विनय हर्डीकरांचे लेखन अंतर्नाद, साधना मधून वाचत होतो आणि मी त्यांचा चांगलाच ‘पंखा’ बनलो होतो. अशातच पुंडलिक पै यांच्या ग्रंथ आदानप्रदान योजनेत त्यांचं ‘जनांचा प्रवाहो चालला’ अवचित हाती आलं. आणीबाणी विषयावरच्या या पुस्तकाने मला चांगलंच गुंगवून टाकलं. विनय हर्डीकर यांच्याबद्दल वाटणारे आकर्षण एका कारणामुळे आहे ते म्हणजे मला हर्डीकर माझ्यासारखे ‘मध्यमार्गी’ वाटतात. तशीही या ‘मध्यमार्गी’ अजिबात गर्दी नसते. गर्दी काय ती दोन्ही टोकाकडे. त्यामुळे अशा कमी गर्दीत ‘आपलं’ माणूस ओळखणं तसं सोपं. हे पुस्तक वाचताना त्यांची ही ओळख अधिक पक्की झाली. आणीबाणीबद्दल अधिक वाचून काढावं असं वाटू लागलं. त्यांनी उल्लेख केलेले ‘माणूस’ चे अंक शोधावेत आणि त्या काळात बाकीच्या नियतकालिकांमध्ये काय चाललं होतं, त्यांची या आणीबाणी बद्दल काय प्रतिक्रिया होती ते पाहावं अशी उत्कंठा लागून राहिली. सुधन्वा आणि बोजेवार सरांबरोबर चर्चा केली. ठरलं…जून महिन्यात पुनश्च चा आणीबाणी विशेष अंक काढूया. आता डिजिटल नियतकालिक म्हटल्यावर त्याला ‘अंक’ कसं म्हणायचं हा प्रश्नच आहे. पण ते असो…

लेख शोधायचे तर अंक उपसायला लागणार होते. त्यासाठी मी आणि सुधन्वा ठाण्याच्या ग्रंथ संग्रहालयात ५-५ तास बसलो. नुसतं ठाण्यात बसून चालणार नव्हतं. बरेचसे अंक ठाण्याच्या संग्रहालयात नव्हते. अशावेळी आठवतो ‘ग्रंथसखा’. झालं. मग एका रविवारी बदलापूर गाठलं. ग्रंथसखा मध्ये तर काय आणीबाणी विशेष म्हटल्यावर श्याम जोशी सर आणि कर्णिक मॅडम यांच्या उत्साहाला उधाण आलं. त्याच दिवशी नेमके कल्याणच्या ग्रंथ संग्रहालयाचे श्री राजीव जोशी तिथे आले होते. त्यांनी  ‘आणीबाणीतील कविता’ हे पुस्तक काढून आणून दिले. मला लेख मिळण्याची खात्री होती पण कवितांबद्दल मी जरा साशंक होतो. नेमकं तेच पुस्तक मिळाल्यामुळे काम सोपं झालं. मंगेश पाडगावकरांची ‘भिंत’ शीर्षकाची एक अफलातून कविता त्यात मिळाली. डॉ अरुण लिमयेंच्याच संपादनाखाली निघालेले ‘आणीबाणीतील पत्रे- भाग २’ हे पुस्तक जोशी सरांनी आणून दिले. त्यातून तर त्या काळातील वेगवेगळ्या प्रसिद्ध, कमी प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध अशा व्यक्तींमधील पत्रव्यवहार मिळाला. साधना साप्ताहिकाबद्दलचे एक पत्र मिळाले. रुची मासिकाचा एक विशेषांक मिळाला ज्यात अरुण साधू, अशोक शहाणे आणि विनय हर्डीकर यांचे लेख मिळाले. बोजेवार सरांनी कुमार केतकरांचा लेख शोधून दिला. याचा कळसाध्याय असणारेत सगळ्यांचे आवडते ‘ठणठणपाळ’. आता ठरल्यापेक्षा लेख जरा जास्तच झालेत. पण ते सशुल्क, अवांतर अशा वेगवेगळ्या विभांगात मिळून सामावून घेण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून वाचकांना आणीबाणी काळातील जास्तीत जास्त लेखन  वाचायला मिळेल.

यानिमित्ताने आणीबाणीकडे बघण्याचा नियतकालिकांचा वेगवेगळा दृष्टीकोन कळला. सत्यकथा चे ७५ ते ७७ मधले सगळे अंक चाळले. वसंत आबाजी डहाके यांचा एक लेख सोडला तर एकाही अंकात आणीबाणीसंबंधी अवाक्षर नाहीये. कथा, कविता, समीक्षा, ग्रंथव्यवहार, साहित्यिक चर्चा  अशी त्या अंकातील लेखांची सूची दिलीये ती पाहिलीत तर शंकाच येईल की त्यावेळी आजूबाजूला एव्हढं काही सुरु होतं?

आणि तेच माणूस चे अंक म्हणजे उसळता ज्वालामुखी आहे. आणीबाणी जाहीर झाली २५ जून च्या मध्यरात्री. आणि जुलै महिन्याचे त्यांचे मुखपृष्ठ पहा. पुढची अडीच वर्ष माणूसची मुखपृष्ठे आणि लेख बघण्या-वाचण्यासारखे आहेत. कठीण परिस्थितीत तुमच्यातले गुण झळाळून उठतात असं म्हणतात. श्रीगमांसाठी आणीबाणी ही पर्वणीच ठरली असं दिसतं. त्यांच्यातला संपादक या आव्हानाला पुरून उरला असंच म्हणावं लागेल.

बाकी बरेचसे अंक सेन्सॉरशिपमुळे असेल कदाचित पण या विषयावर एकदम चिडीचूप आहेत. वसंत मासिकासारखे काही तर भांबावलेले दिसतात.  आणीबाणी चांगली की वाईट ? नक्की काय ते ठरवू न शकलेले बरेच जण त्या दिवसात कुंपणावर बसलेले होते. वसंत मासिकाच्या १९७५ सालच्या दिवाळी अंकातील संपादकीय पहा…

“असामान्य परिस्थितीतील ही असामान्य दिवाळी ! देशात आणीबाणी सुरु आहे. जनता निश्चिंत आहे.लोकांनी दिवाळीचा सण मोठ्या आनंदात व सुखात साजरा करावा. बाजारात स्वस्ताई झाल्याने लाडू, करंज्या, कडबोळी, चकली वगैरे अनेक पदार्थांवर यथेच्छ ताव मारून घ्यावा. बाळ-गोपाळांना फटाके आणून देऊन जिकडे तिकडे आनंदी आनंद करावा. सारा देश दिवाळीच्या आनंदी वातावरणात पोहत राहील असे कार्यक्रम साजरे करावेत. ” शेवटचा परिच्छेद तर मस्तच आहे. उपरोध की खरंच त्यांना असं म्हणायचं आहे कळत नाही. वाचा ..”मध्यमवर्गही महागाई भत्ते बोनस वगैरे मिळणार असल्याने दिवाळीच्या आनंदात मश्गुल होऊन गेला आहे. सर्व वस्तू स्वस्त भावाने मिळू लागल्याने त्याच्या चेहऱ्यावरील चिंता पार नाहीशी झाली आहे. देशातले चळवळे, समाजकंटक, नतद्रष्ट राजकीय पुढारी वगैरे गजाआड टाकल्यामुळे जनतेच्या मानसिक शांततेचा भंगही आता होणार नाही. म्हणून लोकहो, खा. प्या, मजा करा. दिवाळी साजरी करा-”

आणि त्याचवेळी ‘एकचालकानूवर्तीत्व’ वाली रा. स्व. संघासारखी संघटना हुकुमशाहीचा आणि आणीबाणीचा विरोध करून वातावरणातील गोंधळात भर घालीत होती. संघविचारांना मानणारी एकता, सोबत सारखी मासिके त्यामुळे काँग्रेस आणि इंदिरा गांधींवर तुटून पडली होती. पण त्याचवेळी ‘प्रसाद’ सारख्या मासिकात ‘इंदिरा गांधी विविध गुणदर्शनम’ छापलं जात होतं.  ‘एकता’ मासिकातला श्रीकृष्ण शिदोरे यांचा ‘पत्रकारांचा शासनाबरोबरचा संघर्ष’ आणि ‘रुची’ मधील अशोक शहाणेंचा ‘वामकुक्षी निर्वेध सुरु आहे’ हा लेख साहित्यिक, पत्रकारांमधील याच गोंधळाचे वर्णन करणारा आहे.

आता आणीबाणीचे अत्यंत खुले आणि निसंदिग्धपणे समर्थन करणारे कदाचित एकमेव पत्रकार म्हणजे कुमार केतकर. त्यांच्याशिवाय हा अंक पुरा होवू शकला नसता. म्हणूनच ‘आणीबाणी कशी अपरिहार्य होती’ हा त्या काळातील जागतिक राजकारण आणि घटनांचा वेध घेत कुमार केतकर यांनी लिहिलेला लेखही या अंकात घेतला आहे. या विषयाची एक वेगळी बाजू दाखवणारा लेख म्हणून तोही महत्वाचा आहे.

असं एकंदर धमाल साहित्य या महिन्यात वाचायला मिळणार आहे. पण म्हणजे महिनाभर फक्त या एकाच विषयावर सगळे लेख आहेत असं समजू नका. आणीबाणी संबंधी लेखांशिवाय ३ इतर लेखही आहेत. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्यावरील व्यक्तिविशेष सदरातील लेख, स्थललेख या सदरात वसई उर्फ वाजीपूर या शहराबद्दल माहिती देणारा लेख आणि कथा या सदरात यावेळी एक वेगळीच, कथेची कथा तुम्हाला वाचायला मिळेल. त्याचे लेखक आहेत विजय पाडळकर. तेव्हा जून महिन्यातील या भरगच्च ‘आणीबाणी’ विशेष अंकासाठी तयार राहा. ..आणि हो आमचे हे प्रयत्न कसे वाटले यावर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

image credit : beedlive.com

 

Leave a Reply

This Post Has 13 Comments

 1. आपण निवडलेल्या लेखांचे विविधअंगी दृष्टीकोन वाचकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न व मेहनत कौतुकास्पद आहे.

 2. आपण निवडलेल्या लेखांचा विविधअंगी दृष्टिकोन वाचकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न व मेहनत कौतुकास्पद आहे.

 3. निश्चितच वाचायला आवडेल विजय पाडळकर यांचे लेखन मला खुप आवडते

 4. मला हा आणिबाणी विशेष अंक आता कधी वाचायला मिळेल असं झालेय.

 5. मला आता हा आणिबाणी विशेषांक कधी वाचायला मिळेल असं झालेय.

 6. वाचायला निश्चित आवडेल.

 7. छान लेख संपादन!

 8. ‘ देशात आणीबाणी सुरु आहे पण जनता निश्चिंत आहे. दिवाळी असताना बाजारात स्वस्ताई आहे…. देशातले चळवळे, समाजकंटक, नतद्रष्ट राजकीय पुढारी वगैरे गजाआड टाकल्यामुळे जनतेच्या मानसिक शांततेचा भंगही आता होणार नाही. ‘
  हे वसंत मासिकातले निरिक्षण महत्त्वाचे आहे.
  सामान्य लोकांच्या अशा मतांना महत्त्व द्यायची संवेदनशीलता त्यावेळच्या अनेक नेत्यांकडे नसणार.

  फारसा अभ्यास न करता, भावूक होऊन एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा टोकाचा द्वेष, विरोध करायचा अशी मेलोड्रामाबाज सवय भारतातील अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना लागलेली आहे. अशी व्यक्ती पंतप्रधान असेल तर हा एकांगी विरोध अधिकच तीव्र होत असतो.
  केवळ आणिबाणीच नाही तर बोफोर्स प्रकरण, आर्थिक उदारीकरण, गॅट करार अशा विषयांबाबतही हे घडले आहे.

  कुमार केतकरांचा लेख ह्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. ज्वालामुखीच्या तोंडावर ह्या पुस्तकातही केतकरांनी ह्याबाबत विवेचन केलेले आहे.

 9. नविन मेजवानी. आणीबाणी वर एकत्रीत सर्व लेख म्हणजे
  दिवाळ फराळ एका ताटात .. लगे रहो

 10. व्वा झक्कास
  आणीबाणीच्या पर्वात कांही स्थानिक पेपर धाडसाने विरोधात लिहीत होते त्याचा समावेश कराल?