लेखक: डॉ यश वेलणकर

दहा वर्षांचा नीरज शाळेतून घरी आला की फार चिडचिड करायचा. इतर वेळी शांत आणि आनंदी असणारा हा मुलगा याचवेळी का चिडचिड करतो हे त्याच्या आईला समजत नव्हते. पण नंतर तिच्या लक्षात आले की त्याने काहीतरी खाल्ले की त्याची चिडचिड कमी होते. म्हणजेच भूक लागली की नीरजची चिडचिड होते, त्यावेळी तो पटकन रागावतो, रडतो देखील हे आईला समजले. काहीही पोटात गेले की त्याचा मूड बदलतो. तो हसू,बागडू लागतो. पण भूक लागण्याचा आणि मूड खराब होण्याचा संबंध काय असे कोडे त्याच्या आईला पडले आहे.

बऱ्याच लहान मुलांची भूक लागल्यानंतर चिडचिड होते. थोडे मोठे झाल्यानंतर ही चिडचिड कमी होते. याचे कारण आपल्या मेंदूत आहे. माणसाच्या मेंदूचे कोडे शास्त्रज्ञांना थोडे थोडे उलगडू लागले आहे. मेंदुमुळेच  माणसाची स्व ही जाणीव विकसित होते. या स्व ला कोणताही धोका निर्माण झाला की तो लगेच उपाय योजतो कारण मेंदूचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे स्व चे संरक्षण आणि वंश विस्तार. त्यासाठी तो पंच ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून परिसराची माहिती घेत असतो. त्याचबरोबर तो शरीरातील प्रत्येक पेशीशी संपर्क ठेवून शरीरात काय घडते आहे हेही जाणत असतो. स्वतःच्या शरीराची माहिती तो तीन प्रकारांनी मिळवत असतो. शरीराचा तोल सांभाळण्याचा तो कानातील यंत्रणेच्या सहाय्याने सतत प्रयत्न करीत असतो, ही पहिली यंत्रणा. वार्धक्यामध्ये ही यंत्रणा कमजोर होऊ लागते त्यामुळे तोल जाऊ लागतो. तो सांभाळण्यासाठी हातात काठी घ्यावी लागते. दुसरी यंत्रणा शरीरातील सांध्यांशी जोडलेली असते, त्यामुळे आत्ता या क्षणी शरीर कोणत्या स्थितीत आहे, हात कोठे आहेत, मान कशी आहे हेही त्याला समजत असते. त्यामुळेच आपले डोळे बंद असले तरी हात डोक्याच्या वर आहेत हे आपल्याला समजते. तिसरी यंत्रणा ही त्वचा आणि शरीरातील इंद्रिये यांच्याशी जोडलेली असते. भूक लागली आहे, शी किंवा शू होते आहे हे या यंत्रणेमुळे आपल्याला कळते. या तीन ही यंत्रणा शरीरात  काही संवेदना निर्माण करतात. या संवेदना मेंदू जाणतो, त्यांचा अर्थ लावतो आणि त्यानुसार काय करायचे हे ठरवतो, तशी कृती करतो. माणसाचा मेंदू या संवेदनांचा अर्थ लावायला हळूहळू शिकत असतो.

नीरज शाळेतून आल्यानंतर चिडचिड करतो याचे कारण त्याचा मेंदू संवेदनांचा अर्थ समजून घेण्यात थोडा गोंधळ करतो आहे, हे आहे. शाळेतून घरी आल्यानंतर त्याच्या शरीरात जी संवेदना त्याच्या मेंदूला जाणवते, तिला भूक म्हणतात हे त्याच्या मेंदूला पटकन कळत नाही. ती संवेदना अस्वस्थता निर्माण करते, त्यामुळे तो चिडचिड करतो. खायला मिळाले की ती संवेदना बदलते. त्यामुळे त्याचा मूड बदलतो, त्याची चिडचिड कमी होते. थोडा मोठा झाल्यानंतर आत्ता शरीरात हे जे काही होत आहे, त्यालाच भूक म्हणतात हे त्याला कळू लागेल. हे केवळ भुकेच्या संवेदनेबद्दलच होते असे नाही. बालकाला शी आणि शू ची  संवेदना ही अशीच शिकावी लागते. जन्मतः ती नसते. मेंदू हळूहळू या संवेदनांचा अर्थ लावू लागतो. आत्ता शरीरात जे काही होते आहे त्याचा अर्थ शी होणार आहे हा आहे हे मेंदूला शिकावे लागते. शरीरातील संवेदनांचाच नाही तर ज्ञानेंद्रिये बाह्य जगाची जी माहिती देतात त्याचा अर्थ लावायलादेखील मेंदू सावकाश शिकत असतो. मोठे झाल्यानंतर आपण डोळ्यांनी समोरील दृश्य पाहतो. आणि समोर रस्ता आहे, गाड्या आहेत, रस्त्याच्या पलीकडे इमारत आहे, त्याच्या शेजारी झाड आहे, याचे ज्ञान आपल्याला होते. पण हे अचानक होत नाही. समोर जे काही दिसते आहे, त्याचा अर्थ लावायला आपला मेंदू शिकलेला असतो, म्हणून आपल्याला हे ज्ञान होते.

काही मुले जन्मांध असतात. त्यांच्या दोन्ही डोळ्यात काही विकृती असते, त्यामुळे जन्मापासून त्यांना काहीच दिसत नसते. मोठे झाल्यानंतर ही विकृती दूर करणारी शस्त्रक्रिया केली की त्यांना दिसू लागते. हिंदी सिनेमात आपण असे दृश्य बऱ्याचदा पाहतो. हिरोईनच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया होते, डोळ्यावरील पट्टी काढली की तिला समोर उभा असलेला हिरो दिसतो आणि ती त्याला मिठी मारते. हे केवळ सिनेमातच शक्य आहे. प्रत्यक्षात अशा शस्त्रक्रियेनंतर डोळ्यावरील पट्टी काढली की प्रकाश मेंदूपर्यंत पोचू लागतो पण त्याचा अर्थ मेंदूला समजतच नाही. समोर विविध रंग आहेत, त्यांचे पट्टे आहेत एवढेच दिसते. या रंगांचा आणि पट्ट्यांचा अर्थ म्हणजे झाड, घर, रस्ता किंवा हिरो आहे, हे शिकायला मेंदूला अनेक दिवस लागतात. एखादी नवीन भाषा शिकताना आपला मेंदू जे काही करतो, तसेच या वेळीही त्याला करावे लागते. आपल्याला न येणारी भाषा आपण ऐकली तर ते फक्त आवाज आहेत, इतकेच आपल्याला ,म्हणजे आपल्या मेंदूला कळते. त्या आवाजांचा अर्थ लगेच समजत नाही. कानावर आवाज पडणे आणि त्याचा अर्थ समजणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तसेच समोर काहीतरी दिसणे आणि त्याचा अर्थ समजणे याही स्वतंत्र गोष्टी आहेत. आपला मेंदू वयाच्या पहिल्या काही महिन्यात हे करू लागतो, त्यामुळे दृश्याचा अर्थ समजून घ्यायला आपल्याला प्रयत्नपूर्वक शिकावे लागले होते हे आपल्या लक्षात राहत नाही.

म्हणजेच डोळ्यांना जे काही दिसते, कानांनी जे ऐकू येते तसेच शरीरात ज्या संवेदना जाणवतात, त्यांचा अर्थ लावायला मेंदू सावकाश शिकत असतो. हे तो जे शिकतो त्याच्याच स्मृती तयार होतात. आपला मेंदू प्रत्येक क्षणी जगाची आणि शरीराची माहिती घेत असतो. त्या माहितीचा अर्थ लावून त्यावर प्रक्रिया करण्याचे कामही मेंदूत चालू असते, त्यातूनच विचार निर्माण होत असतात. त्यातून ‘स्व’ हा भाव विकसित होतो. मनात येत असलेल्या विचारांना आपण ‘स्व’संवाद म्हणतो .ही प्रक्रिया मेंदूत होते म्हणूनच शरीर, त्यातील पेशी बदलत गेल्या तरी ,बालवयातील शरीर तरुण झाले, प्रौढ झाले तरी ‘स्व’ तोच राहतो, बालपणांतील आठवणी वृध्द माणूस सांगू शकतो ते या ‘स्व’संवादामुळेच. आपण जागे असताना आणि झोपेतही मेंदूत एकाचवेळी अनेक कामे चालू असतात. त्यातील फार थोड्या गोष्टी आपल्या जागृत मनाला समजत असतात. आपण कसला तरी विचार करीत असतो, त्याचवेळी कुठेतरी खाज उठू लागते. ही संवेदना मेंदू जाणतो, ती चांगली नाही असा अर्थ लावतो आणि हाताला हुकुम देऊन तो खाजवायला लावतो. पण हे सारे आपल्याला समजतेच असे नाही. आपण आपल्या नकळत शरीराच्या अनेक हालचाली करत असतो, नखे खातो, हात पाय हालवतो, तोंड वेडेवाकडे करतो. शरीरातील संवेदना आपल्या जागृत मनाला फार कमी वेळ समजतात. पण मेंदू त्या सतत जाणत असतो, त्यांचा अर्थ लावत असतो आणि त्यांना प्रतिक्रिया करीत असतो.

प्रत्येक क्षणी बाह्य जगाची माहिती, शरीरातील संवेदना आणि मनातील विचार यांचे संयुग तयार होत असते, मेंदू त्याचा अर्थ लावतो आणि त्यानुसार शरीरात बदल करतो. प्रत्येक ज्ञानेंद्रिय, शरीरातील तीन यंत्रणा आणि विचार यामुळे एकाचवेळी अशी अनेक संयुगे तयार होत असतात. हे सर्व चालू असताना काहीतरी महत्वाचे घडते. तिकडे लक्ष वेधून घेण्यासाठी एखादे संयुग अधिक प्रबळ होते.त्या प्रबळ संयुगालाच आपण भावना म्हणतो. मनात येणारी प्रत्येक भावना ही ते संयुग आत्ता सर्वात महत्वाचे आहे असे सांगण्यासाठीच असते. प्रत्येक भावनेच्या संयुगात  शरीरातील संवेदना जोडलेली असते. संवेदनाशी निगडीत भावना  मोठ्या माणसातही अशा सेट झालेल्या असतात, त्या स्व ने निश्चित केलेल्या असतात, त्यांनाच आपण त्या माणसाचा स्व’भाव म्हणतो. एकच घटना वेगवेगळ्या माणसाच्या बाबत घडली तर प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असू शकते. एकाला तीव्र संताप येईल, दुसऱ्याला थोडासा राग येईल ,तिसऱ्याला वाईट वाटेल. प्रत्येकाचा हा पॅटर्न ठरलेला असतो, त्यालाच आपण त्याचा ‘स्व’भाव म्हणतो. कुणी रागीट असतो, कुणी चिंतातूर असतो, कुणी राग व्यक्त करीत नाही पण आतल्या आत घुसमटत राहतो. स्वभावाला औषध नाही, तो बदलता येत नाही असे समजले जाते. याचे कारण त्याचे मूळ अंतर्मनात, जाणीवेच्या पलीकडील मनात असते. बाह्य घटना, शरीरातील संवेदना आणि मनातील विचार या संयुगांतील घटना आणि विचार एवढेच आपल्या जागृत मनाला समजते, ते आपण बदलण्याचा प्रयत्नही करतो. पण या संयुगातील शरीरातील संवेदना जागृत मनाला समजत नाही, मेंदू मात्र ती जाणत असतो, आणि तिला ठरलेल्या पद्धतीने प्रतिक्रिया करीत असतो. मेंदू शरीरातील या संवेदनांचा जो अर्थ लावत असतो, तो काहीवेळा चुकीचा असतो, त्यामुळे असे होते. त्यामुळेच अचानक राग येतो, अकारण भीती वाटते. ही प्रतिक्रिया बदलायची असेल तर शरीरातील अधिकाधिक संवेदना जागृत मनाने जाणायला हव्यात, आणि त्यांना प्रतिक्रिया करण्याची पद्धत, पॅटर्न बदलायला हवा . हेच सजगता ध्यानाने, माईंडफुलनेस मेडीटेशनने केले जाते.

शरीरातील संवेदना याच माणसाच्या स्वभावाचे मूळ आहेत याचा शोध सर्वात प्रथम गौतम बुद्धाने लावला. आधुनिक मेंदूविज्ञान त्यालाच दुजोरा देत आहे. त्या तंत्राचा उपयोग मानसोपचार म्हणून करून घेत आहे. अशा मानसोपाचाराने स्वभाव बदलवता येतो, मनाच्या अस्वस्थतेचे मूळ कारण दूर करता येते, ते कारण असते संवेदनांचा चुकीचा अर्थ लावणे. नीरजची भूक लागल्यानंतर येणारी अस्वस्थता त्याला त्या संवेदनेचा अर्थ कळला की कमी होईल. पण मोठ्या माणसांना ज्या संवेदना जाणवतच नाहीत पण अस्वस्थता निर्माण करतात, ती दूर करण्यासाठी माईंडफुलनेस थेरपीच घ्यायला हवी.

इंग्रजी tags- dr. yash welankar

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 10 Comments

 1. यश वेलणकरांचे सर्वच लेख खूप आवडतात.

 2. Mindfulness therapy विषयी अधिक माहिती मिळाली तर बरे होईल

 3. स्वभाव बदलता येतो. खरेच आहे. पण. प्रयत्न कोणी करत नाही. किंवा म्हणा उत्सुकच नाही.

 4. वा मस्त स्वभावावर औषध सापडलं शेवटी

 5. खूप छान लेख. नवीन माहिती मिळाली. धन्यवाद.

 6. Nice article. Thanks !

 7. छान👌👌

 8. अप्रतिम लेख! विपश्यना देखील हेच सांगते आणि असेच परिणाम देते, नाही का?

 9. छान।

 10. उत्तम लेख.
  अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.
  धन्यवाद !