हा हा म्हणताना गेला महिना संपला आणि अर्ध वर्ष देखील संपलं. आणीबाणी विशेषांकाची कल्पना वाचकांना खूप आवडली हे दोन गोष्टीवरून सिद्ध झाले. गेल्या महिन्यात सर्वाधीक प्रतिक्रिया आल्या आणि सर्वाधिक सभासद पुनश्च बरोबर जोडले गेले. याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार. असा प्रतिसाद असेल तर कष्ट करायला पण मजा येते. आता पुढला विशेषांक ऑक्टोबरमध्ये. विषय? अं हं.. एवढ्यात नाही सांगणार. जवळपास १२ विषय काढलेत विशेषांकासाठी. एकसे एक सॉलिड आहेत. त्यातील कुठला घेतोय ते तुम्हाला सप्टेंबर मध्ये कळेल.

आता गेल्या महिन्यातील सर्वोत्तम प्रतिक्रियेबद्दल. नेहेमीप्रमाणे जून महिन्यातील आलेल्या भरपूर प्रतिक्रियांमधून सर्वोत्तम कुठली हे निवडणं थोडं कठीणच गेलं. याआधीचे विजेते वसंत देशपांडेआणि पाटणकरांच्या प्रतिक्रिया छानच होत्या. नवीन पैकी  आदित्य बापट यांची ‘अनुशासनपर्व नव्हे- हे तर आतंकपर्व’ या लेखावरील प्रतिक्रिया, देवेंद्र राक्षे यांची ‘मुहाफिझ’ चित्रपटाचा रसास्वाद घेणाऱ्या लेखावरील प्रतिक्रिया, पृथ्वीराज ठाकूर यांची वि. का. राजवाडे यांच्या आठवणी सांगणाऱ्या लेखावर आलेली आणि मुग्धा भिडे यांची ‘का नकोत मराठी शाळा’ या लेखावरील प्रतिक्रियांची लघुयादी केली तरी त्यामधून सर्वोत्तम निवडणे कठीण गेले. सगळ्याच प्रतिक्रिया स्वतःचा अनुभव सांगणाऱ्या, लेखात दिलेल्या माहितीत भर टाकणाऱ्या होत्या. यातून मग आम्ही सर्वानुमते आदित्य बापट यांना  विजेते घोषित करीत आहोत. जून महिन्यात मोबाईलवरून  प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. पण मोबाईलवरून आलेल्या प्रतिक्रिया जास्त करून एक दोन ओळींच्या होत्या. मोबाईलवर मराठी टंकलेखन करणे कठीण जात असेल तर तसे कळवा म्हणजे काहीतरी दुसरा मार्ग शोधता येईल.

तुम्हाला हे माहितीच आहे की पुनश्च सुरु करण्याच्या मुख्य हेतुत ‘मुल्यांची पुनर्स्थापना’ हा एक हेतू आहे. आणि लोकशाही मूल्य हे त्यातीलच एक महत्वाचं मूल्य आहे असं आम्हाला वाटतं. आजवर आपण दिलेल्या ‘समाजाचा शत्रू’ आणि ‘लोकशाही की हुकुमशाही?’ या लेखांमधून आपण लोकशाहीचे मूल्य अधोरेखित केले. उपलब्ध शासनसंस्था पर्यायात लोकशाही हाच कमीतकमी जाच आणि जास्तीतजास्त प्रभाव असणारा पर्याय आहे असे आमचे मानणे आहे. आणि त्यामुळे लोकांच्या राजकीय प्रक्रियेतील सहभागानेच लोकशाही सबलीकरण होऊ शकते असा आमचा विश्वास आहे. आता यात ‘राजकीय प्रक्रियेतील सहभाग’ म्हणजे निवडणुकीला उभे राहणे एवढाच मर्यादित अर्थ नसून आपली मतदार म्हणून नोंदणी आहे का याबद्दल सजग असणे, ती झालेली असेल तर प्रत्येक निवडणुकीत मतदार म्हणून सहभाग घेणे हेदेखील अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात झालेल्या मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीत आपल्यापैकी किती जणांनी मतदान केले हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आमचे मित्र आणि मराठी भाषा केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. त्यांचा हा निर्णय होत असताना त्यांच्याशी भरपूर वाद  घातला. मात्र ते जेव्हा खरंच निवडणुकीला उभे राहिले तेव्हा यथाशक्ती आपण त्यांना पाठींबा दिला.  दुर्दैवाने एकंदरच सुशिक्षित मतदारात असलेली मतदानाप्रती अनास्था अशा धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला भोवते आणि निवडणुकीचा निकाल अपेक्षित असा मोठ्या पक्षाच्या बाजूने लागतो. हे सगळं नेहेमीप्रमाणे पार पडलं की आपण सिनिक व्हायला पुन्हा एकदा मोकळे होतो.  पुनश्च च्या माध्यमातून या विषयात काही काम करण्याचा येत्या काळात आपला इरादा आहे. ज्या वाचकांना आपली ही भूमिका पटत्ये त्यांनी आम्हाला उत्तर पाठवून स्वतःचा पाठींबा किंवा विरोध दाखवावा.

३० जूनला पुनश्च नऊ महिन्यांचे झाले आणि याच महिन्यात आपण एक हजार सशुल्क वाचक संख्येचा टप्पा पार केला. एका मराठी online सशुल्क पोर्टलवर एक हजार सभासद होणं हे काही जणांना उत्साहवर्धक वाटतंय. एक नवा ट्रेंड पुनश्च आणू पाहतंय असं काहींचं म्हणणं आहे. पण  व्यक्तीशः आम्ही कुठेतरी कमी पडलोय याची बोच आहे. गेल्या दीडशे वर्षातलं, जुनं असलं तरीही जुनाट नसणारं, अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीतून उतरलेलं आणि संपादकांच्या मुशीतून तयार झालेलं साहित्य म्हणजे खरंतर जाणकार वाचकांच्या उड्या त्यावर पडायला हव्या होत्या. अशा साहित्याचा वाचक किमान वीस ते तीस हजार असेल असं आमचं गृहीतक आहे. पण या सर्वांपर्यंत पुनश्च पोचलंच नाहीये अजून. त्यामुळे जे काम तीन ते सहा महिन्यात व्हायला हवं होतं त्याला नऊ महिने लागलेत. असो…पण एक आहे, आमची गाडी जरी स्लो असली तरी  तिचा प्रवास सुरु आहे 🙂

पुनश्च ची वार्षिक वर्गणी किमान ५०० रुपये तरी ठेवायला हवी होती असं खूप जणांचं म्हणणं असतं. पण तसं न करता आपण ती सर्वसाधारण वाचकाला परवडेल अशी १०० रुपये  ठेवली. याचं अनेकांनी स्वागत केलं. एकाच घरात २-३ सशुल्क सभासद झाले. पण खूप जणांना हे १०० रुपये online भरताना त्रास झाला. खरंतर यातील  मोबाईल नेटवर्क, बँकेचं नेटवर्क आणि पेमेंट गेटवे हे तीन घटक आमच्या नियंत्रणाबाहेर होते. पण नवीन असल्यामुळे याचं खापर आपल्याच app वर  फुटत होतं. आणि हे सगळं कमी म्हणून की काय खूप जण offline पैसे भरण्याची काही सोय करा अशी मागणी करीत होते. त्यास प्रतिसाद म्हणून online पैसे भरण्याचे सर्व मार्ग ( म्हणजे अगदी अलीकडे आलेले गुगल चे तेज सुद्धा ) उपलब्ध करून आता आपण काही पुस्तकांच्या दुकानातदेखील पैसे भरण्याची सोय केली आहे. पुण्यात अक्षरधारा, मॅजेस्टीक आणि आयडियल कॉलनीतील पुस्तकपेठ, ठाण्यात मॅजेस्टीक, डोंबिवलीत मॅजेस्टीक आणि गद्रे यांच्याकडे वाचक १०० रुपये भरू शकतात. हा देखील एक प्रयोग आहे आणि यातून जे शिकायला मिळेल त्यातून पुढचा मार्ग प्रशस्त होईल.

शेवटी येत्या 14 तारखेला आपण घेणाऱ्या पुनश्च मित्र गाठभेट बद्दल थोडं. पुनश्च सुरु केल्यापासून गेल्या नऊ महिन्यात खूप वाचकांनी व्यक्तीशः मेसेज करून, फोनवर बोलून आपली पुनश्च मध्ये सक्रीय सहभाग देण्याची तयारी असल्याचं कळवलं. त्या सगळ्यांशी प्रत्यक्ष भेटून बोलणं आवश्यक होतं. या भेटीसाठी आम्हाला वाटतं आता योग्य वेळ आली आहे. 14 जुलै रोजी ठाण्यात आपण ही ‘पुनश्च मित्र’ गाठभेट आयोजित करतोय. ज्यांना ज्यांना वाटतंय की आम्ही काही बरं काम करतोय, पण आमच्या कामात काही उणीवा आहेत आणि त्या कोणीतरी म्हणजे तुम्हीच आम्हाला दाखवून द्यायला हव्यात आणि असंच एकमेकांच्या सहकार्याने पुढे जायला हवं त्या सगळ्यांना आम्ही निमंत्रित करतोय. या, गप्पा मारू, काहीतरी च्याव म्याव खाऊ आणि एकमेकांची ओळख करून घेऊ. आम्हा तिघांकडून ( मी, श्रीकांत बोजेवार आणि सुधन्वा कुलकर्णी ) तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. ज्यांना जमणार आहे त्यांनी तसं कळवावं म्हणजे ठिकाण ठरवणे सोपे जाईल. एकमेकांच्या सोयीची वेळ ठरवू. आणि ज्यांना जमणार नाही त्यांना आपण जुलै महिन्यातल्या लेखांमधून भेटणार आहोतच.

तेव्हा वाचत राहा, व्यक्त होत राहा आणि ठाण्याला यायचं नक्की जमवा…

 

Leave a Reply

This Post Has 9 Comments

  1. उद्याच्या भेटीचे ठिकाण आणि वेळ?

    1. घरी. सकाळी ११ ते १ किंवा संध्याकाळी ५ ते ७

  2. आम्हा वाचकांना , तुम्हा सर्व मान्यवरांना भेटण्याची ही संधीआहे. मलादेखील यायला नक्कीच आवडेल . कृपया सोयीची वेळ ठरवावी.ही नम्र विनंती.

  3. नक्की आवडेल!

  4. mala yayala aavdal

  5. आम्ही भारताबाहेर आहोत, त्यामुळे पुन्हा कधीतरी असे म्हणते.माहितीसाठी- वाङ्मय शोभा मासिक bookganga.com वर मोफत उपलब्ध आहे,50 वर्षांचे सर्व अंक

  6. १४ जुलैला भेटण्याचा नक्की प्रयत्न करतो

  7. मी १४ जुलैच्या गाठभेट कार्यक्रमाला हजर रहाण्याचा निश्चित प्रयत्न करेन

  8. मला जमेल आणि भेटायला आवडेल