काही वेळा दोन घटना एका पाठोपाठ घडतात. त्यात काही कार्यकारणभाव असतोच असं नाही. त्याची संगती लावताना मात्र आपण त्याला योगायोग म्हणतो.

बरोबर एक महिन्यापूर्वी, ४ मे २०१८ रोजी जेष्ठ नाट्य दिग्दर्शक आणि कलाकार श्री. दिलीप कोल्हटकर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. आणि त्याच्या पुढच्याच आठवड्यात, आणीबाणी विशेषांकासाठी लेखांच्या शोधात असताना नेमकं आम्हाला दिलीप कोल्हटकरांचीच एक जुनी मुलाखत सापडली. योगायोग अशासाठी की त्याअगोदर अंक चाळताना तो लेख कधी दिसला नव्हता.

नोव्हेंबर १९७५ च्या ‘माणूस’ मासिकातली ही मुलाखत कोल्हटकरांच्या डोळस जाणीवांवर आणि विचार स्पष्टतेवर प्रकाश टाकते. प्रायोगिक रंगभूमी म्हणजे काय? वास्तववादी नाटक असतं का ? कला की व्यवसाय ? सेन्सॉरबोर्ड असावे की नाही ? इत्यादी प्रश्नांचा कोल्हटकरांनी केलेला उहापोह अतिशय वाचनीय आहे. मुख्य म्हणजे १९७५ साली चर्चिले जाणारे विषय तब्बल ४३ वर्षांनी २०१८ सालीही जेव्हा तसेच प्रकट होतात तेव्हा त्या विषयांची कालसुसंगतता जाणवते.

आणि म्हणूनच आज दिलीप कोल्हटकरांच्या प्रथम मासिक स्मरणदिनी, सुभाष सोनवणे यांनी घेतलेली ती मुलाखत, अवांतर सदरात प्रसिद्ध करत आहोत.

********

आजच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक मराठी रंगभूमीवर दिलीप कोल्हटकर ह्या नावाला निर्विवादपणे महत्त्वाचे स्थान आहे. व्यावसायिक रंगभूमीबाबत सांगता येत नाही; परंतु हौशी रंगभूमीला मात्र त्याच्यासारख्या सतत धडपड्या कलाकाराची नितांत गरज आहे. किंबहुना मला असे वाटते की हौशी रंगभूमीवरच अशा कलाकारांमधली नवनिर्मितीची प्रेरणा सदैव जागृत राहू शकते. एकदा व्यावसायिक रंगमंचावर गेला की, त्या कलाकाराला-कोणाहीविषयी अनादर न दाखवता स्पष्टच बोलायचं तर पाण्याच्या बैलाचे किंवा पाट्या टाकणाऱ्या मजुराचे स्वरूप येते!

ह्याच भूमिकेतून मी दिलीपला विचारलं- ‘तू व्यावसायिक नाटकांतून भूमिका करतोस त्या कशासाठी’
‘पैशांसाठी! मला माझ्या बँकेतल्या नोकरीच्या पगाराव्यतिरिक्त आणखी जास्त पैसा माझ्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक वाटतो आणि हा जादा पैसा कमावण्याचा चांगला मार्ग नाटकांच्या रूपाने मला मिळाल’ दिलीप.
‘केवळ पैशांसाठीच? कलाकाराला केवळ पैसाच हवा असतो?’ माझा प्रश्न.
‘पैशाबरोबरच आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी हीसुद्धा अर्थातच प्रत्येक कलाकाराची अपेक्षा असतेच. आपले काम, आपले नाटक लोकांना आवडावे हीसुद्धा प्रत्येकाची इच्छा असते.’
‘लोकांना आवडेल तेच त्यांच्यासमोर सादर करताना मग तुझ्यासारख्या स्वतःची प्रतिभा, स्वतःची कल्पनाशक्ती असलेल्या कलाकाराला मुस्कटदाबी होत असल्यासारखं वाटत असेल?’
‘काही प्रमाणात वाटतं, पूर्णतः नाही. मी माझ्या व्यावसायिक नाटकांतून ‘आपलेपण’ राखण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. अर्थात हे ‘आपलेपण’ अव्यावसायिक किंवा प्रायोगिक रंगभूमीवर जास्त प्रमाणात, अधिक सार्थपणे, अधिक स्वैरपणे दाखवता येते’ – इति दिलीप.
‘प्रायोगिक-प्रायोगिक नाटक म्हणजे तुझ्या मते नेमकं काय?’

नेमक्या शब्दांची जुळवाजुळव मनातल्या मनात काही वेळ करून दिलीप उत्तरला – ‘वस्तुतः स्टेजवर प्रयोगरूपात सादर होणारं प्रत्येक नाटक हे प्रायोगिकच नाटक असतं. तथापि ‘प्रायोगिक’ ह्या नावाखाली जी परंपरा सुरू झालेली आहे, त्या प्रायोगिक नाटकांची व्याख्याही करता येईल. सगळ्या चौकटींचा जाणीवपूर्वक विचार करून आणि त्या चौकटी मोडण्याचा धोका पत्करूनही आपल्याला जे अभिव्यक्त करायचंय, ते आपल्या पद्धतीने निर्भीडपणे मांडणारे नाटक म्हणजे प्रायोगिक नाटक!’

‘पण त्या चौकटी ठरवणार कोण? बाळ कोल्हटकरांना जी चौकट किंवा जी चाकोरी वाटेल ती खानोलकरांना वाटेलच कशावरून? त्यामुळे अमुक एक जण चाकोरीच्या किंवा मर्यादेच्या बाहेर गेलाय असं कशावरून म्हणायचं?’ मी विचारतो.
‘बरोबर बोललास. चौकट ही एक सापेक्षा कल्पना आहे. निर्भीड अभिव्यक्तीसाठी एखाद्या नाटककाराला आपल्या नाटकातल्या एखाद्या पात्राने दर अंकात नवी बाई बदलणे आवश्यक वाटत असेल तर दुसऱ्या नाटककाराला कदाचित आपल्या स्त्रीपात्राने लग्नाच्या नवऱ्याला केवळ साधा स्पर्श करणे हीच अभिव्यक्तीची परिसीमा वाटत असेल.’ – दिलीप.

‘अरे बाबा, पण कल्पना व विचार ह्यांच्या ह्या सापेक्षतेमुळे तेंडुलकरांचा निर्भीडपणा काही मंडळींना मुळीच मंजूर होत नाही आणि मग तथाकथित संस्कृतिसंरक्षक ओरडा करतात की अमका नाटककार सामाजिक नीतिमत्ता रसातळाला नेतोय, त्याचा धिक्कार करा! ह्या तथाकथित संस्कृतिरंक्षकांच्या मते नाटक ही समाजावर इष्ट-अनिष्ट वगैरे परिणाम घडवून आणू शकतात. ह्या बाबतीत तुझं मत काय?’ मी.
‘तसा काही परिणाम होत नसावा असा माझा अंदाज आहे. माझ्या मते, खऱ्या अर्थाने मॅच्युअर-पक्व-प्रेक्षकांवर नाटकाचा परिणाम होऊ शकत नाही.’ दिलीप.
‘मॅच्युअर किंवा पक्व प्रेक्षक म्हणजे काय?’ – मी.
‘जेवढा वेळ लोक नाटक बघत असतात, तेवढा वेळ नाटकाच्या ‘नाटकपणा’चे भान ठेवणारे प्रेक्षक म्हणजे ‘मॅच्युअर’ प्रेक्षक. असे प्रेक्षक नाटकांमुळे होणाऱ्या कोणत्याही परिणमांच्या अतीत असतात.’ – दिलीप.
‘म्हणजे नाटक पाहताना प्रेक्षकांनी जसं नाटकाकडे नाटक म्हणून पहायला हवं, त्याचप्रमाणे नाटकवाल्यांनीसुद्धा नाटकाचं नाटकपण अबाधित ठेवायला हवं-नाही का? मग सध्याची जी तथाकथित वास्तववादी नाटकं असतात, त्यांचं काय?’ माझी शंका.

‘बापरे, नाटक हे ‘नाटक’ असतं, मग ते ‘वास्तव’ कसं असणार? ‘वास्तववादी नाटक’ हे सुद्धा कुठे तरी ‘नाटक’ असतंच! नाटकामध्ये वास्तवाचा जास्तीत जास्त आभास असू शकते; पण पूर्ण वास्तव नाही. आता इथे पुन्हा वास्तव किंवा अवास्तव यासुद्धा सापेक्षच कल्पना आहेत.’ दिलीप.

‘पण ह्या सापेक्षतेच्या लफड्यात, नाटकाचं मूळ स्थान काय आहे?’
‘थिएटरची माझी कन्सेप्ट अशी की थिएटर स्टार्टस् विथ् टू पर्सनस – एक म्हणजे नाटक करणारा आणि दुसरा नाटक पहाणारा, म्हणजेच प्रेक्षक. ही नाटकाबाबतची मूलभूत बाब दुर्लक्षून, नाकारून चालणारच नाही!’ – दिलीप.
‘ह्याचा अर्थ नाटक करणारा आणि नाटक पहाणारा ह्यांच्यामध्ये एक संवाद, किंबहुना सुसंवाद असणे अगत्याचे ठरते’
‘नक्कीच’ – दिलीप.

‘मग ‘वासनाकांड’ प्रकरणाबद्दल काय म्हणशील?’ मध्यंतरी ‘वासनाकांड’ निमित्ताने अमोल पालेकर व पुणेकर प्रेक्षक यांच्यात झालेल्या विसंवादाच्या अर्थात बेबनावाच्या संदर्भात मी विचारतो.
‘पुण्याचा प्रकार हा पूर्णतः वेगळा आहे. ‘वासनाकांड’ मनापासून आवडलेले लोक मला माहीत आहेत’ – दिलीप.

‘नाट्यकला ही एक निखळ कला आहे. कलेचा ‘व्यवसाय’ व्हावा; पण धंदा मुळीच होऊ नये. काही लोक हा ‘धंदा’ करू पाहतात. मग त्यासाठी येनकेनप्रकारेणं सनसनाटी वातावरण निर्माण करायचं आणि या तापल्या तव्यावर आपली पोळी खरपूस भाजून घेऊन यथेच्छ हादडायची! हे कितपत योग्य आहे?’ मी विचारतो.
‘कलेचा धंदा होत असला, तर त्याहून मोठं दुर्दैव नाही. मी माझ्या परीने अशा वेळी निश्चितच निषेध नोंदवतो. ‘अवध्य’ हे नाटक व्यावसायिक किंवा धंदेवाईक रंगमंचावर आलं तेव्हा त्यामागील पूर्णतः धंदेवाईक प्रवृत्तीचा निषेध म्हणून त्या नाटकातली भूमिका मी नाकारली होती.’

‘सारे प्रवासी तिमिराचे ह्या नाटकामुळे तू व्यावसायिक दिग्दर्शक बनलास. ह्या तुझ्या पहिल्या व्यावसायिक दिग्दर्शनातले काही विशेष अनुभव?’
‘प्रत्येकजण ‘पहिली’ गोष्ट अगदी जीव लावून करत असतो. माणूस पहिलं प्रेम अगदी उत्कटपणे करतो. पहिला इंटरव्ह्यू खूप उत्सुकतेनं देतो. मी माझं हे पहिलं व्यावसायिक नाटक अत्यंत आत्मीयतेनं दिग्दर्शित केलं होतं. पंचवीस दिवसांत नाटक उभं करून देईन असं मी तोंडवळकरांना म्हटलं होतं. त्याप्रमाणे सव्विसाव्या दिवशी शुभारंभाचा प्रयोग झाला. माझ्या कुवतीप्रमाणे जास्तीत जास्त बांधीव व रेखीव असं मी ते नाटक बसवलं होतं. साऱ्या सहकारी कलाकारांनीही मला चांगली साथ दिली. प्रयोगाबद्दल मी पूर्णतः समाधानी झाली. एवढंच काय; पण माझ्या कामगिरीबद्दल इतर अधिकारी व्यक्तीसुद्धा खूष होत्या’ दिलीप.

‘तुला ‘जास्वंदी’च्या निमित्ताने विजया मेहतांच्या दिग्दर्शनाखाली व त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. तू दिग्दर्शिका विजयाबाईंविषयी काय सांगशील?’
‘नाटक बसवताना बाई प्रत्येक गोष्टीत अगदी बारीक लक्ष घालतात. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी अगदी पिनपॉइंटेडली एक्झिक्यूट करुन घ्यावी ती विजयाबाईंनीच’ – दिलीप.

‘हे झालं तुझ्या व्यावसायिक नाटकांबद्दल. तू हौशी रंगभूमीवरदेखील नेहेमीच कसल्याकसल्या गडबडीत असतोस. ‘बहुरूपी’च्या ‘राजाचा खेळ’चा प्रयोग आज, तर उद्या ‘उन्मेष’च्या ‘सोफा कम् बेड’ची ‘रंगीत तालीम’. अरे हो, रंगीत तालीम हा प्रकार सेन्सॉरबोर्डाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी तुम्ही शोधून काढला, नाही का? सेन्सॉरबोर्डाविषयी तुझं काय म्हणणं आहे?’
‘नाट्यगृहातल्या पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंतचा सगळा प्रेक्षकवर्ग हे मी सेन्सॉरबोर्ड मानतो. पाच किंवा सात माणसांना सेन्सॉरबर्डाच्या नावाने आपली मते इतरांवर लादण्याचा काहीच हक्क नाही’ – दिलीप.
‘पण तरी सेन्सॉर बोर्ड, त्याचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागतोच ना? सेन्सॉरची परवानगी नाही म्हणूनच तुम्हाला ‘सोफा कम् बेड’चे खुल्ले प्रयोग करता येत नाहीत ना?’
‘पण त्यातूनही काही तरी मार्ग निघतोच. ‘सोफा कम् बेड’ला आधी सेन्सॉरबोर्डाने छत्तीस कट्स् सांगितले होते. ते कमी कमी होत गेले. आजपर्यंत मी कधीच सेन्सॉरबोर्डाचे कट्स् स्वीकारलेले नाहीयेत. प्रत्येक वेळी त्या त्या आक्षेपार्ह मुद्द्यांच योग्य ते स्पष्टीकरण मी सेन्सॉरबोर्डाला देऊ शकलो आहे.’ – दिलीप.

‘पण हे एकंदरीत सरळ साधं प्रकरण नाहीच. हौशी रंगभूमीवर आणखी काय काय अडचणी येतात. त्यांची पुनरावृत्ती करायची गरज नाही. अखेरचा एक प्रश्न विचारावासा वाटतो की ह्या सगळ्या वैतागवाडीला सामोरे जावे लागत असून सुद्धा तू किंवा तुझे मित्र नाटकांचा-अव्यवसायिक नाटकांचा-अट्टाहास करता, तो कशासाठी?’
‘जे जेन्यूइनली एक्स्प्रेस करावंस वाटतं, ते एक्स्प्रेस केल्यावाचून राहवतच नाही अशी एक मानसिक अवस्था निर्माण होते. आमच्या अच्युत वझेला काही तरी मनापासून सांगावसं वाटतं, तो ‘सोफा कम् बेड’ लिहितो, बसवतो. त्याला-आम्हा साऱ्यांना वाटतं की ते नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचावं…आणि मग सारे अडथळे, साऱ्या अडचणी, सारी प्रतिकूलता ह्यांना तोंड देण्याची मनाची तयारी होते…’

********

लेखक- सुभाष सोनवणे; अंक- माणूस ; वर्ष- नोव्हेंबर, १९७५.

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 2 Comments

  1. कोल्हटकर या नावााला मराठी नाट्यव्यवहारामध्ये फार मोठे स्थान आहे. श्रीपाद कृष्ण, चिंतामणराव, चित्तरंजन, बाळ,प्रत्येकाने आपापल्यापरिने मराठी प्रेक्षकाला भऱभरून आनंद दिला आहे. गंमत म्हणजे प्रत्येकाने केवळ नावामुळे नव्हे तर आपल्या चिंतनाने आणि कृतीने आपले स्थान निर्माण केले. दितीप यांनी स्वतःच्या जीवनात प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीचा समन्वय साधायचा यशस्वी प्रयत्न केला. ही मुलाखत त्यामागील त्यांची विचारसरणी स्पष्ट करते. ती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  2. हे दिलीप कोल्हटकर डोंबिवली स्टेशनपासून आमच्या घरी येण्याच्या रस्त्यावर रहात. त्यांचा बंगला होता आणि आवारात हाफ चड्डीत वावरताना त्यांना बघणे म्हणजे एकदम हॅपनींग होते .