आज बहुतांश शहरी मराठी सुशिक्षित मध्यमवर्गीय व उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. मराठी शाळा हा पर्यायच त्यांच्या मनात डोकावत नाही. आणि डोकावला तरी तो स्वीकारण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे. मातृभाषेतून शिकण्याचे फायदे दूर सारून त्यांना इंग्रजी माध्यम का स्वीकारावेसे वाटते, मराठी शाळा कुठे कमी पडतात, याचा परामर्श घेतलाय शुभदा चौकर यांनी. २००३ साली लिहिलेला त्यांचा हा लेख आजही तितकाच ताजा आणि कालसुसंगत वाटतो –

********

आज बहुतांश शहरी मराठी सुशिक्षित मध्यमवर्गीय व उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. मराठी शाळा हा पर्यायच त्यांच्या मनात डोकावत नाही, डोकावला तरी तो स्वीकारण्याचे धारिष्ट नाही, ही वस्तुस्थिती आहे. मीही गेल्याच वर्षी या सर्व प्रकियेतून गेले. पूर्ण विचारांती या सार्वत्रिक स्थितीकडे पाठ फिरवून अपवाद केला. मुलीला मराठी शाळेत घालण्याचा हा निर्णय घेताना मनात चाललेली विचारप्रकिया, काही सुज्ञ, विचारी मित्र, शिक्षणतज्ञ इत्यादींशी मुद्दाम केलेल्या चर्चा यातून मराठी शाळांची स्थिती, पालकांचे विचार आणि मुलांच्या भवितव्याविषयीची त्यांची धारणा याबाबत अनेक विचारार्ह मुद्दे समोर आले.

`मातृभाषेतून शिक्षण घेणे तार्किकदृष्ट्या योग्यच’ हे विज्ञानानेही वारंवार सिद्ध केलेले असताना त्याच मुद्द्यावर तडजोड करून अनेक सुजाण पालक मराठी शाळांकडे पाठ फिरवताना दिसताहेत. त्याची कारणे आणि त्या कारणांवर आधारित विचारमंथन घडून यावेसे वाटते. 

मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यामागची पालकांची काही प्रमुख कारणे (ही कारणे पालकांच्याच वत्त्कव्यातून पुढे आली आहेत) :

 1. जागतिकीकरणाच्या या काळात इंग्रजी उत्तम येण्याला पर्याय नाही. या युगात आपले मूल मागे पडू नये, न्यूनगंडाने त्याला पछाडू नये, त्याचा आत्मविश्वास कमी पडू नये…
 2. महाविद्यालयीन शिक्षण घेताना मराठी शाळेतील मुलांना अडचणी येतात, ती गोंधळतात…
 3. आजूबाजूची सर्व मुले इंग्रजी शाळेत जातात. त्यांच्यात आमचे मूल सहज सामावले जावे. त्यांच्या संभाषणात सहभागी होता यावे…
 4. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. इंटरनेटची, माहिती- तंत्रज्ञानाची भाषा आहे. या भाषेतील स्रोत मुलांना लहानपणापासून वापरता यावा…
 5. पालकांना नोकरीधंद्यानिमित्त राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून कुठेही जावे लागले तरी मुलांच्या शिक्षणाची समस्या उद्भवू नये…
 6. मराठी भाषा मृतप्राय होत चालली आहे. मराठीत उत्तम साहित्यनिर्मितीतरी होते आहे का? मराठी उत्तम येऊन काय साधणार? मराठीला `मार्केट’ नाही…
 7. मातृभाषा यायला हवी याबद्दल दुमत नाही, पण ती आपण घरी नीट शिकवू शकतो. शास्त्रशुद्ध इंग्रजी भाषा मात्र मुद्दाम वेगळी शिकवावी लागते. ती शाळेतच शिकणे उत्तम…
 8. मराठी शाळेतील `क्राउड ‘ चांगले नाही. मराठी शाळांमध्ये अधिकतर `झोपडपट्टी’ भरलेली दिसते. शिक्षणाचा संस्कार नसलेल्या घरांमधून आलेले हे विद्यार्थी आपल्या पाल्याचे मित्र असणे हे आामच्यासारख्या सुशिक्षित, उच्चस्तरीय पालकांना नकोसे वाटते. आर्थिक, सामाजिक, बौद्धिकदृष्ट्या निम्नस्तरातील मुलांमध्ये आपले मूल नेहमी वावरणे धोक्याचे वाटते. भलतेच संस्कार संकमित होण्याची धास्ती वाटते…
 9. मराठी शाळांचा दर्जा चांगला नाही. शिक्षकवर्गात अशुद्ध बोलणाऱयांचा भरणा अधिक असतो, शिक्षकांची इयत्ता कोणती, असा प्रश्न पडावा अशी स्थिती असते…
 10. खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय उच्चभ्रू पालकांना चांगला वाटतो. खासगी इंग्रजी शाळा `पॉश’ असतात. सोयीसुविधांनी युक्त, स्वच्छ, नेटक्या असतात. शिकण्याच्या पद्धतींत कल्पकता, मर्यादित विद्यार्थीसंख्या, शाळेत अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा इत्यादींना वाव असतो. फी भरमसाट असते, पण त्याचा योग्य मोबदला मिळत असेल, तर मुलांच्या शिक्षणावर तितका (महिन्याकाठी 700 ते 1000 रु.) खर्च करण्यास सुशिक्षित, सधन पालक तयार असतात.
 11. अशा आधुनिक, पॉश, दर्जेदार व कल्पकतेने शिक्षण देणाऱया, मर्यादित विद्यार्थीसंख्येच्या मराठी शाळा दुर्दैवाने अपवादापुरत्या आहेत. बाकी बहुतांश मराठी शाळा अनुदानित (निदान माध्यमिक शिक्षण विभाग तरी) असतात. तिथे भरमसाट विद्यार्थीसंख्या, निधीचा अभाव, त्यामुळे तुटपुंजी साधनसामुग्री, सोयीसुविधांची टंचाई असे रडगाणे असते. मराठी शाळांनी कायम दारिद्र्य पांघरायचा जणू मक्ता घेतला आहे. अशा शाळेत मुलांना पाठवावे, असे सुखवस्तू पालकांना वाटत नाही.
 12. खासगी इंग्रजी शाळांसारखी मराठी शाळा आमच्या भागात असली तर आम्ही जरूर मुलांना तिथे पाठवू, असेही काही पालक सांगतात.
 13. खासगी विनाअनुदानित पॉश मराठी शाळा महाराष्ट्रात अगदी अत्यल्प संख्येने आहेत, पण त्याही स्वत: तशी प्रसिद्धी (इथे `प्रसिद्धी`चा विधायक अर्थ अपेक्षित आहे- समाजापर्यंत त्यांचे प्रयत्न पोहोचावेत, यासाठीची प्रसिद्धी!) करत नाहीत.
 14. मराठी वातावरणाच्या, मराठी व्यवस्थापनाच्या इंग्रजी शाळा हा पर्याय काही पालकांना श्रेयस्कर वाटतो. (उदा. मुंबईतील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा, पुण्याची `अभिनव’ इंग्लिश मिडियम, ठाण्याची ए. के. जोशी इ.) इंग्रजीतून शिक्षण ही व्यावहारिक गरज व मराठी वातावरण ही भावनिक गरज भागवणाऱया शाळांना काही पालक प्राधान्य देताना दिसतात.

सुशिक्षित मराठी पालकांचीच ही विधाने- पाल्याला इंग्रजी शाळेत घालण्याचे समर्थन करणारी! जेव्हा बहुतांश मराठी सुशिक्षित, बुद्धिवादी पालक अशी कारणे देतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष न करता त्याकडे गंभीरपणे बघितले पाहिजे. यातील प्रत्येक कारणात किती तथ्य आहे, याची परखड चिकित्सा करणे जरुरीचे वाटते.

जागतिकीकरणाच्या या काळात इंग्रजी उत्तम येण्याला पर्याय नाही : आजच्या पिढीला इंग्रजी उत्तम येण्यास पर्याय नाही, हे तर खरेच; पण त्यासाठी शिशू गटापासूनच तीच भाषा ही शिकण्याचे माध्यम असावी, असा दुराग्रह कशासाठी बाळगावा? मातृभाषेतून शिकणे तुलनेने सोपे, सहज असते. मातृभाषेतून शिकलेल्या विषयाचे आकलन चटकन तर होतेच, शिवाय ते ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहते, शिवाय मुले अभ्यास एन्जॉय करतात. त्यामुळे शालेय शिक्षण मराठीतून आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण इंग्रजीतून हा पॅटर्न चांगला आहे. महाविद्यालयीन शिक्षण हा पुढील उच्चशिक्षणाचा पाया असतो. कॉलेजच्या पहिल्या वर्षात मराठी माध्यमाच्या मुलांना रूळ बदलल्यानंतरचा खडखडाट थोडा जाणवेलही, पण हे रूळ बदलण्याची क्रिया आत्मविश्वासाने आणि चातुर्याने केली की मग प्रवास सुरळीत होतो. आजच्या तरुण पालकांपैकी अनेकांनी त्यांच्या तरुणाईत हे आव्हान छान झेपवून दाखवले आहे. आठवीपासून सेमी-इंग्लिश (विज्ञान-गणित विषय इंग्रजीतून) हा पर्याय स्वीकारल्यास कॉलेज-शिक्षणाचा आरंभही सुलभ होतो.

या पिढीला तर पहिलीपासून इंग्रजी हा विषय शिकण्याची उत्तम सोय महाराष्ट्र सरकारच्या कृपेने (रामकृष्ण मोरे यांच्या प्रयत्नाने) उपलब्ध झाली आहे. मुलांना इंग्रजी एक भाषा म्हणून किंवा विषय म्हणून शिकवण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत. पुस्तके, कॅसेटस्, टीव्ही, रेडिओ अशी पूरक साधने उपलब्ध आहेत. काही शाळांमध्ये अलीकडे पहिली-दुसरीपासून इंग्रजी संभाषणाचे वर्गही घेतले जातात. `इंग्रजी शिकणे’ आणि `इंग्रजीतून शिकणे’ या दोन भिन्न संकल्पना आहेत. त्यातील फरक अनेक पालक समजून घेत नाहीत आणि म्हणून त्यांच्या विचारसरणीत संभ्रम जाणवतो.

विशेषत: महाराष्ट्रात `पहिलीपासून इंग्रजी’ शिकवण्याचा प्रयोग सुरू झाल्यानंतर अनेक संभ्रमित पालकांनी पाल्याला मराठी शाळेत घालण्याचा मार्ग स्वीकारायला हवा होता. कारण मातृभाषेतून क्रमिक शिक्षण व लहानपणापासूनच इंग्रजी या भाषा-विषयाची जोड हा उत्तम मध्यममार्ग आहे. अगदी पहिलीपासून (पाचव्या वर्षापासून) इंग्रजी या विषयाच्या शिकण्या-शिकवण्याकडे नीट लक्ष दिले गेल्यास, पाल्याला भाषाविकासाचे प्रयोग/खेळ याद्वारे या भाषा-विषयाची गोडी लावल्यास त्यांना इंग्रजीची भीती वाटणार नाही. इंग्रजी सफाईदार बोलता आले की न्यूनगंड वाटणार नाही. सर्वच क्रमिक अभ्यास इंग्रजीतून करण्यापेक्षा इंग्रजी हा भाषा-विषय गांभीर्याने शिकवण्याचा मार्ग मुलांच्या व पालकांच्याही दृष्टीने चांगला नाही का?

मुलांना इंग्रजीतून शिकवायचे, तर पालकांना घरातील वातावरण, पर्यावरण इंग्रजी करणे कमप्राप्त आहे. अन्यथा मुले गोंधळतात, त्यांना आकलन पूर्ण होण्यास तुलनेने वेळ लागतो, संकल्पना स्पष्टपणे समजणे (कन्सेप्चुअल अंडरस्टँडिंग) कठीण होते. पाल्याला इंग्रजीतून शिकवायचे असेल तर पालकांची जबाबदारी खूप वाढते. पाल्याचे पर्यावरण इंग्रजी ठेवण्याची तयारी असली तरच त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्याचे धाडस करणे उचित. पर्यावरण इंग्रजी ठेवायचे म्हणजे घराची संभाषणाची भाषा, घरात वाचली जाणारी नियतकालिके, पुस्तके, पाहिले जाणारे दूरचित्रवाणी कार्यकम, संगीत, सांस्कृतिक कार्यकम, इत्यादींवर इंग्रजीचा प्रभाव असायला हवा. परदेशात राहणाऱया मराठीजनांना हे आजूबाजूच्या वातावरणामुळे सहज जमते. आपल्याला ते जमणार आहे का, याचा पालकांनी विचार करावा. नपेक्षा मातृभाषेतून विषयाची जाण लवकर येते व ती पक्की होते, हे सत्य स्वीकारावे. पाल्याला मातृभाषेतून शिकवावे, व जोडीला इंग्रजी हा एक विषय म्हणून पहिल्यापासून पध्दतशीर शिकवावा, हा मार्ग जास्त सुरक्षित.

पहिलीपासूनच इंग्रजी शिकायला सुरुवात झाली की इंटरनेट वापरणे कठीण आहे, असे या लहानग्यांना वाटणारच नाही. संगणकीय इंग्रजी भाषा तर सोपीच आहे. क्लिष्ट, अलंकारिक नाही. उलट इंग्रजी भाषा-विषय शिकता शिकता संगणक, इंटरनेट वापरणे हे एकमेकांना पूरक ठरू शकते.

आजूबाजूची सर्व मुले इंग्रजी शाळेत जातात : आजूबाजूची मुले इंग्रजीत शिकणारी आहेत म्हणून मराठी शाळेत जाणाऱया मुलांना न्यूनगंडाने पछाडण्याचे काही कारण नाही. आजूबाजूच्या गुजराती, सिंधी, पंजाबी मुलांना मातृभाषेतून शिकण्याचा पर्याय उपलब्ध नाही म्हणून ते इंग्रजी शाळेत नाइलाजाने जातात. आजूबाजूची इंग्रजी शाळेत जाणारी मराठी मुले काय किंवा अन्यभाषिक काय, त्यांची दैनंदिन व्यवहाराची भाषा हिंदी किंवा अर्धवट इंग्लिश (थोडक्यात, रीमिक्स) असते. जिच्याशी जमवून घेणे कोणत्याही लहान मुलाला कठीण नसते. `न्यूनगंड’ ही भावना लहान मुलांमध्ये चटकन व स्वत:च्या मनातून उगम पावत नाही. बहुतेक वेळा, मुलांपेक्षा पालकच न्यूनगंडाची शिकार बनलेले असतात आणि त्यांच्याकडून ती भावना मुलांकडे संक्रमित झालेली असते. प्रत्यक्षात मुले मात्र स्वत: त्यातून मार्ग काढत असतात. समवयस्क लहान मुलांची परिभाषा वेगळी असते व ती लहान मुले सहजत: शिकत असतात.

आताच्या मध्यमवर्गीय मराठी पालकांना स्वत:च्या लहानपणी इंग्रजी भाषेचे कौशल्य व ज्ञान किती सीमित होते, हेच स्मरणात असते. आज आपल्या पाल्याचेही इंग्रजी भाषाज्ञान तितकेच यथातथा असेल तर तो/ती आजच्या युगात कसा/कशी तग धरेल, याची धास्ती वाटते. इथेच या पालकांचे चुकते. एक तर हा पालकवर्ग 25 ते 35-40 वयोगटांतला. त्यांच्या लहानपणी पाचवीपासून इंग्रजी भाषा-विषय शिकवण्यास सुरुवात होई. शाळेबाहेर इंग्रजी भाषेला एक्स्पोजर फार नसे. त्या पिढीला (म्हणजे माझ्या पिढीला) पाचवीत इंग्रजी मुळाक्षरांशी ओळख होई. सहावी-सातवीपर्यंत जेमतेम इंग्रजी वाचता येई. मग पंचाईत अशी होई की, सहावी- सातवीत वाचता येतील अशी पुस्तके असत- इसापस् टेल, फेअरी टेल, बेडटाइम स्टोरीज अशी! त्या बालिश कथा-कवितांतील भावविश्वात सहावी- सातवीच्या मुलांनी रमावे कसे? त्यांच्या वयाच्या कुमार-किशोर साहित्याची पुस्तके वाचायला घ्यावी तर इंग्रजीचा शब्दसंग्रह पुरेसा नसल्याने ती वाचायला कठीण वाटायची. अशा तिढ्यात सापडलेली ही मुले मग अवांतर इंग्रजी वाचनापासून बिचकून राहत. त्यांना या वयात योग्य मार्गदर्शक मिळाला तर ठीक, नाही तर त्यांचे इंग्रजी साहित्य-वाचन तिथेच थांबे. आणि केवळ क्रमिक पुस्तकांच्या वाचनापुरतीच इंग्रजी पुस्तके त्यांच्या हाती टिकत. त्यामुळे व्याकरणदृष्ट्या शुद्ध, पण शब्दसंग्रह फार तोकडा, अशी त्यांची स्थिती इंग्रजीबाबत होई. या पिढीच्या लहानपणी माहितीचा आजच्याइतका विस्फोट झाला नव्हता. त्यामुळे सोप्या भाषेतले, छोट्या वाक्यांचे चित्रमय इंग्रजी एन्साय्क्लोपीडिया, इंग्रजी विज्ञान पुस्तके, कोडी असे साहित्य घरोघरी उपलब्ध नसायचे. संगणकही नव्हता. घरामध्ये, वस्तीमध्ये इंग्रजी कानावर पडत नव्हते. टीव्हीचाही प्रसार फार नव्हता. अशा इंग्रजी-पोषक वातावरणाअभावी आजच्या तरुण पालक-पिढीला इंग्रजीबद्दलची भीती, इंग्रजीचे अधुरे ज्ञान अशा सर्व अडचणींनी पछाडले होते. काहींनी त्यावर यशस्वी मात केली, काही जण मात्र आयुष्यभर त्या इंग्रजीबद्दलच्या नकारात्मक भावनांचे ओझे वागवत राहिले. त्यांना आपल्या पाल्याला या स्थितीतून जावे लागू नये, असे मनापासून वाटते, आणि मग इंग्रजी शाळेचा पर्याय समोर दिसतो. ट्रेंडच्या बरोबर राहण्याचे समाधानही त्यातून मिळते. ट्रेंड फॉलो करणे सोपे असते, `ट्रेंड सेंटर’ व्हायला नेतृत्वगुण लागतो, जो कमी जणांकडे असतो.

ज्या पालकांना नोकरी-उद्योगानिमित्त राज्याच्या-देशाच्या सीमेबाहेर जावे लागण्याची शक्यता आहे, त्यांना ही वाद-चर्चा लागू नाही. त्यांना इंग्रजी शाळेशिवाय पर्याय नाही. ज्यांना महाराष्ट्राबाहेर जावे लागण्याची शक्यता फार कमी, त्यांनी इंग्रजी शाळेचा अनाठायी आग्रह का धरावा, हा चर्चेचा विषय आहे.

मराठी भाषा मृतप्राय होत चालली आहे : मराठी मृतप्राय होत चालली आहे, असे सरसकट विधान करण्यात काही अर्थ नाही. आपण फक्त शालेय पातळीवर मराठी माध्यमाचा पर्याय विचारात घेतला आहे. या पातळीतील विद्यार्थ्यांना पुरेल इतके मराठी दर्जेदार साहित्य नक्कीच उपलब्ध आहे. निर्माणही होत आहे. नाही तरी इंग्रजी शाळांतील विद्यार्थीसुद्धा `हॅरी पॉटर`पलीकडे जाऊन दर्जेदार वाङ्मय कितीसे वाचतात? आजची मराठी शाळेतील मुले शालेय नाही, तरी महाविद्यालयीन पातळीवर तरी इंग्रजी साहित्यकृती वाचण्याइतके सक्षम नक्की होऊ शकतात. मुळात हा प्रश्न वाचण्याच्या क्षमतेचा नसून वाचनाच्या गोडीचा आहे. पहिलीपासून पद्धतशीर व नेमाने इंग्रजी भाषा विकासाकडे लक्ष दिल्यास `इंग्रजी वाचण्याची इच्छा आहे, पण क्षमता नाही`, अशी स्थिती होणार नाही.

मराठी शाळेतील `क्राउड ‘ चांगले नाही : राहिता राहिला प्रश्न मराठी शाळेतील `क्राऊड`चा आणि शाळांच्या एकंदर दर्जाचा. याकडे मात्र मराठी शाळा-व्यवस्थापनांनी गांभीर्याने बघणे जरुरीचे आहे. नव्हे, त्यांनी ठोस निर्णय, ठाम पावले उचलून या कोंडीतून मार्ग काढायला हवा.

गरीब पालक खाजगी इंग्रजी शाळांचा विचारही करू शकत नाहीत, इतका तेथील शिक्षणाचा खर्च अफाट असतो. अनुदानित इंग्रजी शाळांचा पर्याय काही गरीब पालक स्वीकारतात, परंतु अशिक्षित, अत्यल्पशिक्षित पालकांना अनुदानित इंग्रजी शाळेत घालण्याचीही भीती वाटते, कारण अनुदानित इंग्रजी शाळांत फी कमी असेलही, पण घरी पालक काहीही अभ्यास करून घेणारे नसतील, तर त्यांना शिकवणीचा आधार घ्यावा लागतो. आणि तो खर्चही गरीब पालकांना अवाक्याबाहेरचा असू शकतो. मग ते बापुडे पाल्याला मराठी अनुदानित शाळेत घालण्याचा पर्याय स्वीकारतात. आसपासच्या झोपडवस्तीतील बहुतांश मुले मराठी शाळेत आली की साहजिकच त्यांचा `क्राऊड’ वाढतो. या पालकांना- मुलांना कमी लेखू नये, इतपत सामाजिक भान मराठी सुशिक्षितांमध्ये आले आहे. मात्र आपल्या पाल्याच्या वर्गात आपल्या `स्टेटस`चे विद्यार्थी एक-चतुर्थांशही नसावेत, हे मात्र मराठी बुद्धिजीवी वर्गाला खटकते. `सामाजिक समरसता गाठायची तर सर्व स्तरांतील मुलांनी एका वर्गात शिकावे, हे मान्य परंतु आमच्या स्टेटसची 10-12 मुलेही (50 पैकी) पाल्याच्या वर्गात नसावीत जेणेकरून त्यांना समान अपब्रिंगिंग, समान जीवनशैलीचे किमान काही मित्र-मैत्रिणी मिळतील, हे मात्र पचवणे कठीण आहे,’ असे या पालकांचे मत असते.

आज कुटुंबे लहान होत चाललेली असताना अनेक मुलांना भावंडे नाहीत. मित्र-मैत्रिणींचे भावबंध त्यांना महत्त्वाचे वाटणार आहेत. अशा वेळी त्यांच्या घराशी/ पालकांशी साधर्म्य असलेल्या घरांतील मुलांचे मित्रगट तयार होतील. त्यामुळे, आपल्या समाजवर्तुळातील सर्वच पालक त्यांच्या पाल्यांसाठी इंग्रजी शाळेचा पर्याय निवडत असताना आपण वेगळा मार्ग चोखाळायचा, तर पुढे आपल्या पाल्याला आपल्या स्तरातील मित्र उपलब्ध झाले नाही तर… ही भीती अनेक मध्यम/ उच्चवर्गीय मराठी पालकांना वाटते. आणि मग ते ट्रेंड फॉलोअर होतात.

शिक्षणाचा संस्कार नसलेल्या घरातील मुले जर उडाणटप्पू असतील, अश्लील व/वा अशुद्ध भाषा बोलत असतील, वाईट सवयीची असतील तर तीच मुले आपल्या मुलाला नाइलाजाने मित्र म्हणून स्वीकारावी लागू शकतात; दुसरा चॉइस उपलब्ध नाही, म्हणून तरी! अशा वेळी पाल्यावर काय परिणाम होतील आणि पुढे जाऊन आपण या विचित्र कचाट्याशी कसा सामना करणार… असेही भय सुसंस्कारित पालकवर्गाला वाटते. `स्वत:च्या संस्कारांवर ठाम विश्वास हवा’ हे म्हणणे सोपे असते, कृतीत येणे तितके सोपे नसते.

मराठी शाळांच्या वर्गात सर्व सामाजिक स्तरांचे विद्यार्थी आहेत, त्यांचे सुरेख आदानप्रदान होते आहे, सुशिक्षित घरांमधील मुलांचा फायदा अशिक्षित मुलांच्या जडणघडणीत होतोय, सुखवस्तू वातावरणातील मुलांना निम्न आर्थिक स्तरावरील मुलांचे जीवनही समजते आहे व त्यातून त्यांची जीवनाची जाण वाढते आहे, असे आदर्श चित्र हवे – जे आजच्या पालक पिढीला अनुभवायला मिळाले.

आज मराठी शाळांच्या वर्गात आदर्श `प्रॉडक्ट- मिक्स’ नाही, याची नुसती खंत करत बसण्यापेक्षा शाळा व्यवस्थापकांनी- मुख्याध्यापकांनी मिळून जिकिरीचे प्रयत्न करायला हवे. शाळा परिसरातील व्यावसायिक, उच्चविद्याविभूषित, सामाजिक- सांस्कृतिकदृष्ट्या एलिट, बुद्धिजीवी आणि प्रभावी (इन्फ्लुएन्शिअल) पालकांना भेटून आपल्या शाळेबद्दल सांगणे, मराठी शाळेत पाठवण्याचा आग्रह करणे, त्यांना सोबत घेऊन शाळेत उपक्रम राबवणे अशा पद्धतीने त्यांना आपल्या शाळेशी जोडण्याचा प्रयत्न मराठी शाळांनी करायला हवा. परिसरातील व्यासपीठांवरून (उदा. अत्रे कट्टा, व्याख्यानमाला, साहित्यिक गप्पा) हा विषय चर्चिला जाण्याचा आग्रह मराठी शाळाचालकांनी धरायला हवा. `मराठी शाळेतही सर्वांगीण विकास होऊ शकतो; इंग्रजी भाषा चांगली होऊ शकते.’ हे आश्वस्त शब्दांत शाळाचालकांनी समाजाला पटवून द्यायला हवे. शाळाचालकांनी काही किमान लक्ष्य ठेवून समाजाच्या प्रतिष्ठित स्तरातील मुलांना आपल्या शाळेकडे खेचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे प्रयत्न यशस्वी झाल्यास ते समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. यासाठी थोड्या प्रमाणात का होईना, जाहिरात तंत्र वापरायला हवे. परिसरातील मान्यवर डॉक्टर, इंजिनिअर, अभिनेते, लेखक, चित्रकार, शिक्षक, वास्तुविशारद, सी.ए., व्यवस्थापक, इ. आपल्या शाळेला पालक म्हणून जोडले जावेत, अशा `रीसोर्सफुल’ पालकांचा उपयोग शाळेला व्हावा यासाठी शाळाचालकांनी प्रयत्नरत असावे. कुणाचा उपयोग निधीसंकलनासाठी होऊ शकतो, तर कुणी डॉक्टर 9 वी, 10 वीच्या मुलांना शरीरशास्त्राची ओळख करून द्यायला कधी शाळेत येऊ शकतो, कुणी चित्रकार शाळेत कला-शिबिरे घेऊ शकतो… यामुळे पालकांकडे असलेल्या रिसोर्सेसचा फायदा शाळांना होईलच. शिवाय प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस नसलेल्या संभ्रमित पालकांना, पॅरेंट-लिस्टमध्ये अशी नावे बघून धीर मिळेल. आपल्या मुलांना त्याच मराठी शाळेत घालण्यास प्रोत्साहन मिळेल.

शिक्षकवर्गात अशुद्ध बोलणाऱयांचा भरणा अधिक : शाळाचालकांनी शिक्षकाची भाषा, ज्ञान, वर्तनशैली जोखून मगच त्यांना घेण्याचा संकेतही कसोशीने पाळावा. आवश्यकता भासल्यास शाळेने त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. एकंदरीतच शिक्षकांच्या मूल्यमापनाची काहीतरी पद्धत प्रत्येक शाळेने निश्चित करावी. शिक्षकांचा दर्जा चांगला असण्याबाबत आग्रही राहावे. आजकाल कोणीही व्यावसायिक आपल्या `क्लाएंट लिस्ट`कडे व सेवेकडे काटेकोर लक्ष देतो. मराठी शाळांनीही तीच नीती अनुसरावी. पॅरेंट-लिस्ट गुणात्मकदृष्ट्या चांगली असेल, याकडे कटाक्षाने पाहावे आणि मुलांना शिक्षणसेवा उत्तम मिळेल यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे.

खासगी विनाअनुदानित पॉश मराठी शाळा : शिक्षणाच्या नव्या वाटा, नव्या कल्पक पद्धती अनुसरणाऱया ज्या मोजक्या शाळा आहेत, त्यांनीही प्रसिद्धीपासून दूर का राहावे? प्रसिद्धीचा हव्यास जसा वाईट, तशी प्रसिद्धीची अॅलर्जी असणेही वाईटच. अशा शाळांना सुयोग्य प्रसिद्धी (सनदशीर मार्गाने) मिळाली, तरच अशा प्रयोगांबद्दल इतरांना कळेल. काहींना ते अनुकरणीय वाटेल आणि ती पद्धत रुजेल. अशा विधायक प्रसिद्धीसाठी शाळांनी वृत्तपत्रे, नियतकालिके, परिसरातील प्रसिद्धीमाध्यमे (उदा. केबल, लीफलेट) यांच्या संपर्कात राहावे. अशा प्रयोगशील शाळांनी तर आग्रहाने रिसोर्सफुल पालक स्वत:कडे येतील, यासाठी प्रयत्न करावा. सुजाण पालकांना अग्रकम देऊन त्यांच्या पाल्यांना अवश्य शाळाप्रवेश द्यावा.

शैक्षणिक संस्था चालविणाऱयांनी अॅडमिशनसंदर्भातील निर्णयही सारासार विवेकबुद्धीने घ्यायला हवे. काही निश्चित ध्येयाने, उद्दिष्टाने चालवल्या जाणाऱया शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना पालकांची बौद्धिक पातळी, जाण, पाल्याच्या शिक्षणातील त्याचा सहभाग याकडे प्राधान्याने बघायला हवे. `सब घोडे बारा टक्के’ ही नीती सर्वत्र लागू होत नाही. उत्तम मराठी शाळा चालवू इच्छिणाऱ्यांनी, त्यांच्या प्रयत्नांना दाद देणाऱ्या, साह्यभूत ठरणाऱ्या पालकांना आवर्जून आमंत्रित करून शाळेशी जोडले, तर ते शाळेसाठी व मुलांसाठीही अधिक फायद्याचे ठरेल. दुर्दैवाने शिक्षणाची संधी न मिळाल्यामुळे सुशिक्षित नसलेल्या पण सुजाण, कल्पक शिक्षणाबद्दल आग्रही असलेल्या पालकांच्या पाल्यांनाही प्राधान्याने सामील करून घ्यावे. अशा शाळा याआधी म्हटल्याप्रमाणे आदर्श `मिक्स`चे उदाहरण ठरू शकतील. आणि आपोआपच दुष्टचक भेदले जाईल.

उपक्रमशील व प्रागतिक विचारांच्या मराठी शाळांनी समाजाच्या `किमी लेअर`पर्यंत स्वत: पोहोचून शाळेसाठी निधी, दर्जेदार मनुष्यबळ उभारावे आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पथदर्शक उपक्रम आखावे. साहजिकच परिसरातील इतर मराठी शाळांनाही त्यांचे अनुकरण करावेसे वाटेल आणि हळूहळू सर्वच मराठी शाळा दर्जेदार व कल्पक शिक्षण देणाऱ्या संस्था ठरतील आणि मग `मराठी शाळांचे स्टँडर्ड घसरले आहे’ या विधानाला सणसणीत उत्तर मिळेल.

यासाठी खासगी विनाअनुदानित मराठी शाळा अधिकाधिक प्रमाणात निर्माण व्हायला हव्यात. तसेच सध्याच्या अनुदानित शाळांनाही सरकारने फी वाढवण्याची मुभा द्यायला हवी. मराठी शाळा `सरकार जेवू घालीना आणि स्वत: कमवून खायची परवानगी देईना’ अशा कात्रीत अडकल्या आहेत आणि तिथेच त्यांच्या घसरणीचे मूळ आहे. सध्याच्या अल्प निधीत त्यांच्या शैक्षणिक गरजा भागणार कशा? स्वच्छ, नेटक्या इमारती, अद्ययावत प्रयोगशाळा, भरपूर शिक्षण साहित्य, चांगले वाचनालय, कला-क्रिडा उपकमांसाठी सोयीसुविधा, बौद्धिक- सांस्कृतिक उपक्रमांसाठी पुरेशी साधने… अशा अद्ययावत मराठी शाळा प्रत्येक परिसरात का नसाव्यात? मराठी शाळांनी समृद्ध का नसावे? ज्या मराठी सुसंस्कृत घरातील मुलांना घरी समृद्ध वातावरण मिळते, त्यांना ते तसे शाळेत मिळत नसेल, तर का त्यांच्या पालकांना दरिद्री शाळांकडे वळावेसे वाटेल? शैक्षणिक सुविधा, व्यक्तीविकसनासाठी पुरेसा वाव आणि प्रगल्भ सामाजिक- सांस्कृतिक- बौद्धिक वातावरण हे सारे मराठी शाळांत असायचे, प्रत्येक तुकडीत विद्यार्थीसंख्या मर्यादित असायची तर मराठी शाळांकडे पैसा हवा. पैशाचे सोंग आणता येत नाही. पाच-दहा रुपये फी (तीही मुलींना माफ) घेऊन आदर्श शाळा चालवणे शक्य नाही. आज महाराष्ट्रातील शहरी भागांत झोपडवस्तीतही घरोघरी केबल टीव्ही आहेत. ज्याचा खर्च महिन्याकाठी 200-250 रुपये आहे. आज हा वर्ग सण-समारंभही खर्चिक पद्धतीने साजरा करतो. कपडे-लत्ते, बूट यावरही वाजवीपेक्षा जास्तच खर्च करताना दिसतो आहे. तरी अशा `गरिबांच्या’ खिशाचा विचार करून मराठी शाळांना अत्यल्प फी आकारणे सक्तीचे करणे योग्य आहे का? एका बुटाच्या जोडाला होतो, तितका खर्चही शाळेला महिनाभराची फी म्हणून द्यायला नको का? अत्यल्प फीच्या धोरणातून आता मराठी शाळांची सुटका झालीच पाहिजे. `ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर होतो, तितका खर्च मुलांकडून वसूल करण्याची पद्धत सुरू झाली पाहिजे. ज्यांना तितकीही फी परवडत नाही, त्यांना महापालिका शाळांचा पर्याय स्वीकारता येईल. पालिका, जिल्हा परिषद यांच्या शाळांत आहेच की मोफत शिक्षण. शहरी भागातील मराठी शाळांना खर्चाच्या तुलनेत फी आकारण्याचे स्वातंत्र्य दिले तरी आजचे चित्र खूपसे बदलू शकेल. त्यातही मुलींना फी माफी देण्याचे धोरण आता शहरी भागांत तरी बंद केले पाहिजे.

राज्यातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत देणे ही आदर्श स्थिती झाली. हे कल्याणकारी शासनाचे लक्षण झाले. पण नाही शासनाच्या तिजोरीत तेवढे धन, तर कशाला आव आणायचा शाळा चालवण्याचा? त्यापेक्षा काही पालिकेच्या शाळा प्रशासनाने नीट चालवून दाखवाव्या- गरीब जनतेला त्यांचा आसरा घ्यावासा वाटेल इतपत तरी. आणि इतर अनुदानित मराठी शाळांना स्वयंपूर्ण होण्यास सांगावे.

हा निर्णय धाडसी वाटेल. सुरुवातीला राबवणे कठीण जाईल, पण हळूहळू सर्वजण या व्यवस्थेला सरावतील. अल्प फी- अल्प निधी- अपुऱ्या सुविधा- घसरता दर्जा- सुशिक्षित घरातील मुले मराठी शाळांत न येणे- हे दुष्टचक्र भेदायचे तर असे धाडसी पाऊल शासनाने लवकर उचलायलाच हवे. मात्र या नव्या व्यवस्थेला समांतर अशी पालिका/जि.प. शाळांची (मोफत शिक्षण देणाऱ्या) व्यवस्थाही सुस्थितीत ठेवायला हवी. सध्या मुंबईत बहुतेक सर्व उपनगरांत महापालिकेच्या शाळा आहेत. ज्यांना पालिकेतर शाळांतील फी परवडत नाही, ते ड्रॉप आऊट न होता पालिका शाळेत वळतील, याची काळजी सरकारने घ्यावी.

सध्या मोठ्या शहरांतील पालिका शाळा ओस पडताहेत, मराठी अनुदानित शाळेला महापालिकेच्या शाळांचे रूप आले आहे आणि इंग्रजी खाजगी पॉश शाळांनी मात्र मराठी शाळेला पेलता येणार नाही, असे मोठे आव्हान उभे केले आहे.

या स्थितीस शासन, शाळाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक सारेच जबाबदार आहेत. प्रत्येकाने सखोल आत्मपरीक्षण करून ठोस पावले उचलली पाहिजेत. समाजातील विचारक्षम गटांनीही याबाबतीत दबावगट तयार करून मराठी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आपोआपच इंग्रजी शाळांकडे मराठी पालकांचा ओढा कमी होईल. `मराठीतून दर्जेदार शिक्षण व त्याला इंग्रजीची यथार्थ जोड’ हा सुवर्णमध्य किती फायदेशीर ठरू शकतो, हे सिद्ध करायचे तर संबंधित प्रत्येक घटकाने कठोर आत्मपरीक्षण करून आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकले पाहिजे.

********

लेखिका- शुभदा चौकर;  वर्ष – २००३

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 18 Comments

 1. मी हा लेख लिहून आता १५ वर्षे झाली. आजही हा लेख समयोचित आणि उपयुक्त वाटतो, त्यावर चर्चा होते, याचा लेखक म्हणून आनंद आहे. मात्र एक सुजाण नागरिक म्हणून १५ वर्षांत या स्थितीत सुधारणा होऊ नये, याचा विषाद वाटतो. शासन, प्रशासन, पालक सर्वानी तीव्र इच्छाशक्ती दाखवली तर मातृभाषेतून शिक्षणाचा ट्रेंड रुजेल का? त्याचे फायदे मुलांना मिळतील का?
  मी माझ्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत, बालवाडीत घातले आणि मगच हा लेख लिहिला. आता ती १८ वर्षांची आहे. UDCT मध्ये Chemical technology चे पहिले वर्ष उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. ती मराठी, इंग्रजी दोन्ही पुस्तके वाचते, इंग्रजी सिनेमे आवडीने बघते. इंग्रजीत किंवा एकंदर विकासात कमी पडलेली नाही. हे एवढ्यासाठी सांगितले, कारण मराठी माध्यमाची हट्टाग्रही पालक असले तरी आई म्हणून काही क्षणी हुरहूर वाटायची की, माझा निर्णय तिला त्रासदायक तर ठरणार नाही? पण प्रत्येक टप्प्यावर पटत जातेय, की तो निर्णय बरोबर होता, सुखाचा होता- तिच्यासाठीही!
  आपण जरूर चर्चा करूया, मार्ग शोधूया. आणि मुलांना आनंदाने, विना-त्रास शिकू देऊ या…
  शुभदा चौकर

 2. लेख वाचला ह्या विषयावर आम्ही घरात या पूर्वी चर्चा केली होती पण घरातील स्त्री हे मानायला तयार नाही माझी मोठी मुलगी इयत्ता 3 ला आहे आणि छोटी आता पुढील वर्षी प्लेस्कुलला जाईल छोटीला मराठी शाळेत घालू असा प्रस्ताव मांडल्यावर घरातले 6 विरुद्ध मी एकटा अशी वेळ माझ्यावर आली.

  मी स्वतः मराठी मिडीयम मधून शिकलोय व्यवसाय करतोय परदेश दौरे करून आलोय पण इंग्रजी भाषेमुळे माझ्या आयुष्यात फार काही फरक पडला नाही निदान मला मराठी उत्कृष्टपणे बोलता येते लिहिता येते ह्याचा मला अभिमान आहे.

  घरातील लोकांचा असा समज आहे की मी मराठी शाळेसाठी हट्ट करतोय म्हणजे मला पैशाचा प्रॉब्लेम आहे कारण मला त्याविषयी घरच्यांनी आम्ही मदत करतो असेही सांगितले

  हा विषय हाताळताना प्रचंड तारांबळ होते शेवटी एकमत ना होऊन हा विषय संपला आणि अर्थातच 1 विरुद्ध 6 मतांनी घरच्यांचा विजय झाला

 3. लेख उत्तम. जोपर्यंत चांगल्या मराठी शाळा उपलब्ध होतनाहीत तोपर्यंत पालक इछा असूनही आपल्या मुलांसाठी धोका कसा पत्करनार? सांगणे सोपे असते. आचरणात आणणे कठीण.

  1. सुरेश जी, तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण इथे ज्यांनी सांगितलंय त्या शुभदा चौकर यांनी त्यांची मुलगी मराठी माध्यमातच घातली. त्यांनी लेखातच लिहिलंय तसं. इतकेच काय मी आणि माझ्या बायकोने पण इंग्रजी माध्यमातील आमची मुले काढून मराठी माध्यमात घातली. आज त्याचे चांगले परिणाम आम्ही पाहत आहोत. आम्हीच फक्त नाही, सगळेच हे करू शकतात. फक्त ‘लोक काय म्हणतील?’ याकडे लक्ष न देता आपल्या बुद्धीला पटेल तेच करावे. खूप जण हा लेख वाचून ‘आता काय उपयोग? उशीर झाला.’ असे म्हणतील. पण आपण एवढे तर करू शकतो की जे आज हा निर्णय घेण्याच्या वयोगटात आहेत त्यांच्यापर्यंत हा लेख पोचवू शकतो. तेव्हढ नक्की करा.

 4. या संदर्भात “एबीपी माझा” या वाहिनीवरील “माझा कट्टा : रिअल लाईफ ‘फुनसुक वांगडू’ अर्थातच सोनम वांगचुक यांच्याशी मनमोकळ्या गप्पा” हा कार्यक्रम पाहावा.. व्हिडीओ लिंक : https://www.youtube.com/watch?v=ojSbHrSJ3bA

 5. शुभदा चौकर यांचा लेख अतिशय आवडला . त्यांनी प्रत्येक मुद्दा सविस्तर मांडला आहे. शासनाचे उदास धोरण याला कारणीभूत आहे. आज मराठीची फार बिकट अवस्था झाली आहे. शिक्षण धोरण बदलल्या शिवाय आणि मराठी शाळेचा दर्जा सुधारुन लोकांनमध्ये विश्वास निर्माण केल्याशिवाय पुन्हा मराठी शाळा माध्यमातून शिक्षण घेणे हे खरंच अवघड काम आहे. तरीही शुभदा चौकर आणि या क्षेत्रातिल मान्यवर लोकांना शासनानी बरोब्बर घेऊन मराठी आणि इंग्लिश दोन्ही कसे ठेवता येईल किंवा semi इंग्लिश कधी पासून सुरु करणे योग्य याची चर्चा केली तर आणि तरच यातून मार्ग निघू शकतो. आजच्या काळात पूर्ण मराठी माध्यमातून शिक्षण घेणे कठीण आहे .तेव्हा semi इंग्लिश हा एक चांगला पर्याय वाटतो. आजच्या घडीची सर्वात मोठी समस्या आहे व यावर अत्यंत सखोल प्रकाश टाकला आहे. लेख अप्रतिम.

 6. Sadar lekh chan aahe .Marathi shalanchya sadyastithiche varnan yathayogya ahe. Lekh motha zala ahe thoda lahan asta tar parinam ankhin changala zala asta.

 7. 1, 2, 4, 8, 9 अगदी बरोबर मुद्दे आहेत जीथे प्रत्येक मराठी भाषाभीमानी व्यक्तीला माघार घ्यावीच लागते. माझी बायको, आइ व बहीण ह्यांच्यात विशेष जमत नाही. पण इंग्रजी शाळा ह्या मुद्द्यावर त्यांची अभेद्य एकी आहे आणि समर्पक मुद्दे आहेत.. ८वी नंतर सेमी इंग्रजी हा पर्याय खरेच खूप चांगला आहे. मी स्वत: ८वी नंतर सेमी इंग्रजीचा विद्यार्थी आहे. आणि मला खरेच त्याचा इंजीनिअरींगला खूप फायदा झाला. आठवीपासून Science, Maths (if possible Geography) इंग्रजीत असायला हवे म्हणजे मुलांचे कुठे काही अडणार नाही..

 8. आमच्यात झालेेल्या एका कडाक्याच्या भांडणानंतर माझ्या पत्नीने माझ्या मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला. वर उल्लेख केलेल्या कारणांपैकी २,३,८ चा विचार करताना मी फारसे समाधानकारक स्पष्टीकरण मला देता आले नव्हते आणि मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या पत्नीच्या प्रवाहपतित होण्याचे सखे आश्चर्यही वाटले होते.
  दुर्दैवाने इंग्रजी माध्यमाचा एकूण आवाका पाहता माझ्या मुलीला इतक्या पटापट आकलन होत नाहीये, अर्थात ती तिची व्यक्तिगत मर्यादा असेलही…पण मला माझ्या पत्नीला न समजावता आल्यामुळे म्हणा वा अजून कशामुळे मुलीला अभ्यासाची गोडी अजून लागली नाहीये.
  लोकरंग पुरवणीत आलेला हा लेख मला त्यावेळी पुरेपूर पटला होता पण आज पुन्हा वाचताना एका चळवळीचा भाग बनू न शकल्याबद्दल माझे मन खेद व विषादाने भरून गेले.

 9. अतिशय मुद्देसूद, परिपूर्ण लेख. एकूणएक मुद्द्यांशी सहमत. मुख्य म्हणजे नुसतेच प्रश्न उपस्थित न करता उपायही सुचवले आहेत. खूप आवडला.

 10. लेख खूप छान आणि उद्बोधक आहे. आजच्या काळात मुलांची शैक्षणिक प्रगती साठी लेखिकेच्या विचारांशी मी सहमत आहे.