लेखक: ग. वि. केतकर

लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांची प्रत्यक्ष शेवटची भेट १९१४ च्या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झाली. टिळकपक्ष कॉंग्रेसमध्ये यावा यासाठी बेझंटबाई प्रयत्न करीत होत्या. त्या आणि त्यांचे सहकारी श्री. सुब्बाराव हे ‘सर्व्हंट ऑफ इंडिया’ सोसायटीमध्ये उतरले होते. दि. ६ ला सकाळी व दुपारी टिळक त्यांना भेटले.

यावेळी ना. गोखले हे आजारी असल्याने सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीच्या इमारतीमध्ये तळमजल्यात असलेल्या एका खोलीत त्यांचे वास्तव्य असे. टिळक सुब्बाराव यांच्याशी बोलण्यासाठी गेले तेव्हा टिळकांनी खालच्या खोलीत असलेल्या ना. गोखल्यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली व माडीवर असलेल्या सुब्बारावांना भेटण्यास गेले.

नामदार गोखले हे अगदी काटेकोरपणे शिष्टाचार पाळणारे होते. त्यांनी टिळकांकडे निरोप धाडला की मला तुमच्याकडे येऊन भेटावयाचे आहे. गोखले यांच्या अशक्तपणामुळे जिना चढणे त्यांना कठीण झाले असते म्हणून गायकवाड वाड्यात शिरताना उजव्या हाताला पूर्वी प्रूफ करेक्टर (मुद्रितसंशोधक) बसण्याची खोली होती तेथे ही भेट घेण्याचे ठरले. तेथे दुसरे कोणी नसावे आणि राजकारणाची काही चर्चा होऊ नये असाही संकेत ठरला होता.

मी त्यावेळी सतरा वर्षांचा आणि लो. टिळकांचे धाकटे चिरंजीव श्रीधरपंत हे एकोणीस वर्षांचे होते. आम्ही दोघांनी ह्या थोर पुढाऱ्यांची गुपचुपपणे भेट पाहता यावी यासाठी एक युक्ती केली. त्यावेळच्या जुन्या वाड्यात त्या खोलीच्या दुसऱ्या अंगाला एक सहाफुटी भिंत होती. तीत दोन्ही बाजूंनी फडताळे असलेले एक आरपार कपाट होते. त्यात केसरीच्या जुन्या फायली होत्या. दुसऱ्या बाजूने ते आरपार कपाट उघडून मी व कै. श्रीधरपंत टिळक या दोघांनीही या फायली काढून खाली टाकल्या आणि धुळीने भरलेल्या त्या कपाटात आक्रसून कसेबसे आसन ठोकले! पलीकडच्या बंद असलेल्या जुन्या लाकडी दारात फटी होत्या, त्या फटीशी डोळे नेऊन आम्ही पलीकडचे दृश्य पहात होतो. तसेच बोलणेही ऐकत होतो. नामदार गोखले इतके क्षीण व पांढरे फटफटीत झालेले दिसले की हा थोर पुरुष फार दिवस यापुढे देशाला लाभणार नाही असे आम्हास वाटले.

टिळक आणि गोखले या दोघांना मधुमेह होता म्हणून औपचारिक बोलण्यात तो विषय थोडा वेळ चालला. आपण काय पथ्ये पाळतो हे टिळकांनी सांगितले. मधुमेहामुळे पुढे अंगावर व डोक्यावर फोड येतात. त्यांना आपण ‘रेझिनॉल’ हे मलम लावतो असे टिळकांनी सांगितले. या खोलीतील दोघांच्या खुर्च्यांमध्ये असलेल्या टेबलावर एक केसरीचे फाइल पडले होते. ते सहज हाताला चाळा म्हणून टिळक चाळीत होते. तेव्हा ना. गोखले यांनी सहजच प्रश्न विचारला ‘तुम्ही आता केसरी पुन: हातात घेणार का?’ टिळकांनी उत्तर दिले की ‘केसरी हाती घेणार, इतकेच नव्हे तर कॉंग्रेसमध्येही येणार’ तेव्हा गोखल्यांनी सुचविले की, ‘आम्ही कॉंग्रेसची एक पद्धत बसविली आहे तिच्यात तुमच्या येण्याने बिघाड होईल. तुम्ही दुसरी संघटना काढा.’ ठिळकांनी उत्तर दिले की ‘आता कॉंग्रेस तुमची आमची नाही, भावी पिढीची आहे.’ एवढी प्रश्नोत्तरे होताच दोघांनाही या औपचारिक भेटीत राजकारण बोलावयाचे नाही या ठरलेल्या संकेताची आठवण झाली आणि दोघांनीही खुर्चीवरून उठून भेट संपविली.

त्यावेळी कॉंग्रेसशी समेट करून कॉंग्रेसमध्ये जावयाचे का नाही यासाठी विचारविनिमयार्थ टिळकांनी आपले प्रमुख अनुयायी बोलावले होते. त्यांच्यामध्ये खूप चर्चा झाली. ज्या कन्व्हेन्शन कॉंग्रेसची सहा वर्षे निंदा केली तीत पुन: जाणे नामुष्कीचे होय असे काहींचे मत तर कॉंग्रेसमध्ये जाण्यास हरकत नाही असे काहींचे मत. या वादाची तड लागेना तेव्हा एकाने टिळकांना विचारले की ‘तुमचे मत सांगा.’ टिळक म्हणाले ते मी सांगणार होतोच पण आधी तुमची सर्वांची मते ऐकावी म्हणून स्तब्ध होतो. आता सांगतो, ‘आपल्या पक्षाने कॉंग्रेसमध्ये गेले पाहिजे असे माझे मत आहे. गेल्या सहा वर्षांत कॉंग्रेसबाहेर राहून काही कार्य झाले नाही’ यावरून टिळकांची कार्येकदृष्टी स्पष्ट होते.

ही बैठक टिळक-गोखले यांच्या भेटीच्या आधी झाली व सर्वांनी पुढारी या नात्याने टिळकांच्या म्हणण्यास मान देऊन कॉंग्रेसमध्ये जाण्याची त्यांची सूचना स्वीकारली होती. टिळक-गोखले यांच्या एकांतातील भेटीत काय झाले हे ऐकण्यास माडीवर त्यांचे अनुयायी तिष्ठत होते. त्यांना टिळकांनी सांगितले की, आपण कॉंग्रेसमध्ये येणार हे मी गोखल्यांना सांगून टाकले. त्यावेळी त्यांच्या अनुयायांपैकी काहींनी आपले उद्दिष्ट प्रतिपक्षाला आगाऊ सांगितले हे बरे झाले नाही, याबद्दल नापंसतीही व्यक्त केली.

असो, आता गायकवाड वाड्यात सर्व नवी बांधणी झाली असली तरी ही कोपऱ्यातील खोली नव्या बांधणीतही राहिली आहे.’ या ठिकाणी लो. टिळक आणि नामदार गोखले यांची अखेरची भेट १९१४ च्या डिसेंबरमध्ये झाली होती’ अशी त्या खोलीवर पांढऱ्या दगडावर कोरलेली पाटी लावावी. कागदपत्र व चरित्रे पाहिली तर प्रत्यक्ष दिनांकही सापडेल.

अस्मिता प्रकाशन दि. १-७-१९६७

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply