-किरण भिडे

नमस्कार. पुनश्च वर पहिला लेख ३० सप्टेंबर ला प्रसिद्ध झाला होता. त्याअर्थाने पुनश्च आता एक वर्षाचे झाले. २-३ व्यवसाय करून झाल्यावर मराठी साहित्य प्रसाराच्या प्रांतात प्रवेश केला तेव्हा पुढे होणारा प्रवास सुकर असणार नाही याची जाणीव होती. त्यामुळे पहिल्या वर्षात अपेक्षित व्यावसायिक यश पदरात पडले नाही तरीही जे झालं ते कमी नाही याचे समाधान आहे. सुरुवात करतानाच कामाचा आनंद आणि व्यावहारिक यश दोन्ही मिळवायचे ठरवले असल्यामुळे साहित्यविषयक काय काय करायचं याच्या योजना जशा मनात होत्या, तसेच सभासद नोंदणीचे आकडेही होते. सभासद नोंदणीच्या आघाडीवर कमी पडलो असताना, दोनशेहून अधिक उत्तम दर्जाचे लेख आज आपल्या साईटवर/app वर आहेत याचे तुडुंब समाधान मनात आहे. गेल्या दीडशे वर्षातील नियतकालिके मिळवणे, त्यात कालसुसंगत साहित्य सापडणे या शक्यता गेल्या वर्षी थोड्या धूसर वाटत होत्या. पण शोध घेत गेल्यावर अशा साहित्याचा खजिना उपसण्यात आपणच कमी पडू अशी भावना सध्या मनात आहे. त्या आघाडीवर चांगले यश मिळाल्यावर  आता या वर्षात सभासद नोंदणीसाठीही जोमात प्रयत्न करायचे ठरवले आहे. सुरुवात एकट्याने झाली तरीही वर्षभरात विनय, सुधन्वा, बोजेवार सर, सचिन, समीर लेले सारखे प्रत्यक्ष कामात मदत करू शकणारे मित्र आणि ठाण्यात-पुण्यात मिळून  या  कामाला प्रोत्साहन देणारे,उत्साह वाढवणारे पन्नास ‘पुनश्च मित्र’, साडेबाराशे सशुल्क सभासद आणि तेवढेच चाचणी सभासद असा हा खूप मोठा नसला तरीही छोटा कारवाँ निश्चितच बनला आहे. खरंच…तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मराठी साहित्याच्या क्षेत्रातला असा हा पहिलाच प्रयोग आपण अगदी घवघवीत यशस्वी म्हणता येणार नाही पण बऱ्यापैकी यशस्वी केला. या क्षेत्रातील बरेच जण या प्रयोगाकडे थोडे साशंक नजरेने पाहत होते. मी म्हणेन अजूनही पाहत असतील. पण त्यांच्यासाठीदेखील आपले हे मर्यादित यश भविष्यात ‘अधिक काही चांगलं होऊ शकतं’ असा आशावाद निर्माण करणारं नक्की आहे. हे सगळं तुम्ही सशुल्क सभासद झाला नसतात तर शक्य झालं नसतं म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आता येणाऱ्या वर्षात, महिन्यात आपण काय काय तुमच्यासमोर आणणार आहोत त्याची थोडी माहिती देतो.

पुनश्च चे सीमोल्लंघन-  बहूविध.कॉम

मागच्या दोन मेसेजेस मध्ये म्हटल्याप्रमाणे पुनश्च सारखेच अनेक समांतर उपक्रम आपण एकाच वेळी चालवू शकू असा एक तांत्रिक मंच ( technology platform ) आपण विकसित करत आहोत. आजवर word press या जगप्रसिद्ध तंत्र मंचावर तयार असलेल्या एका मोड्यूल मध्ये थोडे फेरफार करून आपण पुनश्च चालवीत होतो. यापुढे आपण आपलेच मोड्यूल विकसित केले आहे ज्यावर आपण पुनश्च तर चालवणार आहोतच पण इतरही बऱ्याच गोष्टी तिथे शक्य होणार आहेत. बहूविध.कॉम  (www.bahuvidh.com) नावाने असणाऱ्या या मोड्यूलवर आपण जसे पुनश्च चालवत आहोत तसा आणखी कोणाला  इतर कोणत्या विषयावरील (एखादा किंवा जास्तही) उपक्रम चालवायचा असेल तर ते चालवू शकतात. तो उपक्रम त्यांना सशुल्क ठेवायचा असेल तर ती सोयही आपल्या मोड्यूलवर आहे. यामुळे वाचकांना जसे वाचनासाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत तसेच ज्यांना असे उपक्रम चालू करण्यात रस आहे अशांनाही तांत्रिक मदत मिळणार आहे. याबद्दल अधिक माहिती जर कोणाला हवी असेल तर माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधा.

बाकी ऑक्टोबर महिन्यात पुनश्च वर तुम्हाला  मराठी साहित्य सागरात खोल डुबकी मारून शोधून आणलेले एकाहून एक  निवडक असे  उत्तम ९ लेख वाचायला मिळणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पाच लाख अनुयायांसह नागपूर येथे 14 ऑक्टोबर १९५६ साली धर्मांतर केले होते. ही घटना तशी महाराष्ट्राच्या आणि एकंदरच हिंदू धर्माच्या इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना. त्यावर भविष्यात एक दर्जेदार विशेषांक करायचे ठरवत आहोत . या महिन्यात त्या विषयावर एक लेख घेतला आहे. उर्वरित लेखांमध्ये वि. द. घाटे, मुकुंद टाकसाळे, अरविंद ताटके यांचे लेख आहेत. १९५६च्या ‘प्रसाद’ मासिकात लिहिलेली वपुंची मस्त कथा आहे. थोडा छोटा वाटू शकेल पण खूप छान पद्धतीने लिहिलेला सीए उदय कर्वे यांचा अर्थकारण सदरातील लेख आहे. असं सगळं छान छान साहित्य आहे. सप्टेंबर महिन्यात आलेले लेखही बऱ्याच जणांचे वाचायचे राहिलेत (असं आमचं गुप्तहेर खातं सांगतंय:-). त्यामुळे नक्की वेळ काढा आणि भरपूर वाचा. आम्ही भरपूर देऊच.

Leave a Reply

This Post Has 15 Comments

  1. अभिनंदन! वाङ्मय शोभा मासिकाचे सुमारे 52 वर्षांचे अंक bookganga.com वर उपलब्ध आहेत, आमच्या वडिलांनी एकहाती ते चालविले.अनेक सुप्रसिध्द व तेव्हाचे नवोदित साहित्यिकांचे लेख मिळतील.

  2. छान छान साहित्याची उत्सुकतेने वाट पहातोय !

  3. छान छान साहित्यायी उत्कंठतेने वाट पहातोय .

  4. तुमचे गुप्तहेरखाते खूप चलाख आहे.सप्टेंबरमधील काहीं लेख गणपतीमुळे वाचायचे राहून गेले आहेत.तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा

  5. आपला उपक्रम स्तुत्य आहे खास करुन आमच्या सारख्या महाराष्ट्रा बाहेर राहणाऱ्या वाचकांना ही मेजवानी आहे

  6. ऊत्तम.

  7. Super

  8. मस्तच, जोरदार. आमच्या शुभेच्छा.

  9. Keep it up Kiran,Iam always with you for this noble cause

  10. क्या बात है! लगे रहो!