आजच्या अवांतर सदरात आपण लिखित कथेबरोबर तीच कथा श्राव्य स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक प्रयोग आहे. तो कसा वाटतोय ? आणि त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत का ? या सर्वांवर आपले अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.

वाचकांच्या हृदयाला जाऊन भिडणारी ही उत्कृष्ट कथा महात्मा गांधींनी लिहिली आहे हे पुष्कळांना खरे सुद्धा वाटणार नाही. पण त्यांनी ‘हरिजन’मध्ये ही गोष्ट प्रकाशित केली होती. गांधीजींनी लिहिलेली ही एकमेव लघुकथा आहे व ती वाचली असता गांधीजी किती उत्तम कथाकार होते याची साक्ष पटते.

********

मी आहे शेतकऱ्याचा बच्चा, पण कधी नांगराला हात लावला नाही की कधी शेतकाम केले नाही. रात्रंदिवस मी आणि माझी पुस्तके! याशिवाय मला दुसरे जग ठाऊक नव्हते. माझे वडील संस्कृत भाषेचे मोठे पंडित होते, त्याप्रमाणे ते नामांकित शेतकरीही होते. आमच्या घराजवळच ‘इब्राहिम’ नावाच्या एका सज्जन मुसलमानाचे घर होते. तो शेतीबरोबर कोष्टीकामही करी. माझ्या वडिलांचे शेत इब्राहिमच्या शेताला लागून असल्यामुळे आमचा दिवसाचा बहुतेक वेळ एकत्र जात असे.

आम्ही त्यावेळी लहान मुले होतो. आम्ही सर्वजण त्या सज्जन मुसलमानाला ‘काका’ म्हणत असू. त्याचे कारण स्वाभाविकच होते. इब्राहिम आमच्या वडिलांशी भावाप्रमाणे वागे, शिवाय तो फार प्रेमळ असल्यामुळे आमच्यावर त्याचा अतोनात लोभ होता. आपल्या स्वत:च्या मुलांपेक्षा तो आमच्यावर जास्त प्रेम करीत असे, असे म्हटले तरी चालेल. तो पक्का मुसलमान होता, पण त्याला आपल्या धर्माचा कडवा अभिमान नव्हता. आमच्या धर्माकडे तो सहिष्णु वृत्तीने पाहात असे.

जेव्हा पीक तयार होण्याची वेळ येई, तेव्हा माझे वडील व इब्राहिम हे दोघे आळीपाळीने एकमेकांच्या शेतांची राखण करीत, त्यामुळे दोघांचाही बराच वेळ वाचत असे. आम्ही सर्व मुले जेव्हा सकाळच्या प्रहरी आमच्या शेतात जात असू त्यावेळी इब्राहिम आपल्या शेतातली चांगली चांगली खरबुजे व कलिंगडे आम्हाला आणून देत असे. आम्ही शेतात पोचल्यावर पहिल्या प्रथम मोठ्याने हाक देत असू. ‘‘इब्राहिमकाका, झोप झाली का?’’ आमची आरोळी ऐकताच इब्राहिमकाका लगबगीने बाहेर येत व आमची पिशवी फळांनी भरून देत. त्यांची फळे आमच्या हातात पडताक्षणीच आमचे वडील आपल्या शेतातली उत्तम उत्तम कलिंगडे निवडून त्यांच्या घरी पाठवून देत. आम्ही कधी इब्राहिमकाकांच्या हातचे खात नसू किंवा तेही चुकून आम्हाला कधी खायला देत नसत. पण ते मुसलमान आहेत व आम्ही हिंदू आहो अशी शंकाही आमच्या कधी मनात येत नसे.

आम्ही चौघे भाऊ. त्यांत इब्राहिमकाकांची माझ्यावर सर्वात जास्त मर्जी होती. शिवाय मी सगळ्यात लहान. त्यामुळे त्यांच्या शेतात तयार होणाऱ्या प्रत्येक वस्तूवर जणू माझा पहिला हक्क असे. आंब्याच्या मोसम सुरू झाला की, पहिले पिकलेले आंबे एका फडक्यात बांधून इब्राहिमकाका गुपचूप माझ्या खिशात टाकीत. पिकलेल्या आंब्यांचा तो मधुर सुवास दरवळल्याबरोबर मी आनंदाने हुरळून जात असे व एकदम आनंदाने म्हणे, ‘‘इब्राहिमकाका, तुम्ही किती चांगले आहा!’’

त्यांना गूळ विशेष आवडत असे व त्यांच्याशी गप्पागोष्टी करणे हे गुळाइतकेच गोड असे. म्हणून कधी कधी आम्ही मुले त्यांना थट्टेने ‘‘गोडेकाका’’ म्हणालो की, आम्हाला पकडण्यासाठी ते धावत येत, पण आम्ही केव्हाच त्यांच्या हातावर तुरी देऊन दूर पळून जात असू.

इब्राहिमकाका पुष्कळदा आपली जेवणाची थाळी घेऊन आमच्या अंगणात येऊन बसत व आम्हाला म्हणत, ‘‘अरे, घरात जाऊन पहा बरं, तुमच्या आईने आज कसली भाजी केली आहे?’’ मी लागलीच घरात पळत जाऊन आईकडून थोडीशी भाजी व लोणचे त्यांना आणून देई व ते मिटक्या मारीत मोठ्या मजेने खात. मी घरात जाऊन पुन्हा आणखी थोडीशी भाजी त्यांच्या थाळीत टाकीत असे.

जेव्हा मी या प्रकारे माझ्या बाल्यावस्थेत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत असे त्यावेळी अनेकदा त्यांना गहिवरून येई. कधी कधी त्यांच्या डोळ्यांतून अश्रूही येत. पण इब्राहिमकाका मला कधीही जवळ घेत नसत, किंवा त्यांनी कधीही आपुलकीने माझी पाठ थोपटली नाही. मी हिंदू आहे असा विचार चुकूनसुद्धा माझ्या मनात येत नसे, पण आपण मुसलमान आहो याचा त्यांनी स्वत:ला कधीही विसर पाडू दिला नाही. आपण आपले प्रेम एका ब्राह्मण पंडिताच्या मुलावर जाहीरपणे कसे प्रगट करावे या विचाराने त्यांनी मला शक्य तो स्पर्शही केला नाही!

अशा प्रकारे अनेक वर्षे गेली व आमच्या दोन कुटुंबांचा घरोबा उत्तरोत्तर वाढत गेला. मध्यंतरी माझे वडील वारले. त्यामुळे इब्राहिमकाका खऱ्या अर्थाने आमचे काका बनले. त्यांची प्रेमळ नजर आमच्याकडे अधिकच आपुलकीने पाहू लागली. आमच्या थोरल्या भावाला जर काही सल्लामसलतीची जरुरी लागली तर तो हक्काने त्यांच्याकडे जात असे व तेही त्याला मोठ्या खुशीने योग्य तो सल्ला देत.

पुढे एक चमत्कारिक दिवस उगवला. त्या दिवशी आमची गुरेढोरे एका कबरस्तानात शिरली व तेथील कोवळे कोवळे गवत व फुलझाडे यांचा फन्ना करू लागली. या गोष्टीमुळे एक मोठाच तंटा उपस्थित झाला. खरी गोष्ट अशी होती की, गुराख्यांचा डोळा चुकवून ही जनावरे कबरस्तानात घुसली होती, पण मुसलमानांचा असा समज झाला की गुराख्यांनी ही गुरे मुद्दामच आत घुसवली. ते धावत आले व त्यांनी त्या गुराख्यांना मारहाण केली आणि गुरांना कोंडवाड्यात घातले. इकडे ते चिडलेले गुराखी आपापल्या गुरांच्या मालकांकडे गेले व हातात लाठ्या-काठ्या घेऊन कबरस्तानाजवळ येऊन पोहोचले. थोड्याच वेळात ही मारामारीची बातमी आगीप्रमाणे गावभर फैलावली व दूरदूरचे मुसलमान हातात काठ्या घेऊन लढण्याच्या ईर्ष्येने एकत्र जमा झाले. प्रारंभी काही वेळपर्यंत दोघांची परस्परांशी बाचाबाची झाली. दोघांनीही एकमेकंना शिवीगाळ केली. परस्परांची समजूत घालण्याचा, तडजोड करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. कारण गुराख्यांची ही पहिलीच आगळीक नव्हती. त्यांनी यापूर्वी तीन-चार वेळा आपली जनावरे कबरस्तानात घातली होती. दोन्ही पक्षांमध्ये एवढा प्रक्षोभ उसळला होता की, कोणी कोणाचे ऐकायला तयार नव्हते. दोन्ही पक्ष जणू लढाई करण्यासाठी एकमेकांसमोर सज्ज होऊन राहिले होते!

इब्राहिमकाका आपली मुले व नातू यांच्यासह त्या ठिकाणी हजर होते. त्यांनी भांडणे मिटविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण झगड्याला तयार झालेले लोक त्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आमच्या घरचीही गुरे कोंडवाड्यात घातली असल्यामुळे माझे सगळे भाऊ त्या ठिकाणी आले होते. खेड्यातली सर्व पुरुषमंडळी तेथे झाडून जमा झाली होती आणि घरोघरी असलेल्या बायका आपल्या नातेवाईकांच्या सुरक्षितपणाची चिंता करीत बसल्या होत्या. इतक्यात मी शाळेतून घरी आलो व पहातो तो घराचे सर्व दरवाजे बंद आहेत व मारामारी होण्याची सर्व तयारी झाली आहे. मी आपली पुस्तक कोपऱ्यात फेकून दिली. ज्या ठिकाणी दोन्ही पक्ष समोरासमोर युद्धाच्या तयारीने उभे होते त्या ठिकाणी धावत-पळत गेलो. माझ्या आईने मला परत बोलाविले, जाऊ नको म्हणून माझी मनधरणी केली, पण मी तिचे न ऐकताच एकदम धूम ठोकली. माझ्या नसानसांतून रक्त सळसळत होते, पण लढाईचे ते दृश्य पाहून मी अगदी बेचैन होऊन गेलो. माझे भाऊ ज्या जागी उभे होते तेथे मी जाऊन पोचलो.

इतक्यात माझी नजर समोर गेली. मी पाहिले की, इब्राहिमकाका विरुद्ध बाजूला उभे आहेत. मी ताबडतोब त्यांच्याकडे पळत गेलो व घाबरेपणाने त्यांना विचारले, ‘‘इब्राहिमकाका, तुम्ही कोणच्या बाजूला, आमच्या की त्यांच्या?’’

इब्राहिमकाकांनी माझे हे शब्द ऐकले मात्र, त्यांनी तत्क्षणीच आपल्या एका मुलाच्या हातातली लाठी घेतली व माझ्याबरोबर चालता चालता मोठ्याने म्हणाले, ‘‘या पोराला बाप नाही. म्हणून मला त्याची बाजू घेतली पाहिजे. तुम्ही दुसऱ्या बाजूने लढा.’’

इब्राहिमकाकांचे हे शब्द ऐकताच सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकदम तेथे नि:स्तब्ध शांतता पसरली. जो तो आपापल्या ठिकाणी शरमेने चूर होऊन राहिला! एकमेकांशी न बोलता एकेकजण हलके हलके तिथून निघून गेले व युद्धभूमी निर्मनुष्य झाली!

मला त्यावेळी या घटनेचा अर्थ समजला नाही, पण आज पूर्णपणे समजत आहे. माझे प्रेमळ इब्राहिमकाका आज पैगंबरवासी झाले असले तरीही मी त्यांना कधीही विसरणार नाही. कबरस्तानात त्यांची कबर कोठे आहे हे मला माहीत आहे व जेव्हा जेव्हा मी त्यांची कबर पहातो तेव्हा माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. एकदम मला माझ्या बालपणची आठवण होते व तोंडातून शब्द बाहेर येतात, ‘‘इब्राहिमकाका, झोप झाली का?’’

इब्राहिमकाका झोपी गेले आहेत असे मला कधीच वाटत नाही. ते आजही जागेच आहेत!

********

लेखक – महात्मा गांधी; अंक- चित्रमयजगत्; वर्ष-नोव्हेंबर १९५७

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 12 Comments

 1. कथा खूप चांगली आहे. खूप आवडली

 2. अक्षय कथा आहे. हि कथा वाचून विचार पूर्वक वर्तन प्रत्येकाने वर्तन केले तर जग तंटा व युद्ध मुक्त होईल .सुख ओसंडून वाहील .अच्छे दिन येतील .

 3. ही कथा खोटी आहे. गांधीजीचे वडील वारले तेंवा त्यंचे लग्न झालेले होते. त्यानी स्वतः आत्मचरित्रात लिहिले आहे कि
  ‘ मी वडिलांची सेवा करून बेडरूम मध्ये गेलो. पत्नीचे सुख उपभोगले त्यानंतर दारावर थाप पडली पण मी बाहेर ये इ पर्यंत वडील गेले होते. मी कामवासना आवरू शकलो नाही त्यामुळे वडिलाच्या शेवटच्या क्षणी मी नव्हतो. विनंती की खोट्या कथा छापू नका तो गांधीजींचा अपमान आहे.

  1. ही गांधीजींनी लिहिलेली कथा आहे, आत्मकथा नाही.

 4. हृदयस्पर्शी! गांधीजींच्या या कथेने मनाचा ठाव घेतला. निवड एकदम छान!

 5. कथा खूप चांगली आहे. महात्मा गांधी चा पैलू कळला म्हणून पुनश्चचे आभार .

 6. कथा तर आवडलीच पण वाचनही चांगले झाले आहे. कथनकर्त्याचे नाव कळले नाही.

 7. कथा चांगली आहेच आणि वाचनसुद्धा खिळवून ठेवणारे आहे. कुणी केलेय त्यांचे नाव कळले नाही.

 8. Not able to listen. Very good selection of story

 9. माझे सत्याचे प्रयोग वगळता म. गांधीजींनी लघुकथा लेखन केल्याचे ऐकिवात नव्हते ते पुनश्च मुळे कळले. कथा खूप आवडली. धन्यवाद टीम पुनश्च!

 10. वा, खूपच दुर्मिळ आणि हृदयस्पर्शी अशी गोष्ट तीही परमपूज्य बापूजी यांनी लिहिलेली. पुनश्च चे मनःपूर्वक धन्यवाद. असा अनमोल ‘शब्द ठेवा ‘आम्हाला दिल्याबद्दल.