बोरकर गेले. गेले काही दिवस त्यांच्या अस्वस्थतेच्या वार्ता येत होत्या. काळजी वाटत होती. वाढत होती. पण आतून असं वाटत होतं की पुन्हा नेहेमीसारखे बोरकरगुरूजी वावरताना…वाजवताना दिसतील.

कारण आपलं अभिजात सौम्यपण घेऊन वावरणाऱ्या बोरकरांना आपली एकट्याचीच तीव्रपणे घेतलेली दखल वा एकट्यावरच पडलेला झगझगीत प्रकाशझोत सोसणारा..मानवणारा नव्हता. आपल्या अवतीभवती असलेल्या दृश्यात ते अतिकोमल स्वरासारखे अतिशय सौम्यपणे वावरत असत. वर्षानुवर्षे संगीत रंगभूमीवर अॉर्गन साथ करताना बसण्याची रंगमंचाच्या थेट समोरची प्रकाशाच्या अगदी निकटची पण केवळ स्वरतालानेच अस्तित्व दर्शविणारी साथसंगतकारांची काळोखी हौदातील जागा हीच बोरकरांनी आनंदाने स्वीकारलेली… भूषविलेली जागा होती.

पुढे काही वर्षांनी भारतरत्न पं. भीमसेनजींच्या अभंगवाणीच्या कार्यक्रमात बोरकर मंचस्थ झालेले दिसले. डोक्यावर संघाच्या गणवेषासारखी काळी लोकरीची समोर टोक असलेली टोपी घातलेले बोरकर लोकांना दिसू लागले. अभंगवाणीच्या त्या श्रद्धाजागरणात प्रत्यक्ष भीमसेनजी स्वतःसह केवळ मंचस्थच नव्हे तर सभागृहातील रसिकांनाही ‘व्यक्तीत्वाच्या सीमा साऱ्या ओलांडुनी पुढती जाऊ’ असा समर्पणाचा अनुभव देत असत. त्या तल्लीन गानपीठाच्या चित्रात बोरकर सहजपणे समाविष्ट होत…
वेगळी खूण न दाखवता..ठेवता.
तीच त्यांची वृत्ती झाली होती …ओळखही.

पुलं म्हणायचे महाराष्ट्र गोव्याच्या कंठाने गातो. पं. तुळशीदास बोरकरांनी जणू या विधानाचा कृतिविस्तार केला. महाराष्ट्र गोव्याच्या बोटांनीही वाजू-गाऊ लागला.
बोरी गावच्या कविश्रेष्ठ बाकीबाब बोरकरांनी जीवन कळलेल्या महानुभावांचे प्रमुख लक्षण सांगताना सहजपणाची महती कवितेतून गायलेली सर्वांनीच ऐकली आहे..अनुभवली आहे. तशाच सहजपणाचे आपल्या वावरण्यातून…वाजवण्यातून दर्शन घडविणारे पंडितजीही त्याच बोरी गावचे.

तिथे भजनातून संगीताचा संस्कार घेत पुढे पुण्यात स्वरराज छोटा गंधर्वांच्या संगीत नाटकांना साथ करणाऱ्या ज्येष्ठ अॉर्गनवादक पं. विष्णुपंत वष्ट यांच्या सहवासात रंगभूमीवरील साथसंगतीकडे वळले. पन्नासच्या दशकात सुरू झालेली संगतयात्रा ऐशीच्या दशकापर्यंत निनादत राहिली. पुढे मुंबईत पं. देवेंद्र मुर्डेश्वरांशी झालेल्या परिचयातून आकाशवाणीवर वादन करण्याची संधी मिळाली. आणि त्याहूनही मोठा लाभ होता पं. मधुकर पेडणेकर अर्थात पं. पी. मधुकर या सिद्धहस्त कलावंताचा मिळालेला सहवास आणि मिळालेले कलाशिक्षण.

बोरकरांनी अनेक प्रथितयश कलावंतांच्या शास्त्रोक्त संगीताच्या मैफिलीत सुरेल साथ केली. सुधीर नायक, केदार नाफडे आणि असे कितीतरी गुणवान शिष्य तयार केले.

एक अगदी व्यक्तिगत आठवण सांगावीशी वाटते. माझे मामा आप्पा दाबके मुंबई महानगरपालिकेत होते. बोरकरगुरूजीही पालिकेच्या संगीत कला अकादमीत शिक्षक होते. माझ्या मामांनाही संगीतात रस होता. तबला वाजवीत असत आणि विशेष म्हणजे सावरकर साहित्य आणि अन्य राष्ट्रीय विषय मांडण्यासाठी ते कीर्तने करीत असत. दोघेही मालाडला राहात त्यामुळे परिचय होता. मामांच्या घरी अनेकदा गाण्याच्या बैठका होत. मामीही उत्तम पेटी वाजवीत असे. कधी तिचे बंधू पं. रामभाऊ अभ्यंकर तिथे येत..गात असत. बोरकरगुरूजींचीही कधीमधी हजेरी लागे.

अशाच एका भाग्यवेळेला तिथेच माझा बोरकरगुरूजींशी परिचय झाला. मी मामांच्या आख्यानांसाठी आणि मामेभाऊ डॉ. गिरीश दाबके यांच्या एकांकिका, चित्रकथांसाठी गीते लिहिली होती. मी लिहितो, कविता, गीते करतो अशीही माझी ओळख त्यांना करून देण्यात आली. गुरूजींनी तत्काळ पिशवीतून कागदांचे एक भेंडोळे मला दिले आणि म्हणाले, “वाचून पहा. मला कळत नाही याचे काय करु. गीत आहे पण गेयता नाही. कथा आहे पण रंजकता नाही. पहा. वाचून दुरूस्त करता येते का पहा.” हे मला नवीन होते. मी स्वतंत्र लिहिले होते पण दुसऱ्याच्या कवितेत दुरूस्ती कधी केली नव्हती. ते फार रूचतही नव्हते. मी ते भेंडोळे वाचायला घेतलं. श्रावणबाळाच्या कथेवर आधारित ती गीतमालिका होती. काहीशी बाळबोध…बटबटित…बोजडही. मी ते बाड मिटून ठेवले. आणि नव्याने लिहायचा विचार केला. तसे बोरकरगुरूजींना कळवलेही. ते अर्थातच आनंदून अवश्य करा म्हणाले. गतीने ती संगीतिका लिहून झाली. बोरकरगुरूजींना दिली. माझा संगीतिका लिहिण्याचा पहिलाच योग..प्रयोगही. पुढच्या भेटीत ती आवडल्याचे आणि महापालिका संगीतोत्सवासाठी बसवता येईल असेही म्हणाले.

पुढे मात्र योगच असे आले की आमची दीर्घकाळ भेटच झाली नाही. त्यामुळे मला श्रावणबाळाच्या संगीतिकेचे वृत्त समजले नाही. त्याची ती रंगयात्रा सुफळ संपूर्ण झाली की खऱ्या श्रावणबाळासारखी तो शराघाताने अकालीच संपली तेही समजले नाही. औत्सुक्य तर होते पण खूप लांबलचक बोगद्यातून बाहेर आल्यावर भवताल नवेनवखे होऊन जावे तसे काहीसे होऊन आमचा संवाद होत राहिला पण वेगळ्या सांगितिक विषयांवर.

काही काळ बोरकरगुरूजींनी श्रावणबाळाची कावड मोठ्या विश्वासाने माझ्या खांद्यावर वाहायला दिली याचेच समाधान मात्र लोण्यासारखे मनावर तरंगत राहिले. तेव्हापासून आजवर.

आता तर बोरकर गेलेच.
तुलसीदासांच्या रामायणात आरंभीच श्रावणबाळाची भूमिका संपुष्टात यावी आणि त्या पुढच्या सुरम्य रामकथेतच मन रमून जावं…श्रावणबाळाला विसरून. तसंच काहीसं…पं. तुळशीदास बोरकरगुरूजींच्या संवादिनी साथीने रंगलेल्या खूप सुंदर सुरेल मैफिली, अभंगवाणी आणि संगीत नाटकांचे खेळ या त्रिवेणीने रंगविलेले काळाचे पट आजही सोबत करीत आहेत. रहावेत..राहतीलही.

पं. तुळशीदास बोरकरांचं मी अखेरचं वादन ऐकलं ते बरोबर एक वर्षापूर्वी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्दाच्या सभागृहात…चतुरंग आयोजित मुक्त संध्या उपक्रमात. मोठा सुंदर योग होता. बोरकरांना वादनाबरोबरच बोलायचं होतं. त्यांना बोलतं करण्याचं अवघड काम करीत होते प्रख्यात सतारवादक आणि बंदिशकार पं. शंकरराव अभ्यंकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. कमलताई अभ्यंकर. कार्यक्रम अर्थातच रंगला. बोरकरांनी गुरूवर्य पी. मधुकरांच्या आठवणी सांगितल्या. स्वतःच्या जडणघडणीविषयी सांगितले. रंगतदार वादनही केले.

अपवाद म्हणून ओठांनी आणि जीवनव्रत म्हणून बोटांनी बोलणाऱ्या पद्मश्री पं. तुळशीदास बोरकरांच्या स्मरणमैफलीचा रंग आज रंगभूमीवरच्या धूपासारखा दरवळतो आहे. स्वरांचे पंख लावून…
बोरकरगुरूजींना विनम्र श्रद्धांजली !!

लेखक- प्रमोद वसंत बापट

Leave a Reply

This Post Has 3 Comments

  1. छान लेख आहे.

  2. सुंदर लेख !!

  3. आदरांजली….