होय मला गोड धोड खायला आवडतं. माझ्या बाबांप्रमाणे मी सिक्स पॅकवाला नाही. पण वर्गणीच्या नावाने धाकदपटशा करून खाल्लेला पैसा हा पदार्थ मला मुळीच आवडत नाही.

होय. मला माणसांमध्ये राहायला आवडतं. बाबांसारखं मी हिमालयात जाऊन बसत नाही. किंवा कार्तिकदादा सारखं मला स्त्रियांची ऍलर्जी नाही. पण अशक्य गर्दी करून लोकांना त्रास होणे हेही मला आवडत नाही.

होय. संगीताचा मी भोक्ता आहे. माझ्या या लांब कानांनी मी खूप काही ऐकतो/ऐकलंय. पण तुम्ही कानशत्रू लोक भसाड्या आवाजात जी काय आयटम सॉंग्ज लावता ती ऐकून माझे कान दुखायला लागतात.

होय. मी कलेचा भोक्ता आहे. १४ विद्या आणि ६४ कला मला अवगत आहेत. पण क्वार्टर मारून रस्त्यावर लोळून केलेला नाच, मावा खाऊन पिचकाऱ्या मारून केलेली लाल रांगोळी याना मी कला समजत नाही.

होय. तुम्ही प्रेमाने दिलेल्या भेटवस्तू मला आवडतात. पण पैश्यांचे ओंगळ प्रदर्शन करून मला तुम्ही जे सोन्या दागिन्याने मढवून टाकता ते काय मला पसंत नाही. अरे मी काही गुंठामंत्री नाही रे बाबानो. प्रेमाने दिलेली दुर्वांची जुडी सुद्धा मी अभिमानाने डोक्यावर मिरवतो. एखाद्या लहानग्याने भक्तिभावाने नमस्कार करून हळूच माझ्यासमोरचा खोबऱ्याचा तुकडा उचलला कि मला २१ मोदक खाल्ल्यागत वाटतं.

अमुक एक गणपती नवसाला पावतो. करा गर्दी असे काही नसतं रे बाबानो. मी मीच आहे. लालबागचा राजा असो की तुमच्या डेस्कवर ठेवलेला फोटो. आमच्या आमच्यात काही भेदभाव नाही.

मला जरूर भेटा. मला आवडतं ते. पण तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करा, शिस्त पाळा, नियम पाळा. या सर्वातून मी तुमच्या आजूबाजूला असल्याचं तुम्हाला जाणवेल. कारण फक्त दहा दिवस विशिष्ट मंडपातच थांबायला मी म्हणजे काही लिमिटेड डेटा पॅक नाही. मी स्वतंत्र लीज लाईन आहे.

असो. मी लवकरच येतोय. तुमची तयारी पूर्ण झाली असेलच. भेटूया लवकर. आणि यावेळी घरचं कढवलेलं तूप द्या रे मोदकावर. ते विकतचे नको.

….. आपला गणपती बाप्पा.

Leave a Reply

This Post Has 8 Comments

 1. सुशिक्षित सुजाण जनतेला कधी हे कळणार कोण जाणे,

 2. गणराया तुच माझे दैवत. आजकाल नव नवीन धार्मिक उत्सव म्हणजे मार्केटिंग झाले आहे. अशा प्रसिध्दी पावलेल्या गणरायाच्या दर्शनाने समाधान व शांति प्राप्त होत नाही.

 3. खूपच छान लेख. आज श्री गजाननराव अस सांगायचे वेळ आली हे आपल दुर्दैव. श्री चा फोटो खूप खूप आवडला. माझ्या माहेरची मूर्ती डोळ्यासमोर आली. अगदी असाच असायचा आमचा बाप्पा
  श्री ना पाहून नकळत ओठांवर शब्द येतात
  “तू आमुची प्रेरणा.

 4. लेख छान आहे.सार्वजनिक गणपती च्या दर्शनाला होणारी प्रचंड गर्दी मलाही आवडत नाही.त्यापेक्षा सारसबागेतील गणपतीसमोर ५ मिनिटे डोळे मिटून बसल्यावर समाधान व शांती मिळते.

 5. वास्तव आहे. बाप्पा सर्वांना कळतो, पण वळत नाही. आत्ता बापानच सर्वाना सुबुद्धी देवो,,!

 6. तंतोतंत…

 7. कधी शहाणे होणार हे!

 8. मार्मिक !