सभासदत्वासंबंधी वाचकांशी बोलताना बऱ्याच जणांनी आमचे पण लेख पुनश्च वर घेणार का? अशी विचारणा केली. तेव्हा मला जाणवलं की हल्ली लोक लिखित स्वरुपात बऱ्यापैकी व्यक्त होऊ लागलेत. त्यांच्या या उर्जेला पुनश्च च्या format मध्ये वाव कसा द्यायचा हा प्रश्नच होता. शिवाय एखादा लेख वाचल्यावर अस्वस्थ होऊन किंवा त्याच्या उलट एखाद्या लेखामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळून काळ्यावर पांढरे करण्याची उर्मिसुद्धा अनेक जणांना येते. त्यांना सुद्धा लिखाणाची संधी मिळाली पाहिजे हे समजत होतं. त्यामुळे या दोन्ही ‘लेखक’ मंडळींना लिहिते करण्यासाठी एक कारण म्हणून आपण ‘वाचक बना लेखक’ ही स्पर्धा जाहीर केली. या स्पर्धेचा हा दुसरा महिना. आपण ही स्पर्धा जाहीर करायला आणि app वरून प्रतिक्रिया स्वीकारणे सिस्टीममधून बंद व्हायला एकच गाठ पडली. त्यामुळे नेमके app वरून प्रतिक्रिया पाठवणे शक्य होत नाहीये. त्यावर काम सुरु आहे. पण वाचक computer चा वापर करून किंवा app ऐवजी मोबाईलच्या browser मधून login करून आपल्या प्रतिक्रिया पाठवू शकतात.

प्रतिक्रिया कशा असाव्यात यासंबंधी थोडे…

१. ती त्रोटक नसावी. उदा. खूप छान, सुंदर वगैरे. हे शब्द तुमच्या मनात का आले ते सविस्तर दिलेत तर इतरांनाही कदाचित त्या लेखाचा अधिक आनंद घेता येईल.

२. लेख वाचल्यानंतरचे तुमचे आकलन, तुमचा point of view द्या. असे निरनिराळे point of views वाचणे हाच अजून एक वाचनानंद होऊ शकतो. अशा वेळी हमखास ‘एक हत्ती आणि सात आंधळे’ या गोष्टीची आठवण होते.

३. बऱ्याच वेळी एखादा लेख वाचल्यावर त्यात दिलेल्या माहितीवर प्रतिवाद करावासा वाटू शकतो, किंवा त्यात  भर घालावीशी वाटू शकते. ती जरूर घाला. फक्त ती माहिती तुम्ही मिळवलेली असू द्या. ऐकीव माहिती नको. किंवा तसा उल्लेख करावा.

४. एखादा लेख तुम्ही वाचलेल्या दुसऱ्या एखाद्या लेखाची आठवण करून देणारा असू शकतो. अशावेळी त्या दुसऱ्या लेखाबद्दल इतरांनाही अवगत करून द्या. ज्ञान असेच तर पसरते.

५. कधीकधी आम्ही पाठवलेला लेख एक निमित्त ठरू शकते आणि एखादा विषय तुमच्या मनात मूळ धरू शकतो. तसं झाल्यास त्या लेखाचा उल्लेख करून तुमचे लिखाण आम्हाला पाठवा.

६. चांगल्या प्रतिक्रियेचे उदाहरणादाखल विनय हर्डीकर यांचे ‘माणूस’ साप्ताहिकाच्या संपादकांना पाठवलेले पत्र दिले आहे. ते किती वाचनीय आहे पहा…

श्री. ग. माजगावकर,

सप्रेम नमस्कार

‘माणूस’ दिवाळी अंकामधलं संपादकीय वाचल्यावर अगदी लगेच उठावं आणि तुम्हाला भेटावं असं मनात आलं होतं. एक-दोन वेळा येऊन गेलो आणि जमलं नाही.

काही मिनिटांपूर्वीच ‘थँक यू मिस्टर ग्लाड’ वाचून संपवली आणि तसंच वाटतंय. मी चक्रावून गेलोय, झपाटून गेल्यासारखं मला झालंय. मी कम्युनिस्ट नाही, नक्षलवादी नाही. साम्यवाद, मार्क्सवाद, नक्षलवाद यांच्याबद्दल मला फरसं प्रेम नाही. नक्षलवाद्यांचा निःपात झाला तेव्हा तरुण रक्ताच्या हानीचंच दुःख मला अधिक जाणवलं होतं आणि जेव्हा माझे किती तरी तरुण मित्र अति-डाव्या तत्त्वज्ञानाकडे ओढले जाताना मला दिसतात तेव्हा एक विषादाची, काळजीची कळ मनात उठल्याखेरीज राहात नाही. ही कथा वाचतानाही प्रथम मी थोडा सावध होतो. मला त्यात प्रचाराचा भाग स्पष्टच दिसत होता. माझ्यातल्या सावध टीकाकाराच्या नजरेतून त्यामधली Sentimental craftsmanship निसटणं शक्य नव्हतं. त्यामधली वळणं, कलाटण्या यांतून एका साचेबंदपणाचा भासही होतच होता पण…

…पण तरीही या कथेनं मला भारून टाकलंय!

मला असं वाटलं की मी कुणा एका नक्षलवाद्याची कथा वाचत नाही. मी एका चिरंतन, युगायुगांतून लिहिल्या जाणाऱ्या अनादिअनंत महाकाव्याचा एक सर्गच-विसाव्या शतकातलं प्रकरण वाचतो आहे. ‘फिडेल चे आणि क्रांती’ किंवा ‘आणि ड्रॅगन जागा झाला’ वाटलं आणि हाच अनुभव आला होता. भगतसिंग, सुखदेव, आझाद, धिंग्रा, सावरकर हेच सगळे फिडेल, चे, माओ यांच्यामध्ये मला दिसत होते. तो लाँग मार्च माओचा आणि मिनी लाँग मार्च चे चा; पण त्याही आधी गेलेला मिनी मिनी लाँग मार्च बाजीप्रभूचा हे सगळेच एका विश्वव्यापी महाकाव्याचे सर्गच आहेत, अध्याय आहेत, असं मला वाटलं. वीरभूषण पटनाईक आणि छत्रपती संभाजी यांच्यात काही फरक करावा असं वाटत नाही-एक केव्हा मनातून जातो आणि दुसरा कधी त्याची जागा घेतो ते कळत नाही. जगात कुठं तरी त्याग ही बाजारू क्रयवस्तू झालेली नाही, स्वतंत्र विचार हे लांछन मानलं जात नाही, ध्येयमरण हा मध्यमवर्गीय सावधपणातून कुचेष्टेचा विषय मानला जात नाही, कवी-डॉक्टर-विचारवंत आपल्या हस्तीदंती कबरीच्या आतच राहण्यात धन्यता मानीत नाहीत, अजून कुठं तरी स्वप्नं पाहिली जातात, विजा उराशी कवटाळून हसत त्या स्वप्नांचा ध्यास घेतला जातो आणि हौतात्म्य, बलिदान, वीरमरण या क्षुल्लक बूर्ज्वा किंवा मध्यमयुगीन शाहिरी कल्पना मानल्या जातत नाहीत याची जाणीव केवढी थरारून सळसळून टाकणारी आहे! नवनिर्माण करणाऱ्या वेदनांचं हे जयगान किती भव्य, उदात्त आहे!

थँक यू मिस्टर नक्षलवादी… !

थँक यू मिस्टर बर्वे- !!

विनय हर्डीकर, पुणे

Leave a Reply

This Post Has 6 Comments

 1. ‘उत्कृष्ठ’ नसावे हो. मला वाटतं ते उत्कृष्ट असावं! ‘सर्वाधीक’, ‘लोकप्रीय’ शब्दही अशुद्ध आहेत, असं वाटतं. तपासून तेवढा बदल कराल का कृपया?

 2. ‘वाचक बना लेखक’ ह्या स्पर्धेतून ‘ वाचकांनो, लेखकही बना.’ असे सुचवायचे आहे.

  हा उपक्रम छानच आहे पण
  ‘ लेखकांनो, वाचकही बना.’ असे प्रबोधन करायचीदेखील गरज असेल.
  नेहमीच्या यशस्वी मान्यवर लेखकांपैकी बहुतेकजण इतर लेखकांचे लेखन वाचत नाहीत हा आक्षेप जुनाच आहे.

  ‘थँक यू मिस्टर ग्लाड’ वाचून हर्डिकरांनी लिहिलेला अभिप्राय ह्याबाबतही लक्षणीय आहे.
  तो उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

 3. खूप खूप आभार आपल्या या मार्गदर्शनाबद्दल.

 4. प्रतिसाद कसा असावा याबाबत आपल्या अपेक्षा व मार्गदर्शन समजले. प्रतिक्रिया देताना एवढा विचार मी करत नव्हतो. धन्यवाद!

 5. ऑन लाइन ऍप लवकर सुरू करावे