सर्वप्रथम पुनश्चच्या सर्व सभासद आणि वाचकांना आगामी दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!

कागदावर मांडू गेल्यास पुनश्चची ही दुसरी दिवाळी असली, तरी गेल्या वर्षी पुनश्च हे अगदी पाळण्यातलं बाळ असल्याने आमच्या स्मरणातली पहिली दिवाळी २०१८ हीच म्हणावी लागेल. एका वर्षात या बाळाला रांगायला नव्हे तर धावायला आणि बागडायला लावण्यासाठी आपणा सर्वांचे जे पाठबळ आणि योगदान उपयुक्त पडले ते आठवण्याची संधी ही दिवाळी देत आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा महोत्सव. त्यामुळे वर्षभरात पुनश्चने स्वतःचा काय प्रकाश पाडला याचीही या निमित्ताने उजळणी करता आली. पण आम्ही म्हटलं की पुनश्च हा उपक्रम स्वतःचा प्रकाश पाडणारा नसून, अंधारात असलेल्या उत्तमोत्तम साहित्यावर आपल्या परीने प्रकाशझोत टाकून, ते उजळवण्याचे एक साधन आहे. मग त्या अर्थाने पाहिल्यास पुनश्चची आजवरची वाटचाल निश्चितच समाधानकारक म्हणता येईल.

जेव्हा आम्ही म्हणतो की पुनश्च हे साधन आहे, तेव्हा साध्य काहीतरी निराळे असले पाहिजे हे चाणाक्ष वाचकांना लगेच लक्षात येईल. वर्षभरासाठी आकारलेली नगण्य वर्गणी पाहता, पैसे कमावणे हे तर आमचे साध्य असू शकत नाही, याची पुनश्चच्या सभासदांना एव्हाना खात्री पटली असावी. जुन्या लेखकांना शोधून काढून त्यांचेच साहित्य व नाव प्रमोट करत असल्यामुळे वैयक्तिक प्रसिद्धी हेही आमचे साध्य नाही. याही पुढे जाऊन सांगायचे तर, लोकांनी केवळ जुन्या दर्जेदार साहित्य वाचनाचा आनंद मिळवावा, हे देखील आमचे साध्य नाही.

तर या वाचनाद्वारे कुठेतरी समाजात चांगुलपणाची, सजगतेची वाढ व्हावी; आणि अश्या सजग झालेल्या समूहाचा अंतिमतः समाजावर प्रभाव व प्रसंगी दबाव निर्माण व्हावा हे पुनश्चचे साध्य आहे. आता आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की हे जरा ‘जादा’ आदर्शवादी विचार आहेत. पण असा विचार करून स्वस्थ बसल्यास काहीच होणार नाही, हेही नक्की. म्हणूनच आम्ही आमच्या परीने ताकद लावून यात उतरलो. सुदैवाने या विचारांना समाजातल्या १५०० लोकांचा, ज्यात अनेक लेखक, संपादक, पत्रकार, कलाकार यांचा समावेश आहे, सक्रीय पाठिंबा मिळाला.

आजच्या कमर्शियल युगात, सशुल्क उपक्रम असूनही, आमच्या हेतूंवर विश्वास ठेऊन असंख्य पुनश्चमित्र आम्हाला जोडले गेले. आणि म्हणूनच ही पहिली दिवाळी पुनश्चच्या संपूर्ण परिवारासाठी अत्यंत आनंदाची आणि समाधानाची ठरत आहे. दरम्यान कुठल्याही स्वरूपाच्या राजकीय पाठिंब्याची आम्ही कामना बाळगली नाही. कारण पुनश्चच्या प्रकाशाची ढळढळीत मशाल अपेक्षित नसून, आज जसे १५०० आहेत, तसे मंदपणे तेवत राहणारे लक्ष-लक्ष दिवे लागणे हे आमचं ध्येय आहे. आणि यातला प्रत्येक दिवा आम्ही लावणार नसून हा चांगुलपणा ‘ ज्योत से ज्योत ‘ पद्धतीनेच वाढत रहावा अशी आमची मनिषा आहे.

भविष्यात जेव्हा केव्हा लक्ष लोकांचा असा प्रभावी समाजगट तयार होईल तेव्हा अनेक सकारात्मक बदल समाजात घडलेले आपण पाहू शकू असा आम्हाला विश्वास आहे. दिवाळीच्या निमित्ताने, या कामात तुम्हा सर्वांच्या अशाच पाठबळाची अपेक्षा ठेवून आम्ही पुढचा प्रवास नव्या जोमाने सुरु करत आहोत.

‘पुनश्च’  एकदा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा आणि धन्यवाद !!

Leave a Reply

This Post Has 20 Comments

 1. नक्कीच!
  पुनश्च परिवार वाढवणं हे माझं कर्तव्य आहे असं मानून प्रत्येक सदस्याने केवळ एक सभासद जोडायचा संकल्प या दिवाळीत करु या.तरच दिव्याने दिवा लावल्यासारखे होईल.सर्वांनी असं केलं तर दिवाळीनंतर ही संख्या ३००० होईल.निदान २५०० व्हावी.
  हीच खरी दिवाळीची सक्रीय शुभेच्छा ठरेल.
  नुसती शुभदीपावली म्हणून उपयोग नाही

 2. Happy Diwali!

 3. छान उपक्रम आहे. सर्व परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 4. अभिनंदन आणि शुभेच्छा!

 5. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

 6. शुभेच्छा!

 7. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा,उत्तरोत्तर उत्तमोत्तम वाचनीय साहित्य देत रहा.👏👏👏

 8. पुनश्च च्या दिवाळीत माझी पण एक पणती लावल्याचा आनंद आणि अभिमान वाटतो.
  टीम पुनश्चला दीपावलीच्या प्रकाशमान शुभेच्छा

 9. पुनश्चच्या सर्व टीमला तसेच सर्व सभासदांस ही दीपावली आणि येणारे नवीन वर्ष सुख समाधानाचे व भरभराटीचे जावो .
  पैसा दुय्यम समजून असा समाजोपयोगी स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन !

 10. पुनश्च च्या संपूर्ण टीम ला, लेखकांना , वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. खाद्य फराळा बरोबर वाचन फराळाचा आनंद लुटू या.