गणपतीची धामधूम सुरु झाली की सर्वात आधी मूर्तीची आगाऊ नोंदणी करण्याची लगबग असते. मग वर्तमानपत्रांतून प्रत्येक वर्षी नेमाने मूर्तीकारांच्या समस्या वगैरे यांवर लेख प्रसिद्ध होत असतात. १९७२ साली तत्कालीन सरकारने गणपतीच्या मूर्तींवर विक्रीकर लावण्याची घोषणा केली होती. त्यावर्षी एका कवीने या निर्णयाचा आपल्या कवितेतून निषेध केला होता. आणि ही कविता केसरीच्या दिवाळी अंकात छापूनही आली होती. गणपती उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हीच  कविता आज वाचकांसाठी देत आहोत.

**********

कार असणाऱ्यांना कर असावेत

कर आहेत त्यांना डर असावी

हे सगळं खरं आहे

पण गणपतीला का कर?

त्याला आधीच चार कर आहेत

तो शुभंकर आहे

भरीस भर विक्रीकर कशाला?

इतके दिवस समजत होतो-

केवळ सूर्यच सहस्रकर आहे

पण

आमचं सरकारही सहस्रकर आहे

हे कळून आलं.

निरनिराळ्या नावाचे सहस्र कर

नक्की असतील

घर बांधलं की कर आहे

दुकान घातलं की कर आहे

काही विकलं तर कर आहे

उत्पादन केलं तरी कर आहे

घेतलं तरी कर आहे.

हे कसलं सरकार?

हे कसलं राज्य?

बाणभट्टानं कादंबरीत

आदर्श राज्याची कल्पना

सुंदर सांगितली आहे

हे वाचून तरी सरकार

कर कमी करील काय?

बाणभट्ट म्हणतो,

“यस्मिन राज्ये करग्रहणं

विवाहसमये एवम्”

काय ग्रॅंड कल्पना आहे

निदान गणपतीला तरी

सेल्स टॅक्स मधून

विक्रीकरांतून सोडवा

अशी जनतेची मागणी आहे

अर्थमंत्री कितपत मानतात

ते पाहूया ..

**********

बाणभट्टाच्या श्लोकाचा अर्थ : ज्या राज्यात ‘कर’ ग्रहण विवाहाच्या वेळी(च) करतात. इथे करग्रहण शब्दावर कोटी केली आहे. विवाहाच्या वेळी करग्रहण चा अर्थ पती-पत्नी म्हणून स्वीकारणे, विवाह होणे असा समाजाला जातो. करग्रहण चा दुसरा अर्थ होऊ शकतो कर ( टॅक्स) घेणे. त्यामुळे बाणभट्ट म्हणतो की ते राज्य आदर्श जिथे विवाहाच्या वेळीच फक्त ‘कर’ग्रहण होते.

 

केसरी दिवाळी अंक १९७२

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 4 Comments

  1. कर आले जुळुनी!

  2. कर ह्या विविध अर्थी शब्दावर केलेली कोटी आवडली .

  3. म्हणणे एकदम रास्त आहे!

  4. या कराच्या कचाट्यातून देवअधिदेव देखील सुटले नाहीत. हे कळून आले. असो, पण नवीन पण चांगलं वाचायला मिळाले..