लेखिका: मीना वैशंपायन

रस्त्याने जाताना एखादा कुणीतरी आपल्या लहानग्या मुलाला फरफटत नेताना  दिसला की,आपल्याला त्या माणसाचा राग येतो. बसमधून जाताना आपल्या शेजारी एखादा वृद्ध उभा हे आणि कुणीही तरूण त्याला उठून जागा देत नाही हे लक्षात आलं की आपल्याला राग येतो. ते मूल किंवा तो वृद्ध आपला कुणी नातेवाईक नसतो, तरीही ती दृश्ये आपल्याला चीड आणतात. या गोष्टी म्हटलं तर तशा  क्षुल्लक, किरकोळच असतात पण तिथे माणुसकी हे मूल्य पाळलं जात नाही म्हणून आपल्याला सात्विक संताप येतो. घटनांचं गांभीर्य जितकं अधिक असेल तितकी आपल्या संतापाची धारही तीव्र होत जाते, आणि त्या संतापाचं कृतीत रूपांतर  होतं, हा आपला नेहमीचा अनुभव !

सहज कल्पना करा की, असा राग जर आपल्याला येईनासाच झाला तर ? आपल्या डोळ्यांसमोर असं काही धडत असताना आपण काहीच हालचाल केली नाही तर ते अनैसर्गिक नाही का? कारण अन्यायविरुद्ध चीड येणं, साधी, मूलभूत जीवनमूल्यं पायदळी तुडवली जाताहेत हे पाहून राग येणं ही सुसंस्कृत मानवी मनाची सहज प्रवृत्तीच आहे. अलीकडे मात्र मानवाची ही सहज प्रवृत्ती नष्ट होत आहे, नव्हे त्या प्रवृत्तीचा अंतच झाला आहे , असं कुणी म्हटलं तर त्यात काय चुकीचं ?क्षणभर आपल्याला चमकल्यासारखं होईल, पण विचारांती आपल्याला ते पटेलही. अमेरिकेतील मेरीलॅन्ड राज्यात राहणारे डॉ. विल्यम बेनेट यांना ठामपणे असं वाटतं की, माणसांमधली ही सात्विक संतापाची वृत्ती आणि त्या वृत्तीला आधारभूत असणारी मूल्यनिष्ठा समाजातून नाहीशीच झाली आहे. त्यांनी आपल्या नव्या, ताज्या पुस्तकाला नाव दिलंय, ‘द डेथ ऑफ आऊटरेज’—‘सात्विक संतापाची अखेर !’ लेखक डॉ. बेनेट यांना तीव्रतेनं असं वाटण्याचं कारण आहे. सध्या अमेरिकेतच नव्हे तर सर्वत्र चर्चेचा विषय असलेले राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि त्यांच्यावरील आरोप!

महिन्याभरापूर्वी न्यूयॉर्क येथील ‘फ्री प्रेस’ प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलंय.डॉ. विल्यम बेनेट हे ‘एम्पॉवर अमेरिका’ चे सहसंचालक आणि ‘हेरिटेज फाऊंडेशन’चे फेलो आहेत. ‘सांस्कृतिक धोरणांचा अभ्यास’ हा त्यांचा विषय. राजकीय तत्त्वज्ञानातील डॉक्टरेट मिळवणा-या बेनेट यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बुश व रेगन यांच्याबरोबरही विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे. क्लिंटन प्रकरणातील सारे साक्षीपुरावे लक्षात घेऊन त्याबद्दल मतप्रदर्शन करीत असताना, डॉ. बेनेट यांनी काही महत्त्वाच्या मुद्दयांचा ऊहापोह केला आहे. ते सारं वाचत असताना मनामध्ये सतत आपल्या समाजातील अनेक उदाहरणे, प्रसंग  आठवत होती, आणि वाटत होतं की, क्लिंटन यांच्या निमित्ताने डॉ. बेनेट यांनी कळत-नकळत सा-या मानवी समाजातील आधुनिक वृत्तीचंच विवेचन केलं आहे.

क्लिंटन यांच्यावर अनैतिक संबंध,खोटे बोलणे, भ्रष्टाचार असे वेगवेगळे आरोप होऊन त्यातले काही सिद्ध होऊनही त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यांच्या लोकप्रियतेची चाचणी घेण्यात आली तेव्हा या सा-या गंभीर घटनांनंतरही त्याची लोकप्रियता घटलेली दिसली नाही, किंवा त्यांनी राजीनामा द्यावा असेही सर्वसामान्यांना वाटत नाही. क्लिंटन यांच्या अनैतिक संबंधांकडे आपण दुर्लक्ष करावे, असे अमेरिककन लोकांना वाटते, कारण कुणाशी, आणि कसे संबंध ठेवायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असे ब-याच अमेरिकनांचे मत आहे. डॉ. बेनेट यांना मात्र ही सारी विचारसरणी चुकीची आणि समाजप्रकृतीचा गंभीरपण विचार करायला लावणारी आहे , असे वाटते. त्यांच्या मते , राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर असणा-या व्यक्तीला अशा प्रकारे अनिर्बंध जीवन जगण्याचं स्वातंत्र्य नसतं. कारण राष्ट्राध्यक्षच काय पण लोकप्रिय खेळाडू, कलावंत हेदेखील त्या त्या राष्ट्रातील जनतेचे आदर्श असतात आणि आपल्या त्या स्थानाचं बंधन, पावित्र्य त्यांनी पाळणं आवश्यक असतं. एखादा कलावंत कितीही प्रतिभावंत असला तरी त्याचं अनैतिक, भ्रष्टाचारी, अहंकारी वर्तन समर्थनीय ठरत नाही.

एका ‘अमेरिकन’ व्यक्तीने असे विचार मांडावेत याचं आपल्याला आश्चर्य वाटेल कदाचित, पण ते विचारार्ह आहेत. क्लिंटनच्या धोरणांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली, अमेरिकेची सुबत्ता वाढली. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांच्या या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करावे असे काही अमेरिकनांचे मत आहे. एखाद्या राष्ट्राध्यक्षांची गुणवत्ता केवळ त्यांच्या आर्थिक धोरणांनी ठरते का ? केवळ पैशांमध्ये सा-या गोष्टी मोजल्या जाव्यात याची खंत, चीड डॉ. बेनेट यांना येते. बिल क्लिंटन यांनी शपथपूर्वक खोटी साक्ष दिली,कायद्यांचे उल्लंघन केले , अनेक गोष्टी आपणास माहीत नसल्याचा , आपण ऐकल्या नसल्याचा आव आणला. अमेरिकन समाजाला लांच्छनास्पद अश्या गोष्टी केल्या, असे बेनेट म्हणतात. मनात आलं, भारतातील अनेक नेत्यांच्या बाबतीत अधिक वेगळं आपण काय म्हणू शकतो? आर्थिक स्थैर्य आणलं म्हणून क्लिंटन यांची गुणवत्ता निरपवाद ठरत नाही. कारण त्यांचं व्यक्तिमत्त्व संशयास्पद आहे, गर्हणीय आहे. अमेरिकन व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेचा इथे अतिरेक केला गेला आहे, असं दिसतं.

अमेरिकेत अगदी ‘रामराज्य’ आहे अशी  आपल्या समाजातील अनेकांची कल्पना आहे, पण रामराज्यातील ‘राम’ फक्त आर्थिक सुबत्तेत नव्हता तर रामाच्या एकसंध, चारित्र्यवान, सत्यप्रिय, वचनबद्ध व्यक्तिमत्त्वात होता हे आपण जाणतो आणि त्यालाच महत्त्व  देत आलो आहोत. ते तसे देणेच आवश्यक आहे. आजवरची कोणतीच संस्कृती मूल्यविरहित समाजाचा पुरस्कार करीत नाही. मूल्याधिष्ठित संस्कृतीच महान ठरते, असे बेनेट यांचे प्रतिपादन आहे. यामुळेच क्लिंटन याच्या वर्तनाचा सर्व थरांतून मोठ्या प्रमाणावर निषेध झाला पाहिजे असे मोठ्या पोटतिडिकेने बेनेट म्हणतात. तसे होत नाही, समाज या सा-याकडे पाहून, खांदे उडवत, ‘मला काय त्याचे ?माझे सारे व्यवस्थित चाललेय ना’? असे म्हणतो, याचा त्यांना अतिशय राग येतोय.

विचार करता मनात येतं की हे आपलंच तर चित्र नाही ? आपल्याकडे याहून काय निराळी परिस्थिती आहे ? आमची मने तर इतकी संवेदनाशून्य झाली आहेत की, ती कोणत्याही, कोणावरच्याही अन्यायाने, अत्याचाराने पेटून उठतच नाहीत. मूल्यांचा व विवेकाचा गळा आम्ही केव्हाच ‘घोटाळ्यां’मध्ये घोटून टाकला आहे. आमच्या मनांमधली जिवंतपणाची, चैतन्याची, चीडेची खूण तरी कुठे उमटते का ? आम्हीही सारे मुर्दाड, बधीर झालोय का? बहुधा याचं उत्तर होकारार्थी आहे. आपण इतके स्वार्थी, आत्मकेंद्री, संवेदनाहीन झालोय की एखाद्या अमृता देशपांडे, किंवा रूपाली पाटील यांच्या खुनांची बातमी ऐकूनही थंडपणे एक सुस्कारा  सोडण्यापलीकडे आपण काही करीत नाही. आपल्या चामडीबचाऊ वृत्तीने आणि अलिप्त मनाने आम्ही दंगलग्रस्त भागांकडे दुर्लक्ष करतो. याचं एक दुसरं रूपही दिसतं. ज्या सांगलीत अमृताचा खून अलिप्तपणे पाहिला जातो, त्या सांगलीत एक मराठा मुलगी व दलित तरूण यांच्यातील संबंधांवरून दंगल उसळते आणि ‘सगळी वस्ती’ सवर्णांच्या रागाला बळी पडते. हा संतापाचा योग्य आविष्कार?

रूपाली पाटीलची शोकांतिका झाली ती थंड डोक्याच्या हिंसाचारी तरूणांकडून. तो काही निषेधाचा योग्य मार्ग नव्हेच. आणि या सगळ्या कृत्यांची आपल्या समाजाची प्रतिक्रिया कोणती  एकतर पूर्ण अलिप्तता थंडपणा आणि नाहीतर एकदम हिंसा. अत्याचार, विध्वंसक आततायीपणाशिवाय आमची प्रतिक्रिया कोणतंच रूप घेऊ शकत नाही. कारण त्यामागे केवळ वैयक्तिक ईर्ष्या,द्वेष, सूड असतो. समाजहिताची मूल्यधारणा नसते. बेनेट म्हणतात, त्याप्रमाणे व्यक्तीची प्रतिष्ठा मापण्याचे आपले मानदंडच बदलले आहेत. ते केवळ व्यावहारिक झाले आहेत. आम्ही आयुष्य कप्प्याकप्प्यांमध्ये विभागून टाकलंय. पैसा हे एकच मूल्य मानणा-या या आधुनिक जीवनशैलीने आमच्या सात्विक संतापाचा अंत केला तसा आणखी कितीतरी मूल्यांचा अंत होतो आहे. आमचं आधुनिक जीवन म्हणजे तुकड्यातुकड्यांची चित्रविचित्र गोधडी होतेय पण तिला आजीच्या मायेचं एकसंध अस्तर मात्र राहाणार नाहीये.

अंक: लोकसत्ता- (१३-१०-९८)

ताजा कलम—तारीख बघताच लक्षात येईल की मी हा लेख वीस वर्षांपूर्वी लिहिला होता.  त्यात उल्लेखिलेल्या मुलींवरील अत्याचार व त्या रागाची परिणती त्यांच्या खुनात झाली होती.सगळे लोक बघत होते पण कुणीही पुढे होऊन त्यांना वाचवलं नाही. आज परिस्थिती आणखी इतकी बिघडली आहे की विचार, विवेकबुद्धीच कुणाजवळ शिल्लक राहिली नाही. रोजचा तमाशा वेगळा आहे. हतबुद्धता, असुरक्षितता आणि मूल्यहीनता यामुळे समाजातील सामान्यजनही विलक्षण  गोंधळलेले आहेत. परवा अटलबिहारींच्या अंत्यसंस्कारप्रसंगी संवेदनाशून्यतेचं, अनौचित्याचं हिडीस रूप कॅमे-याने अचूक पकडलेलं आपण सा-यांनीच पाहिलं असेल. त्यामुळे हा लेख आठवला आणि पाठवलाय. कोणतंही दडपण न बाळगता छापावा की नाही याचा निर्णय घ्यावा. – मीना वैशंपायन

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 5 Comments

 1. आपला लेख वास्तवदर्शी आहेच , वाचल्यावर दोन प्रश्न मनात आले
  1) माणूस परिस्थिती घडवतो का परिस्थिती माणूस घडवते ?
  2) कदाचित सद्य परिस्थितीत जगात टिकून राहण्यासाठी ह्या मानसिकतेची ( कमी संवेदनशीलता ) गरज असू शकते

 2. एखाद्यावर अन्याय, अत्याचार झाला की मला शहेनशाह सिनेमाची आठवण होते. आत्ताच्या काळात असाच एखादा शहेनशाह असायला हवा. धाक असायला हवा. त्या शिवाय सुधारणा होईल असं वाटत नाही.

 3. My god !
  sadly even true today !!

 4. कारण सामान्य माणसाला राजकीय पक्ष व पोलीस संरक्षण देत नाह्हीत नंतर गुंडाकडून त्रास दिला जातो पोलीस गप्प रहातात. लोक भेकड नाहीत पण आज वकील एका वेळचे २५००० घेतो तेवढे पैसे व खटला लढविणे शक्य नसते. समाज पाठीशी उभा रहात नाही. उपदेश मला हि करता येईल असे करा व तसे करा चा.

 5. मीनाताई, आजच्या समाजाच्या वैचारिक अवमूल्यनावर आपण अचूकपणे बोट ठेवलं आहे.पण आशेचे किरणही आहेत आणि सुरवातही करायची आहे यातून बाहेर पडायला!