त्या घटनेला काही वर्षे लोटली. अशा प्रकृतीच्या आणि प्रवृत्तीच्या व्यक्तिंचे भारतात पुढे जे काही होते तेच रामभाऊंचे झाले. लोक रामभाऊंना आता प.पू.पळवे महाराज म्हणूनच ओळखतात. पळणे आणि पळवणे यामागे किती गहन अध्यात्मिक अर्थ दडलेला आहे हे लोकांच्या हळूहळू  म्हणजे आस्तेकदम लक्षात आले आणि मग लोक त्यांना पळवे महाराज म्हणू लागले. दहीहंडीच्या दिवशी होणारे त्यांचे भाषण ऐकायला लोक आता तिकिट काढून येतात. रोजच्या जगण्यातील लहान-सहान प्रश्नांवर ते आपल्या भाषणात असे काही तोडगे सुचवतात की त्या तोडग्यांची त्रिखंडात चर्चा होते. तसंही तोडगा या शब्दातील तोड ही पहिली दोन अक्षरं त्यांना आधीपासूनच प्रिय होती. त्या दोन अक्षरांसोबत पाणी हा शब्द जोडूनच ते गुजराण करत होते. जेहत्ते कालाच्या ठायी एकेकाळी ते केवळ महाजनांचे चालक होते परंतु काळाच्या ओघात आता ते बहुजनांचे पालक म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. ते जेव्हा चालक होते तेव्हा त्यांच्या मालकांना सतत कुठेतरी जाण्याची, कुठेतरी पोचण्याची घाई असे. त्यामुळे ते सतत “रामभाऊ पळवा जरा” असं म्हणत असंत. तेव्हापासूनच त्यांच्या मनात ‘पळवा’ या शब्दानं घर केलं होतं. पळणे, पळवणे हेच आपले आयुष्य आहे असे त्यांना तेव्हापासूनच वाटत होते. आज आपण जे काही आहोत ते केवळ त्याकाळी आपण धनी सांगेल त्याप्रमाणे पळवत होतो म्हणूनच आहोत, हे त्यांना स्वतःच्या मनाशी चांगलेच ठावूक आहे. त्यांनी तर आपल्या आश्रमातील भिंतीवर सुविचारच लिहून ठेवलेला आहे- ” पळवल्याने होत आहे रे, आधी पळवलेची पाहिजे.”

आपल्या मालकाला सतत कुठेतरी पोचवून पोचवून त्यांच्यात एवढा आत्मविश्वास निर्माण झाला की पुढे कालौघात ते सतत कुणालातरी पोचवण्याच्या कामातच व्यस्त झाले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी दहिहंडी उत्सवात आपल्या या पळवण्याच्या गुरूमंत्राचा जाहीर उच्चार केला तेंव्हा कोण वादळ उठले. परंतु वादळे जशी उठतात तशीच बसतातही. रामभाऊंचे महात्म्य लोकांच्या हळू हळू लक्षात आले. पळवणे हा मंत्र जीवनाच्या प्रत्येक व्यवहारात कसा उपयोगी आहे हे लोकांच्या हळूहळू लक्षात येऊ लागले. राजकीय पक्षांना एकमेकांचे पैसेवाले आणि निवडून येऊ शकतील असे नेते पळवायचे असतात. वाहिन्यांना एकमेकांचा टीआरपी पळवायचा असतो. वृत्तपत्रांना एकमेकांचे वाचक पळवायचे असतात. कलावंत जेव्हा सतत एका सेटवरून दुसऱ्या सेटवर पळत असतात तेव्हाच त्यांचे वजन वाढते. चोरलोकही पोलिसांना पळवतात ते कशासाठी? तर पोलिसांच्या पोटांचे घेर आटोक्यात रहावेत आणि ते तंदुरूस्त रहावेत म्हणून. सकाळी बघावे तो लोक आपले अर्ध्या चड्ड्या किंवा पायजामे घालून झुंडीने पळताना दिसतात, कारण त्यांच्या डॉक्टरांनीच त्यांना पळायला सांगितलेले असते. पळवे महाराज जेव्हा रामभाऊ म्हणून ओळखले जायचे तेंव्हा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, मतदारांना ‘तुम्ही फक्त सांगा मी पळवून आणतो’ असे जे जाहीरपणे सांगितले होते त्याचा गर्भितार्थ आपल्या समाजाला थोडा उशीराच कळला.

पळणे आणि पळवणे हा केवळ रोजच्या जगण्यातला मंत्र नसून त्याचा आपल्या संस्कृतीशी, पौराणिक कथांशीही गहिरा संबंध आहे. गेली काही वर्षे ते अत्यंत श्रध्देने श्रध्दाळूंच्या बशी (‘बस’चे मराठमोळे अनेकवचन) भरभरून त्यांना तीर्थक्षेत्री पाठवत होतेच. आता ते स्वतःच परमपूज्य झाल्यामुळे त्यांचे कार्यालय काळाच्या ओघात आता पळवे महाराजांच्या आश्रमात रूपांतरीत झाले आहे. पळवे महाराजांची थोरवी सांगणारे विपुल साहित्य त्या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहे. त्यातील दोन महत्वाची प्रकरणे अशी-

रामायण आणि पळवे महाराज

रामायण लिहिताना महर्षी वाल्मिकी एके ठिकाणी अडले होते. त्यांच्याने रामायणाची कथा पुढे जाईचना. त्यांच्या प्रतिभेची कवाडे अचानक बंद झाली तेव्हा त्यांनी पळवे महाराजांचे स्मरण केले. त्यासरशी महाराज पळत पळतच गेले आणि म्हणाले, अरे तू वाल्मिकी होण्याच्या आधी काय करत होतास ते आठव. वाल्मिकींनी डोळे मिटले, स्वतःच्या भूतकाळाचे स्मरण केले. म्हणाले, वाटमारी करून पळून जात होतो. मग त्यावरून काहीतरी क्ल्यू घे की. पळवे महाराजांच्या या उपदेशामुळे वाल्मिकींच्या प्रतिभेची बंद कवाडे उघडली. रावणाने सीतेला पळवले तरच रामायण पुढे जाईल अन्यथा या कथानकात काही राम उरणार नाही हे त्यांना सुचले आणि मग रामायण घडले.

गोविंदा, दहिहंडी आणि पळवे महाराज

दहिहंडी हा सण ज्या योगेश्वर कृष्णाच्या नावाने साजरा केला जातो. त्याचे तर पळवण्याशी अत्यंत जवळचे नाते आहे. सर्वप्रथम त्याचा जन्म होताक्षणीच आपल्या वडिलांसह त्याने कंसाच्या कैदेतून, पहारेदारांची नजर चुकवून पलायन केले. सवंगड्यांसह लीला करताना त्याने गोपिकांच्या मडक्यांमधील दही-दूध लोणी पळवले. राधा तरी कोण होती? आपला भाऊ बळजबरी आपला विवाह शिशुपालाशी करणार आहे याची रूख्मिणीला कुणकुण लागली तेव्हा तिनं पळवे महाराजांचा सल्ला घेतला. पळवे महाराज म्हणाले ‘माझे हरण कर’ असा एक निरोप कृष्णाला पाठव आणि निर्धास्त रहा. पुढे काय घडले हे सगळ्यांनाच माहिती आहे.

याच श्रीकृष्णाचा उत्सव साजरा करत असताना रामभाऊंनी खुद्द कृष्णाच्याच आयुष्यावरुन प्रेरणा घेऊन काही विधाने केली,त्यावर सुरूवातीला खूप गदारोळ झाला. परंतु सुदैवानं लोकांना हळूहळू त्यातलं गांभीर्य कळलं, त्यांनी सांगितलेले उपाय किती जालीम आहेत हे कळलं आणि मग हळूहळू भक्तांमध्ये त्यांचं पळवे महाराज हे नाव रूढ झालं. मुख्यमंत्र्यांनीही तेव्हा रामभाऊंच्या लीलांकडे दुर्लक्ष केलं कारण खुद्द भगवान कृष्णानं रूख्मिणीला जिथून पळवून आणलं ते कौंडिण्यपूर विदर्भातच असल्याने मुख्यमंत्र्यांना हा उपाय किती प्रभावी आहे याची चांगलीच कल्पना होती. सुरूवातीच्या टिकेचा जोर ओसरून लोकांना जशीजशी त्यांच्या उपायांची प्रचिती येऊ लागली तसे लोक त्यांच्याकडे जाऊ लागले आणि सल्ला मागू लागले. ‘समस्यांपासून पळू नका तर समस्यांना पळवून लावा’ असं ते सांगू लागले आणि मग भक्तांनी त्यांना पळवे महाराज म्हणायलाच सुरूवात केली. सध्या भारतभर जे अनेक बाबा,बुवा आणि महाराज आहेत त्यापैकी अनेकांचा भूतकाळ, पळवे महाराजांशी मिळता जुळता असला तरी तो आपण केवळ ऐकून आहोत. पळवे महाराज मात्र आपल्या डोळ्यांदेखतच घडले हे आपले भाग्यच म्हणायला हवे. तेव्हा  ‘परमपूज्य पळवे महाराजांची थोरवी, म्या पामरे काय वर्णावी…’ अशी बहुत जनांची स्थिती झाली असेल तर ते साहजिकच आहे.

तंबी दुराई

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 15 Comments

 1. नेहमीप्रमाणे नर्म विनोदी आणि बोचरा

 2. झकास!

 3. मस्तच
  उपरोधाची तळपती तलवार

 4. superb . ( as usual ) !!!!!

 5. नर्म विनोदी खुसखुशीत अन उपहासगर्भ लेख आहे.
  तंबींच्या इतर लेखांसारखाच टवटवीत, वाचनीय…
  धन्यवाद !

 6. अप्रतिम आणि मार्मिक लेख आहे हा

 7. एक नंबर

 8. सुरेख आणि मार्मिक लेख

 9. वाह!!! खूपच छान लेख. वाचून मजा आली

 10. पुन्हा एक अप्रतिम शाब्दिक फटकेबाजी . वाचनानंद देणारा खूपच छान लेख.