तर भाविकहो, कथा नामस्मरणाची आहे. नामस्मरणामुळं काय काय होऊ शकतं याची  आहे.  जेहत्ते काळाचे ठायी, कधी एकेकाळी, कोण्या एका नगरीचा एक राजा होता. एक दिवस विपरीत झालं. राजाच्या हितशत्रूंनी एक भूखंडाचं प्रकरण शोधून काढलं. या भूखंडाच्या व्यवहारात म्हणे अपहार झाला होता…

********

तर भाविकांनो, एकदा विठूनामाचा गजर करू आणि मग आपण आजच्या कीर्तनाचा विषय लावू… लोक मला कीर्तनाच्या आधीच विचारतात, बुवा आज काय बोलणार? कोणती कथा घेणार? मी त्यांना सांगतो…बघा काय सांगतो,

माझी वाचा विठू, माझी काया विठू

माझे मन विठू, आणि माझा शब्द विठू

तर, मी काय बोलणार आहे ते माझे मलाच माहिती नसते. विटेवर उभा असलेला तो विठ्ठल ठरवतो, मी काय बोलणार आहे ते. कारण माझे सर्व काही, माझे अस्तित्वच विठू आहे…बोला विठ्ठाल…विठ्ठाल…विठ्ठाल…

तर आता, विठ्ठलाचे नामस्मरण झाले, श्रोत्यांमध्ये चैतन्य आले. कारण? कारण नामस्मरणाचे माहात्म्यच मोठे आहे, त्याशिवाय या जगात काहीही होणे शक्य नाही. एक नामस्मरण फक्त खरे, बाकी सर्व झूठ आहे. लहानसे बाळ पाळण्यामध्ये काय करत असते? आपल्या मातेचे नामस्मरण करत असते! पती जेव्हा चार दमड्या मिळवण्यासाठी बाहेर जातो तेव्हा त्याची भार्या, त्याची कांता घरी त्याचे नामस्मरणच करत असते! माझा पती चार पैसे घेऊन नीट घरी यावा, त्याची पाऊले दारूच्या गुत्त्याकडे पडू नयेत, त्याचे लक्ष एखाद्या सटवीकडे जाऊ नये…वगैरे वगैरे..यापेक्षा अधिक खोलात मला शिरायचं नाही. तुम्हाला ते सगळं माहितीच आहे.

तर आपण काय बोलत होतो? नामस्मरणाचं महत्व. संत मंडळी आपल्याला नेहमी सांगत असंत, तुम्ही देवाचं नाव घ्या आणि मग सगळं त्याच्यावर सोपवा. तो पाहून घेईल सगळं..’घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे’ हे तुम्हाला माहिती असेल, पण आता आजच्या काळात, इथं सगळी चाळीशी पन्नाशीची मंडळी बसलेली आहेत, त्यातल्या बऱ्याच जणांना मधूमेहाची सोबत असेल तर त्यांना कदाचित विठ्ठलाचं गोड नाव घेतानाही जपून घ्यावं लागत असेल, आपण दुसरा अभंग म्हणू-

नाव तुझे ओठी, नाव तुझे गाठी

नाव तुझे पोटी, माझ्या विठूराया

दशकं संपली, शतकं लोटली तरी नामस्मरणाचं महत्व कायम आहे बघा, त्याशिवाय गती नाही आणि त्याशिवाय प्रगतीही नाही. आपला वरिष्ठ कितीही फुल्या फुल्या असला तरीही आपण त्याला काय म्हणतो? साहेब, तुमच्या मार्गदर्शनाशिवाय काहीही शक्य नाही. खरं तर या साहेबाचं साधं दर्शनसुध्दा आपल्याला नको असतं, पण दुसरा काही मार्गच नसतो, तेव्हा मार्गदर्शनाची भाषा करावी लागते. तुम्ही मंत्री असाल तर तुम्हाला मुख्यमंत्र्याचं मार्गदर्शन हवं असतं, तुम्ही मुख्यमंत्री असाल तर तुम्हाला पंतप्रधानांचं मार्गदर्शन हवं असतं. ही सगळी मार्गदर्शनं साहेबांच्या मार्गदर्शनासारखीच असतात, दुखतं पण सांगता येत नाही…

तुम्ही म्हणाल, बुवा कथा लावा की आता, हे काय भारूड लावलंय तुम्ही? तर भाविकहो, कथाही नामस्मरणाचीच आहे. नामस्मरणामुळं काय काय होऊ शकतं याचीच ही कथा आहे. जेहत्ते काळाचे ठायी, कधी एकेकाळी, कोण्या एका नगरीचा एक राजा होता. तो आपल्या राज्याचा कारभार कौशल्यानं हाकत होता. रथाला आठ घोडे असावेत आणि आठही घोड्यांचा लगाम एकाच व्यक्तीच्या हाती असूनही एकही घोडा सैल सुटू नये, असे कौशल्य राजाच्या ठायी होते. कुठल्या घोड्याची कमकुवत बाजू काय आहे हे त्याला चांगलेच ठावूक असल्याने, कुणाच्या पाठीवर टोचायचं, कुणाचे कान उपटायचे, कुणाच्या पाठीवर थाप मारायची आणि कुणाच्या…तर असो थोडक्यात काय की तो कुशल राजा होता.

पण एक दिवस विपरीत झालं. राजाच्या हितशत्रूंनी भूखंडाचं एक प्रकरण शोधून काढलं. या भूखंडाच्या व्यवहारात म्हणे अपहार झाला होता आणि खुद्द राजाचा त्या व्यवहारात हात असल्याचा आरोप झाला. राजा बिथरला. सगळ्या घोड्यांचे लगाम माझ्या हाती, सगळ्या घोड्यांच्या सवयी मला ठावूक आणि तरीही रथ असा कसा डगमगला? प्रजाननांमध्ये कुजबुज सुरू झाली होती. ही कुजबुज, या शंका मोठ्या वाईट असतात भाविकांनो-

लोक विचारी नाना शंका

पेटली संशयाची लंका

वाजू लागला सगळीकडे

या अशुभ वार्तेचा डंका

झाले! राजा अस्वस्थ झाला. मोठमोठ्या माणसांच्या कपड्यांना आपण काय म्हणतो? वस्त्रप्रावरणे! आपण साधे नागरिक, आपण मोठ्यांच्या व्यवहारात शिरत नाही कधी. पण तरीही मला सांगा, मोठ्या लोकांच्या कपडयांना वस्त्रप्रावरणे का म्हणतात? कारण त्यांच्या वस्त्रांना आवरणे असतात. चिखल उडाला, माती लागली, रस्त्याने शेणावर पाय पडला तरी त्यांच्या वस्त्रांवर डाग उमटत नाहीत,कारण त्यांच्यावर आवरणे असतात अधिकारांची. ती आवरणे कधीही झटकून स्वच्छ करता येतात आणि खालची वस्त्रे कायम स्वच्छ राहतात. पण काहींना त्या आवरणांवरही चिखल उडालेला चालत नाही. आपल्या गोष्टीतला राजा अशांपैकीच होता. त्या राजाचा जो महाराजा होता, त्याच्याकडूनच त्याने हे गुण घेतले होते. ‘ देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार’ असं नरहरी सोनार म्हणाले होते, तद्वत सगळ्या प्रांताचे राजे या महाराजाच्या नामस्मरणाचा व्यवहार करूनच राज्य चालवित होते. तर हा महाराजा जसा सगळ्या व्यवहारांपासून कायम नामानिराळा राहतो तसेच आपल्या राजालाही रहायचे होते. त्याला संशयाची बोटे आपल्याकडे वळलेली कसे बरे चालणार? मग त्याने काय करावे? नामस्मरण सुरू केले. बोला, विठ्ठाल विठ्ठाल, विठ्ठाल…

मी म्हटलं ना, नामस्मरणामुळं बुध्दीला लागलेली जळमटे निघून जातात, विचारांचे पाणी वाहते होते आणि कल्पनांचे नवे नवे आविष्कार जन्माला येतात. आपल्या गोष्टीतल्या राजानेही नामस्मरण सुरू केले आणि देवाची प्रार्थना केली, देवा तूच आता रस्ता दाखव मला- नामस्मरणाला फळ आले आणि राजाला एक दृष्टांत झाला, एक स्वप्न पडले. ते स्वप्न काय होते?

एक अतिशय कपटी आणि लोभी राजा होता. त्याचे सैनिक रोज सकाळी राज्यातील एका श्रीमंत व्यक्तीच्या घराच्या दारावर काळ्या रंगाची फुली मारत असंत. ज्याच्या घराच्या दारावर फुली मारली जात असे,त्याची सगळी संपत्ती राजाच्या खजिन्यात जमा केली जाई. एका धनाढ्य व्यापाऱ्याने आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण केले आणि प्रार्थना केली, हे देवा, मी तुझे नित्य स्मरण करतो, माझ्या धनाचे रक्षण कर. एका भल्या पहाटे सैनिकांनी या धनाढ्य व्यापाऱ्याच्या दारावर काळ्या रंगात फुली मारली. दिवस उजाडल्यावर खजिन्याचे अधिकारी पाहतात तो काय! गावातील सर्वच घरांवर काळ्या फुल्या…त्यांना कळे ना कोणाची संपत्ती जप्त करावी. ते गडबडले….स्वप्न संपले. दृष्टांत फळाला आला.

राजाला नामस्मरणाचे फळ मिळाले, त्याने या दृष्टांतातून काय घ्यायचा तो धडा घेतला. राजाने दुसऱ्या दिवशी फतवा काढला…मला कशाचीही भीती नाही, वाट्टेल ती चौकशी करा. परंतु भूखंडाच्या या व्यवहाराची चौकशी करतानाच मी आणखी शेकडो प्रकरणे तुम्हाला सांगतो, त्यांचीही चौकशी करूया आपण…

चौकशी सुरू झाली. जोरात चौकशी सुरू झाली…तुम्ही विचाराल चौकशीचं पुढे काय झालं? तर तुम्हाला उत्तर मिळेल, अजून चौकशी सुरूच आहे. कारण काय? तर अहो एवढे भूखंड, त्यांचे शेकडो व्यवहार, त्या व्यवहारांच्या शेकडो बाजू, त्या बाजूंच्या हजारो बाजू, त्यात कोणाचे हात तर कोणाचे पाय गुरफटलेले…तेव्हा चौकशी सुरू राहू दे..यातून आपल्याला नामस्मरणाचं महत्त्व कळावं एवढाच हेतू होता. आपण आता पांडुरंगाचं नामस्मरण करू, त्यानंतर आरती होईल, आरतीचं ताट भाविकांपर्यंत येईल त्यात यथाशक्ती धन अर्पण करा…बोला विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल..

********

तंबी दुराई 

इमेज क्रेडीट: लोकमत न्यूज 18.

 

 

 

 

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 14 Comments

 1. व्वा धम्माल मस्तच मजा आली!

 2. फार छान

 3. तंबी दुराई यांचा लेख म्हणजे तिरकस टोलेबाजी आणि उपरोधिक लिखाणाचा आविष्कार यांची खुसखुशीत मेजवानीच . तिचा आस्वाद घेण्याची
  संधी वारंवार मिळत राहो.

 4. फार छान. वस्त्रप्रावरणे या शब्दाची फोड आणि राजाच्या रूपकाचा वापर भन्नाट..

 5. मस्त . आवडला

 6. सध्याच्या राजकारणाचे यथार्थ वर्णन!

 7. मस्त , तंबी दुराई म्हणजे चोफेर फटकेबाजी
  आलीच

 8. अप्रतिम. नेहमीप्रमाणेच तंबी दुराईंंची टोलेबाजी झकास.

 9. मला पण आज असाच अनुभव आला पण आता काय करायचे म्हणून सोडून दिले. इथे पण मराठीत टाईप करायचे तर ते टैल्पच होई ना, शेवटी फेस बुक वर टाईप करून इथे चिकटवत आहे, हा द्राविडी प्रामायाण बराच वेळेस करावा लागतो म्हणून वाचायचा कंटाळा येतो कधी इथे क्लीक करा इकडून तिकडे प्रयत्न करा आधीच वेळ थोडा आणि सोंगे जास्त म्हणून काहीच करावेसे वाटत नाही आणि म्हणूनच एक तुमचा संदेश आला होता पण प्रयत्नपूर्वक त्याला उत्तर देण्याचे टाळले.

  1. आता वाचता येतोय ना? आणि आमच्या हे लक्षात आलंय की मोबाईल नेटवर्क, मोबाईल चा प्रकार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पण पुनश्च app नवीन असल्यामुळे या त्रुटींचे खापर त्यावरच फुटते. असो…हा विश्वास ठेवा की आपण सतत feedback घेऊन आपले app आणि website update करीत असतो. त्यातूनही काही त्रुटी राहतात. पण वाचकांनीही आमच्या ताब्यात सर्व गोष्टी नाहीत ही बाब स्वीकारायला हवी. आणि आमच्या हेतूवर विश्वास ठेवायला हवा. मला आशा आहे मी काय म्हणतोय ते तुमच्या ध्यानात आलं असेल. आणि काहीही अडचण आली तरी आम्हाला कळवत राहा म्हणजे आम्ही करण्यासारख काही असेल तर लगेच करू…

 10. असे लेख आम्ही रु. शंभर भरून वाचता येत नसतील तर त्याबाबतचे विपत्र पाठवू नये ही विनंती. कारण असे हे दाखवायचे आणि आम्ही पाहायला गेलो की तुम्हाला या अमुक वर्गणीत वाचता येणार नाही त्यासाठी वेगळे पैसे भरा असा ताकदीवजा संदेश यावा हे पटत नाही. पुनश्च हा उपक्रम ‘एक खिडकी’ तत्त्वावर चालू ठेवावा. आणखी खिडक्या उघडू नये. पुढील वर्षी आम्ही अधिक पैसे भरू हे सांगता येणार नाही. माझा हा त्रागा नसून आपली भूक वाढवणारा हा धंदेवाईकपणा पाहून हे असे परखडपणे सांगावेसे वाटले. राग न मानता विचार करावा आणि योग्य ते करावे.
  मंगेश नाबर

  1. मंगेश जी, आजचा लेख तांत्रिक चूक झाल्यामुळे संरक्षित झाला. चूक सुधारली आहे. आता वाचू शकता…आणि धंदेवाईक भूक वगैरे नाही. चुका होत असतात , थोडा संयम ठेवा आणि आमच्या हेतूबद्दल विश्वास ही ठेवा.