श्रावणातल्या पहिल्या सकाळी, आदल्या रात्रीचा गटारीचा माहौल आठवत मोरू लोळत पडल होता आणि तिथं मंगेश पाडगावकर आले. त्यांच्यात झालेल्या संवादाचा हा तंबी दुराई यांनी अवचित उलगडलेला मोरपिसारा….

********

श्रावणाचा पहिला दिवस, त्यातही रविवार, त्यातही रिमझिम पाऊस आणि त्यातही काल रात्रीच्या गटारीचा अंमल! अशा वेळी लोळत पडलेलं असणं! अहाहा, सुख म्हणजे तरी आणखी काय असतं? काय असू शकतं? किचनमध्ये कामवाली बाई भांडी घासत असावी त्या भांड्यांचा आवाज, बायको रविवारची एक्स्ट्रॉ कामे करत असावी त्यामुळे कानी पडत असलेली बांगड्यांची किणकिण आणि मुलं बहुधा टीव्हीवर मराठी चित्रपटांची हिंदी वाटतील अशी गाणी ऐकत बसली असावीत त्या गाण्यांचा आवाज…तशी फार झोप येत नसूनही मोरू या सर्व आवाजांचे श्रवण करत बळेबळे पांघरूणात पहुडलेला होता. शेक्सपिअरपेक्षाही गहन प्रश्न त्याला पडला होता, ‘ उठावे? की उठू नये…!’  या प्रश्नाचं जोवर स्पष्ट उत्तर मिळत नाही तोवर असंच पडून रहायचं एवढं मात्र त्यानं मनाशी निश्चित केलं होतं.

पडल्या पडल्याच त्यानं खिडकीच्या पडद्याचा खालचा कोपरा एका हातानं उचलून पावसाचा अंदाज घेतला. पावसाचा जोर वाढला होता,रस्त्यानं रंगीबेरंगी छत्र्यांचे अर्धगोल गर्दी करून होते. मोरू स्वतःशीच गुणगुणला, श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा…पन्नास वर्ष झालीत या गाण्याला, पण अजूनही श्रावणातला पाऊस म्हटलं की हेच गाणं आठवतं. वा,पाडगावकर!

‘बोल, काय म्हणतोस?’

मोरूनं चमकून पाहिलं तर बोकडदाढीतले आणि जाड फ्रेमच्या आणि तेवढ्याच जाड भिंगाच्या चष्म्यातून मिश्कीलपणे पाहात असलेले मंगेश पाडगावकर उभे होते.

‘अरे? पाडगावकर? कधी आलात?’

‘तू आत्ता आठवण काढलीस ना, तेव्हाच आलो. मी काय वर रिकामाच बसलेलो असतो. काहीच काम नसतं. मला तिथं कविताही करू देत नाहीत.’

‘का बुवा? कविता का नाही करू देत?’

‘अरे, ते म्हणतात, काय करायचं ते करून झालं तुमचं, आता काही केलं तर तुमच्या खात्यात जमा होणार नाही. म्हणजे बघ, निवृत्तीनंतरही समजा तू ऑफिसात जात राहिलास आणि काम करत राहिलास तर तुझा साहेब काय म्हणेल?’

‘काय म्हणेल?’

‘काम करायचं तर करा मोरेश्वरराव, पण पगार मात्र जमा होणार नाही हं तुमच्या खात्यात….!  कळलं? तर मग कशाला काम करायचं? आपण काही नुसत्याच कविता करत नसतो. केलेली कविता पाडगावकरांची आहे, असं लोकांनी म्हणावं म्हणून करत असतो. मग मी, बापट आणि करंदीकर आम्ही बसतो तिकडं चकाट्या पिटत.’

‘पण आलात ते बरं झालं. मला कालपासूनच तुमची खूप आठवण येत होती.’

‘कळलं मला ते. काल रात्री पापड खाताना आली होती ना माझी आठवण?’

‘पापड खाताना?’

‘गटारी होती ना? अरे पापड इज द बेस्ट चाखणा इन द वर्ल्ड. मी काय उगाचच पापडावर कविता केल्या? पहिलं प्रेम पेल्यावर, दुसरं प्रेम पापडावर! ही एकच जागा अशी आहे जिथं पहिलं आणि दुसरं अशी दोन्ही प्रेमं एकत्र सुखानं नांदतात. त्यामुळं माझी खात्री आहे काल तुला घोट घेतल्यावर पापडाचा तुकडा तोडताना माझी आठवण आली असेल. अर्थात घोट घेतानाच आठवण काढली असतीस तर मला जास्त आवडलं असतं.’

‘छे हो, प्यायलो वगैरे नाही, पण बसलो होतो मित्रांसोबत.’

‘गधड्या, नुसताच बसला होतास का रे?’

‘हो, तुम्ही गेल्यापासून मजा येत नाही, म्हणून सोडली.’

पाडगावकर हसले. ‘सोडलीस? आमचा बापट काय म्हणतो बघ एका कवितेत-

‘किती आलो दूर दूर रस्ता चुकून

तरी तिथेच कसा पोचतो, जिथे होतो तिथेच!’

एकदा ज्याच्या ओठांना पेला लागला त्यांचं असं होतं बघ. बापटानं लिहिताना हे लिहिलं असेल प्रेमा बिमाविषयी, पण ते लागू होतं मदिरेला.’

‘तुमच्या पापडावरच्या कविताही मिस करतो आम्ही पाडगावकर. अहो जे कधी त्या अर्थानं बसत नाहीत त्यांनाही पापड लागतोच ना गरमा गरम खिचडीसोबत?’

‘हो. आणि आता तर खिचडी ही बसणाऱ्या लोकांची राष्ट्रीय डिश झालेली आहे. चाखण्यानं पोट भरल्यावर आणि मदिरेनं मन भरल्यावर जेवण्याचं समाधान लाभण्यासाठी लोक तडका मारके दाल खिचडी मागवतात.’

‘आयला, पाडगावकर तुम्ही पृथ्वी सोडली तर अपडेट दिसता अगदी इथं काय चाललंय त्याबद्दल.’

‘तर? जे न देखे रवी ते देखे कवी म्हणतात आणि आता तर रवी आणि कवी दोघेही एकाच जागेवरून जग पाहतात, मग काय विचारता!’

‘तुम्ही आलात तर बरं वाटलं, कधी कधी खूप आठवण येते तुमची आणि डोळे पाणावतात.’

पाडगावकर पुन्हा हसले.

‘अहो हसताय काय? मी गंभीरपणे बोललो.’

‘आमचा विंदा काय म्हणतो ते विसरलास का? ऐक-

‘बन दगड आजपासून, काय अडेल तुझ्यावाचून?

गालावरचे खारे पाणी, पिऊन काय जगेल कोणी?’

‘अहो, विंदा म्हणाले होते तसे आता आम्ही सगळे मनाने दगड बनलोच आहे, पण तरीही गालावरचे पाणी मात्र खरे आहे माझ्या हं!’

‘म्हणून तर तू मोरू आहेस ना! तुझ्याही गालावर जेव्हा खोटे अश्रू ओघळू लागतील तेव्हा मी तुला दिसणारच नाही, कितीही आठवण काढलीस तरी!’

मोरू हे ऐकून निःशब्द झाला.

त्याला तसं शांत पाहून पाडगावकर म्हणाले, ‘खरंच कारे पन्नास वर्ष झाली श्रावणात घन निळा लिहून? पुढले पन्नास श्रावण कधी आणि कसे गेले ते कळलंच नाही. तुझ्या बरं लक्षात आलं पन्नास वर्ष झाल्याचं.’

मोरू सावरून बसला आणि म्हणाला, ‘ बापट, करंदीकर तुम्ही मला ऐकवले. आता पाडगावकर मी तुम्हाला ऐकवतो.’

जाड भिंगातून पाडगावकरांचे लुकलुकते डोळे उत्सुकतेनं पाहू लागले, ऐकू लागले. मोरूनं कविता म्हणण्याची पोज घेतली-

‘अशा क्षणी कुणालाच मी,  शोधीत नसतो,

तरीसुध्दा तुम्ही येता, गरजेच्या पलिकडची

शब्दाची नवी ओळख करून घेता

हिरवं हिरवं गार पातं आपल्या मनात रूजू देता!

अगदी तसेच आज आलात, मला बरं वाटलं

यालच अशी खात्री नव्हती, प्रत्यक्ष पाहिलं, तेव्हा खरं वाटलं!’

मोरूनं मोठ्यानं म्हटलेली कविता ऐकून सौ. मोरू आता आल्या आणि म्हणाल्या, ‘अहो, आज नेमके पाडगावकर कसे आठवले? श्रावणात घन निळा या गाण्याला पन्नास वर्षे झाली म्हणून लेख आलाय मटाच्या संवाद पुरवणीत कौशल इनामदारचा…’

‘काय म्हणतेस?’ असं म्हणत नाटकी उत्सुकता दाखवत मोरूनं पेपर हाती धरला आणि पाडगावकर टाटा करत मिश्कील हसत अंतर्धान पावले.

तंबी दुराई

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 16 Comments

  1. सुंदर लेखासमवेत पाडगावकरांचे छान असं व्यंगचित्र…..

  2. छान,मस्त लेख

  3. श्रावणातला मोरपिसारा

  4. सुंदर लेख व तसेच सुंदर रेखाटनसुध्दा आम्ही सर्वे वाचकांनी enjoy केल

  5. कुरूमकुरुम🍺👍👌मस्त लेख आणि रेखाटन😀

  6. सुंदर गाण्यावर सुंदर लेख

  7. छान.

  8. छान

  9. वा … छानच.

  10. खूप छान .