लेखक: तंबी दुराई

साहेबांची मॅराथॉन मुलाखत अनेकांनी वाचली किंवा ऐकली असेल. पण ती होती ठरवून रेकॉर्ड वगैरे केलेली. कॅमेऱ्यासमोरची. कॅमेऱ्यामागे घडलेली अस्सल मुलाखत आमच्याकडे आहे. वाचा-

********

(साहेब सोफ्यावर वृत्तपत्र वाचत किंवा चाळत बसलेले असतात. कार्यकारी संपादक प्रवेशतात.)

‘या या, कार्यकारी संपादक या. बसा.’

‘साहेब कसं बोलावणं केलंत?’

‘कसं म्हणजे काय? हा काय प्रश्न झाला? मोबाइलनं केलं आम्ही बोलावणं.’

‘कळलं नाही तुम्हाला साहेब. ‘कशासाठी बोलावलंत’, या अर्थानं असं विचारण्याची पद्धत आहे आपल्या भाषेत.’

‘तुम्ही आम्हाला पध्दत वगैरे शिकवू नका हो. आम्हाला काहीही शिकवू पाहणारांचं काय होतं ते तुम्ही पाहिलं आहे ना? आमची पध्दतच वेगळी आहे.’

‘हो साहेब.’

‘बऱ्याच दिवसांत आमची ती मॅराथॉन की काय काय म्हणतात तशी मुलाखत छापून आलेली नाही.’

‘छापून टाकू की, त्यात काय आहे?’

‘त्यात काय आहे ते आम्ही ठरवू, ते तुम्ही नाही सांगायचं.’

‘एखादी गोष्ट सहज करण्यासारखी असेल तर, ‘त्यात काय आहे’ असं म्हणायची पद्धत आहे आपल्या भाषेत.’

‘पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, आम्हाला तुम्ही पद्धत वगैरे काही शिकवू नका. आम्ही आमच्या पद्धतीनं करतो सगळं.’

‘बरं साहेब. पण त्या मुलाखतीत काय असेल?’

‘मुलाखतीत काय असतं?’

‘प्रश्न असतात आणि उत्तरं असतात.’

‘मग प्रश्न कुठे आहेत तुमचे?’

‘म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही उत्तर सांगणार त्यावरून मी प्रश्न तयार करायचे आहेत की मी प्रश्न काढायचे आणि त्यावरून तुम्ही उत्तरं देणार?’

‘मोठे साहेब काय करत होते?’

‘त्यांना काही विचारायची हिंमतच नव्हती माझी. ते बोलवायचे आणि मी…’

‘थांबा थांबा, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा तुमची काही विचारायची हिंमत नव्हती आणि आत्ता मात्र आहे…’

‘नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला…’

‘मग कसं म्हणायचं होतं?’

‘मला असं म्हणायचं होतं की त्यांची एक पद्धत होती…’

‘मग मघापासनं मी तुम्हाला काय सांगतो आहे? आमची एक पद्धत आहे ठरलेली.’

‘बरं, मग त्याच पध्दतीनं करू आपण. मोठे साहेब मुलाखतीसाठी बोलवायचे तेव्हा ते बोलायचे आणि मी लिहून घ्यायचो. कधी ते बोलायचे त्यावरून मी प्रश्न तयार करायचो तर कधी जमल्यास एखादा प्रश्नही विचारायचो.’

‘जमल्यासच विचारावं माणसानं.’

‘मग सुरू करायची का मुलाखत?’

‘त्यासाठी मुहुर्त हवा का?’

‘नाही. म्हणजे, तुम्ही एकटेच बोलणार आहात की बाळराजेही बसणार आहेत सोबत बोलायला?’

‘बाळराजे नकोत, आम्ही एकटेच पुरेसे आहोत त्यांना.’

‘त्यांना? म्हणजे कोणाला?’

‘आता तेही आम्हीच सांगायचं?’

‘अच्छा. कळलं. म्हणजे याचा अर्थ विरोधकांना लोळवण्यासाठी कुणाच्या सोबत जाण्याची काही गरज नाही आता. सैनिकांचा आग्रह तुम्ही मनावर घेतला तर अखेर!’

‘अखेर? आत्ता कुठं मॅराथॉन मुलाखत सुरू झाली आणि एवढ्यातच अखेर?’

‘नाही, नाही. एखादी गोष्ट ठरली असेल, तर असं म्हणायची पद्धत आहे.’

‘ पद्धत पद्धत काय लावलं तुम्ही मघापासनं. ते पद्धत वगैरे आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही प्रश्न विचारा.’

‘बरं, मी विचारायचे आहेत का प्रश्न? मला वाटलं की मोठ्या साहेबांसारखं तुम्ही बोलणार आणि मी त्यावरून प्रश्न तयार करणार.’

‘परत परत तेच तेच नका सांगू हो.’

‘बरं. विचारतो. पाच वर्षातली चार वर्ष गेली आहेत. उणं पुरं एक वर्ष राहिलं आहे, म्हणजे खरं तर आता सहाच महिने राहिले आहे.’

‘तुम्ही आम्हाला गणित शिकवायला आला आहात की काय? एक वर्ष राहिलं म्हणजे सहा महिने राहिले, हा काय प्रकार आहे?’

‘असं म्हणायची पद्धत आहे.’

‘मला काही कळत नाही, आज आल्यापासनं तुम्ही सारखं पद्धत पद्धत सांगताय मला. मला पद्धत सांगणारे सगळे झोपवले मी,तुम्हालाही झोपायचं आहे का?’

‘नाही. आता पद्धतीविषयी चकार शब्द बोलणार नाही. आपण थेट मुलाखतीलाच सुरूवात करू या.’

‘हं, बोला.’

‘सत्तेत रहायचं की नाही याबाबतचा निर्णय आपण कधी घेणार आहात?’

‘आम्ही मनातल्या मनात निर्णय घेतलेला आहे,तो कधी जाहीर करायचा एवढाच फक्त प्रश्न आहे आणि आम्ही तो जाहीर करायचं ठरवलं तर आम्हाला अडवण्याची हिंमत कोणीच करू शकणार नाही.’

‘ते सैनिकांना चांगलंच माहिती आहे.’

‘असायलाच पाहिजे, नाही तर त्यांना सैनिक का म्हणायचं?’

‘हल्ली मोदींवर तुम्ही वारंवार टीका करता…’

‘मग काय डोक्यावर घेऊन नाचायचं त्यांना? राहुल गांधींनी त्यांना मिठी मारली तशी मिठी काही मी मारणार नाही. मिठीचं पाणी प्रदुषित आहे…’

‘हो.’

‘हो काय? मी जोक केला. कुठलाही विषय असो, मला माझी मुंबई, माझा महाराष्ट्र आठवतो. तुम्ही मोदींविषयी काही तरी विचारत होता…’

‘मध्यंतरी अमित शहा तुम्हाला भेटले, तेव्हा त्यांनी मोदींचा काही निरोप सांगितला का? काय बोलणं झालं तुमच्यात नेमकं? अनेकांना त्याबद्दल उत्सुकता आहे.’

‘अनेकांना आहे की नाही ते माहिती नाही, तुम्हाला मात्र नक्कीच असेल. पण आमचं काही खास बोलणं झालं नाही. त्यांना म्हटलं ढोकळा खाऊन कंटाळला असाल, बटाटावडा खा. अमितभाईंनी वडा खाल्ला. ते फार स्पष्ट बोलणारे गृहस्थ आहेत, माझ्यासारखेच. आत एक बाहेर कधी जमलं नाही आम्हाला.’

‘पण युतीचं काय?’

‘ते तर तुम्हीच सांगून टाकलं आहे. मुका घेतला तरी युती होणार नाही. परवा वाचलं मी कुठंतरी.’

‘ते आपलं उगाच. तुम्ही म्हणत असाल तर मीच मुका घेतो.’

‘मी कधीच काही म्हणत नसतो. जे काय असेल ते करून दाखवायचं, म्हणायचं नाही. म्हणून दाखवण्याचा मक्ता आम्ही आमच्या बंधूंकडे देऊन टाकलेला आहे नेहमीसाठीच.’

‘तो एक प्रश्नही लोक नेहमी विचारत असतात.’

‘कुठला प्रश्न?’

‘दोघे भाऊ एकत्र येणार का वगैरे.’

‘महाराष्ट्रात टाळकुट्या लोकांची संख्या मोठी आहे. ज्यांना कुटायचे त्यांना कुटू देत. आपण आपलं पुढे जायचं.’

‘हे फार छान उत्तर झालं. मला आवडलं.’

‘तुम्हाला आवडलं म्हणजे छान झालं असं नाही. मी बोललो हे महत्वाचं आहे.’

‘हो. ते तर आहेच. तुमचे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध कसे आहेत? म्हणजे तुम्ही मोदींवर खूप टीका करता, परंतु मुख्यमंत्र्यांवर फार जपून टीका करता असं म्हणतात लोक.’

‘कोण म्हणतं? मी तर कधी वाचलं नाही कुठं.’

‘तुमच्यापर्यंत आलं नसेल, माझ्याकडे लोक बोलतात असं.’

‘माझ्यापर्यंत आलं नाही परंतु तुमच्या पर्यंत आलं, असं आणखी काय काय आहे ते सांगून टाका एकदाचं. एका फटक्यात सगळी उत्तरं देऊन टाकतो.’

‘नाही, आणखी काही नाही. एवढंच आहे.’

‘ही मॅराथॉन मुलाखत आहे ना? दोन- तीन दिवस चालू शकेल. आजच्यापुरतं इथंच थांबू. आज मी खूप काही सांगितलं, बाकीचं उद्या बोलतो.’

‘ओके. मग आज थांबूया इथंच.’

‘नको..नको, इथं नका थांबू. घरी जा.’

‘तसं नव्हे. एखादं काम मध्येच थांबवायचं असेल तर असं म्हणायची पद्धत आहे. (जीभ चावतात) माफ करा…मला पद्धत म्हणायचं नव्हतं, चुकून बोललो. येतो मी.’

‘येतो? तुम्ही तर कधीच आला आहात, आता जायची वेळ आली आहे.’

‘नाही,तसं म्हणायची…स़ॉरी. जातो मी.’

(कार्यकारी संपादक जातात. साहेब परत वृत्तपत्र वाचू लागतात.)

********

तंबी दुराई

 

 

 

 

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 23 Comments

  1. वा !! अप्रतिम !!

  2. अगदी तंबीदुराईची अस्सल स्टाईल. खुसखुशित आणि मजेशीर लेख. ह्यातले साहित्यीक कौशल्य महत्वाचे.

  3. लोकसत्तात लिहिणारे तंबी दुराई वाचायला मिळाले मन सुखावले

  4. केवळ आकसापोटी लिहिले आहे हे. वस्तुतः सामना मध्ये जेवढे स्वातंत्र्य आहे लिखाणाचे तेवढे कुठेच नाही. बाळासाहेब ठाकरे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना कमालीचा मान देत होते. उद्धव ठाकरे पण तेवढाच मान देतात. या पेक्षा इतर दैनिकात संपादकाला रोज तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो. तो लिहिला गेला पाहिजे

  5. Hahaha, Mulakhatipekha jast manoranjak ha lekh aahe 🤣🤣🤣

  6. फारच छान! वक्रोत्ति व्याजोक्ती चा चपखल वापर तंबी दुराई त्यांच्या सदरात करतात.

  7. Lai bhari

  8. लेख खूपच खुसखुशीत झाला आहे. सध्याच्या राजकारण परिस्थिती अचूक टिपली आहे. छान कोपरखळ्या मारत सद्य स्तिथी नमूद केली आहे.

  9. जबरदस्त!:)

  10. SUNDAR. THIS i READ DIRECTLY. THANKS FOR THAT . I HAVE RECORDED THIS TAMBI DURAI ARTICLES. IF YOU WANT I CAN SEND THEM. GIVE A EMAIL ADDRESS.