सकल मराठी विश्वात ज्यांची चर्चा होत असते अश्या त्या पुणेरी पाट्या. मात्र या नमुनेदार आणि विक्षिप्त ‘ पाट्यांचे जनक ‘ असे ज्यांना म्हणता येईल ते पुण्याचे माजी महापौर श्री. प्र. बा. जोग यांच्याबद्दल हल्ली फार कमी जणांना माहिती असते. अतिशय तऱ्हेवाईक वल्ली असलेले जोग हे त्यांच्या भांडणांसाठी सुप्रसिद्ध होते. पुढच्या काळात तर त्यांनी ‘ मी असा भांडतो’ या नावाचे पुस्तकच लिहिले. त्याच पुस्तकाचे परीक्षण/ समीक्षण करणारा लेख १९६५ सालीच्या ‘ माणूस’ अंकात आला होता. मधुकर वकील यांनी लिहिलेला तो लेख आज वाचा अवांतर सदरात- 

********

असे ज्यांना आफतमे उलझनमे जंजालमे बेहोष है

पूरा वह मर्द है कि जो हर हालतमे खूष है।।

“मी असा भांडतो” हे प्रसिद्ध पुणेरी उपमहापौर श्री. प्र. बा. जोग यांचे पुस्तक ‘असाच मर्दाचा पोवाडा’ आहे, असा निर्वाळा नासिकस्थ कवी श्री. सोपानदेव चौधरी यांनी दिला आहे. भांडणे अंगावर घेणारा माणूस काही प्रमाणात तरी मर्द असावाच लागतो. (अपवाद आपले पंतप्रधान शास्त्री व संरक्षणमंत्री चव्हाण. कारण हे दोघे ‘मर्द’ असूनही भारताच्या शत्रूंशी असलेली भांडणे थोड्या गोडीने व बऱ्याच नेहरू-गुलाबीने मिटवू पाहातात.) केवळ पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे श्री. प्र. बा. जोग यांनी आपली सर्व १३०५ भांडणे सविस्तर दिली नाहीत. नाहीतर पृष्ठसंख्येतही हा एक अजोड ग्रंथ झाला असता.

सॉलिड शिव्यांचा स्टॉक

हा ग्रंथ आहे त्या कृश स्वरूपातही अत्यंत वाचनीय आहे. हा ग्रंथ वाचून पुण्यासंबंधी असलेले इतरांचे वाईट मत पुण्याला इरसाल शिव्यांची लाखोली देण्यापर्यंत घसरेल. वस्तुतः अशांची सोय करणयाकरता मराठीतील सर्व शिव्यांचे एकाक्षरी ते चौदा-पंधरा अक्षरी परिशिष्ठ या ग्रंथाला लेखकाने जोडायला हवे होते.कारण श्री. जोग सांगतात,

“मी ज्या शिव्या देतो, त्या Solid असतात. माझ्याजवळ साध्या-बावळट, गाढव अशा शिव्यांचा भरणा नाही. तर भडव्या X X X च्या, X X X वगैरे वगैरे अस्सल शिव्यांचा मजजवळ संग्रह आहे.”

“माझे वडील यथेच्छ शिव्या देत. माझे तिन्ही काका वडिलांच्या सवाई शिव्या देत. म्हातारपणी मुलांनी मला शिव्या दिल्या, की हे वर्तुळ पूर्ण होईल.”

अधूनमधून श्री. जोग यांची जी व्याख्याने पुण्याला होतात, त्या शिव्यांच्या ‘क्लासला’ चिक्कार गर्दी असते. परंतु पुण्याबाहेरील मंडळींची सोय अशा परिशिष्टाने झाली असती.

हा ग्रंथ वाचून पैसे खाणारे न्यायमूर्ती, दारूडे वकील, रस्त्यात घाण करणारे शेजारी, पैशाने गरीब परंतु लबाड असे नातेवाईक, तरुण मुलींचे धूर्त नातेवाईक, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसारख्या संस्थांतील झब्बूगिरी, अशा विविध गोष्टींचे ज्ञान होईल. वस्तुतः संघर्षाचे असे सर्व अनुभव प्रत्येकालाच येत असतात. रस्त्यात, गाडीत, थिएटरात, बसमध्ये जो तो आपल्या कुवतीप्रमाणे भांडत असतो. परंतु ही भांडणे ‘कचरा’ म्हणून विसरली जातात. सध्या ‘कलेची माती’ व ‘कचऱ्यातून कला’ निर्माण करणे महत्त्वाचे ठरले आहे. अशा या कचरास्वरूप भांडणांची वर्षानुवर्षे नोंद ठेवून, त्याला काही विशाल भांडणांची जोड देऊन श्री. जोग यांनी अत्यंत प्रांजळपणे हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक लिहिताना अधूनमधून श्री. जोग हे वाचकांच्या तोंडावरील हसूही कायम ठेवतात. एक प्रसंग ते सांगतात,

“माझा गवळी इलेक्ट्रिकच्या बेलवर जे बोट ठेवीत असे, ते मी दार उघडेपर्यंत. त्या गवळ्याशी मी भांडलो, म्हणालो, हजामा, तुला थोडा वेळच घंटी वाजवून थांबता येत नाही का?” नंतर कळले की तो बहिरा होता.

पुणेरी आवाजाचे नमुने

याचप्रमाणे अपरात्री काठी ठोकून चोराला सावध करणारा गुरखा, खॉक खॉक करीत तोंडात बोटे घालून सकाळच्या प्रहरी ऑ ऑ करणारे शेजारी, असे अनेक मासले लेखकाने टिपले आहेत.

श्री. जोग यांनी सकाळपासून सुरू होणारे सर्व पुणेरी आवाज टिपले आहेत ते पाहा –

“गवळी गेले की, त्यामागून वर्तमानपत्रवाले आलेच x x x x ! त्यात निकाल असावा कुठल्यातरी परीक्षेचा. मॅट्रिक, व्ह. फा., बी. ए. म्हणजे ओरडण्याबद्दल बघायलाच नको.”

“वर्तमानपत्रवाले येऊन गेले की फेरीवाल्यांची x x सुरू होते. ती मग रात्री सात वाजेतो. ‘मटकी मोडाची ए’, ‘भाजी ए-कांदे बटाटे’, ‘कल्हई ए’, ‘रद्दी पेपाssर’ ‘रफू करायचेsss’”

“एकदा पाहातो तर एकजण ओरडत होता, ‘खलास झाला sss खलास झाला.’ पाहातो तर गजरा मोगऱ्याचा. शनिवारी, रविवारी दुपारच्या वेळी डालडाचे, रॉकेलचे डब्यांना झाकणे बसवण्याचा व आपल्या संपत्तीत भर टाकण्याचा मोह अनेक गृहिणींना होतो. मग तो डबेवाला रिकामे डबे ठोकण्याचा तो आवाज करतो, तो तासभर चालू असतो–”

“नंतर आइसफ्रूटवाले आइस फ्रूssट! केळीवाले, आंबेवाले, नंतर संध्याकाळी खेळणीवाले, हर माल दो आनेवाला! नंतर दोन फुगे दाबून फुगेवाला जो आवाज काढतो त्याची सर तर कोठल्याच खेळण्याला येणार नाही. लहान मुलांना खेळणी प्रिय असतातच आणि लहान मुलांना हिंदुस्थानात तोटा नाही. एका मुलाने खेळणे घेतले रे घेतले की पन्नास मुलांच्या हातात तेच खेळणे दिसते. मग विचारायलाच नको. ‘टम् टम् टण् टण—’”

“पावसाळ्याच्या दिवसात छत्री दुरुस्त करणारे, बोहारणी, कल्हईवाले. चंद्रग्रहणाच्या दिवशी कहरच झाला. ‘दे दान सुटे गिराण’, म्हणून जे लोक x x मारू लागले. रात्री दोन वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत ग्रहण कोणालाच दिसत नव्हते.”

“रात्री आठ ते साडेदहा भिकारी, ‘अन्न वाढा हो माय,’ म्हणून जो टाहो फोडतात त्यालाही तोड नाही.”

“याच्या जोडीला रेडिओवरील श्रुतिका, नाटके असतातच. रेडिओ संपला की सिनेमा, नाटकांहून परतणारी मंडळी. त्यांची पाळी संपली की गुरखा. हा गुरखा तासातासाने लोकांची झोपमोड करण्यासाठी ठेवलेला असतो. लोकांनी हा गुरखा पैसे देऊन ठेवलेला असतो, हा यातला खरा विनोद आहे.”

शोधाविषयी शंका

याशिवाय अनुभवाच्या आधारे लेखकाने काही नवी संशोधनेही नोंदवली आहेत. त्यातील एक असे आहे-

“कोकणस्थ हे मुळात वस्ताद. परंतु एकारांत कोकणस्थ हे महावस्ताद. भिडे, गोगटे, भावे, लिमये, फडके, वझे, परांजपे ही मंडळी जोग, चिपळूणकर, देवधर या मंडळींपेक्षा खूपच वस्ताद.”

अर्थात लेखक स्वतः अकारांत आहे, तरीही ते उपमहापौर कसे झाले याची सुरस हकीकत वाचून वरील शोधाविषयी शंका निर्माण होते.

या ग्रंथाचे विस्तृत परीक्षण दिले तर श्री. जोग यांचे आमच्याशी १३०६ वे भांडण होईल. ते म्हणतील, “हजामांनो, पुस्तकातली सगळी गंमत परीक्षणात दिलीत. त्यामुळे हे पुस्तक खपले नाही. पाच हजार रुपये नुकसानभरपाईची ही नोटीस.” म्हणूनच केवळ थांबतो.

(‘मी हा असा भांडतो. मी हा असा बोलतो. मी हा असा आहे.’ लेखक व प्रकाशक प्र. बा. जोग, १५६९ सदाशिव, पुणे २)

लेखक- मधुकर वकील; अंक- माणूस; वर्ष- १ जून १९६५

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 12 Comments

 1. Khu छान

 2. Hkupach Chan

 3. छानच लेख

 4. हे वाचून जोगसाहेबांची मूर्ती समोर उभी राहिली. ते आमच्या गल्लीतले(पुणेरी शब्द).त्यांच्या घरावर पाटी होती – आम्ही कोणतेही काम करतो,त्यात अंत्ययात्रेचा पण समावेश होता. अफलातून व्यक्तिमत्व!

 5. हे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे का ? मूळातच वाचायला हवे

 6. प्र.बा.जोग यांचे विषयी हे नवीन पैलू कळाले. पुस्तक वाचायला हवे. धन्यवाद

 7. मी एकारान्त सदाशिव पेठी कोकणस्थ पुणेकर आहे 🤣🤣 प्र बा जोग ह्यांच्या बद्दल ऐकले होते पण पुस्तका बद्दल माहिती नव्हती. वाचायला हवे

 8. प्र.बा. जोग हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होते.. खूप वर्षांपुर्वी दूरदर्शनवर त्यांची मुलाखत पाहिल्याचे स्मरते.. त्यांचे “खुल्लम खुल्ला” नावाचे देखील पुस्तक होते. गिरगावातील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे ही दोन्ही पुस्तके होती.. मी वाचली आहेत.. दादर सार्वजनिक वाचनालयात देखील ही पुस्तके असल्याचे दादरच्या एका मित्राने त्यावेळी सांगितले होते..
  त्यांचा एक किस्सा गमतीशीर आहे.. पुण्यात कुठलातरी क्रिकेटचा सामना होता. यांना त्याचे समालोचन करायचे होते.. परंतु आकाशवाणीने परवानगी नाकारली.. तेव्हा यांनी नेहेरू स्टेडियमच्या बाहेरील एका झाडावर मचाण बांधून समालोचन केले होते…

 9. LaaJawab!

 10. फक्त ट्रेलर वाटला. फक्त चव चाखवून भूक चाळवू नका हो प्लिज.