(तंबी दुराई यांजकडून ) – भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी, ‘नरेंद्र मोदी हे विष्णूचा ११वा अवतार आहेत’ असे ट्विट केल्याने पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर वारेमाप संतापलेले आहेत. वाघ यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता असून, मुळात भगवान विष्णू हेच नरेंद्र मोदी यांचा ११वा अवतार असल्याची पक्षाची भूमिका असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.  या संबंधी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री अमित शहा यांनी अवधूत वाघ यांच्या ट्विटशी पूर्णपणे असहमती दर्शवली. ‘वाघ यांचे हे विधान अज्ञानमूलक असून (शहा यांनी अज्ञानमूलक हाच शब्द उच्चारला का याबाबत संपादकीय विभागाने संबंधित प्रतिनिधीला वारंवार खोदून विचारले तेव्हा त्याने याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला) त्यांनी हिंदू पुराणांचा नीट अभ्यास केलेला नाही, हे यावरून दिसून येते’ असे ते म्हणाले.

‘आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कायम नंबर एकचे आकर्षण राहिलेले आहे. आपले राज्य, आपला देश, आपला धर्म नेहमीच एक नंबरवर असावा असे त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवले आहे. असे असताना ते कोणाचा तरी ११वा अवतार असण्याचा विचारही करणार नाहीत, असतेच तर ते पहिला अवतार असते. मात्र ते स्वतःच अनेक पराक्रम करणारे, अनेक चमत्कार करून दाखवणारे आणि अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याने त्यांना कुणाचा पहिला किंवा अकरावाच काय कुठल्याही नंबरचा अवतार होण्याची काहीच गरज नाही’ असेही शहा यांनी पुढे स्पष्ट केले. ‘अवधूत वाघ यांच्या नावात वाघ असताना ते शिवसेनेत जाण्याऐवजी भाजपमध्ये कसे आले याचीच खरे तर चौकशी केली पाहिजे’, असे सांगून शहा पुढे म्हणाले की ‘वाघाचा बंदोबस्त करण्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमचे नेते श्री देवेंद्रजी फडणवीस हे एक नंबर असून या पक्षांतर्गत वाघाचा बंदोबस्त करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच सोपविण्याचे पक्षाने ठरवलेले आहे’.

पक्षाशी संबंधित प्रत्येक प्रश्नावर, पक्षावर होणाऱ्या प्रत्येक आरोपावर, सात्विक क्रोधाने, अतिशय चिडलेल्या स्वरांत आणि संतापलेल्या चेहऱ्याने आपली भूमिका मांडण्याची जबाबदारी पार पाडणारे रविशंकर प्रसाद यांच्याशी याबाबतीत संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. या प्रश्नाशी कॉंग्रेसचा काहीही संबध नाही,असे त्यांना सांगितले असता, ‘आपण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याआधी काँग्रेसवर टीका करण्याची सवय लावून घेतलेली आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले. अवधूत वाघ यांच्या विधानाची त्यांना पुन्हा आठवण करून दिल्यावर प्रसाद यांनी ‘आपण या प्रश्नाचा नीट अभ्यास करून लवकरच याबाबत आपण आपली सविस्तर भूमिका मांडणार आहोत असे सांगितले.’

संरक्षण धोरणाशी संबंधित प्रश्न सोडून इतर सर्व प्रश्नांवर आणि इतर सर्व विषयांवर उत्साहाने प्रतिक्रिया देणाऱ्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतःहून फोन करून माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून घेतले आणि ‘आपण अवधूत वाघ यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो’ असे सांगितले. ‘पंतप्रधान मोदी हे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सर्वथा सक्षम आहेत. त्यांनी विष्णूचा कुठल्या नंबरचा अवतार असावे हे इतरांनी ठरवण्याची अजिबात गरज नाही, त्यांचे तेच ठरवतील आणि ठरवल्यावर ते स्वतःच तसे जाहीरही करतील’, असे त्या म्हणाल्या. ‘वाघ यांना ही माहिती कुठून मिळाली, ती जर खरी असेल तर ती आधीच कशी फुटली आणि खोटी असेल तर ती कोणी पसरवली याची सखोल चौकशी केली जाईल’, असेही त्यांनी सांगितले.

रूपयाचे मूल्य सतत खाली येत असल्याने सदैव काळजीत असलेले अरूण जेटली यांनी ‘आपल्या खात्याचा याच्याशी काहीही संबध नाही, वाघ यांच्या ट्विटमध्ये काही आकडे आहेत त्यामुळे हा प्रश्न अर्थखात्याशी संबधित असल्याचा काही लोकांचा गैरसमज झालेला आहे’ असा खुलासा याविषयी स्वतःहूनच केला.

महाराष्ट्रातही वाघ यांच्या वक्तव्यानंतर उलट सुलट चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत छेडले असता, ‘राज्यात वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे’ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. अवधूत वाघ यांनी केलेल्या ट्विटबाबत आपले मत काय आहे, असा थेट प्रश्न केला असता कारचा दरवाजा उघडून ते आत जाऊन बसले आणि सराईत तुपट लोभस मुद्रेने त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींचा निरोप घेतला.

विविध प्रतिक्रिया

नरेंद्र मोदी हे विष्णूचा ११वा अवतार आहेत, या अवधूत वाघ यांच्या विधानावर विविध नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अशा-

शदर पवार– मी मोदी यांना गेली अनेक वर्षे ओळखतो. असे काही असते तर त्यांनी ते लोकांपासून लपवून ठेवले नसते हे नक्की. शिवाय अकरावा की बारावा की कितवा हे त्यांचे त्यानाच ठरवू दिले पाहिजे, इतरांनी त्याची उठाठेव करण्याची गरज नाही असे मला वाटते.

अशोक चव्हाण– मी अजून ते स्टेटमेंट वाचलेले नाही. तुम्ही उद्या सकाळी फोन करा.

उद्धव ठाकरे– हा बिना शेपटीचा वाघ कोण आला? मोदींचा अवतार कुठलाही असो या वाघाचा एकूण अवतार पाहून भाजपचा अवतार संपवण्यासाठीच त्याचा जन्म झालेला आहे, अशी माझी खात्री आहे.

राज ठाकरे– अव-धूत? अवदसा आठवल्याबद्दल याला आधी धुतला पाहिजे. काँग्रेसच्या देवकांत बारुआने एकेकाळी इंदिरा इज इंडिया असं म्हटलं होत. मोदी अवतार असोत किंवा नसोत, हा अवधूत वाघ मात्र त्या बारुआचा अवतार आहे हे नक्की. त्यानं काँग्रेस संपवली, हा भाजपला संपवणार.

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 17 Comments

 1. झकास. विनोदी राजकारण म्हणाव की राजकारणातील विनोद म्हणाव. काही म्हणा तंदु(री) मस्तच
  तंदु(री) = तंबी दुराई

 2. मार्मिक..

 3. हाहा ! हा अवतार वगैरे म्हणणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे .
  बाकी शाळेत मराठी मध्ये एक धडा होता ” महापुरुषांचा पराभव “, त्याचा सारांश असा की कोणत्याही मोठ्या नेत्याचा पराभव हे त्याचे विरोधक करत नाहीत तर त्याचेच आंधळे समर्थक करत असतात.
  त्यावरून तरी मोदी समर्थाकांनी शिकावे आणि आपलया नेत्याला स्वतःच्या चुकीच्या विधानांमुळे आणि चुकीच्या कृत्यांमुळे होणाऱ्या परिणामांपासून वाचवावे.
  बाकी तंबी दुराई “कुमार केतकर “, “निखिल वाघ ” वगैरे प्रवृत्तींचा कितवा अवतार आहेत हा पण संशोधनाचा विषय आहे .
  असो !

  1. सुधारणा : “निखील वागळे “

 4. Dear tambiji…
  Best article after a long time..
  Every sentence has a punch.
  JABARDAST !!

 5. खुसखुशीत .
  खास तंबी शैलीतला लेख…

 6. Mr. Tanbi Durai, Please go to other subjects now. Whether the money has covered your eyes so that you can see like HORSE only BJP, Hindu. there are other personalities in India.

  1. Sure. i want to convey the same.There are other personalities in India. Thanks.

 7. भंगार लेख

 8. मोदी हे विष्णू चे ११ वे अवतार आहे
  आणि
  राफेल हे त्यांचे वाहन आहे.

 9. भारीये

 10. सुंदर …मार्मिक