हल्लीं ब्राह्मण जातीस मोठा अभिमान आहे. त्यांस असें वाटतें कीं, आम्ही श्रेष्ठ, आमच्यासारखा कोणी पृथ्वीवर नाहीं. इतर लोक कसेही असले तरी आमची योग्यता पावणार नाहींत.

परंतु जातीविषयीं कोणी गर्व करूं नये. आपलें कर्म तशी आपली जाति आहे. जात म्हणजे कर्मावरून योग्यता. क्षत्रिय म्हणजे त्यांनीं युद्ध करावें, ब्राह्मण म्हणजे त्यांनीं विद्या करावी. सोनारांनीं सुवर्णाचें काम करावें. परीट यांणीं वस्त्रें धुवावीं. हींच कामांची नांवें आणि जात. जातीची कांहीं वेगळी खाण नाहीं. सर्वांचे मूळ एक याविषयीं तुकारामाचा अभंग असा-

तुम्ही नका करूं गर्व। नीज जाती म्हणुनी सर्व॥

शुक्रशोणिताची खाणी। तुम्हा आम्हा एकच योनी॥

रक्तमांस चर्महाडें। सर्वां ठायीं सम पाडें॥

अन्नउदक घरोघरीं। निष्ठा नाहीं हो दुसरी॥

तुका म्हणे हेंचि खरे। नाहीं देवाशीं दुसरें॥1॥

याजवरून उघड न्याय होत आहे कीं, जातीचा अभिमान मानणारे मूर्ख आहेत. आणि जाति व्यवहारावरून आणि कर्मावरून झाल्या आहेत, यांत संशय नाहीं, येविषयीं मनूचें वचन आहे कीं, ब्राह्मणाचा शूद्र होतो आणि शूद्राचा ब्राह्मण होतो-

(अध्याय 10 वा)

शूद्रायां ब्राह्मणज्जात: श्रेयसा चेत् प्रजायते।

शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्‍चैति शूद्रताम्।

क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यास्तथैव च॥ (65)

(अध्याय 7)

कुबेरश्‍च धनैश्‍वर्य ब्राह्मण्यं चैव गाधिज:॥ (42)

इत्यादि वचनेंकरून असें सुचविलें आहे कीं, धर्माचे फेरफारानें क्षत्रियाचा ब्राह्मण होतो, शूद्राचा ब्राह्मण होतो, असें आहे.

मग आतां जे दुसरें जातीचे लोक ब्राह्मणांचा गर्व हरण करण्याकरितां बळेंच नमस्कार करितात, बळेंच अग्निहोत्र घेतात, इत्यादि खटपट करितात. आणि ब्राह्मणांचें कर्म कोणी सुखानें करणार नाहीं. वास्तविक त्यांत सुख नाहींच; फार उपद्रव. त्रास व कष्ट आहेत; परंतु तितकेंही सहन करून नीच जातीचे लोक ब्राह्मणपणा मिळविण्याकरितां जों जों खटपट करितात, तों तों ब्राह्मण चिडतात आणि दोघांचे वादविवाद सुरू होतात. त्यांत अर्थ पाहिला तर काहीं नाहीं. माझे मतें हल्लींचे ब्राह्मण आणि नीच जातीचे लोक हे दोघेही एकसारखेच आहेत. कारण कीं, उंच म्हणविणारे यांचीं व नीच म्हणविणारे यांचीं कर्में समान आहेत. येविषयीं प्रमाण-

त्र्यहेण शूद्रीभवति ब्राह्मण: क्षीरविक्रयात्।

इत्यादिवचनें धर्मशास्त्रांत आहेत. त्याप्रमाणें म्हटलें, तर सर्व ब्राह्मण कांही तरी दोषानें शूद्राचे योग्यतेस आले आहेत. आतां कुळाचार मात्र राहिला आहे. दोरी जळाली पण पीळ राहिला. तसें हें आहे.

ब्राह्मणांस आपलें कर्म कांहीं ठाऊक नाहीं. सर्व प्रकारचा व्यापार, चाकर्‍या धंदे, हे करतात; विद्याशून्य व ज्ञानशून्य आहेत, हे ब्राह्मण कशाचे? असें असतां अभिमानाकरितां दुसरे लोक झटतात, हेंही अज्ञान आहे. असो, भले लोकांनीं जातीचा अभि-मान कधीं करूं नये, त्यांत काहीं हशील नाहीं. लोकांस असें वाटतें कीं, ब्राह्मणांनी रामोशाची सोयरगत करावी काय? तर असें नव्हे. साधारणत: असें कधींही होणार नाहीं. जे ब्राह्मण आहेत, ते ब्राह्मणांतच बहुधा सोयरगती करतील. ब्राह्मणांची सोयरीक मिळेल ती टाळून बळेंच परिटाचे घरांत शिरणें जरूर नाहीं. व कोणी तसें करणार नाहीं. जा लोकांमध्यें जाति नाहींत, त्या लोकांमध्येंही असें करीत नाहींत. मोठा मुसलमान मोठे मुसलमानाशींच संबंध ठेवितो. ही परंपरा चाल आहे, बळेंच कोणी अगदीं शेवटल्याचे घरीं जात नाहीं.

यास्तव जातिअभिमान सोडला, तरी जाति कायम राहतील. यात संशय नाही; परंतु तंटे व भांडणे मोडतील. मत्सर करणार नाहींत. इतका फायदा होईल. सर्व लोक एकत्रपणानें वागतील. ब्राह्मण असें म्हणणार नाहींत कीं, अमका तो महार आहे, त्याचें तोंड पाहूं नये. त्याचा विटाळ होतो. हा वेडेपणा मात्र जाईल. मग तो महार अर्थातच ब्राह्मणांचे गर्विष्ठपणाचे शब्द ऐकून नीट इंग्रजांचे घरी जातो आणि म्हणतो, ब्राह्मण आतां फार माजले. मी त्यांस हात दाखवीन. इंग्रज लोकांचे फौजेंत नीच जातीचे लोक फार असतात; कारण त्यास ब्राह्मण लोक तुच्छ मानतात, त्यास उष्टें खावयास घालतात व केवळ जनावरांप्रमाणें समजतात. याजमुळें त्यांस उपाय सुचतो, तो ते करितात. आणि ब्राह्मणांचें काम काढितात, हा परिणाम जातिअभिमानाचा आहे. ब्राह्मण आपसांतदेखील फुटले आहेत. देशस्थ, कोकणस्थ, पळशे, कुडाळे, जौळ, खिस्ती, तीरगुळ, कराडे, किरवत, शेणवी, इत्या-दिक ब्राह्मणांच्या जाती असून, त्यांचे दरम्यान अनेक विपर्यास आले आहेत. आणि ते परस्परविवाह करीत नाहींत, ही चाल वाईट आहे.

ब्राह्मणांशीं ब्राह्मणांनीं खुशाल सोयरीक करावी. त्यांस त्याविषयीं अटकाव असूं नये. जर कोकणस्थाची जात मिळेल, तर कोकणस्थानें कोकणस्थाची सोयरीक करावी; परंतु देशस्थाची करण्यास प्रतिबंध नसावा. जसें जास सोईचें वाटेल, तसें त्यांनें करावें. बहुधा जो तो आपले जातीची आणि आपले देशाची मुलगी करील, हे उघड आहे. जरी प्रतिबंध नसला, तरी दक्षणचा रहाणार गुजराथ्याची मुलगी करणार नाहीं, हे उघड आहे; परंतु याचा प्रतिबंध नसावा. आतां जातीचे फार भेद जहाले. मराठे लोकांतही जातकुळाचा भेद, ब्राह्मणांचा पाहून झाला आहे. सात कुळांतील मराठी विधवेचें लग्न करीत नाहींत. हा सर्व मूर्खपणा आहे. यांत कांहीं शहाणपण नाहीं; परंतु लोकांस जे मोठे वाटतात, त्याप्रमाणें ते चालतात. यास्तव हे लोक अभागी आहेत. ईश्‍वर त्यांस सुबुद्धि देवो.

लेखक- गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी

शतपत्रे, वर्ष-१८४८ 

 

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 5 Comments

  1. जाति अभिमान सोडला तर जाति भेद कायम राहील पण भांडण तंटे कमी होतील हे विधान पटले.

  2. जात कर्मावरुन ठरते असे म्हणताना ब्राम्हण आणि नीच जातीचे असा उल्लेख करण्याचा उद्देश कळला नाही. पण नक्कीच जातीविषयक द्दष्टिकोन बदलणारा लेख आहे

  3. आजही relevant असणारा लेख आहे.

  4. लोकहितवादीचा विचार काळाच्या पुढचा विचार होता हे आज सिद्ध झाले आहे.
    ही सर्व शतपत्रे (शत असले तरी त्यांची संख्या शंभराहून अधिक आहे) आम्ही एम ए ला असतांना अभ्यासक्रमात होती

  5. आजही हे विचार तंतोतंत लागू आहेत. मनुस्मृतीमध्ये सामाजिक परिस्थितीवर खूप उपयोगी भाष्य केले आहे हे या लेखात उद्धृत केलेल्या श्लोकांंवरून स्पष्ट होते.