बंडू हा गंगाधर गाडगीळ यांचा मानस पूत्र आणि अर्थातच स्नेहलता ही त्यांची मानस सून. बंडू आणि स्नेहलता या दोन व्यक्तिरेखांना घेऊन गाडगीळांनी त्यांच्या कथांमधून मराठी मध्यमवर्गावर मजेदार, खुसखुशीत भाष्य केलं. गेल्याच आठवड्यात गाडगीळांची ९५वी जयंती झाली. वर्तमानाचे संदर्भ आणि गाडगीळांच्या या दोन व्यक्तिरेखा घेऊन त्या मध्यमवर्गीय संवेदनांना वाहिलेली तंबीची ही स्तंभरुपी आदरांजलीच…

**********

ज्या दिवशी कोर्टानं विवाहबाह्य संबंध हा कायद्यानं गुन्हा ठरवणारं कलम रद्द केलं, त्या दिवशीचीच गोष्ट. स्नेहलता ऑफिसला जाण्याची तयारी करत होती आणि बंडू आंघोळीला गेला होता. बंडूचा मोबाईल चार्जिंगला लावला होता. बाजूलाच स्नेहलताचा मोबाइलही होता. स्नहेलतानं स्वतःचा मोबाइल उचलला आणि पर्समध्ये ठेवला तेवढ्यात बंडूच्या व्हाट्सप मेसेजचा टोन किणकिणला. स्नेहलतानं सहज म्हणून बंडूचा मोबाइल घेऊन आलेला मेसेज वाचला. अभिनंदन एवढा एकच शब्द होता. ज्या नंबरवरून हा मेसेज आला तो नंबर सेव्ह केलेला नव्हता. स्नेहलतानं त्या नंबरचा डीपी पाहिला आणि ती चरकली. बाई सुंदरच होती. आपल्यासारख्या बाईमाणसाला ती सुंदर वाटते म्हणजे पुरूषांना ती किती सुंदर वाटत असेल हे तर विचारायलाच नको. मग स्नेहलताचं लक्ष बाजूलाच टीपॉयवर ठेवलेल्या आजच्या वृत्तपत्राकडे गेलं. विवाहबाह्य संबंध हा कायद्यानं गुन्हा ठरवणारं कलम रद्द केल्याची बातमी, अभिनंदनाचा मेसेज आणि डीपीमधली सुंदर बाई या तिघांनी मिळून स्नेहलताच्या डोक्यात संशयाचा भुंगा सोडला. तिनं मनातल्या मनातल्या मनात काही वाक्य स्वतःच स्वतःला ऐकवली ती अशी-

बंडू तसा नाही.

बंडू अशा भानगडीत पडणारा नव्हे.

बंडूमध्ये एवढे गट्स कुठले?

बंडूमध्ये असं काय आहे की एवढी सुंदर स्त्री त्याच्या प्रेमात पडावी?

प्रेम? छे प्रेमाचा काय संबंध? गरजेला प्रेमाची गरज नसते.

पण बंडूला गरज तरी का पडावी?

गरजं बंडूची नव्हे, गरज तिची असू शकते. आणि एवढी सुंदर स्त्री जर स्वतः चालून येत असेल तर बंडू कशाला माघार घेईल?

बंडू तिकडे बाथरूममध्ये अंगाला लाइफबॉय साबण लावत असताना स्नेहलता बंडूला आलेल्या मेसेजचे अर्थ लावत बसली होती. रोजच्या सवयीप्रमाणे तो आंघोळ करता करता गातंही होता. नेहमीपेक्षा आवाज जरा जास्तच आनंदी वाटतो. खुशीत दिसतोय गडी. कारण तरी काय? आणि कुठलं गाणं गातोय हा? स्नेहलता संशयभरल्या मनानं आणि सावध पावलांनी बाथरूमच्या दिशेन सरकली. बंडू लाइफबॉय लावता लावता गातच होता- आज कल तेरे मेरे प्यारके चर्चे हर जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई… त्यानंतरचं म्युझिकही त्यानं टॅर टॅर टट्ट टॅ…म्हणत तोंडानं वाजवलं तेव्हा स्नेहलताला धस्स झालं. बंडू तिकडे बाथरूममध्ये आता दो बदन एक दिल, एक जां, हो गये या ओळीवर आला होता आणि इकडे स्नेहलताची संशयानं होळी व्हायची वेळ आली होती. ती बाथरुमच्या आसपास घुटमळत असतानाच बंडू टॉवेलनं केस कोरडे करत बाहेर आला आणि स्नेहलताला पाहून म्हणाला, गेली नाहीस तू अजून? अगं तुझी ११.१७ ची लोकल चुकेल ना?’

‘११.१७ चुकली तर चालेल रे, पण इकडे संसाराचं गणितच चुकलं तर काय?’ असा प्रश्न तिनं मनातच ठेवला आणि म्हणाली, निघालेच. तुझा डबा ठेवलाय भरून, तेवढा बॅगेत टाकून देशील.  त्यावर तिच्याकडे फार लक्ष न देता बंडू म्हणाला, हो गं, टाकतो, तू जा… आणि मग त्यानं टॉवेल बेडवर भिरकावत पुन्हा उरलेल्या गाण्याचा सूर धरला, क्यू भला, हम डरे, दिलके मालिक है हम, हर जनम में  तुम्हे अपना माना सनम…म्हटलं. तरी स्नेहलता तिथंच उभी होती. काय गं, काही प्रॉब्लेम आहे का? घुटमळते का आहेस अशी तू?’ म्हणत बंडू त्याच्या मोबाइलकडे गेला तेव्हाच नेमका स्नेहलताचा मोबाइल वाजला. स्नेहलताच्या मैत्रिणीचा फोन होता, ती बस स्टॉपवर तिची वाट बघत होती. अगं आलेच दोन मिनिटात असं सांगून स्नेहलतानं चटकन फोन ठेवला तोवर बंडूनं मेसेज बघून मोबाइल परत खाली ठेवला होता आणि कपडे घालायला म्हणून तो बेडरूममध्ये गेला होता. म्हणजे त्यानं मेसेज पाहिला होता. नक्कीच उत्तरही दिलं असणार. स्नेहलताची उत्सुकता पुन्हा चाळवली. तिनं बंडूचा मोबाइल घेतला आणि व्हाट्सप चेक केलं…मघाशी तिच्या छातीत धस्स झालं होतं आणि आता मनात चर्र झालं. तो व्हाट्सप मेसेज बंडूनं डिलिट करून टाकला होता. स्नेहलतानं मनात पुन्हा काही वाक्य स्वतःच स्वतःला ऐकवली ती अशी-

बंडूकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती.

हे जर खरं असेल तर काय करायचं?

आता तर कायदाही आपल्या बाजूला नाही.

पण हे खरं असेल का?

खरं नसेल तर मग बंडूनं तो मेसेज डिलिट का केला असेल ?

आणि कधी नव्हे ते वृत्तपत्र वाचल्या वाचल्या तेच गाणं बरं आठवलं त्याला आज.

आता धस्स आणि चर्र दोन्ही एकत्र झालं. आल्या प्रसंगाला धीरानं तोंड दिलं पाहिजे. आज रात्रीच याचा सोक्षमोक्ष लावायचा, असं ठरवून स्नेहलता निघाली. मी निघते, दार लावून घे, असं ती ओरडली तेव्हा तो इस्त्री केलेला आणि त्याचा अत्यंत आवडता शर्ट घालत बाहेर आला… टॅर टॅर टट्ट टॅ..लावतो मी, बाय, असं ओरडला. त्याच्या त्या म्युझिकनं स्नेहलताचं डोकं उठलं.

स्नेहलता ऑफिसला गेली तरी तिचं कामात लक्ष नव्हतं. तिच्या बॉसनं विचारलंही तिला काही प्रॉब्लेम आहे का, डिस्टर्ब दिसतेस आज तू. तिचा बॉस तिच्याहून वयानं दोनच वर्षांनी मोठा असेल फार तर. त्यानं काळजीनं तिला विचारलं तेव्हा नाही, मी ठिक आहे असं ती म्हणाली. पण मग कधी नव्हे ते अचानक तिनं बॉसकडे निरखून पाहिलं. चांगला आहे दिसायला. स्वभावानंही किती उमदा आहे. करावं याच्याशी अफेअर आपण? विवाहबाह्य संबंध का बदला, विवाहबाह्य संबंध. बंडूला जशास तसे उत्तर दिले पाहिजे. असा विचार करत स्नेहलतानं हसून बॉसकडे पाहिलं आणि मनातल्या मनात कल्पना केली. आपण जर याला आय लव्ह यू असा मेसेज पाठवला तर हा ही उद्या आंघोळ करताना म्हणेल, ‘ दो बदन एक दिल एक जान हो गए बहुधा मनात विचार करता करता ती ओळ खरोखरच बाहेर पडली स्नेहलताच्या तोंडून. बॉसनं ती ऐकली आणि हसून म्हणाला, ‘ ब्रह्मचारी मधलंय ना, माझं आवडतं गाणं आहे ते. स्नेहलता लाजली. ती का लाजली ते फक्त तिलाच माहिती होतं. आता तिला बरं वाटत होतं. बंडूचं काही असेलच तर तिचाही प्लॅन तयार होता. बदल्याचा नुसता विचार केल्यानंही तिला हलकं हलकं वाटू लागलं.

तेवढ्यात अकाउंट सेक्शनच्या भरारेबाई तिला शोधत आल्या. अगं, मागं मला मंत्रालयात काम होतं तेव्हा तू तुझ्या नवऱ्याचा नंबर दिला होतास ना. आज गंमतच झाली बघ. माझी एक मैत्रिण आहे बंड आडनावाची. तिचं काल प्रमोशन झालं म्हणून मी तिला अभिनंदनाचा मेसेज टाकला होता आणि चुकून तो बंडू अडकित्तेंना म्हणजे तुझ्या मिस्टरांना गेला. बरं झालं बाई आता आपल्याला पाठवलेला मेसेज डिलिट करता येतो. तुझ्या नवऱ्यानं पहायच्या आत मी तो डिलिट करून टाकला…

 स्नेहलताच्या मनावरचं ओझं एका झटक्यात उतरलं. ती हसत हसत म्हणाली, अगं तू डीपी कसला भन्नाट ठेवला आहेस, मी दुपारीच पाहिला आज. भरारेबाई हसत म्हणाल्या, अगं ती माझी भाची आहे, सुंदर आहे ना?’

हो ना, खूपच गोड आहे गं…स्नेहलतानं तिच्या सूरात सूर मिसळला आणि पर्स उचलून ऑफिसमधून बाहेर पडता पडता बॉसला म्हणाली, माझ्या मिस्टरांनाही फार आवडतं सर ते गाणं…ब्रह्मचारीमधलं. त्यातलं ते म्युझिक तर खूपच आवडतं, टॅर टॅर टट्ट टॅ… ऐकून बॉसही गोड हसला. मनातल्या मनातल्या मनात तिनं बॉससोबत जे काही मिनिटांचं अफेअर केलं होतं, त्या विचारानं तिला आता गुदगुल्या होऊ लागल्या. बिच्चारा बॉस आणि बिच्चारा गं माझा नवरा…असं म्हणत ती निघाली घराकडे. 

**********

तंबी दुराई      

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 16 Comments

 1. आज गंगाधर गाडगीळ ची लेखणी पुन्हा बोलती झाल्याचा भास झाला. धन्यवाद तंबीजी

 2. एकदा वाटलं गाडगीळच पुन्हा लिहिते झाले आहेत . झकास जमलाय लेख .

 3. मस्त😂😂😂😂😂
  कुठल्या कुठे जाऊन आली ती इतक्यात😁

 4. छानच

 5. अगदी मस्त जमून आलाय.

 6. आज आपण ‘ स्नेहलता बंडूला अमेरिकेला नेते ‘ या लेखाची जी प्रास्ताविक माहिती दिली आहे तिच्यात आपण गंगाधर गाडगीळ यांची नुकतीच ९५ वी पुण्यतिथी झाली असं म्हटलं आहे. ती पुण्यतिथी नसून जयंती / जन्मदिन आहे.

  1. धन्यवाद. दुरूस्ती केली.

 7. एकच नंबर..!!!

 8. Typical of Gangadhar gadgil style

 9. मस्त..
  तंबी शैलीतला खुसखुशीत लेख…

 10. जयंती