गेल्या महिन्याचे संपादकीय लिहित होतो तेव्हा माझ्या मनात ठाण्याच्या पुनश्च मित्र गाठभेटीतून आलेला उत्साह आणि पुण्याची पुनश्च मित्र गाठभेट कशी होईल याबद्दल हुरहूर अशा मिश्र भावना होत्या. आज मात्र मन समाधानाने काठोकाठ भरलं आहे. ठाण्यात २३ आणि पुण्यात २५ असे मिळून आता ४८ जण पुनश्च मित्र झालेत. या दोन दिवशी न येऊ शकलेलेही बरेच पुनश्च मित्र पुढील गाठभेटीत नक्की भेटतील असा विश्वास आहे. मित्र मानलं आहे म्हटल्यावर आता आपल्यात आभाराचे शिष्टाचार नकोत. बरोबर ना?

गेल्या महिन्याच्या प्रतिक्रिया बघत होतो. एक कुतूहलजनक गोष्ट नजरेस आली. जे लेख आपण निःशुल्क ( अवांतर/सोशल मिडिया/तंबी/डॉ यश ) देतो त्या लेखांवर प्रतिक्रिया खूप असतात, तसंच ते लेख खूप वाचलेही जातात. बरं प्रतिक्रिया देणारे आणि वाचणारे वाचक कोणी बाहेरून आलेले वाचक नसतात, ते सशुल्क सभासदच असतात. पण सशुल्क लेखांना मात्र तुलनेने प्रतिसाद कमी मिळतो. असं का होत असेल? वाचकांना login करून लेख वाचण्यात अजूनही अडचण येत्ये का? कारण ‘पासवर्ड बदला’ या पेजला महिन्यात सगळ्यात जास्त व्हिजिट्स असतात. तांत्रिक बाबतीत आपल्या app किंवा site ला ‘एकदम मस्त’ ते  ‘खूप अडचण आहे’ अशा टोकाच्या प्रतिक्रिया मिळतात. अलीकडे स्टोरीटेल ( ऑडीओ स्वरुपात पुस्तक/लेख ऐकण्याची सोय असलेले app ) नावाच्या एका मल्टीनॅशनल कंपनीच्या भारतातील प्रमुखाला ( श्री. योगेश दशरथ यांना) भेटण्याचा योग आला. १५ देशात त्यांचे app वापरले जाते आणि वार्षिक उलाढाल २००० कोटींच्या घरात होते. भारतात त्यांचे  सभासदत्व शुल्क तीनशे रुपये ‘मासिक’ आहे. आपल्या वर्षात शंभर रुपये शुल्कावर त्यांनी त्यांची नाराजी दर्शवली. जवळपास दोन तास माझ्याशी गप्पा मारल्यावर ‘पुनश्च या उपक्रमात दम आहे आणि तुमचे app ही वरच्या दर्जाचे आहे’ असा त्यांचा अभिप्राय घेऊन निघताना एका बाजूला छान वाटत होतं पण दुसऱ्या बाजूला शंभर रुपये शुल्क ठेवूनही आपले आजवर फक्त १२०० सभासद झाल्याचं शल्यपण टोचायला लागलं होतं. पुण्याच्या पुनश्च मित्र गाठभेट कार्यक्रमातसुद्धा कोणीही तांत्रिक अडचणी असल्याचं सांगितलं नाही. पण अनेक जणांना महिन्यात पासवर्ड बदलावा लागतोय हेही सत्य कोड्यात टाकणारं आहे. आपल्याकडे हा असा सशुल्क लेख वाचण्याचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. लोकांना अजून याची सवय झालेली नाही. अशी कारणं कोणी देऊ शकतो पण त्याने मूळ परिस्थितीत खूप काही फरक पडणार नाही. आपल्या सर्वांचे यावर विचार कृपया कळवा. पुढची दिशा ठरवण्यासाठी तुमच्या सूचनांचा खूप उपयोग होईल.

गेल्या महिन्यातील नरहर कुरुंदकरांच्या लेखाला खूप छान प्रतिसाद मिळाला. त्यांचा लेख पुनश्चवर घ्यायचा होताच पण तो असा जरा ‘हटके’ असावा असं वाटत होतं. हा लेख वाचला आणि वाटलं ‘मिळाला’. त्या लेखाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘हल्लीच्या काळाच्या’ ( म्हणजे कशा ते मी सांगायची गरज नाही. तुम्ही सर्व सुज्ञ आहात. ) पार्श्वभूमीवर आनंद साधले आणि कुरुंदकर सर यांच्यातील सहिष्णू मैत्र अधिक उठून दिसले. एक मित्र दुसऱ्याला आपण लिहिलेली कादंबरी अभिप्रायार्थ पाठवतो. दुसरा सडेतोडपणे आपल्याला त्या पुस्तकाबद्दल काय वाटलं ते विस्तृतपणे कळवतो आणि पहिला मित्र उदार मनाने ती टीका स्वीकारतो, एवढंच नव्हे तर मासिकात प्रसिद्ध करतो. सगळंच अजब, नाही का? आमच्या निवडीला तुम्ही सर्वांनी दाद दिलीत त्याने आमचा उत्साह अजून वाढला आहे.

मात्र गेल्या महिन्यातील सोनोपंत दांडेकरांच्या लेखाला तेव्हढा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजे तो वाचलाच गेला नाही. महाराष्ट्रातील थोर व्यक्तींची/संस्थांची माहिती सर्वांना व्हावी म्हणून आपण व्यक्ती/संस्थाविशेष हे सदर चालवतो. त्यात अशाच व्यक्तींवर लेख घेतो ज्यांना म्हणावं तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यामुळे ज्यांनी तो लेख वाचला नसेल त्यांनी तो अवश्य वाचावा.

आता पुढील महिन्यातही आपण असेच छान छान लेख घेऊन येणार आहोत. अरुण टिकेकर, अनिल अवचट यांसारख्या लेखकांचे लेख आहेतच. शिवाय गणेशचतुर्थी निमित्त दोन विशेष लेख पण आहेत. ‘समाजकारण’ सदरात महंमद फारुख खान यांचा ‘गोषा’ हा लेख या महिन्याचा तारांकित लेख असेल. वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

पुनश्च चे नीट मार्केटिंग होत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार होती. त्यासाठी सर्व पुनश्च मित्रांच्या सूचनेनुसार एक तयार मेसेज खाली देत आहे जो copy paste करून आपापल्या मित्रांना/नातेवाईकांना whatsapp वर पाठवा. शक्यतो ग्रुपवर पाठवू नका. नीट निवडून, वाचनाची आवड असणाऱ्यांनाच हा मेसेज पाठवलात तर चांगला उपयोग होईल. मेसेज खालीलप्रमाणे =>

“मराठी भाषेचे काय होणार???” अशी चिंता करीत नुसते बसून राहण्यापेक्षा त्यासाठी काही करता आले तर….? बोलण्यापेक्षा कृती महत्वाची असे मानून आपल्या मतीने, कुवतीने एक चळवळ सुरु झाली. मराठी साहित्यातील एक आधुनिक चळवळ…पुनश्च. मराठी साहित्याचे नुसते जतन, संवर्धन न करता ते जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचवण्याची चळवळ.

उत्तम साहित्य विचार देते. विचार माणसाला कार्य करायला प्रेरणा देतात. आणि कार्यातूनच समृद्धी निर्माण होते. मराठी भाषा तेव्हाच समृद्ध होईल जेव्हा मराठी माणूस समृद्ध होईल. म्हणूनच त्या मराठी माणसापर्यंत उत्तम साहित्य, प्रेरक विचार  पोचवायला हवे. त्यासाठी सुरु झाले ‘पुनश्च’ – मराठीतील पहिले सशुल्क डिजिटल नियतकालिक. वर्षभरात शेकडो लेख फक्त १०० रुपयात. मीही याचे सभासदत्व घेतले आहे. आपणही घ्या आणि उत्तम मराठी साहित्याचा आनंद घ्या. सभासदत्वासाठी 9152255235 या whatsapp नंबर वर ‘पुनश्च/punashcha’ असे लिहून मेसेज करा. आणि हो…आपल्या परिचयातील वाचकांपर्यंत हा मेसेज पोचवा. 

Leave a Reply

This Post Has 13 Comments

 1. लेखाची तारीख काय ते समजत नाही, कृपया।तारीख टाकलीत तर बरं होईल

 2. अचहुत गोडबोले यांचे लेख प्रकाशित करत जावे .

 3. फारच छान लिहलय मुम्बई पुण्यापासून दूर असलेल्या ससभासदांना प्रत्यक्ष हजर असल्याचा भास होतो ईतक सुन्दर लिहल आहे लोक 100 रू देवून सभासद व्हायला का आळस करतात हे अनाकलनीय आहे पुनश्चला शुभेच्छा

 4. छान आहे फारच ऊपक्रम.मठी भाषा असे वाटायचे आमच्या आणि अजुन एका पिढी नंतर लुप्त होईल कि काय अशी भिती मनात असताना अचानक अल्लादिनचा चिराग म्हणजेच पूनश्च सापडले .नाव पण अगदी सार्थ आहे

 5. खर सांगायच तर मला फारच आनंद होतो आहे की आपण ही एक छान संकल्पना घेऊन आला आहात. मी आजच सुरूवात करतो आहे. त्यामुळे एक , दोन दिवसात लेख वाचून नक्की अभिप्राय देईन. तोपर्यंत आपले मनपूर्वक अभिनंदन.

 6. १. पासवर्ड लक्षात ठेवला जात नाही – मी win10, moz ff वापरतोय. काय कारण माहीत नाही, पण login लक्षात ठेवलं जात नाही… इतक्यात नाही, पण, स-शुल्क लेख वाचतांना login करावं लागतं, की जे लक्षात ठेवणे/फाफोच्या स्मरणात असणं अपेक्षित असतं. २. बदल होत नाही… मंगला गोदाबोलेंचा तो लेख – आंब्यावरचा (c) पुस्तकात आहे, संदर्भ देऊनही संकेतस्थळावर आधीचेच आहे. ३. भाषा कठीण वाटते. अर्थात, हा आपला दोष नव्हे. मूळलेखच तसे असावेत. ४. सारेच विषय सगळ्यांना भावातीलच असे नाही. ५. वैयक्तिक आवडीने, तंबीदुराई म.टा.तच (कोंदणात) वाचावेसे वाटत होते. वेलणकर लोकमत मध्येही भेटतात. ५. मराठी प्रतिक्रिया, भाषेच्या वळणाने तसेही अवघडच. – पुन: वैयक्तिक. बाकी मजा येतेय. धन्यवाद.

 7. आपणांस,या बाबत आवाहन करावे लागणे,त्रासदायक आहे खरे। परतु माटे,सोनोपंत दांडेकर या मान्यवरांची अताच्या तरूण पिढीला माहिती असेलच असॆ मला वाटत नाही मह
  म्हणून निराश न होता चिकाटी ने प्रयत्न करणे गरजेचे आहे

 8. आशयपूर्ण आणि विचार करायला लावणारा लेख आहे.
  १०० ₹ शुल्क फार नाहीच.तरी केवळ १२०० सभासद संख्या हे विचारदारिद्र्याचे लक्षण आहे
  दुसरी गोष्ट अशी की लाॅगिनबाबत मला आपण व्यक्तिश: मार्गदर्शन केले.अगदी फोनही करायची तयारी दाखवली.
  पण मी तितका तंत्रस्नेही नसल्याने मला जमले नाहीच.
  नाद सोडला.
  “आपले सभासदत्व यश वेलणकर,तंबी………..आहे”
  अशी टीप येते .मग पुढे काहीच नाही.
  पण इतर लेख मी नियममित वाचतो.त्यावेळी सशुल्क लेखही सहज उपलब्ध होतात.अभिप्राय प्रत्येक वेळी नाही देत.
  तण मी पुनश्च बाबत अतिशय समाधानी आहे.
  बाकीच्या अडचणी माझ्या मर्यादा अधोरेखितकरतात इतकेच!
  धन्यवाद!

 9. पुनश्च चे मार्केटिंग करण्यासाठी व्हॉट्स अँपवर मेसेज पाठवण्या शिवाय आपण काही करतोय का ? जिथे साहित्य, कला याबाबत आस्था, आपुलकी,आवड असलेले लोक एकत्र येतात अशा कार्यक्रमांचे व्यासपीठ किमान जागा पुनश्च च्या प्रसारासाठी वापरता येईल।
  महाविद्यालयात साहित्यिक उपक्रम करणाऱ्या प्राध्यापकांची मदत घेता येईल
  वर्तमानपत्रांच्या स्थानिक पुरवण्यात विशेषतः मुंबई, पुण्याबाहेरच्या पुनश्च बाबत माहिती लेख छापून आणले तर उपयोग होईल.
  मुंबई, ठाणे,पुणे ,नाशिक अशा शहरांमधे जिथे पुनश्च चे सभासद आहेत त्यांच्या मदतीने पुनश्च प्रमोशनसाठी साहित्यिक मुलाखत,चर्चा, परिसंवाद असे कार्यक्रम घडवून आणता येतील.
  पुनश्च डिजिटल माध्यम असले तरी प्रचार,प्रसिध्दीसाठी मुद्रित आणि अन्य माध्यमांवर भर द्यावा लागेल .
  यातील कोणत्याही उपक्रमात मी स्वतः सहभागी होऊ शकेन. धन्यवाद

 10. वाचक संख्या कमी असण्याचं महत्वाचं कारण हे ही असू शकत की डिजिटल वाचन हे थोडं अवघड आहे. अजूनही बरेचसे वाचक छापील वाचन करणं पसंत करतात करण ते सोयीचं आणि सवयीचं आहे. हा माझा अनुभव आहे. बरेचदा मला पण कॉम्प्युटर किंवा मोबाईल वर वाचायचा फार कंटाळा येतो. छोटे लेख तरी ठीक आहे पण 5000 वैगेरे शब्दसंख्या असलेले लेख डिजिटली वाचायचे म्हणजे फार जीवावर येतं.