पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टच्या भाषणासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. पत्र लिहून त्यांना केलेल्या या काही सूचना…

प्रिय प्रधान सेवक,

पंधरा ऑगस्टच्या भाषणात मी काय बोलू? असं तुम्ही विचारलंच आहे म्हणून मी हे पत्र पाठवत आहे. पंधरा ऑगस्टच्या भाषणात काँग्रेसच्या काळात गरीबी, महागाईवर प्रवचन असे आणि त्यानंतर सर्वधर्मसमभावाचे, सामाजिक सलोख्याचे डोस पाजले जात. शेवटी पाकिस्तानला इशारा देण्याची आणि आम्ही कोणतीही आगळीक सहन करणार नाही वगैरे ठणकावून सांगण्याची स्वीट डिश असे. त्या प्रवचनांचा, डोसांचा आणि स्वीट डिशांचा अगदीच कंटाळा आला म्हणून आम्ही त्यांना हाकलले आणि तुम्हाला आणले. पण सेवकसाहेब, खुद्द तुम्ही, तुमच्या सरकारमधले उपसेवक, राज्यसेवक, पालिकासेवक म्हणजे, काँग्रेसच्या हिरव्या शिमला मिरची ऐवजी तुमची केशरी रंगाची शिमला मिरची विकत आणावी, तसे निघालात हो. तीच चव, तशाच आणि तेवढ्याच बिया आणि तेवढाच आकार. फक्त रंग वेगळा. स्वीट डिशसह सगळा मेन्यू तोच आहे, फक्त थाळी बदलली. स्पष्टच बोलतो, राग अवश्य माना.

तुम्ही स्वतःच विचारलं म्हणून सांगतो, आम्हाला तुमच्या भाषणात गरीबी, महागाई अशा मोठमोठ्या थापा नको असतात हो. आमचे प्रश्न खूप लहान सहान असतात. त्यांच्याबद्दल बोला तुम्ही. आमच्या खात्यात तुम्ही ते पंधरा लाख वगैरे टाकणार होतात त्याबद्दल नाही विचारणार आम्ही, कारण ती लोणकढी होती हे आम्हाला तेव्हाच कळलं होतं. अगदी काँग्रेसच्या काळापासून आम्हाला तुम्ही राजकारणी लोक बोलता त्यात किती लोणकढ्या असतात ते समजून घ्यायची सवय लागलेली आहे. आपली लोकशाही असल्या लोणकढ्यांवरच टिकून राहिली आहे, ते सोडून द्या. आमच्या लहान सहान प्रश्नांबद्दल बोला.

आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर गेली काही वर्ष काही खड्डे आहेत. पालिकेनं ते खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला नाही असं नव्हे. परंतु ते खड्डे अजिबात कोणालाच दाद देत नाहीत. तुम्ही जसं काँग्रेसच्या काळातलं सिलॅबस बदलून नवे धडे शिकवण्याचा प्रयत्न करता तसे खड्डे बुजवणारे कंत्राटदारही तुमच्या काळात बदलले गेले. त्यांनी आधीच्या लोकांची दुकानं बदं करून नव्या लोकांकडून गिट्टी-खडी आणली, नव्या लोकांकडून रेती आणली आणि नव्या लोकांकडून नवे डांबर आणले. परंतु हे मिश्रण त्या खड्ड्यांमध्ये राहण्यासाठी प्रामाणिकपणा नावाचा एक पदार्थ त्यात मिसळावा लागतो, तो काँग्रेसच्या काळातही नव्हता आणि आताही नाही. त्यामुळे हे खड्डे तुमच्या सांस्कृतिक भाषेत सांगायचं तर, पुराणांमधल्या राक्षसांसारखे झाले आहेत. त्या राक्षसांचं मुंडकं उडवलं की तिथं दुसरं मुंडकं येतं आणि ते हा हा हा हा करून हसतं, तसे हे खड्डे नवनव्या कंत्राटदारांकडे पाहून हसत असतात. हे खड्डे बुजवल्यानंतर पंधरा वीस दिवस रस्ते बरे असतात त्या काळातही आम्ही खड्डा ओलांडताना जायचो तसंच जातो. कारण सोळाव्या दिवशी पुन्हा तसं जायचं असतंच, उगा आपली सवय कशाला मोडा? तर, तेवढं खड्ड्याचं काही तरी बघा आणि त्याविषयी बोला.

डिजिटल क्रांती झाली असं ऐकलं म्हणून मी परवा ऑनलाइन मालमत्ता कर भरायचा प्रयत्न केला. माझ्या घराचा नंबर, माझं नाव, एरियाचं नाव सगळं काही टाकून झालं तरी प्रकरण पुढं जाईना. कुणीतरी म्हणालं की सरकारी कामं फक्त रिलायन्सच्या नेटवर्कवरून होतात. खरं तर मला ते खरं नाही वाटलं, पण काय सांगावं, खरं असेल असंही वाटलं, म्हणून मी आमच्या शेजारच्या तात्यांकडे गेलो. त्यांच्याकडे रिलायन्सचं वायफाय आहे. पण तिथेही तेच. म्हणून मी त्या संकेतस्थळावर दिलेल्या नंबरवर फोन केला, तर ते म्हणाले की काही दिवस सर्व्हर डाऊन असेल तुम्ही प्रत्यक्ष येऊन पैसे भरा. मी विचारलं की ‘अहो डिजिटल क्रांतीचं काय झालं?’ तर ते म्हणाले, ‘क्रांतीसाठी पैसे आले पण ती क्रांती मेंटेन करण्यासाठीचे पैसे आलेले नाहीत. ते आले की सगळं मेंटेन होईल.’ यावरून सरकार रिलायन्सला विशेष वागणूक देत नाही, हे मात्र स्पष्ट झालं.

शेतकऱ्यांना सातबाराचा उताराही आता ऑनलाईन मिळणार असं ऐकलं होतं मी. पण ऑनलाइनमधलं शेतकऱ्यांना काही कळत नाही त्यामुळं त्यासाठी ते पुन्हा तलाठ्यांकडेच लाईन लावतात आणि अशाप्रकारे सरकारचं ऑन – लाइनचं (!) आश्वासन पूर्ण करण्यासाठी मदत करतात. केमिस्ट, वाणी, कापड दुकानदार सगळेच सांगतात, ‘कार्ड पेमेंट असेल तर तुम्हाला महागात पडेल, त्यापेक्षा रोख द्या.’ मी प्रत्येकाला सांगत असतो की ‘अहो, आपले पंतप्रधान डिजिटल करायला निघाले आहेत सगळं आणि तुम्ही असे खोडा का घालताय?’ तर ते वस्तू परत घेतात आणि म्हणतात ‘दुसऱ्या दुकानात जा, आम्हाला विकायचंच नाही काही.’ म्हणजे वस्तू खपली नाही तरी चालेल, पण डिजिटल क्रांती नको, असं अनेकांना वाटत आहे. माझ्या घराच्या आसपासचे लहान मोठे दुकानदार, भाजी विक्रेते, पाणीपुरीवाले सगळे कसे डिजिटल झाले आहेत याच्या फोटोसह बातम्या छापून आल्या होत्या. त्या बातम्यांची कात्रणे अजूनही त्यांच्या दुकानात लावलेली आहेत, पण त्या फोटोंमधली मशीन्स कुठं ठेवलेली आहेत हेही त्यांना आता आठवत नाही. तर प्रधानसेवक, तुमच्या या डिजिटल क्रांतीविषयीही चार शब्द बोला काही तरी…

मी जे काय उत्पन्न मिळवतो त्यावर आयकर देत असतो. त्यानंतर मी त्याच बचतीतून एफडी मध्ये पैसे टाकले आणि त्यावर चार पैसे (खरोखर चारच पैसे मिळतात हो) मिळाले तर त्यातलेही दोन पैसे परत तुम्ही कर म्हणून घेणार. एकदा आयकर देऊन झाल्यावर त्यातले काही पैसे मी हॉटेलात जाऊन खाण्यावर खर्च केले तर त्या खर्चावर पुन्हा मीच टॅक्स द्यायचा. एकदा आयकर दिलेल्या पैशातून मी काहीही खरेदी केली तरी पुन्हा त्या खरेदीवर कर द्यायचा. बालाजी मंदीर, साई संस्थान अशा श्रीमंत देवस्थांनांमध्ये तर म्हणे आता बोर्ड लावणार आहेत, ‘तुम्हाला दानपेटीत शंभर रूपये टाकायचे असतील तर जीसटीसह एकशे अठरा होतात.’ आमच्या कामवालीनंसुध्दा तिच्या पगारावर अठरा टक्के जीएसटी लावला आहे. जीएसटीचा सामान्य माणसाला खूपच फायदा होणार आहे असं मी अनेकांकडून आणि तुमच्या तोंडूनही ऐकलं होतं. तेव्हापासून मी त्या फायद्याच्या शोधात आहे, पण अजून तरी मला तो कुठे सापडलेला नाही. तो तुम्ही शोधून दिला किंवा तुमच्या भाषणात त्याचा पत्ता सांगितला तर बरं होईल.

माझ्या शेजारी माझा मित्र याकुब राहतो. दोनतीन पिढ्यांपासून त्याचा दुध दुभत्याचा व्यवसाय आहे. परवा त्यानं नवी गाय विकत घेतली आणि तिला तो घरी घेऊन येत असताना काही लोकांनी पाहिलं, तेव्हापासून तो आणि गाय दोघेही गायब आहेत. त्यांचा काही पत्ता लागत नाही. पोलिस म्हणतात, आम्ही शोधतो आहोत. जरा याबाबत काही करता आलं किंवा पोलिसांना काही सांगता आलं तर बघा बुवा. तुम्ही विचारलंच आहे म्हणून मी हे पत्र पाठवत आहे. स्पष्टच बोलतो, राग अवश्य माना.

आपला लहानसा सेवक

तंबी दुराई

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 31 Comments

  1. नेहमीप्रमाणेच चुरचुरीत ! तुमच्या काल्पनिक मित्र याकूबबद्दल वाचून वाईट वाटलं. आमच्या घराशेजारी खऱ्याखुऱ्या मुसलमानाचे सलून आहे. एकदम जोरात चाललं आहे. नुकतच भरपूर खर्च करून रिनोव्हेशन केलाय आणि जोरदार उद्घाटनही केलाय. बहुधा काही मुसलमानांचा बरं चाललं असावं या जुमलेबाज मोदींच्या राजवटीत. असो. मी काही मोदी समर्थक नाही. भक्त तर नाहीच नाही.

  2. टीका करण सोपं आहे. आतापर्यंत पाहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी सामान्य लोकांशी इतका चांगला संवाद साधला. उज्वला योजना, स्वच्छता अभियान, बिमा योजना, strat up India अशा योजना राबवण्याचा प्रयत्न केला. आता लगेच सर्वच योजना यशस्वी नसतील झाल्या पण प्रयत्न तर दिसले. महागाई म्हणाल तर कमी होणं कठीण कारण सर्व फुकट वा कमी पैशात हवे. देशातील 125 करोड पैकी आतापर्यंत फक्त 1. 5% जनता टॅक्सपायर्स आहे. आणि त्यांच्यावर देश चालतो आहे. यावर्षी प्रथम 3%म्हणजे income tax payers झाले. म्हणजे atleast दुप्पट झाले. आहो आपल्याला एक सोसायटीची मीटिंग घेणं किती कठीण आहे ते माहित आहे. तेव्हा 125करोड लोकांचा देश चालवणं किती महा कठीण आहे ही कल्पना केलेलीच bari. मोदी आणि फडणवीस खरे कामसू लोक प्रतिनिधी आहेत पण आपल्या सारख्या व माध्यमांना प्रामाणिक लोकांचे वाव डे आहे त्याला कोण काय करणार? असो असे चांगले मुख्यामंत्री आणि पंतप्रधान deseve करत नाही हेच खरे.

  3. फार छान ! प्रत्येक शब्द खराच आहे . मोदी व्यक्तीशः दोषी नसतीलही पण जे चालू आहे ते पूर्वीच्या सरकारपेक्षा काही निराळे नाही .

  4. हा उपरोधिक लेख आहे की अग्रलेख आहे?

  5. THIS ARTICLE IS NOT AT ALL GOOD. RUBBISH COMMENTS

  6. Tambi is always excellent…but Iam not going to change my opinion about our PM.What India stands in world is because of him only

  7. हा विनोदी लेख असेल तर खाली टीप द्या आता हसा अशी !!!हा हा हा !

  8. I cannot my comment in Marathi? Any reason. I am using Google typing and can type with same app of face book, why not here?

  9. अत्यंत टुकार लेख आहे हा. धड ना राजकीय ना विनोदी !

  10. वा सर, अत्यंत मार्मिक टिप्पणी . खूप मजा येते वाचताना पण त्याचबरोबर वस्तुस्थितीची बोचरी जाणीव देखील होते. थाळी आणि शिमला मिरची ची उपमा मनापासून आवडली. अगदी मनातलं बोललात.