दिवाळी आणि चकली याचे समीकरण कधी आणि कोणी जन्माला घातले ते माहिती नाही,परंतु ते आहे हे मात्र खरे. तर, ऐन दिवाळीच्या तोंडावर आपण आता पाहूया चकलीची एक अत्यंत वेगळ्या प्रकारची रेसिपी-

एरवी वर्षभर चकली खाणारे असतात ते वेगळे आणि दिवाळीच्या सुमारास चकली खाणारे असतात ते वेगळे. वर्षभर खपतात त्या छोट्या चकल्या, ज्या घोटा-घोटात ताजगी आणि चव भरत असतात. आता ही घोटा घोटात ताजगी म्हणजे नेमकं काय ते विचारु नका, कारण टीव्हीवर जाहिराती पाहून पाहून आम्ही ही नवी मराठी भाषा शिकलो आहोत. दिवाळीच्या सुमारास लोक खातात त्या चकल्या आकारानं मोठ्या असतात, तळहाताएवढ्या. आता प्रत्येकी(का)चा तळहात सारख्या आकाराचा नसतो. त्यामुळे ‘एखाद्याच्या घरची चकली केवढी? तर ज्याच्या त्याच्या बायकोच्या तळहाताएवढी!’ अशी म्हण आहे. ज्यांच्या बायका नोकरी करतात आणि घरी चकल्या करण्यासाठी  (पाडण्यासाठी) त्यांना वेळ नसतो, त्यांच्या घरच्या चकल्या त्यांच्या आईच्या किंवा शेजारणीच्या तळहाताएवढ्याही असू शकतात. प्रत्येकाच्या बाबतीतल्या शक्यता वेगवेगळ्या.  आपण म्हणजे आपल्या बायका (सगळ्यांच्या बायकांना मिळून हे अनेकवचन आहे, नाही तर गैरसमज होऊन प्रत्येकजण एकमेकाला ‘यूटू?’ असा मेसेज पाठवेल.) गेली शेकडो वगैरे वर्षे चकल्या करत आहोत, खात आहोत तरीही दिवाळी आली की वृत्तपत्रात, मासिकात चकल्यांच्या आणि दिवाळीच्या फराळांच्या कृती प्रसिद्ध होतातच. टीव्हीवर येऊन सेलिब्रिटीही आपापल्या आवडीच्या फराळाच्या पदार्थांच्या कृती सांगतात. आता फेसबूक आल्यापासून तर रेसिपीची बूके वाचून फेसबूकवरील जनतेला शहाणे करुन सोडणारे अनेक शेफ जन्माला आले आहेत. हे सगळे एकमेकांपासून दूर असतात त्यामुळे पदार्थ बिघडला तरी रेसिपी लिहिणारे सेफ असतात. या परिस्थितीत नेहमीच्याच लोकप्रिय पदार्थांच्या नेहमीच्या कृतींना फाटा मारुन काही नवीन पद्धती अलीकडे  आम्ही शोधून काढल्या आहेत. त्यांची ही माहिती.

तर आता पाडूया चकली…

साधारणतः तीन जणांना दोन दिवस पुरतील एवढ्या चकल्या करायच्या असतील तर त्यासाठीचे साहित्य आणि कृती अशी-

साहित्य- एक किलो विकतच्या चकल्या, मिक्सर किंवा खलबत्ता, पाणी, चकली करावयाचा साचा, तेल, शेगडी किंवा ओव्हन.

कृती- बाजारातून आणलेल्या उत्तम प्रतिच्या चकल्या आधी निट सुट्या सुट्या करुन घ्याव्या. खलबत्त्यात कुटून केलेले अथवा पाट्या परवंट्यावर वाटून केलेले पदार्थ त्या दगडाच्या स्पर्शाने अधिक चवदार होतात हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. (आपल्या पुराणकालीच सगळे शोध लागलेले होते,त्यामुळेच आपण पाटा, खलबत्ता, उखळ यांचा वापर गेली अनेक वर्षे करत आहोत. रामायण- महाभारत काळातील लोक शंभर-दोनशे वर्षे जगत असंत (उदाहरणार्थ भीष्म) त्याचे कारण तेव्हा सगळे पदार्थ कूटूनच केले जात. कुटून केलेली कृती ही नेहमीच फायदेशीर ठरते, यातूनच विचारपूर्वक केलेल्या कृतीला कूट नीती असे म्हणतात.) तर भरपूर वेळ असेल, ‘चवीने खाणार त्याला देव देणार’ यावर तुमची श्रद्धा असेल तर या सुट्या सुट्या केलेल्या चकल्या एकेक करुन खलबत्त्यात निट कुटून घ्याव्या. एकाचवेळी अधिक चकल्या खलात टाकू नयेत, त्यामुळे कोणावर वार करावा याबाबत उजव्या हातातील बत्त्याचा गोंधळ होतो आणि त्याचा एखादा फटका डाव्या हाताच्या बोटांवर बसण्याची शक्यता वाढते. ज्यांना चवीचे फार काही पडलेले नाही आणि ‘चकल्या त्या चकल्या, काय फरक पडतो’ असा ज्याचा निष्काळजी दृष्टीकोन असेल त्याने खुशाल मिक्सरचा वापर करावा.

तर अशा प्रकारे आता चकलीसाठी लागणारा मुख्य ऐवज आपल्याकडे तयार आहे.  तुम्ही जर खलबत्त्यात एक किलो चकल्या कुटल्या असतील तर लगेचच आणखी काही करण्याची ताकद तुमच्यात राहिलेली नसेल. तेव्हा पुढील कृती दुसऱ्या दिवशी केली तरी चालेल. मिक्सरचा वापर करणारे अरसिक खवैये लगेचच पुढील कृती करु शकतात. ती अशी-

एका टोपल्यात किंवा पातेल्यात किंवा मुंबईच्या मराठी भाषेत एका टोपात हा कूट घेऊन त्यातून आधी हळूवार बोटे फिरवावीत म्हणजे आपल्या मेहनतीचं आपल्यालाच क्षणभर कौतुक वाटेल. नंतर त्या कुटात थोडे थोडे पाणी घालत त्याचा साधारण चकल्या पाडता येतील एवढा घट्ट गोळा तयार करावा. ‘साधारण चकल्या पाडता येतील’ हे प्रत्येकाच्या बाबतीत सराव, त्याच्या घरातील चकलीचा साचा वगैरेवर अवलंबून असल्याने या ठिकाणी ज्याने त्याने आपापला निर्णय घेणे अपेक्षित आहे. असा गोळा तयार झाल्यावर कढईत तेल तापवायला घ्यावे. तेलात बोट बुडवून साधारणतः ते बोट बुडेल एवढे तेल कढईत असल्याची खात्री करुन घ्यावी, मात्र कढई गॅसवर किंवा चुलीवर किंवा स्टोव्हवर ठेवण्याआधीच बोट बुडवून घ्यावे. बोट बुडविण्याची वेळ चुकली तर  मग चकलीचा साचा दाबण्यासाठी नवरा घरी असेल याची आधी खात्री करुन घ्या.

या साच्यामध्ये चांदणीच्या आकाराची छिद्रे असलेली तबकडी घालून वर त्यात बसेल एवढा गोळा टाकावा आणि योग्य तेवढा दाब देऊन साचा गरम झालेल्या तेलावर गोल गोल फिरवावा. नुसताच साचा फिरवून चकल्या पडत नाहीत, योग्य दाब महत्वाचा आहे. अन्यथा ‘बॅट हवेत फिरली आणि चेंडू विकेटकीपरकडे गेला’ याचा, मूळात गोलंदाज असलेल्या फलंदाजांना  नेहमीच येतो, तसा साचेबद्ध अनुभव तुम्हालाही येईल. तर, चकल्या पाडणे हे अत्यंत कौशल्याचे काम आहे, हे यावेळी तुमच्या लक्षात येईल. तेलावर चांगल्या खरपूस भाजून झालेल्या चकल्या झाऱ्याने काढाव्यात म्हणजे सोबत तेल येत नाही. ज्यांना हेल्दी चकल्या हव्या असतील त्यांनी याच चकल्या मायक्रोवेव्हमध्ये खरपूस भाजून काढाव्यात. झाल्या चकल्या तयार! आहे की नाही सोप्पं?

या नव्या पद्धतीचा फायदा असा आहे की घरी चकलीची भाजणी करा, ती दळून आणा, एवढे सगळे श्रम करण्याची गरज पडत नाही. शिवाय तिखट, मीठ, हळद वेगळे घालण्याची गरज पडत नाही, त्यामुळे त्याची बचत होते ते वेगळेच. अशा पद्धतीने चकली केली तर तिला निट काटा येत नाही असा काहींचा अनुभव आहे. त्यांनी ही चकली करून एकदा खाऊन बघावी, म्हणजे थेट अंगावरच काटा येईल आणि चकलीला काटा असण्याची गरजच भासणार नाही. मूळातच विकतची चकली चवदार असल्याने तिची पुन्हा केलेली चकली अधिक चवदार लागेल हे वेगळे सांगण्याची गरजच नाही.

अशाच पद्धतीने, तयार करंजीपासून करंज्या, तयार लाडूपासून लाडू आणि तयार चिवड्यापासून चिवडा कसा करावा, याच्या अधिक रेसिपीज तुम्ही आमच्या संकेतस्थळावर वाचू शकता. पुनश्चच्या   वाचकांना ही दिवाळी आनंदाची आणि अशाच चवदार फराळाची जावो, अशा शुभेच्छा!

तंबी दुराई

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 13 Comments

 1. चकली चुकली असं होणार नाही.चकली चावणार नाही.चकचकीत चकल्या शिकवणारी चकाचक रेसिपी.क,

 2. लय भारी.असे मूळ पदार्थाचे उप मूळ पदार्थ करणे हा छंद जोपासल्यास पदार्थाचा होणारा नाश यापासून मुक्ती मिळेल. देशाच्या साधनसंपत्तीचा विनाश टळून देश प्रगतीकडे वाटचाल करू लागेल चीन पूर्वी आपली प्रगती धडाक्याने होईल. देश समृद्ध करण्याच्या कार्यात सहभागी होऊ शकाल.हे राष्ट्रकार्य देखील घरबसल्या होईल.

 3. ह्या रेसिपीला दुर्मिळ रेसिपीचा मान मिळावा. भविष्यात ही रेसिपी घराघरात लौकिक मिळवेल ह्यात शंकाच नाही…!!!
  दिपावलीच्या ह्या चकलीप्रमाणेच खुसखुशीत शुभेच्छा.

 4. चकली खाण्याची इच्छा झाली,हे असं होतं माझं काही चांगलं खुमासदार वाचलं की ….

 5. लेखातील चकल्यांचे फोटो एकदम मस्त, ओरिजिनल दिसताहेत………!!!
  मात्र रेसिपी खुसखुशीत नाही…….!!

 6. एकदम बेस्ट पण तंबीदुराईचा लेख हा सशुल्क+ 50 असा असतो तो आज एकदम फ्री पुनश्च ची दिवाळी सुधन्वा आणि किरणला खुसखुशीत चकल्या सारखी जावो ही सदिच्छा

 7. बात कुछ जमी नही इस बार

 8. वाहवा ! एकदम खुसखुशीत !!! खमंग !!!👌

 9. ही कल्पना मला आजपर्यंत कां सुचली नाहीं?मस्त पाककृतीबद्दल धन्यवाद.दीपावलीच्या शुभेच्छा.

 10. दीवाळीच्या शुभेच्छा.
  खलबत्ता सुद्धा आणावा लागेल