‘एखाद्या प्रश्नाचं निश्चित असं उत्तर देता येत नसेल तर प्रश्न विचारणाऱ्यालाच गोंधळात पाडायचं…’ असं जागतिक तत्वज्ञान सांगतं.

कदाचित सांगत नसेलही, परंतु जागतिक स्तरावरचं कुणीतरी सांगतो म्हटल्यावरच आपण ते गंभीरपणे घेतो. समजा हेच वाक्य मी माझं म्हणून सांगितलं, तर कोण कशाला ते लक्षात ठेवेल? पण ‘व्हॉल्टेअर असं म्हणाला होता…’ हे वाक्याच्या सुरूवातीला जोडलं की त्या वाक्याचं वजन वाढतं. तो जो कोण व्हॉल्टेअर वगैरे आहे, तो नेमका कोण आहे?  तो खरंच असं म्हणाला होता का? वगैरेची चौकशी करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. आपल्यावर सध्या सोशल मिडीयातून माहितीचे प्रपात एवढ्या वेगात आणि एवढ्या बाजूंनी धबाधबा कोसळत आहेत की विचार करायला वेळच मिळत नाही. त्यामुळं दचकायचं, घाबरायचं आणि धास्तावून जायचं एवढंच आपल्या हाती आहे. त्यातही  घरात नक्षलवादावरची वाचायला आणलेली पुस्तकं सापडली तर आपल्यालाही नजरकैदेत ठेवलं जाईल या भीतीनं लोक आता पुस्तकंही घरात ठेवत नाहीत. त्यामुळे व्हॉट्सअप आणि फेसबुक हेच आपले गुरु झालेले आहेत.

राजकारणानंतर सध्या सर्वात चलती असलेला विषय कुठला असेल तर तो आहे आरोग्याचा. सगळ्यांनाच तंदुरूस्त रहायचं असतं, दीर्घायुषी व्हायचं असतं, कायम प्रफुल्लीत दिसायचं असतं…आणि कानात सांगायचं तर  वाढत्या वयातही सेक्शुअली कार्यरत रहायचं असतं. याबाबतीतले हजारो प्रश्न आणि लाखो शंका आपल्या मनात असतात आणि त्यांची निश्चित अशी उत्तर कोणापाशीच नसतात.

कुठल्याही आजाराची लक्षण आपण वृत्तपत्रात वाचली,टीव्हीवर ऐकली किंवा व्हॉट्सअप,फेसबुकवर वाचली तर आपल्याला नक्कीच तो आजार झाला आहे असं वाटू लागतं. तसंच मानसिक आरोग्याबाबतही आहे. त्याची माहिती वाचता वाचताच आपली खात्री पटते की आपण मानसिक रूग्ण आहोत. अनेकदा तर आपल्या भोवतीची सगळीच माणसं मानसिक रूग्ण आहेत असं वाटू लागतं. खरं वाटत नसेल तर मी अशा काही लक्षणांची माहिती देऊ शकतो, ती वाचून तुमची नक्कीच खात्री पटेल.

उदाहरणार्थ, ‘तुम्हाला भयगंड झालेला आहे का?’ अशा शीर्षकाचा लेख असतो. त्यात काही प्रश्न विचारलेले असतात – ‘तुम्हाला सतत भीती वाटते का? तुम्ही सतत दडपणाखाली असता का? आपण जे करतोय ते चुकीचं करतोय अशी भावना तुमच्या मनात सतत येते का? एखादं कृत्य केल्यावर तुमच्या मनात अपराधीपणाची भावना येते का? या सर्व प्रश्नांची किंवा यापैकी पन्नास टक्के प्रश्नांची उत्तर होकारार्थी असतील तर तुम्हाला भयगंडानं पछाडलेलं आहे. तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची गरज आहे.’ हा लेख किंवा ही लक्षणं तुम्ही आयुष्यात कधीही वाचली नाहीत, तर तुमच्यासारखे सुखी आणि नशीबवान तुम्हीच. परंतु एकदा का ती तुम्ही वाचली, की तुमचं रूपांतर पेशंटमध्ये होतं.

आपण आता क्रमानं भयगंडाच्या एकेका लक्षणाचा समाचार घेऊन बघू- पहिला प्रश्न आहे. ‘तुम्हाला सतत भीती वाटते का?’

अर्थातच आपण मनातल्या मनात या प्रश्नाचं चट्कन होकारार्थी उत्तर देतो. कारण आपल्याला सतत भीती वाटत असतेच. घरात, कार्यालयात  भीतीचा सुक्ष्म व्हायरस लपलेला असतोच. ‘बायको काय म्हणेल? आईला कसं वाटेल?,  नातेवाईक काय विचार करतील?, समाजात काय प्रतिक्रिया उमटतील?…’ अशी भीती वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला वाटत असतेच. साधं बायकोला चकीत करायला म्हणून एखादी साडी घेतली तर साडीचा रंग बायकोला आवडेल की नाही? तिला असं मोठ्या फुलांचं डिझाईन चालेल ना? आपण भाव न करता साडी घेतली ती महाग तर पडलेली नाही ना? अशी भीती आपल्याला वाटत असते. सकाळी बोलताना आपण बायकोची बाजू घेतली तर, आई रागावली असेल का?… मुलाला काल नवीन मोबाइलसाठी नाही म्हटलं आपण ! … भीती, भीती आणि भीती..! सतत भीती वाटत असतेच. तेव्हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण शंभर टक्के होकारार्थी देतो. या पहिल्या प्रश्नातच पुढील सर्व प्रश्नांचीही होकारार्थी उत्तरं आहेत हेही तुमच्या लक्षात येईल. वाटल्यास पडताळून पहा. काय प्रश्न होते?

तुम्ही सतत दडपणाखाली असता का? आपण जे करतोय ते चुकीचं करतोय अशी भावना तुमच्या मनास सतत येते का? एखादं कृत्य केल्यावर तुमच्या मनात अपराधीपणाची भावना येते का? …बघा, सापडलात ना जाळ्यात मानसोपचार तज्ज्ञाच्या? ठरलात ना तुम्ही भयगंडाचे रूग्ण?

मानसिक अनारोग्य हा ‘बाप दाखव नाही तर श्राध्द घाल’,असा रोखठोक मामला नसतो; तर ‘तू श्राध्द घाल, बाप नाही हे मी सिध्द करतो,’ असा उफराटा खेळ असतो. मानसिक विकारांमधला सगळ्यांचा बाप म्हणावा असा विकार आहे तो डिप्रेशनचा, अर्थात नैराश्याचा. नैराश्याच्या लक्षणांचा हात धरून जर रोगनिदान करायचं झालं तर, पाळण्यात झोपलेल्या सहा महिन्याच्या मुलालाही आपल्याला डिप्रेशनचा रूग्ण ठरवता येईल, एवढी ती लक्षणे सर्वसामान्य असतात. तुम्हाला रात्री अंथरूणावर पडल्या पडल्या झोप यायला हवी हा तंदुरूस्तीचा साधा सोपा नियम. पण जवळपास प्रत्येकाच्याच बाबतीत तो खोटा ठरतो. म्हणजे दहापैकी चार दिवस आपण पडल्या पडल्या लगेच झोपतो. पण उरलेल्या सहा दिवसांत तसं होत नाही, याची खूप वेगवेगळी कारणं असू शकतात-

नोकरीचा कॉल आला याचा आनंद!

इंटरव्हूव मनासारखा नाही झाला, त्याची निराशा!

ती हो म्हणाली याचा आनंद!

तीनं नकार दिला याचं दुःख!

चांगली पगारवाढ मिळाली याचा आनंद!

आपल्यापेक्षा इतर कुणाला तरी जास्त वाढ मिळाली, खरं तर आपण जास्त करतो…याची निराशा!

आपल्या लेखावर चार फोन आले याचं समाधान!

एवढी माहिती गोळा करून मेहनत करून लिहिलं,तरी कुणाला कदर नाही. एकही फोन नाही. हे असमाधान!

आजचं गाणं छान रंगलं. मस्त सूर लागला!

आज नवऱ्यानं स्वैपाकाचं मनापासून कौतुक केलं!

मुलाला चांगले मार्क पडले. त्याच्यावर घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं!

खूप दिवसांपासून या पुस्तकाच्या शोधात होतो. आज मिळालं!

वाह..मस्त सिनेमा होता. आपल्याकडे अशा फिल्म्स का नाही होत! …

ही आणि अशी हजारो कारणं असतात, ज्यामुळं आपली तात्पुरती झोप उडू शकते. रात्री अंथरूणावर आपण जेव्हा अंग टाकतो तेव्हा ‘आजचा दिवस संपला, चला जरा आजच्या दिवसाचा हिशेब करूया’ असं म्हणत आपण स्वतःच्याही नकळत दिवसाचा जमाखर्च मांडत असतो. त्यात जमा जास्त असेल तर त्या आनंदामुळं आपण पुढची स्वप्न पाहू लागतो आणि त्यामुळं झोप लागत नाही. खर्चाची बाजू मोठी असेल तर निराशेनं मन काळवंडतं आणि या अपयशातून बाहेर पडण्याचं प्लॅनिगं आपण करू लागतो, त्यामुळंही झोप लागत नाही. परंतु दहापैकी किमान चार दिवस तरी असे असतात की आपलं शरीर श्रमानं थकलेलं असतं आणि त्या दिवशी ते जमाखर्चाचा हिशेब मांडण्याच्या भानगडीत न पडता, थेट झोपण्याचा आदेश देऊन शरीराच्या विश्रांतीची गरज पूर्ण करतं. हा सगळा खेळ वर्षानुवर्ष सुरू आहे. त्याचा मानसिक आजाराशी संबंध जोडण्याचा खटाटोप करणं हाच मुळी एक आजार म्हणावा लागेल.‘तुम्ही मानसिकदृष्ट्या आजारी आहात आणि ही बघा त्याची लक्षणे’, असं परत परत कोणी सांगत राहिलं, तर आपसूकच त्याचा परिणाम होतो.

‘तुळशीची पाने खाल्ल्यानं कर्करोग बरा होतो’ असं ठासून सांगण्यापासून तर ‘महापालिकेत अवघ्या पाच मिनिटात जातीचा दाखला आता आपल्या हाती येतो’, अशा वाट्टेल त्या थापा सोशल मिडीयावर मारल्या जात आहेत. ‘फ्रान्समध्ये ९५ टक्के जोडपी आठवड्यातून तीन वेळा सेक्स करतात, म्हणून मानसिकदृष्ट्या फ्रान्स हा सर्वाधिक समाधानी देश आहे,’ अशी माहिती कुणी फॉरवर्ड केली  तर तीही लोक गंभीरपणे घेतात. कारण सध्या आपल्या देशाला ‘सोशल मिडीयाच्या देश’ म्हटलं जात आहे. डिजिटल इंडियाचं स्वप्न कसं का होईना पूर्ण होतंय, हे मात्र खरं आहे.

**********

तंबी दुराई

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 11 Comments

  1. लेख आवडला. लेखकाच्या विचाराशी पुर्णत: सहमत आहे.

  2. भयगंडाची उदाहरणे खूपच अप्रतिम. मात्र हसता हसता social media वर केलेलं भाष्य अंतर्मुख करणारं

  3. झकास लेख! मानसशास्त्राचे उदाहरण तर अफलातून!!

  4. अप्रतिम लेख..

  5. अप्रतिम लेख …जर media आणि social media बंद ठेवला तर आयुष्य आजही सुंदर वाटतं

  6. खुसखुशीत, बाळकडू आधी गूळ देऊन कार्यसिद्धीस नेणारा लेख छान वाटला. डिजिटल इंडियाची शेवटची कोपरखळी सतत मान खाली घालून काचेवर बोटे घासणा-यांना सद्गती देवो.

  7. सोसंल तितकं सोशल

  8. सोशल मिडियाचं भूत बाटलीतून बाहेर आपणच काढलंय,आता सोसेल तितकं सोसायचं 😀

  9. बोधपर अन वास्तव लेख आहे,सोशल मीडीया अॅडिक्शन हाच आजार प्रमुख बनलाय…..

  10. अगदी खरंय. (स्वघोषित ) शहाणी माणसे तरी थोडा विचार करतील का? या काळातहीआपण किती गतानुगतिक आहोत !