वाचकांस विनंती. लेख मनोरंजक आहे. लेख जसा वाचत पुढे वाचत जाल तसे तुम्हास बरेच साक्षात्कार होतील. वाचून आनंद घ्यावा.

**********

खालील वाक्य वाचा:

“मी दरबारातून घरी येत असताना बाजारात गेलो. तिथं मला फौज दिसली. फौज अदालतखान्यासमोर उभी होती. तिथं सावकार सक्तीने गरिबांचा जमीन-जुमला जप्त करत होता. बाजारातील दिल्ली दरवाजातून मी घरी आलो. किल्ली लावून मी माझ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. मुख्य दालनात कारंजाचा फवारा उडत होता.

बाजूच्या हौदातून पाणी काढून मी हातपाय धुतले. नंतर मी रंगमहालात आलो. तिथं नाच बघितला. नाच आवडला म्हणून संदूकखाना उघडून नर्तकीला बक्षीस दिले. नंतर भूक लागली म्हणून खाण्यासाठी मुदपाक खाण्यात गेलो. तिथून मी परत आरामखोलीत आलो. खिडकी उघडली आणि खुर्चीवर कट्यार ठेऊन बाहेरच्या बुरुजाकडे पहात पलंगावर झोपी गेलो.”

(वरील वाक्याचे मराठी भाषांतर लेखाच्या शेवटी दिले आहे.)

ह्या वरील वाक्यात जवळपास सगळेच फारसी शब्द आहेत. नाही खरे वाटत?

बघा मग: दरबार, बाजार, घर, फौज, अदालतखाना, सावकार, सक्ती, गरीब, जमीन, जुमला,जप्त, दिल्ली दरवाजा, किल्ली, घर, दालन, कारंजे, फवारा, हौद, रंगमहाल, नाच, संदूकखाना, नर्तकी, बक्षीस, भूक, खाना, मुदपाक खाना, आराम, खिडकी, खुर्ची, बाहेर, बुरुज आणि पलंग.

इतके शब्द ह्या वरील वाक्यात फारसी आहेत. आहे ना गंमत ? पण मग हे सगळे झाले तरी कधी?  इसवीसन १२९६ म्हणजे बरोबर आजपासून ७२२ वर्षांपूर्वी फारसी भाषा महाराष्ट्रात आली. फारसी हि आजच्या इराण आणि पूर्वीच्या पर्शियन साम्राज्याची भाषा. हि भाषा इकडे येण्याचे एक कारण होते आणि ते म्हणजे इसवीसन १२९६ ला दिल्लीचा शासक अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर केलेला हल्ला. इसवीसन १३१८ पासून १३४७ पर्यंतचा महाराष्ट्राचा कारभार खिलजी सल्तनत दिल्लीत बसून करत होती.

अलाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर पुढे १३४७ साली त्याचा सुभेदार हसन गंगू ह्याने दिल्लीशी संबंध तोडून दक्षिणेत बहमनी सल्तनतीची स्थापना केली. इसवीसन १४९२ पर्यंत बिदर, १४८४ पर्यंत वऱ्हाड, १४८९ पर्यंत अहमदनगर, १४८९ पर्यंत विजापूर आणि १५१२ पर्यंत गोवळकोंडा भागात हि बहमनी सल्तनत अस्तित्वात होती. ह्या वरील बहमनी सल्तनतीच्या वेळेसच मराठ्यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्व महाराष्ट्र आक्रमिण्याचा उद्योग सुरु केला. इसवीसन १४५० च्या सुमारास खानदेशातील स्वाऱ्यांत निकम, ठाण्यास बिंबदेव राणे, कोळवनात कोळी, रामनगरास राणे, सोनगड आणि रायरीच्या प्रांतात तेथील राजे, शिरकाणात शीरके, खेळण्यास शंकरदेव, वाडीस सावंत, बेळगावास कर्णराज, मोरगिरीस मोरे, असे अनेक मराठे आपले राज्य स्वतंत्रपणे करीत असत. ह्या वरील प्रांतांमध्ये १४५० पर्यंत अस्सल मराठीचाच प्रचार होत असे. मात्र हे प्रांत सोडून बाकीच्या प्रदेशांत फारसी शब्दांचा सुळसुळाट झाला होता. १४५० नंतर हि लहान लहान राज्ये नष्ट होऊन बहमनी सल्तनतीच्या अंकित बनली.

ह्या बहमनी सल्तनतीचे पुढे जाऊन बरिदशाही, इमादशाही, निजामशाही, आदिलशाही, आणि कुतुबशाही असे पाच तुकडे पडले. बरिदशाही-१६५६, इमादशाही-१५७२, निजामशाही-१६३७, आदिलशाही-१६८६, आणि कुतुबशाही-१६८७ पर्यंत अस्तित्वात होत्या. म्हणजे ह्या राजसत्ता जिवंत असूपर्यंत फारसी भाषेने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला.  हे सगळे मुस्लिम शासक मूळचे पर्शियन असल्यामुळे त्यांची दरबारी भाषा हि फारसी होती. त्यामुळे फारसी आणि मराठीची टक्कर होऊ लागली. सुलतानांनी राज्य चालविताना आपली भाषा वापरण्यावर भर दिला. त्यामुळे जमीन महसूल असो कि अजून काही. सगळीकडे फारसी शब्द वापरू जाऊ लागले.

जेथे जेथे म्हणून मुस्लिम शासकांचे राज्य कायम झाले तेथे तेथे दरबारातील सर्व मराठी लिहिण्यात फारसी संबंधांचा भरणा विशेष असे. दरबारापासून दूर अश्या गावी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा जेथे संबंध नाही अश्या गावकीच्या किंवा धर्माच्या किंवा गोतकीच्या खटल्यात जे कागदपत्र बनत त्यात फारसी शब्दांची संख्या फारच कमी असे. मात्र त्यात फारसी शब्द बिलकुल नसत असे नाही. इसवीसन १२९६ ला अलाउद्दीन खिलजी महाराष्ट्रात आल्यापासून १६८७ च्या कुतुबशाहीच्या अस्तापर्यंत ३९१ वर्ष फारसी भाषेला महाराष्ट्रात झाली होती. ह्या ३९१ वर्षात ह्या फारसी भाषेच्या राक्षसाने रूप धारण केले होते. देशात फारसी भाषेचा इतका प्रचंड संचार झाला होता कि दरबारापासून अलिप्त राहणाऱ्या व्यक्तीच्याही बोलण्यात किंवा लिहिण्यात फारसी शब्द नकळत येत असे.

फारसीतून मराठीत जी विशेषनामे रूढ झाली ती धक्कादायक अशी आहेत. उदाहरणार्थ: आबा, बाबा, मामा, मामी, नाना, नानी, काका, काकी, अबू, अम्मा, अम्मी वगैरे मराठीतील टोपण नावे हि फारसी आहेत. ह्याशिवाय सुल्तानराव, जानराव, बाजीराव, रुस्तुमराव, शहाजीराव, शाहू, फिरंगोजीराव, सर्जेराव, हैबतराव, सर्फरोजीराव, वगैरे नावेही फारशीच आहेत. ह्या शिवाय अजून सौदागर, मुश्रीफ, सराफ, चिटणीस, फडणीस, पोतनीस, हेजिबराव, दिवाण, पेशवे, वाकनीस, दफ्तरदार अशी आडनांवेही फारसी आहेत. अश्या स्वरूपाच्या शेकडो फारसी शब्दांनी मराठीत कायमचे ठाण मांडले.

जस जसे यावनी भाषेचे मराठीवर आक्रमण होऊ लागले तस तसे संतांनी तातडीने समाजप्रबोधनातून मराठी भाषा वाचविण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु केले.

संत ज्ञानेश्वर म्हणतात,

“माझा मराठाची बोलू कौतुके।

परी अमृतातेही पैजा जिंके।

ऐसी अक्षरे। रसिके मेळवीन”

संत तुकाराम तर अजून ओजस्वी म्हणतात कि

“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने।

शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ।।

शब्द ची आमुच्या जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जनलोका ।।

तुका म्हणे पहा शब्द चि हा देव। शब्दे चि गौरव पूजा करू ।।

संत जनाबाई, संत बहिणाबाईं, संत एकनाथांनी जशी मराठी भाषा समृद्ध केली तशीच संत नामदेवांनीही मराठी भाषेचा वारू यथार्थ दौडवीला. संतांचे हे सगळे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांच्या ओव्यांमधून भारुडांमधून फारसीच्या दुष्काळात गुडूप झालेल्या मराठीचा जिवंत झरा सुप्तपणे लोकांच्या मनोमनी वाहतच राहिला. इसवीसन १२९६ ला अलाउद्दीन खिलजी महाराष्ट्रात आल्यापासून थेट शिवाजी महाराजांपर्यंत म्हणजे इसवीसन १६५६ पर्यंत फारसीला महाराष्ट्रात येऊन ३६० वर्ष पूर्ण झाली होती.

मराठी भाषा वाचविण्याचे सगळ्यात मोठे कार्य जर कोणी केले असेल तर ते शिवाजी महाराजांनी.  शिवाजी महाराजांनी स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेच्या रक्षणार्थ मोठे कार्य केले. राज्यकारभारात आणि दैनंदिन व्यवहारात आलेल्या अनेक फार्सी, अरबी, तुर्की- म्हणजेच या नव्या शब्दांना पर्यायी संस्कृत अथवा प्राकृत शब्द योजण्याची कल्पना शिवाजी महाराजांना सुचली आणि त्यातूनच राज्याभिषेकानंतर (१६७४) त्यांनी ‘राज्यव्यवहार कोश‘ तयार करण्यासाठी रघुनाथ नारायण हणमंते या पंडिताची नियुक्ती केली. (काही अभ्यासकांच्या मते हा राज्यव्यवहार कोश तंजावरच्या धुंडिराज लक्ष्मण व्यास ह्यांनी लिहिलेला आहे.)

शेवटच्या घटक मोजणाऱ्या मराठीला छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे नवसंजीवनी मिळाली आणि मराठी भाषेचा वृक्ष वेगाने मोठा होऊ लागला. माय मराठी वाचविण्याचे हे मोठेच कार्य शिवाजी महाराजांनी केले. इथून पुढे सावध वाचावे:

संतांनी, शिवाजी महाराजांनी जशी आपली माय मराठी भाषा जपायचा प्रयत्न केला तसा प्रयत्न आपण सर्वानी हट्टाने केला पाहिजे. आपल्या बोलीचालीत, प्रत्येक कार्यात, सण-समारंभात मराठी कसोशीने वापरली पाहिजे. मी माझ्या कामानिमित्त बऱ्याच देशांमध्ये फिरतो. तुम्ही जर्मनीत जाल तर तिथं फक्त जर्मन बोलतात. फ्रान्समध्ये जाल तर तिथं फक्त फ्रेंच भाषा बोलतात. त्यांच्या दुकानांची नावे हे फ्रेंच भाषेतच आहेत. इटलीत जाल तर इटालियन बोलतात, गल्फ देशांमध्ये अरबीच बोलतात. चायनात जाल तर चायनीजच बोलतात. चायनीज लोकांना तर बिलकुल इंग्रजी येत नाही. जपानी पण जापनीज बोलतात.

आता जरा गुगल वर जाऊन शोध घ्या कि भारतात कुठल्या प्रमुख भाषा बोलतात.  शोधल्यावर तुम्हाला हिंदी नंतर इंग्रजीचे नाव दुसरे येईल. मग मराठी, बंगाली, तमिळ वगैरे वगैरे… देशी परदेशी असे खूप सारे संशोधक, लेखक आहेत कि त्यांना त्यांच्या देशी भाषेशिवाय इतर भाषा अजिबात येत नाहीत. जर तुम्ही ‘युनायटेड नेशन’ मधील नेत्यांची भाषणे पहिली तर तुम्हाला सगळे नेते, प्रतिनिधी कानाला ‘हेडफोन’ लावून बसलेले दिसतात. हे ‘हेडफोन’ त्यांना ते भाषण ऐकणाऱ्याच्या भाषेत रूपांतरित करून सांगते. जर युनायटेड नेशनमध्ये भाषेवाचून कोणाचे काही अडत नसेल तर मग आपण इंग्रजीचा आणि नवीन फ्याड आलेल्या फ्रेंच भाषेचा हट्ट का करावा?

म्हणून अभिमान बाळगा मराठी भाषेचा. एखादी चांगली हासडून मराठी शिवी देऊन बघा समोरच्याला. काय आनंदाने उर भरून येतो आपल्या भाषेचे सामर्थ्य पाहून. माझ्या मते भाषा हि मोठ्या वटवृक्षासारखी असते. ह्या भाषेच्या वटवृक्षात वाईट असे काही नसते. जे असते ते चांगलेच असते. त्यामुळे उगाच सभ्यपणाचा आणि शुद्धतेचा आव आणून आपली बोली मराठी भाषा मारू नये. सोलापुरी, कोल्हापुरी, नगरी, सातारी, अहिराणी, माणदेशी, खान्देशी, कोकणी, कोळी, आगरी, चंदगडी, नागपुरी, मालवणी, वऱ्हाडी ह्या सगळ्या ह्या मराठी भाषेच्या वटवृक्षाच्या फांद्या आहेत. उगाच शुद्धतेचा आव आणून ह्या फांद्या तोडू नयेत. ( …खास पुणेकरांसाठी हा सल्ला आहे.)

ह्या फांद्यांमुळेच मराठीचा हा वृक्ष बहरलेला आहे. आता मराठीचे महत्व आणी मराठी कुठं कुठं बोलतात ते पहा: आशिया, आफ्रिका, नॉर्थ-साऊथ अमेरिका, अंटार्टिका युरोप आणी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्व देशांत प्रदेशांत मराठी माणसे आपल्या कर्तृत्वाने पोहोचलेली आहेत. त्यामुळे तिथेही मराठी बोलली जाते. देशातील २९ राज्ये आणी ७केंद्रशासित प्रदेशांत मराठी भाषिकांची वस्ती आहे. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.  शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत, चरित्र कोश, तत्त्वज्ञानकोश, वाङ्मयमयकोश, विश्वकोश, समाजविज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृती कोश, ज्ञानकोश, असे शेकडो प्रकारचे कोश मराठीत आहेत. या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो, असे म्हटले जाते.

गाथा सप्तशती हा ७०० श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणा अगोदर किमान ३०० वर्षे अस्तित्वात असली पाहिजे. इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत. भांडारकर पुरातत्त्व संशोधन संस्थेमध्ये किमान ८० हस्तलिखिते मराठी भाषेचे पुरातत्व सिद्ध करणारी आहेत. आपण भारतीय सोडून इतर जग तरी इंग्रजीचे अजिबात कौतुक करताना दिसत नाही. लक्षात ठेवा आपण देश विदेशात जे नाव, प्रतिष्ठा, यश मिळविले आहे ते आपल्या बुद्धीच्या जोरावर. इंग्रजीच्या जोरावर नाही.

आता अत्यंत महत्वाचे:

मी लेखाच्या सुरवातीलाच तुम्हाला एक वाक्य वाचायला सांगितले होते. त्यात बरेचसे फारसी शब्द होते. त्याचे पूर्ण मराठी भाषांतर आता तुम्हास सांगतो.

“मी राजसभेतून स्वगृही येत असताना पेठेत गेलो. तिथं मला सैन्य दिसले. सैन्य न्यायालयासमोर उभे होते. तिथं धनिक कठोरपणे दरिद्री लोकांची सर्व भूमी हरण करत होता. पेठेतील इन्द्रप्रस्थ द्वारातून मी घरी आलो. चावी लावून मी द्वाराचे टाळे उघडले. मुख्य कक्षात पाणी उंच उडवण्याच्या नलिकेतून तुषार उडत होते. शेजारच्या कुंडातून पाणी काढून हातपाय धुतले. नंतर मी विलासमंदिरात आलो. तिथे नृत्य बघितले. पेटी उघडून नृत्यांगनाला पारितोषिक दिले. भूक लागली म्हणून जेवणासाठी स्वयंपाक घरात गेलो. तिथून मी परत विश्रांती कक्षात आलो. बारी उघडली आणि चारपाई आसनावर कृपान ठेऊन वर्तुळाकार तटबंदीकडे पहात खाटेवर झोपी गेलो.

**********

Leave a Reply

This Post Has 13 Comments

  1. लेख आवडला पण इथेही उगाचच पुणेरी मराठी भाषेला नाव ठेवायची गरज नव्हती. जशा इतर मराठी बोली भाषा आहे तशीच शुद्ध मराठी भाषा ही पण त्याचाच एक भाग आहे. आता हल्ली जवळ जवळ शुद्ध भाषा वापरणे अत्यंत कमी झाले अथवा बोलताच येत नसल्यामुळे जाता येता शुद्ध मराठी भाषेची खिल्ली उडवतात. आमची शुद्ध मराठी बोली आहे ही fact आहे. तर आम्ही तसेच बोलणार कारण आम्ही कायम तसेच बोलतो. त्यासाठी प्रयत्न करत नाही. आणि मी पुण्याची नाही मुंबईची आहे. बाकी लेख माहिती पूर्ण.

  2. लय भारी

  3. लेखात गंमत कुठे आहार

  4. नाविन्यपूर्ण

  5. Zakaas .

  6. Lekh changala aahe pan gammat kothech nahi.

  7. वा छान आहे लेख

  8. फार उपयुक्त आहे हा लेख

  9. अतिशय सुंदर लेख. वा क्या बात हैं 👍👍

  10. अतिशय उपयुक्त