आणीबाणी उठल्यावर नियतकालीकांवरील निर्बंध उठले. पुढच्याच महिन्यात ‘माणूस’चा ‘जनविराट’ विशेषांक निघाला. त्या अंकात विनय हर्डीकर यांचा एक दीर्घ लेख होता. त्या लेखांवरील प्रतिक्रियांनी उत्साहित होऊन श्रीगमानी या पुस्तकाचा घाट घातला. पुस्तकाचे नाव होते ‘जनांचा प्रवाहो चालिला..‘. पुस्तक प्रकाशित झाल्यावर चांगल्या वाईट कारणांनी ते चर्चेत राहिले. पण आजही आणीबाणीवरील भाष्य म्हटले की याच पुस्तकाचे नाव सर्वप्रथम येते. त्या पुस्तकातील शेवटचे प्रकरण येथे देत आहोत.

आणीबाणी संपली. निवडणुका झाल्या. त्यात इंदिरा गांधी पराभूत झाल्या. हुकुमशाहीचा अंत झाला. व्यक्तीस्वातंत्र्याची पहाट पुन्हा एकदा उगवली. पण म्हणजे देशाच्या सर्व समस्या संपल्या का ? इंदिरा कॉंग्रेसचा दारुण पराभव हा केवळ इंदिरा गांधींचा पराभव आहे का ? आणि त्याला केवळ त्याच कारणीभूत आहेत का ? एक व्यक्ती वा समाज म्हणून, काँग्रेसअंतर्गत बळावलेल्या दोषांना आपणही जबाबदार नाही का ? जनता पक्षाच्या प्रचंड विजयाच्या क्षणी देखील, त्यात वाहून न जाता, दोन्ही बाजूंचा समतोल विचार करणारा विनय हर्डीकर यांचा हा लेख-

********

आज मी अतिशय आनंदात आहे. आजच का, गेला एक-दीड दिवस अतिशय आनंदाचाच गेलेला आहे. मीच एकटा आनंदात नाही, माझ्यासारखे अनेक भारतीय नागरिक एका वेगळ्याच आनंदाचा अनुभव घेताहेत याची मला खात्री आहे. काल संध्याकाळपासून, परवा संध्याकाळपासून आम्ही सारे आनंदात आहोत, गातो आहोत, नाचतो आहोत. निवडणुकांचे निकाल येत असताना रात्रभर जागलो आहोत. आता निकाल संपत आलेले आहेत. जनता पक्षाला २७१ जागा मिळाल्या आहेत. अजून एक जागा मिळाली की स्पष्ट बहुमत मिळेल! ती जागा नक्की येईल ना, अशी शंका मला मधूनच येत आहे. काँग्रेसच्या जागा १५० च्या आसपासच आहेत. त्यात वाढ होत नाही, होणार नाही हे दिसत आहे. कालच इंदिरा गांधी पडल्या, संजय पडला, त्यांचे साथीदार पडले! मंत्री तर किती पडले ते आम्ही मोजायचंच सोडून दिलेलं आहे. आमच्या जनतेच्या पक्षाला किती जागा मिळणार याचे अंदाज बांधताना देखील आम्ही चाचरत होते. आता आम्ही थक्क झालो आहोत! एकीकडे विजयाचा प्रचंड जल्लोष चालू असताना दुसरीकडे मनावर एक मोठं दडपण आलंय असं जाणवतं आहे. मोरारजी, वाजपेयी, फर्नांडिस, लिमये, दंडवते आता सत्ताधारी झालेले, आम्ही याची देही याची डोळा पाहाणार आहोत. सत्ता आणि त्याग, निष्ठा आणि पराक्रम यांचा असा विवाह अलीकडच्या काळात झालेला आम्ही पाहणार आहोत. माझ्या पिढीच्या, स्वातंत्र्यात जन्माला आलेल्या पिढीच्या आयुष्यातला हा सर्वांत महान क्षण आहे. जीवनात एकदाच यावा आणि एकदा तरी यावाच असा क्षण!

आज पहाटे आम्ही स्वतंत्र झालो, पुन्हा एकदा स्वतंत्र झालो. आजच पहाटे रेडिओवर आणीबाणीची स्थिती उठविण्यात आल्याची घोषणा झाली आणि आम्ही मुक्त झालो! जवळजवळ पावणेदोन वर्ष अंधार दाटलेला होता. सूर्य रोज उगवत होता, मावळत होता. आजचा सूर्य काहीतरी वेगळा आहे. देश तोच आहे, माणसं तीच आहेत; पण हवा बदलली आहे. ती जास्त आरोग्यदायी वाटते आहे. सूर्यप्रकाश बदलला आहे- तो जास्त लख्ख वाटतो आहे. आमच्या हालचालींना, शब्दांना, भावनांना आज वेगळी झळाळी आल्यासारखी वाटते आहे. श्वासोच्छ्वासात, रक्ताभिसरणात, नाडीच्या ठोक्यात वेगळाच ताल शिरला आहे. ती झळाळी स्वातंत्र्याची आहे; तो ताल, तो डौल मनमोकळ्या, स्वतंत्र, मुक्त समाजाचा आहे!

अजूनही आम्ही गरीब आहोत, अप्रगत आहोत. अंधश्रद्धेच्या गाळात फसलो आहोत; बेकारीच्या, महागाईच्या पकडीत असहायपणे सापडलो आहोत. सामाजिक समता अजूनही दूर आहे. सात स्वातंत्र्यांची महत्ता सगळ्यांना कळायला अजून पुष्कळ अवकाश आहे. वैज्ञानिकता रुजायला हवी आहे. शिक्षणाची जीवनाशी, विचारांशी कृतीशी सांगड बसायला हवी आहे. आळस जायला हवा आहे. श्रम उत्पादक व्हायला हवे आहेत. हे एक-दोन दिवस तर काहीच काम आम्ही कुणी केलेलं नाही. अशी अनुत्पादक स्फूर्ती आमच्या हाडीमासी खिळलेली आहे. आम्ही बेशिस्त आहोत. कमालीची घृणा वाटावी, अमानुषता वाटावी अशा घटना आमच्याकडे घडत असतात. भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा, फुकटेपणा हे सर्व आमच्या श्वासात भिनल्यासारखे आहेत, हेही आम्ही ओळखून आहोत. तरीही आज आम्ही स्वतंत्र आहोत! हे स्वातंत्र्य आम्ही मिळविलेलं आहे! इतिहासात कित्येक वर्षांनी असा एखादा क्षण येतो आणि तो इतिहास पालटून टाकतो. इतिहासपुरुषाच्या तोंडात भडकविणारा तो क्षण त्याची चुकणारी पावलं वठणीवर आणतो. असे कित्येक क्षण आमच्या हातून निसटले. कित्येक वेळा आम्ही उशिरा जागे झालो. वेळ गेली म्हणून विकल झालो, हात चोळीत बसलो, दोष एकमेकांवर ढकलीत राहिलो, वांझोट्या तक्रारी संयम सोडून ओरडत राहिलो. या वेळी मात्र हा क्षण आम्ही ओळखला. हातात घट्ट पकडून ठेवला. त्या क्षणाचा ताबा घेतला आणि केवळ एक शिक्का आणि शाई यांच्यात प्राण फुंकून तो क्षण आम्ही साजरा केला! डोळे उघडून तो शिक्का आम्ही प्रथमच वापरला, मतपेटीला प्रथमच मनापासून नवस केला, नैवेद्य दाखविला. त्या महान क्षणाचे आम्ही सर्वजण वाटेकरी आहोत. आमच्यापैकी प्रत्येकानं तो शिक्का उमटविताना इतिहासाचा एक चिरा ठाकठीक बसविला आहे, गिलावा भरला आहे. इमारत उभी केली आहे असं नाही; पण पाया जागरूकतेच्या भक्कम शिशाच्या रसात आम्ही ओतला आहे म्हणून आज आम्ही वेगळे आहोत!

रायबरेलीचा निकाल आला आम्ही एकदम सुन्न-सुन्न वाटू लागलं आहे. तो निकाल अनपेक्षित होता, अशातला भाग नाही. तसं व्हावं असंच वाटत होतं. मात्र तसं झाल्यावर काही तरी भयंकर घडल्यासारखं वाटतं आहे. इंदिरा गांधींचा पराभव हा त्यांचा स्वतःचा, त्यांच्या पक्षाचा पराभव आहे आणि त्याचा आम्हाला आनंद वाटतो आहे. पण एका मोठ्या चळवळीचा असा दारुण शेवट झाला, मोडतोड झाली याची सुन्न जाणीव क्षणभर बधिर करून टाकते आहे. काँग्रेस या नावाशी काही फक्त इंदिरा-संजय जोडलेले नव्हते. किंबहुना ते तर अगदी अलीकडे जोडले गेले. सगळ्या स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास त्या शब्दात आम्हाला दिसत होता. टिळक, गांधी, नेहरू, सुभाष यांची नावं सवयीनं घ्यायची एवढंच; पण काँग्रेसमध्ये त्या नावांच्या पलीकडे आम्ही काहीतरी पाहत होतो, पाहायची सवय आम्हाला होती. लोकशाहीची रचना होताना पाहत होतो, जनतेच्या चळवळी पाहत होतो, सत्याग्रह करून हजारोंच्या संख्येनं तुरुंगात जाणारे कार्यकर्ते पाहत होतो. आयुष्यभर सूत कातणारे, खादी वापरणारे; शेती, निसर्गोपचार यात प्रयोग करणारे, ठिकठिकाणी राष्ट्रीय शाळा चालविणारे, नेत्याच्या एका शब्दाखातर आयुष्य वाहून टाकणारे, आदिवासी भागात जाणारे कार्यकर्ते; अलंकार, सोनं-नाणं एका मळक्या, फाटक्या टोपीत विश्वासानं टाकणाऱ्या महिला आणि गोळ्या छातीवर झेललेली तरुण मुलं त्या नावात आम्हाला दिसत! ज्यांचं काँग्रेसशी जमलं नाही; पण जे स्वातंत्र्यचळवळीतच अडिग राहिले, आपल्या परीनं घाव घालीतच राहिले त्यांनाही आम्ही काँग्रेस या शब्दातून आठवणाऱ्या स्वातंत्र्याच्या चळवळीतून कधी वेगळलेलं नाही. त्यांचे वैचारिक मतभेद समजून घेऊन त्यांनाही स्वातंत्र्यसैनिकच मानीत आलो.

त्या प्रतिमेला, त्या चित्राला आज जबरदस्त धक्का बसला आहे. काँग्रेस म्हणजे आणीबाणी; काँग्रेस म्हणजे पोलिस स्टेट; काँग्रेस म्हणजे देशभक्तांना तुरुंगवास; काँग्रेस म्हणजे हुकूमशाही, झुंडशाही, गुंडशाही, भ्रष्टाचार; काँग्रेस म्हणजे सत्तेचा गैरवापर, मदांधता, उन्मत्तपणा. काँग्रेस म्हणजे व्यक्तीचं स्तोम, व्यक्तीची पूजा, राष्ट्रापेक्षा व्यक्तीचा बहुमान ही समीकरणं आम्ही कशी नाकारणार आहोत? स्वातंत्र्याच्या आधीची आणि नंतरची काँग्रेस यांचा आम्ही कोणतं स्पष्टीकरण देणार आहोत? आणि काँग्रेसचं जे काही झालं. इंदिरा गांधींनी जे केलं त्याला आम्ही समाज म्हणून मुळीच जबाबदार नव्हतो, असं कसं म्हणणार आहोत? आज इंदिरा गांधी पराभूत झाल्या आहेत, काँग्रेसची राजवट उलथून पडली आहे; पक्षाला, व्यक्तीला शासन झालेलं आहे, आणीबाणीच्या गुन्हेगारांना शासन होणार आहे. परंतु एक देशव्यापी चळवळ आमच्याच दुर्लक्ष करण्याच्या, बेफिकीरीच्या वृत्तीमुळं पार रसातळाला गेली; उत्सन्न, छिन्नभिन्न झाली. आमच्या हाडीमासी खिळलेले दोष तिच्यात पराकोटीला गेले, म्हणून आम्हाला एकवीस महिन्यांची पराधीनता पत्करावी लागली. राष्ट्रीय अस्मितेचं प्रतिनिधित्व केलेल्या पक्षाचा विदारक उच्छेद बघावा लागला, हेही हळूहळू आम्हाला जाणवतं आहे. एका प्रदीर्घ सर्गाचा हा शेवट, हा शोकांत, महाकाव्यात शोभावा इतका भव्य, व्यापक, विदारक, स्फोटक आहे! उद्यापासून नवा महान सर्ग लिहिला जाईल, तो या शोकनाट्याच्या पार्श्वभूमीवरच आम्ही लिहिणार आहोत.

तरीही आज आम्ही स्वतंत्र आहोत. विजयसभांना गर्दी करतो आहोत. सुटून आलेल्या कार्यकर्त्यांना कडकडून भेटतो आहोत. हा देश आमचा आहे, हा समाज आमचा आहे हे गेले एकवीस महिने नाइलाजानं, अगतिकतेनं स्वीकारत होतो, आज स्वाभिमानानं जगाला सांगू इच्छितो आहोत. मी आनंदात आहे, माझे मित्र आनंदात आहेत, माझे नेते मला हवं तिथं पोचलेले दिसताहेत. मला आदर्श असलेल्या समाजकार्यकर्त्यांचा सत्कार, स्वीकार होताना मी बघतो आहे. याहून अधिक मला काहीही नको आहे! हैराण होऊन, निराश होऊन दूर कुठंतरी निघून जावं असं मला वाटू लागलं होतं. आता हैराणी गेली. निराशा गेली. सातासमुद्रांपलीकडं उगवत्या सूर्याच्या देशात गेलेला एक मित्र फार भाग्यवान आहे, असं वाटत होतं. आता या क्रांतीच्या शांत ज्वाळा पाहायला तो नाही, म्हणून तो दुर्दैवी वाटतो आहे. त्याला मी अभिमानानं पत्रामधून म्हणून शकतो आहे, तू गेलास तेव्हा हा देश पारतंत्र्यात होता! परत येशील तेव्हा आम्ही नव्यानं स्वतंत्र केलेल्या एका नव्या देशात येशील!

********

लेखक- विनय हर्डीकर; वर्ष- १९७७ 

जनांचा प्रवाहो चालिला या पुस्तकातील  शेवटचा लेख. 

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 10 Comments

 1. उत्तम लेख.

 2. फारच छान. भावपूर्ण तरीही समतोल. आपल्या समाजातील दोष आजही तसेच नव्हे वाढलेले आणि सुन्न करणारे.

 3. जुन्या आठवणी जाग्या झाल्या, पण ह्यातून आपण काहीच शिकलो नाही हेही लक्षांत आलं.

 4. BEST OF ONE.

 5. उत्तम माहितीपर लेख..

 6. सुंदर लेख

 7. पण पुन्हा काॅग्रेस निवडून आली. कांद्याचे भाव वाढले म्हणून परत इंदिरा गांधीना निवडून दिले. ही सामान्य जनतेची अक्कल. मग कधी कधी हिटलर म्हणत होता तेच खरे वाटते. ” सामान्य जनतेच्या हातात राज्यकर्ता निवडून देण्याची शक्ती देणे हा मूर्खपणा आहे.
  त्यानंतर आतापर्यत अतोनात भ्रष्टाचार झाला पण जातीपातीत अडकलेली जनता जातवाल्याना मते देत राहिली

 8. विचार करायला लावणारा लेख आहे.

 9. एक उत्तम आणि समयोचित लेख.जनता पक्षाचे पुढे काय झाले ते सर्वज्ञात आहे.एका चळवळीच्या झालेल्या अंताबद्दल वाटलेले हळहळ लेखकाच्या समतोल विचारसरणीची साक्ष देते.वाचनीय लेख.

 10. फार छान लेख आहे . विजयाच्या क्षणी जबाबदारीची जाणीव होणं हे विचारी मनाचं लक्षण आहे. त्याबद्दल हर्डीकरांचं करावं तेवढं कौतुक थोडेच ठरेल. पण त्याच बरोबर इंदिरागांधींचा पराभव झाला ही बातमी कळली , त्या क्षणाचा विलक्षण आनंद ज्या ज्या वेळी तो विषय निघतो त्या त्या वेळी आठवल्या शिवाय राहत नाही, हेही सत्य विसरता येत नाही. मी प्रवासात होतो, इंदूरला आमची ट्रेन थांबली होती आणि ध्वनिवर्धकावरून बातमी आली तेव्हा एकच जल्लोष झाला. शेजारी उभ्या असलेल्या माणसाने एकदम मिठी मारली. ना आम्ही ओळखीचे ना देखीचे, पण आम्ही जे मानसिक क्लेश सोसले होते ते सारे क्षणात दूर झाले अशी जणू त्यावेळी सुखद जाणीव झाली.
  पुढे काही दिवसांनी जयवंत दळवी यांनी लिहिलेली जयप्रकाजींची आठवण वाचली आणि उलगडा झाला. त्यांना भेटायला दळवी गेले होते तेव्हा ते काय बोलताहेत हे ऐकण्याकरिता दळवींना आपले कान त्यांच्या तोंडाशी न्यावे लागले,इतके जे.पी. अशक्त झाले होते, नव्हे केले गेले होते. ते म्हणाले, “प्रत्येकाच्या कानात सांग आणीबाणी वाईट आहे, म्हणजे ती उठवावी लागेल .” दळवीनी पुढे लिहिले होते, मला वाटले म्हातारबुवांना भ्रम झालाय. पण नंतर गावात गेलो, तेव्हा बांधाबांधावर खेडूत एकमेकांना तेच सांगत होते.तेव्हा कळले की जनमानसाने जेपींसारख्या तपस्व्याचे ऐकले होते. ही सार्वजनिक भावनााच मला मिठी
  मारणाा-या अनोख्या प्रवाशाने माझ्यापर्यंत पोहोचविली होती. आज हा लेख देऊन तुम्ही पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवून दिलात. धन्यवाद.