आणखी एक पतंगबाजी…

पतंग उडवण्याचा उत्सव मुख्यतः गुजरातमध्ये साजरा होत असला तरी राजकीय पतंगबाजीत मात्र महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यातही सोशल मिडीया आल्यावर घरबसल्या पतंगबाजी करता येऊ लागली आहे त्यामुळे सोशल मिडीयाच्या आभाळात सतत पंतग तरंगताना दिसतच असतात.  आत्ता परवाच जाणता राजा आणि गर्दीचा राजा, हे दोघे औरंगाबादला एकाच हॉटेलमध्ये थांबले आणि विमानात एकमेकांशेजारी बसूनच मुंबईला परतले. त्याचे फोटो व्हायरल झाल्यापासून तर आकाशात पतंगांची गर्दी खूपच वाढली. त्यांच्यात काय बोलणे झाले असावे या चर्चांनी फेसबुक भरुन वाहू लागले. चला..तर मग आपणही उडवूया पतंग !

जा.रा.-  कशी झाली ट्रिप? फार गरम असणार तिकडे.

ग.रा.- गरम? अहो तोंडानं नुसतं अंडं  म्हटलं तरी समोरच्याला ऑम्लेट असं ऐकायलं येतं होतं, एवढं गरम होतं.

जा.रा.- ( हसतात ) गेल्या वेळेस तुम्ही मध्येच परत फिरला होता. मला आठवतंय.

ग.रा.- हो, तुम्हाला आठवत असणारच. कुणाचं काय आठवायचं याबाबत तुम्ही पक्के आहात.

जा.रा.- तुम्हाला माहिती आहे का, मला राजकारणातला अमिताभ बच्चन म्हणतात.

ग.रा.- खरंच आहे, तुम्ही आहातच अमिताभ बच्चन.

जा.रा.- (मिश्किल हसत) तसं नाही हो, आमच्या मुलाबाळांना अजून दुकान सांभाळता येत नसल्याने, आजही रोज सकाळी आम्हालाच शटर उघडून दुकानाच्या गल्ल्यावर बसावं लागतं, म्हणून अमिताभ बच्चन म्हणतात.

(ग.रा. जोरानं हसतात, थोडं खोकतात)

जा.रा.- ते धूरकांडं ओढणं बंद करा, प्रेमाचा सल्ला आहे हा.

ग.रा. (सल्ल्याकडे दुर्लक्ष करत)- यावेळी आघाडीत बिघाडी की सुधारी?

जा.रा.- म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा नाही तोवर आघाडीला मरण नाही. त्यांनी तिकडून पांघरुण ओढायचं, आम्ही इकडून पांघरुण ओढायचं. कुणाचे ना कुणाचे पाय उघडे पडणारच.

ग.रा.- आणि युतीचं काय वाटतं?

जा.रा.- त्याचं त्यांनाच काही वाटत नाही, आपल्याला काय वाटायचं? सासू-सूना दिवसभर भांड भांड भांडतात आणि रात्री स्वयंपाकाची वेळ झाली की सून भाजी चिरायला घेते अन् सासू कणिक मळायला बसते, तसं  आहे त्यांचं.

ग.रा. (हसतात) – हो, कारण सूनेचा नवरा आणि सासूचा मुलगा रात्री घरी आलेला असतो ना. पण यांचा नवरा बसलाय दिल्लीत…

जा.रा.- नवरा? नवरे म्हणा. दोन आहेत.

ग.रा.- यांच्या एका नवऱ्याबद्दल प्रेमानं बोलून तुम्ही अधूनमधून संशय निर्माण करताच.

जा.रा.- (खास  जा.रा. पध्दतीनं गूढ हसत) उद्या त्यांनी मीटू म्हणून तक्रार करु नये म्हणजे झालं…

(ग.रा. जा.रा एकमेकांना टाळी देतात)

जा.रा.- तुमचं काय?

ग.रा.- आमचं नेहमीप्रमाणेच. दुकानात गर्दी दिसते, पण संध्याकाळी गल्ला मात्र रिकामा असतो. आमचा एकमेव उरला होता, त्याला म्हटलं तू पण जा बाबा सोडून, सुरुवात नेहमी शून्यापासूनच केली पाहिजे. मग गेला तो.

( दोघांच्या हास्यस्फोटामुळे बाजूचे प्रवासी दचकतात )

जा.रा.- यावेळी शून्याच्या आधी एक लागला पाहिजे.

ग.रा.-  मी तर हातानं शून्याच्या आधी दहा लिहायलाही तयार आहे. लोक गर्दी करतात, टाळ्या वाजवतात पण बटन दाबताना यांची बोटं भलतीकडेच जातात.

जा.रा.- बोट काय आणि बोटं काय भलतीकडे गेली की खडकावर जाऊन आदळतात, फुटतात हे लोकांना आता कळायलं हवं. ताजं उदाहरण आहे परवाचं.

ग.रा.- भयंकरच होतं ते

जा.रा.- फारच भयंकर. फार वाईट झालं.

ग.रा.- (विषय बदलत) मी गेलो त्या भागात जंगल मात्र खूपच छान होतं..

जा.रा.- हो, आणि हवाही छान शुद्ध असेल..

ग.रा.- शुद्ध हवेचं नाव काढू नका. उगाच नको ते अर्थ निघतील.

जा.रा.- (गोंधळून) मला कळलं नाही…

ग.रा.- चला, एक गोष्ट तर अशी आहे जी तुम्हाला कळली नाही

(तेवढ्याच जा.रा.चा चेहरा बदलतो)

जा.रा.- अच्छा अच्छा…ते सोडून द्या हो. ते उगाच ताणलं मिडीया आणि सोशल मिडीयानं. पण ते असो. आणखी काय काय पाहिलं तिकडे विदर्भात? एखादं जलयुक्त शिवार वगैरे दिसलं का कुठं?

ग.रा.- अहो, प्रत्येक वेळी पाण्याचं डबकं दिसलं रे दिसलं की मी लोकांना विचारायचो, हेच ते जलयुक्त शिवार होय का म्हणून..

जा.रा.- मग?

ग.रा.- लोकांना काही कळेचना, मी काय विचारतोय ते. मग जेवायच्या आधी हात धुतले, त्याचं पाणी जमीनीवर साचलं तर त्यालाही लोक जलयुक्त शिवार म्हणू लागले.

जा.रा.- (टाळी देत) असं बोललात की, तुमच्यात मला नेहमी बाळासाहेब दिसतात. असं सुचत नाही सगळ्यांना.

ग.रा.- तुमच्याकडेही आहेतच की एकेक धमाल. तुमचे छत्रपती काय म्हणतात?

जा.रा.- (चेहऱ्यावर हास्य) ते राजे आहेत. अजून त्यांना लोकशाहीची सवय झालेली नाही. होईल हळू हळू.

ग.रा.-सिंचन प्रकरणही आता पुन्हा बाहेर निघतंय.

जा.रा.- लोकशाहीचा विजय होईपर्यंत असं काहीबाही निघत राहणार. तुम्ही आता बाहेर पडलाच आहात तर, हात पाय पसरा जरा..

ग.रा.- तुम्ही एकमेकांची पांघरुणं ओढा, ते दोघे एकमेकांचे पाय ओढतील, म्हणजे मी हातपाय पसरेन..

जा.रा.- (कान टवकारुन अंदाज घेत) विमानाच्या आवाजात बदल झाला आहे, मुंबईत पोचलोय आपण..

ग.रा.- म्हणजे जमिनीवर येण्याची वेळ झालीय आता..चला, भेटूच.

जा.रा.- भेटूच.

तंबी दुराई

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 4 Comments

  1. लै भारी

  2. मस्त! फारच छान! मजा आली!

  3. झकास!! राजकारणावर लिहिताना तंबींच्या लेखणीला धार येते…. आणि आता निवडणुकांचा हंगाम चालू होतोय म्हणजे दर रविवारी मेजवानी…

  4. एकदम छान. टिपिकल तंबी स्टाइल मध्ये!!!