ढोल-ताशे, डीजे, आरत्या आणि

भक्तीची कर्णकर्कश्श गाणी

‘अहो, माझा नंबर पुढे होता’,

भक्तच भक्ताशी भांडतो कुणी

पोलिसांचे दंडुके, कार्यकर्त्यांशी हुज्जत

दर्शनाच्या रांगेत, अरेरावीची लज्जत

भक्तीच्या महापुराचे नाकातोंडात पाणी

तासा तासाला भरतेय नोटांची गोणी

कुणी म्हणतो- सुखकर्ता दुःखहर्ता

कुणी म्हणतो सुखकर्ता दुःखकर्ता

लाखो आरती संग्रह वाटले तरी

त्याचे कुणाला काही वाटत नाही

संग्रह कोरे करकरीतच राहतात

त्यांचे एक पानही फाटत नाही

याचीही आता सवय झाली

म्हणत बाप्पा मुकाट बसले

मध्येच कुणीतरी त्यांना बुद्धिदाता म्हटले

तेंव्हा विशाल पोट धरून हसले.

मंडपात कोलाहल वाढतच होता

मागच्याला त्याच्या मागचा

पुढे ढकलत होता

फारच गर्दी वाढली तेव्हा

कोणीतरी अधिकारी कार्यकर्ता ओरडला

‘अरे, एकाला दोन सेकंद बास झाले दर्शनाला’

इथला राजा, तिथला राजा

गल्लोगल्ली राजांची दाटी

एक हात आशीर्वादाचा

दुसऱ्या हाती मोदकाची वाटी

‘मऊसूत असावे आवरण

आवरणात असावे सारण

अवर्णनीय गोडी जोडीला

आणि कळसाचा आकार ज्याला

मोदक म्हणावे त्याला.’

मोदकाचे आठवावे रूप

मोदकाची आठवावी चव

म्हणत गणेशाने पुढ्यातला मोदक

चाखून पाहिला

खाता क्षणी त्याचा

चेहरा कसनुसा झाला.

‘अरे, हा तर पेढा

याला मोदक कसे म्हणावे?

आकाराच्या भ्रमाला

किती काळ फसावे?’

मूषक हसून म्हणाला देवा,

‘आता सगळे असेच झाले आहे,

त्याला इथे सिम्बॉलिक म्हणतात

लोक सिम्बॉलिक जगतात

आणि सिम्बॉलिक हसतात

तुम्ही सुध्दा आता एक सिम्बॉल झाला आहात

आजच्या जगात या जरा, कुठं आहात?’

‘म्हणजे काय ते सांग मला’

गणेशाने आदेश दिला.

गर्दीच्या रेट्याकडे बघत मूषक म्हणाला,

‘तुम्हाला सगळं माहिती असतं

पण आदेश म्हणून सांगतो तुम्हाला.

तुम्ही म्हणजे आता आहात

भूतकाळाची साठवण,

लोकमान्य टिळकांची आठवण,

समाजसुधारणांचा जाज्ज्वल्य काल

त्याचा तुम्ही सिम्बॉल.

बुद्धी वगैरे ठीक आहे

पण माणूस परिस्थितीने कावतो

गर्दी करतो, धाव घेतो

कारण,

म्हणे, अमुक-तमुक राजा

नवसाला पावतो.

माणूस निरूपाय होऊन नतमस्तक होतो,

जेव्हा जगण्यापायी होतात हाल,

याच सत्याचे तुम्ही

आहात दरवर्षीचे एक सिम्बॉल’

तोवर दर्शन घेऊन आणखी शंभर लोक वळले

गणपती हसून मूषकाला म्हणाले,

‘तुला हे सगळे कसे रे कळले?’

मोदकरूपी पेढा कुरतडत

मूषक म्हणतो

‘देवा, तू फक्त भक्ती पाहतो

मी भक्तांना पाहतो,

इथे हजारो लोक येतात,

बुद्धी आणि आशिर्वाद दे म्हणतात,

आशिर्वाद घेऊन जातात

बुद्धी इथंच टाकून देतात

ती टाकलेली बुद्धी मी उचलून घेतो

जमेल तेवढी ठेवतो,

बाकी तुमची तुम्हाला परत देतो.

या अनुभवाने माझे गैरसमज गळले

आणि तेव्हाच मला हे सत्य कळले.’

तेवढ्यात पुढ्यात आणखी एक भक्त आला

गणेशाने थोडा विचार केला,

फक्त आशिर्वादाचा हात वर केला.

तंबी दुराई

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 15 Comments

  1. सुंदर लेखन, वास्तविक सत्य परिस्थिती

  2. मार्मिम सत्य

  3. भारी लिहिलंय

  4. खूप खूप छान…!

  5. खरंच.. आज बाप्पाला काय वाटत असेल याची झलकच जणू लिहीली आहे..

  6. खरंच.. आज बाप्पाला काय वाटत असेल याची झलकच जणू लिहीली आहे..

  7. आधुनिक श्री गणेशोत्सवाचे समर्थक वर्णन. सत्याचा स्विकार करण जड जात हे खर.परंतू हेच वास्तव आहे हेच आपल दुर्दैव.

  8. खुसखुशीत, नर्म विनोद अंतर्मुख करणारा …….

  9. गणराया तुच माझे दैवत.

  10. वर्मावर अचूक बोट ठेवलंत सर! फारच छान!