दिवाळी साजरी करीत असतानाच वयाच्या चाळीशीतील स्वानंदला थकवा जाणवू लागला. तपासण्या केल्यानंतर त्याला मधुमेह आहे असे नक्की झाले. त्याचा रक्तदाब ही वाढलेला होता. त्याच्या डोळ्यात मोतीबिंदूची  वाढ होऊ लागली होती. पूर्वी वयाच्या साठीनंतर हे सर्व आजार दिसू लागायचे. पण हल्ली चाळीशीतच हे वार्धक्यात होणारे आजार दिसू लागले आहेत. माणसाचे आयुर्मान वाढले आहे. पंचवीस वर्षांपूर्वी वयाच्या सत्त्तरीत मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक होते. आता माणसे अधिक जगतात, आधुनिक तंत्रज्ञान, औषधे यामुळे साथीच्या आजारात बळी पडण्याचे प्रमाणही कमी झाले. पण माणसे दीर्घायुषी झाली तरी वार्धक्यजन्य आजार लवकर होऊ लागले आहेत, असे का ? 

आपले आयुष्य वाढले आहे कारण पूर्वी माणसे विषमज्वर, पटकी यासारख्या आजारांनी मृत्युमुखी पडत असत. आज हे साथीचे आजार कमी झाले आहेत. त्यावर नवीन परिणामकारक औषधे शोधली गेली आहेत. माणसे गावाकडून शहरात आली आहेत. पण त्याचबरोबर त्यांच्यावरील मानसिक तणावही वाढले आहेत. मानसिक तणावाचा  परिणाम शरीरातील प्रत्येक पेशीवर होतो, पेशी लवकर म्हाताऱ्या होतात असे संशोधनात दिसत आहे. त्यामुळेच आयुष्य वाढले पण वार्धक्यातील आजार लवकर होऊ लागले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती औषध कंपन्यासाठी फायद्याची असली तरी आपल्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य नाही.

आपले शरीर म्हातारे होते म्हणजे त्याच्यातील पेशींच्या नवनिर्मितीची क्षमता कमी होते. शरीराच्या प्रत्येक पेशीत गुणसूत्रे असतात. या गुणसुत्रावर एक संरक्षक टोपी असते. त्या टोपीला टेलोमर म्हणतात. वय वाढत जाते तशी या टेलोमरची लांबी कमी होत जाते. पेशीतील टेलोमरची ही टोपी शिल्लक राहत नाही त्यावेळी नवीन पेशी निर्माण होत नाही .मानसिक तणाव,नैराश्य हे टेलोमरची टोपी वेगाने झिजण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे डॉ एलिझाबेथ ब्लॅकबर्न यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना 2007 साली नोबेल प्राईझ मिळाले. सततचे नैराश्य आणि मानसिक तणाव यामुळे शरीरातील पेशींची नवनिर्मितीची क्षमता लवकर कमी होते, वार्धक्य वेगाने येते. १९८०मध्ये एलिझाबेथ ब्लाकबर्न यांनी असा शोध लावला की telomerase नावाचे रसायन  टेलोमर च्या या टोपीचे संरक्षण करते, त्याची निर्मितीदेखील करते. असे असले तरी पेशींचे विभाजन सतत होत राहिल्याने काही वर्षांनी टेलोमरची लांबी अगदीच कमी होते आणि त्यावेळी पेशीची नवनिर्मितीची क्षमता संपून जाते, ती म्हातारी होते. म्हणजेच आपल्या शरीराच्या वार्धक्याचा वेग टेलोमेरच्या लांबीवरून ठरवता येऊ शकतो. लांबी जास्त असेल तर शरीर तरुण असते, वार्धक्य येते तशी टेलोमेरची लांबी कमी कमी होत जाते. डॉ एलिझाबेथ ब्लाकबर्न यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक दिले गेले आहे.

२००० साली एलिझाबेथ यांची भेट UCSF (युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सानफ्रान्सिस्को) च्या मानसरोग विभागात काम करणाऱ्या डॉ एलिसा एपेल (Elissa Epel) यांच्याशी झाली.

खर म्हणजे मोलेक्युलर बायोलोजीस्ट आणि सायकियाट्रिस्ट यांच्यात सूर जुळण्यासारखे काहीच नसते पण या दोघींचे सूर जुळले आणि एलिझाबेथ यांच्या संशोधनाची दिशाच बदलली. डॉ. एपेल या सायकियाट्रिस्ट, त्या त्यावेळी मानसिक तणावाचा शरीरावर काय दुष्परिणाम होतो याचा अभ्यास करीत होत्या. डॉ. हान्स सेल्ये (Hans Selye) ज्यांनी प्रथम मानसिक तणावाचा शरीरावर होणारा परिणाम दाखवून दिला ते, आणि डॉ. दीपक चोप्रा यांच्यापासून प्रेरणा घेऊन, डॉ एपेल शरीर आणि मन यांच्या परस्पर संबंधांचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यांना डॉ एलिझाबेथ यांच्या संशोधनाबद्दल माहिती होती. रोजच्या आयुष्यातील ताणतणावांचा परिणाम शरीराच्या पेशीवर काय होतो याचा अभ्यास त्यांना करायचा होता आणि तेथे या टेलोमेरच्या संशोधनाचा उपयोग होऊ शकेल असे त्यांना वाटत होते. मतीमंद किंवा जीर्ण आजाराने पिडीत मुलांच्या माता तणावाखाली असतात. त्यांची तणावाची पातळी आणि टेलोमेरची लांबी यांचा तुलनात्मक अभ्यास करायचा अशी त्यांची कल्पना होती.

डॉ. एलिझाबेथ यांनी तोपर्यंत त्यांचे सर्व संशोधन सुसज्ज प्रयोगशाळेत केलेले होते. प्रत्यक्ष माणसांचे संशोधन करणे हे त्यांच्यासाठी आव्हानच होते पण त्यांनी ते स्वीकारले. तोपर्यंत टेलोमेरची लांबी आणि पर्यायाने आपले आयुष्य जीन्सनी निश्चित केलेले असते असा सर्वांचाच पक्का समज होता. त्यावर वातावरणाचा आणि मानसिक तणावाचा परिणाम होईल असे म्हणणेदेखील त्यावेळी मूर्खपणाचे ठरले असते, पण संशोधकाने कोणतेही पूर्वग्रह मनात ठेवता नये ही उक्ती आठवून एलिझाबेथ या संशोधनाला तयार झाल्या.

या पायलट स्टडीसाठी मानसिक तणावाखाली असणाऱ्या वय वर्षे तीस ते चाळीस या वयोगटातील अठ्ठावन्न स्त्रिया निवडल्या. त्याच वयाच्या आणि तशाच आर्थिक स्थितीतील पण आपल्यावर तणाव नाही असे सांगणाऱ्या तेवढ्याच स्त्रियांचा गट कंट्रोल ग्रुप म्हणून निश्चित केला. या सर्वांच्या रक्ताची तपासणी करून टेलोमेरची लांबी आणि टेलोमरेझ या रसायनाचे प्रमाण मोजले. परीक्षणाचा निकाल अगदी स्पष्ट होता, एपेल यांचा अंदाज खरा ठरला होता. तणावामुळे सर्वाधिक अस्वस्थ असलेल्या स्त्रीच्या टेलोमेरची लांबी आणि टेलोमरेझचे प्रमाण सर्वात कमी होते. त्या लांबीनुसार ती तिच्या वयापेक्षा दहा वर्षे अधिक वृध्द झालेली होती. तणाव कमी असलेल्या कंट्रोल ग्रुप मधील स्त्रियांच्या टेलोमेरची लांबी सरासरीने  जास्त होती. मानसिक तणावाचा परिणाम केवळ प्रकृतीवरच नाही तर शरीराच्या पेशींवर आणि वार्धक्याच्या गतीवर होतो हे या पायलट स्टडी मधून जाणवत होते.

या संशोधनाचा एक फायदा झाला या क्षेत्रामध्ये अनेक संशोधकांना रस वाटू लागला. स्किझोफ्रेनियाने आजारी असलेल्या माणसांचे नातेवाईक, मानसिक आघातानंतरच्या तणावाचे रुग्ण(PTSD), औदासीन्याचे रुग्ण यांच्यातील टेलोमरची लांबी मोजण्याचे अनेक प्रयोग जगभर सुरु झाले. तणावामुळे शरीरात वाढणारे कोर्टीसोल रसायन टेलोमेरवर दुष्परिणाम करते हे सिध्द झाले. जोन हाफकिन स्कूलमधील  डॉ. मारी अर्मानोस Mary Armanios हे टेलोमेरच्या विकृतींचा अभ्यास करतात त्यांनी असे जाहीरपणे सांगितले कि वातावरणाचा टेलोमेरवर परिणाम होतोच, याविषयी माझी खात्री झाली आहे. डॉ. एलिझाबेथ यांच्या संशोधनाला अशी अनेक संशोधकांकडून मान्यता मिळू लागली. २००७मध्ये टाईम मॅगेझीनने त्यांची जगातील सर्वात प्रभावी शंभर व्यक्तींमध्ये निवड केली.

शारीरिक आणि मानसिक वातावरणामुळे टेलोमेरची लांबी कमी होत असेल तर त्यामुळे वार्धक्यात होणारे सांधेदुखी, अती रक्तदाब, मधुमेह, स्मृतिभ्रंश असे अनेक आजार अकाली होऊ शकतात अशी चिंता अनेकाना भेडसावू लागली आहे. त्यामुळे या विषयावर संशोधन करून त्यावर उपाय शोधण्यात अनेकांना रस वाटू लागला. एलिझाबेथ आणि एपेल यांच्या जोडीला  जगभरातून पन्नास-साठ साथीदार मिळाले. तणावामुळे कमी होणाऱ्या टेलोमेरच्या लांबीवर होणारा दुष्परिणाम कशाकशामुळे टाळता येऊ शकेल यावर अनेक ठिकाणी संशोधन सुरु झाले. योग्य आहार, व्यायाम, सामाजिक आधार गट या सर्वांचा उपयोग होतो असे आढळून येऊ लागले पण सर्वाधिक लक्षवेधक उपाय जाणवला तो म्हणजे ध्यान!

एलिझाबेथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  Shambhala mountain retreat in northern Colorado, शांभला येथे तीन महिने ध्यान वर्गात सहभागी झालेले आणि प्रतीक्षा यादीत असलेले यांच्या टेलोमेरची लांबी आणि टेलोमरेझचे प्रमाण यांचा तुलनात्मक अभ्यास केला त्यामध्ये ध्यान वर्गात सहभागी झालेल्या माणसांच्या टेलोमेरेझचे प्रमाण तीस टक्के जास्त नोंदवले गेले. स्मृतीभ्रंश झालेल्या व्यक्तींच्या सेवेत असणाऱ्या माणसांचा असाच एक अभ्यास झाला. दिवसात बारा मिनिटे असे आठ आठवडे ध्यान केलेल्या माणसांच्या टेलोमरेझचे प्रमाण तसे न करणाऱ्या माणसाच्या तुलनेत खूप अधिक मिळाले. डॉ डीन ऑर्निश यांनी प्रोस्टेट कर्करोग झालेल्या रुग्णांना ध्यान आणि जीवनशैलीतील बदल करायला लावले आणि पाच वर्षांनी म्हणजे २०१३मध्ये असे बदल केलेले आणि न केलेले यांच्यातील तुलनात्मक अभ्यास प्रसिध्द केला. त्यामध्ये देखील प्रोस्टेट कर्करोगाची वाढ पूर्ण थांबली होतीच पण टेलोमेर आणि टेलोमेरेझ यांची लांबी आणि प्रमाण वाढले होते. हे सर्व परिणाम पाहून डॉ एलिझाबेथ स्वतःदेखील ध्यान करू लागल्या.

त्यांनी सान्ता बार्बरा येथे सहा दिवसांचा ध्यानवर्ग केला, सप्टेंबर २००६मध्ये एका कार्यक्रमात त्यांनी दलाई लामांची भेट घेतली. दलाई लामांनी त्या कार्यक्रमात एलिझाबेथ यांचा मेडिसिन बुद्ध असा उल्लेख आणि गौरव केला. ध्यानाने मिळणारी मनाची शांतता त्यांना आवडली, नेहमीच्या धकाधकीच्या कामात ध्यान माझ्या मनाला उर्जा आणि तजेला देते असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या एका रिसर्च पेपरची सुरुवात त्यांनी बुद्धाचे एक वचन उद्धृत करून केली. “The secret of health for both mind and body is not to mourn for the past, worry about the future, or anticipate troubles but to live in the present moment wisely and earnestly.” शरीर आणि मनाच्या आरोग्याचे रहस्य हे भूतकाळात घोटाळत राहण्यात किंवा भविष्याविषयी काळजी करत राहण्यात नसून शहाणपणाने वर्तमान जगण्यात आहे. ध्यान वर्तमानात जगायची कला शिकवते, त्यामुळे अनावश्यक तणाव कमी होतो आणि या तणावामुळे येणारे अकाली वार्धक्य टाळता येते. ध्यानाचा शोध भारतात लागला असला तरी ध्यानाचा रोजचा सराव करणारे भारतीय खूप कमी आहेत. त्यामुळेच स्वानंदसारखी अकाली वार्धक्य आलेली माणसे अधिक दिसत आहेत.

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 11 Comments

 1. सुंदर लेख. तद्नुषंगिक प्रतिक्रिया ही वाचल्या. आपण आणि ते किंवा गोरे, पाश्चात्य असा भेद लेखासंदर्भात अप्रस्तुत वाटतो. मुळात भारतीय जीवनदर्शन जगण्यात स्पर्धा , वेग कमी करायला सुचवते. आपल्या आंत डोकावून पाहायला सांगते.मनाचा ताण कमी झाला की विचाराची पद्धत बदलते. हे सगळे विचार सैध्दांतिक पातळीवर न ठेवता संशोधकांनी असे परिणाम घडवून आणणारी रसायने ओळखली. त्यांची शरीरात उत्पत्ती व तिचा शरीरावर होणारा परिणाम सिध्द केला.ही विलक्षण गोष्ट आहे.

 2. सुंदर लेख

 3. गोर्‍या कातडीच्या व्यक्तीने सांगितले तर पटते हे जरी असले तरी वळते किती हा प्रश्न आहे.
  सर्वकाही माहित असूनही व्यायाम, ध्यान, करून वजन संतुलित न ठेवणारे व मानसिक तणावावर फक्त खूप खाण्याचा व्यायाम करणारेच जास्त प्रमाणात दिसतात.

 4. मस्त.

 5. अतीशय सूंदर.

 6. खूप सुंदर लेख आहे. बरीच माहिती मिळाली. ध्यान किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आले.

 7. उत्तम !ध्यानाचा वैज्ञानिक दृृष्टीने अनुबंधउलगडून सांगीतला.
  तणावमुक्तीसाठी ध्यान हाच सर्वोत्तम उपाय आहे

 8. पुन्हा एकदा सुंदर लेख दिल्याबद्दल धन्यवाद .

 9. खुप माहितीपर लेख पण जे आपले संत/ मुनी सांगत वआताचे रामदेव बाबांसारखे सांगतात ते आपल्याकडील लोकांना पटत नाही पण हेच पाश्च्यात्यानी सांगितले किमग आपण डोक्यावर घेतो .असो त्यामुळे तरी लोकं वेळकाढुनयान धारणा करतील वआपले आयुष्य सुसह्य करतील

 10. आपण ध्यान म्हणजे विविध बाबांचे काहीतरी खूळ समजतो . आता पाश्चात्य वैज्ञानिकांनी ध्यानाचा गौरव केल्यावर आपल्याला त्यातील गुण दिसू लागतील .