दिनकर मनवर यांच्या कवितेतला आर्त आशय, त्यांनी गेली अनेक वर्षे लिहिलेल्या वेगळ्या धाटणीच्या कविता, त्यांची वैचारिक बैठक, हे सगळे एका क्षणात अक्षरशः पाण्यात गेले. पाणी कसं असतं या त्यांच्या कवितेमुळे उठलेल्या गदारोळानंतर त्याच पध्दतीने उमटलेले हे तरंग-

पाणी कसं असतं?

पाणी संस्कृतीरक्षकांसारखं असतं.

त्यांना ‘जे आणि जसं दिसतं,

ते आणि तसंच सगळ्यांनी पहावं’

अशा दुराग्रहासारखं असतं

पाणी असं असतं!

पाणी कसं असतं?

कालपर्यंत कवितासंग्रहात

निपचित पडलेल्या कवितेतला

अर्थ सोडून,

अनर्थ शोधायला निघालेल्या,

बोट लावेन तिथं

दुखवून घेणाऱ्या,

अस्मितेसारखं असतं.

पाणी असं असतं!

पाणी कसं असतं?

पंधरावीच्या मुलांना

त्यांच्या वयाच्या विसाव्यावर्षी

कविता कळू नयेत,

त्यांची निर्गुण निराकार मनं

वास्तवाची धग लागून

जळू नयेत,

गोड गोड कवितांची

संगत सोडून

ही मुलं

भलतीकडे वळू नयेत

अशा हट्टासारखं असतं

पाणी असं असतं!

पाणी कसं असतं?

अभ्यासक्रमाला लावलेली कविता

एखाद्याला रुचली नाही

बौध्दिक झेप कमी पडली

म्हणून पचली नाही

आणि टोचली जायला हवी

तिथं जर टोचली नाही

तर ती लगेच लगोलग

मागे घेणाऱ्या

तत्पर व्यवस्थेसारखं असतं.

पाणी असं असतं!

पाणी कसं असतं?

तर, साहित्य म्हणजे

फक्त आनंद असतो

साहित्य म्हणजे एक

सुखाचा कंद असतो

आणि असलाच तर

एक निरुपद्रवी

छंद असतो

अशा समजातच

मुलांना ठेवणाऱ्या,

ठेवू इच्छिणाऱ्या

सजग,

सावध,

संस्कारक्षम

लोकांसारखं असतं.

पाणी असं असतं!

पाणी कसं असतं?

एका कवीच्या

मनासारखं असतं,

हजारो वर्षे बंद असलेल्या

खणासारखं असतं,

अर्थाचे श्वास मिळण्याआधीच

हत्या झालेल्या

भ्रूणासारखं असतं

पाणी असं असतं!

एक कवी हरला,

मनातल्या मनात झुरला,

धमक्यांचे, गैरसमजांचे

गाठोडे घेऊन फिरला

ज्याचे शब्द असतात

त्याचं कोणी नसतं

पाणी असं असतं!

(आपल्या समाजाच्या सांस्कृतिक,साहित्यिक अभिरूचीला आणि शैक्षणिक व्यवस्थेतील निर्णय तत्परतेला समर्पित)

**********

तंबी दुराई 

 

 

 

 

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 11 Comments

 1. कविते चा विडंबन पर आषय चक्रावून टाकणारा असून सरळ साध्या ओळीतून रचना मनाचा ठाव घेते.

 2. वास्तव स्थितीवर नेमकेपणे बोट ठेवणारी उपरोधिक कविता

 3. Agree totally with Shreekant Sir.
  Sad but true reality of our society.

 4. खूप छान… मूळ कवितेहूनही विडंबन सुंदर!

 5. पाण्या तुझा रंग कसा? ज्याला जसा हवा तसा .
  हे परंपरागत चालत आलेले सत्य

 6. झ-या, ओढ्यातून झरझरणारं
  आकाशातून अंगावर कोसळणारं
  अथांग सागरातून फेसाळणारं
  निसर्गाचं रूप ते
  सर्व काही सामावणारं

 7. अगदी मस्त !
  झणझणीत अंजन घालणारा लेख आहे
  याची आवश्यकताच होती.
  धन्यवाद आभार अन अभिनंदनही ….

 8. दिनकर मनवर यांची मूळ कविता वाचायला मिळाली तर संदर्भ चांगला कळेल असे वाटते.वरच्या कविताचा आशय उत्तमच.

 9. खूप छान..वास्तव दाखवणारे तरंग. अर्थ सोडून अनर्थ शोधायला निघालेलं पाणी.