडून फेकत सुटलो. जेवणाकडे लक्ष नव्हते. घरात नव्हते. पण घरीच होतो. बाहेर पडण्याची इच्छा होत नव्हती. सारखा चिडत होतो. शब्दमर्यादेचा काच तर जाचत होताच. कधी शब्द जास्त होत तर कधी हवेत त्यापेक्षा बरेच कमी. असे काही तास चालल्यावर जे लिहून झाले त्यातले काही अडचणीच्या वेळी वापरण्यासाठी राखीव म्हणून देण्याचे ठरवले. सदरातला सलामीचा ‘पीस’ अजून जमत नव्हता. सुचला तर कितीदा लिहिला तरी मनाला येत नव्हता. जास्त लिहावा तितका तो कृत्रिम, लाडिक किंवा कोरडा आणि जड वाटत होता. (तो कोणता होता ते आठवत नाही.) पुन्हा सदराला शीर्षक सुचवायचे होते. कुणाकुणाला सुंदर सुंदर अन्वर्थक शीर्षके सहज सुचतात. त्यांच्या कानानाकातून ती सुभाषितांप्रमाणे बाहेर पडतात. मला सुचत नाहीत. पुढच्या दिवसापर्यंत कशीबशी तीन शीर्षके काढली. तीनही मला पटत नव्हती. सकाळ या अर्थी तीनही होती कारण सदर सकाळी वाचकांपर्यंत जाणार होते. सकाळचे सदर म्हणजे शीर्षक सकाळशी संबंधित आणि प्रसन्‍न वाटेल असे हवे. हा सगळाच प्रकार मला खोटा आणि पोरकट वाटत होता. हा सर्व अट्टहास करणारा मी नव्हे, दुसराच कुणी आहे असे वाटत होते. ‘कोवळी उन्हे’ हे त्या तिन्हीतले एक शीर्षक, कर्णिकांनी पसंत केले.

सदर सुरू झाले.

कर्णिकांचे उत्तेजनाचे शब्द सोडले तर भोवती सगळे सामसूम होते. उल्‍लेखनीय प्रतिक्रिया नव्हती. भेटणारे कुणी वाचले म्हणत पण पुढे बोलत नसत. बऱ्याच वाचकांच्या अजून सदर लक्षातच आले नसावे, असे मी मानी. सदर सुरू झाल्यापासून मी माणसे टाळत होतो. समोर कुणीही आले की उगीच सेल्फकॉन्शस होई. सर्वांनी वाचले आहे पण कुणी बोलत नाहीत असे वाटे. मीही विचारत नसे. नसेल आवडत तर नाही असे मनाशी म्हणून मीच चिडचिडा, उदास होई.

आता माझी आवडती भटकंतीही थांबली होती. बहुतेक घरीच माझ्यामाझ्यात आणि सदराच्या चिंतेत असे. इतर लेखनाचा विचारही जवळपास येत नव्हता. रोज सदर लिहिणे चालू होते. शब्दमर्यादेची सवय होत होती. नकळत सदराला आकार येत होता. तुरळक पसंतीचे, उत्तेजनाचे आवाजही कानांवर येऊ लागले होते. कर्णिक नियमाने फोन करून भले भले म्हणत. पण मुख्यत: माझा मला आतून आत्मविश्वास येऊ लागला होता. सदराची भाषा ठरत होती. ती माझ्या सवयीची होती. माझ्या नाटकातली पात्रे बोलत त्यांची ही उत्स्फूर्त बोली भाषा होती. सहज, सोपी, जिवंत आणि थेट. विषयानुरूप तिचा मोड थोडा फार बदलत होता, सदरापुरता. फरक गळेपडूपणाचा होता. नेमका वाचक कोण हे नजरेसमोर येत नसल्यामुळे मी जरा जास्तच खेळकर आणि लाडिक होत होतो. माझ्या स्वभावात हे नव्हते. मी वृत्तीने तोवर गंभीर आणि अबोल. सदरात मी खेळकरपणाचे नाटक करीत होतो. नाटकाची सवय, त्यामुळे हे नाटक विनाप्रयास जमू लागले. एक वेगळा मी तयार होऊ लागलो.

आता विषयांचा तुटवडा जाणवू लागला. मी समोर येईल ते सदराच्या दृष्टीतून बघू लागलो. माणसे (यांत माझी बायको आणि मुलेही आली), घटना, डोक्यात येणाऱ्या वेड्यावाकड्या कल्पना. कुणी काही सांगू लागले, काही कळले की त्यात मी सदराला मसाला मिळतो का पाही, याने भागले नाही. सदरासाठी काही मिळते का या उद्देशाने मी पुस्तके शोधू लागलो. (हे वाचनाच्या आनंदासाठी वाचन नव्हते.) रोजचे वर्तमानपत्र मी वाचत नसे, शोधत असे. कुठेही एखादे इंग्रजी-मराठी नियतकालिक हातात मिळाले की ते उघडण्यापासून माझे सदर-संशोधन सुरू होई.

यात माझे आधीचे भटकणे रहात होते. बाहेर पडलो तरी डोक्यात सदर असे. भोवती लक्ष नसे. लिहिण्याचे प्रश्न सुटत गेले तसा मी पुन्हा नव्याने भटकू लागलो. उद्देश आता एकच : सदरासाठी मसाला. पूर्वीचे निरुद्देश भटकणे संपले होते. कर्णिकांची कृपा!

हे करता करता सदरात अजून एक नाटक आणण्याचे मला सुचले आणि त्याने सदराला वेगळेच बळ मिळाले. मी सदरात एक मुके-बहिरे आणि बोलके पात्र आणले. त्याचे नाव तिनईकर. हा माणूस मला अंधशाळेच्या एका कार्यक्रमाला मी आगंतुक गेलो असता तिथे ‘सापडला’. माझ्या शेजारीच तो बसला होता आणि मन लावून अंध मुलामुलींचे गाणे-बजावणे आणि नाटुकली ‘एन्जॉय’ (!) करीत होता. तो बहिरा असेल असे बराच वेळ मला कळलेही नाही, मुका असल्याचे मात्र लक्षात आले. बिनशब्दांच्या भाषेत तो शेजारी बसलेल्या बायकोशी त्याचा आनंद ‘शेअर’ करीत होता. ती मुकी नव्हती. पण नवऱ्याची मुक्याची भाषा तिला सहज समजत होती. समोर आंधळ्या मुलांचे गाणे-नाचणे आणि पहाणारा मुका-बहिरा. मला याची मौज वाटली. मध्येच तिनईकर (हे सदरातले नाव, खरे नाव कुणास ठाऊक) बायकोऐवजी माझ्याकडे बघून दाद देत. न राहववून मी उलट दाद देत राहिलो.

कार्यक्रमातून बाहेर पडलो आणि ते जोडपे मी बरोबर घरी नेले. त्याचे नामकरण केले आणि ते सदरात दाखल केले. ‘कोवळी उन्हे’चे ते मोठे आकर्षण ठरले. सदर लिहिण्याला मलाही मजा येऊ लागली.

अशा प्रकारे नकळत मी सदरात आणि सदर माझ्यात मुरू लागले. ते बऱ्यापैकी लोकप्रिय होऊ लागले. अंक हाती आला की आधी आम्ही ‘कोवळी उन्हे’ बघतो आणि मग उरलेला अंक असे सांगणारे अनोळखी वाचक भेटू लागले. असेही लक्षात आले की, महाराष्ट्र टाइम्सचा वाचक तितका बिनचेहऱ्याचा नव्हता. तो प्रामुख्याने शहरी आणि मध्यमवर्गीय होता मी त्यातलाच. त्यामुळे आमची नाळ एकच. याचाही सदराला फायदा झाला. माझ्यापलीकडे जाऊन काही करण्याची जरूर मला मग वाटेनाशी झाली. लाडिकपणाचे नाटक आपोआप कमी झाले. खरी सहजता आली. संगीताच्या भाषेत बोलायचे तर बैठक जमली.

यात पहिले सहाएक महिने गेले.

आता आणखी एक गोष्ट झाली. सदराच्या वाचकांकडून मला विषय सुचवले जात होते. पत्रे, फोन्स, भेट अशा मार्गांनी हा नवा ओघ सुरू झाला आणि ‘कोवळी उन्हे’ हे केवळ सदर न रहाता तो संवाद झाला. संकट म्हणून जे पत्करले ती आनंदयात्रा झाली. दिवस कसे जात होते कळत नव्हते. माझे सदर अनंत काळ चालणार अशा मन:स्थितीत मी होतो.

आणि कर्णिकांचा निरोप आला. ते तसे मधून मधून भेटत होतेच. आता त्यांनी भेटायला बोलावले होते. मी गेलो. महाराष्ट्र टाइम्सच्या कचेरीत शिरताना आता छाती पुढे होती. माझे सदर त्या वर्तमानपत्राचे प्रमुख आकर्षण ठरले होते. जिथे नापास झालो तिथेच हे घडले होते, हे विशेष.

‘‘या महाराज,’’ मी केबिनमध्ये शिरताच कर्णिक नेहमीच्या उत्साहाने म्हणावेत तसे म्हणाले. मला मात्र यात काहीतरी उणे भासले. त्यांनी रितीप्रमाणे चहा मागवला. इकडेतिकडचे विषय काढले. यात आज त्यांचे नेहमीचा दिलखुलासपणा नव्हता. काहीतरी कमी होते. मग त्यांनी सहज विचारावे तसे विचारले, ‘‘सध्या काय लिहिता आहात?’’

‘‘कोवळी उन्हे,’’ मी सहजपणे म्हणालो.

‘‘ते झालेच,’’ ते म्हणाले, ‘‘इतर लेखन काय? एखादे नवे नाटक?’’

‘‘नाही. ‘कोवळी उन्हे’ सोडली तर काही नाही.’’ माझे प्रामाणिक उत्तर.

‘‘म्हणजे वर्षभरात तुम्ही दुसरे काही लिहिले नाहीत?’’ कर्णिकांच्या शब्दांत आश्चर्य.

‘‘नाही. वेळच झाला नाही.’’

कर्णिकांच्या मुद्रेवर नाखुषी. ‘‘महाराज, तुम्हांला ते सदर लिहायला दिले ते तुम्हांला महिन्याचे एक नक्की उत्पन्न राहील आणि तुम्ही तुमचे खरे लेखन निर्वेधपणे कराल अशा अपेक्षेने. आणि तुम्ही सांगता तुम्ही वर्षभर फक्‍त हे सदरच लिहिले म्हणून.’’

‘‘हो.’’ मी दुसरे काही न सुचून.

‘‘वाईट झाले.’’ कर्णिकांना खेद. ‘‘असे तुम्ही करायला नको होते.’’

मी गप्प. बरेच म्हणायचे होते पण मी गप्प होतो.

काही क्षण कर्णिकांच्या मुद्रेवर मनापासूनचा विषाद होता. हे वाईट झाले. ते पुन्हा पुन्हा पुटपुटत होते.

माझ्या मनात येत होते, मी चालवलेले सदर इतके फावल्या वेळात लिहिले जात असेल असे यांना वाटले? असे लेखन असे जाता येता होते असे हे समजले? माझे तर पुरे वर्ष यात गेले. कसे गेले ते कळले नाही. वर्षात दुसरे काही मनात आलेच नाही.

काही क्षण आम्ही दोघे आपापल्या मन:स्थितीत बुडून होतो. पण कर्णिकांच्या मनाशी आणखी काही असावे असे मला वाटत होतेच. थोडे थांबून कर्णिकांनी मला बातमी दिली. मॅनेजमेंटचे म्हणणे आता सदर थांबवा.

मी तोवर इतका सदरमय झालेलो होतो की, हा माझ्यावर भलताच आघात होता. मला खरे वाटेना. सदर थांबवणार? इतके चांगले चालले असता थांबवणार? ते लिहिताना आता कुठे मला त्याचा आनंद घेता येऊ लागला आहे आणि ते थांबवणार?

पण मग मी माझी समजूत काढली, सगळेच कधी तरी संपते. ते आपल्याला हवे तेव्हा संपत नाही, असेच एक दिवशी संपते. संपावे असे काहीच न होता देखील संपते. संपले हे खरेही वाटत नाही पण संपलेले असते. आणि काय कधी संपावे ते आपल्या हातात कुठे असते? ते आणखी कुणीतरी ठरवते. वरचे मॅनेजमेंट. जे आपल्याला कधी भेटलेलेही नसते.

मग असे वाटले. एक खरेच. जगण्याच मौज आहे. कुणाला तरी आपण हवेसे आहोत, तोवरच जावे हे बरे. आपल्याला आणि सगळ्यांना कंटाळा आणून जाण्यापेक्षा ते केव्हाही चांगले.

माझी समजूत पटली.

मी कर्णिकांना कारणे विचारली नाहीत, तपशील विचारला नाही. न राहववून कर्णिकांनीच कारण म्हणून काही सांगितले. स्टाफवर इतकी माणसे असताना रोज एक बाहेरचा माणूस का लागतो, असे मॅनेजमेंट विचारते.

‘काय सांगणार?’ कर्णिकांचा यावरचा उद्‌गार.

महाराष्ट्र टाइम्सच्या कचेरीतून त्या दिवशी बाहेर पडताना मला आपले मूल स्मशानात पोचवून निघालेल्या बापासारखे वाटले, हलके हलके. चला, एक जबाबदारी कमी झाली!

तर अशी ‘कोवळी उन्हे’ची जन्म (मृत्यू) कथा.

एक सांगितले पाहिजे : या सदराने माझा मूळ स्वभावच बदलून टाकला. तोवरचा अबोल, अंतर्मुख, गंभीर आणि कुढ्या मी बाहेर बघणारा, बोलका, माणसांचा लोभी, जगण्यावर निहायत प्रेम करणारा झालो.

********

‘ कोवळी उन्हे ‘  या पुस्तकाची प्रस्तावना.

लेखक – विजय तेंडुलकर ; प्रकाशक – राजहंस;

 

 

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 22 Comments

  1. Khupp mast watla lekh vachun

  2. सुन्दर लेख,सदरनिर्मितीमागची गोष्ट आवडली.

  3. ही तर लेखकाच्या जन्माची कथा! उन्हा सारखी तेजस्वी आणि जन्मानं कोवळी!

  4. chan

  5. सुंदर लेख, हे सदर नाही मिळाले वाचायला. पण त्याच्या निर्मितीची गोष्ट आवडली.

  6. खूप सुंदर प्रस्तावना आहे.मी महाराष्ट्र टाईम्सची सुरूवातीपासूनची वाचक आहे,तेंडूलकरांचे सहजसुंदर शैलीदार लेखन आवडते

  7. Every father remembers the birth of his child with excitement. But Tendulkar finds the emotional swings attached to the excitement so easily, so honestly, it is truly remarkable!

  8. मीहि आधी कोवळी उन्हे वाचायची , मग बाकीचा पेपर . हलकेफुलके, खुसखुशीत लेख असायचे त्यातले. रस्त्यावरुन जाणा-या लहान मुलांना लोकरीचे रंगीबेरंगी गुंडे म्हंटलेलं अजून आठवतंय.

  9. क्या बात है! कोवळी उन्हे चे हे ‘मेकींग’ आवडलं.