पुलंचा वाढदिवसानिमित्त दैनिक सकाळमध्ये आलेला आणि सोशल मिडीयावर खूप शेअर झालेला हा उत्तम लघु लेख वाचा आजच्या सोशल मिडीया सदरात.

**********

लेखक- श्री. विजय तरवडे

प्रिय पुल,

तुम्हाला जाऊन इतकी वर्षे झाली. तरी प्रसंगोपात तुमची आठवण येतच असते. रोजच्या धावपळीतून फुर्सत मिळते किंवा कधी एकाकी वाटते तेव्हा तुमचे एखादे पुस्तक हाताशी घेतो. वाचत नाही. मजकूर बव्हंशी लक्षातच असतो. पण पुस्तक डोळ्यांसमोर धरलं की मित्राचा हात धरल्यासारखं वाटतं. धीर येतो. एखादया अनवट प्रसंगी वापरलेली चपखल शब्दयोजना, कोटी आमच्यावर झालेल्या तुमच्या भाषिक संस्कारांमुळे सुचलेली असते. तेव्हा मनोमन तुमचे आभार मानत असतो.

तुम्हाला आउटडेटेड म्हणण्याची सध्या फॅशन आहे. असं म्हणणारे आम्हाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करून विचारत असतात की “सांगा, तुम्हाला पुलंनी नेमकं काय दिलं?” तर त्याचाच हिशेब मांडायचा प्रयत्न करतोय.

सामाजिक दृष्ट्या मध्यमवर्गीय, एकत्र कुटुंबात जन्मलो तरी माझं लहानपण गरिबीत गेलेलं होतं. शिक्षण उरकावं, पर्मनंट नोकरी मिळवून लग्न करावं, महिन्याची एक तारीख आणि महिनाअखेर नीट जुळाव्यात एवढीच स्वप्ने होती. तुम्ही आम्हाला स्वतःखेरीज स्वतःच्या पलीकडेही बघायला शिकवलंत. हे असं बघण्याची, बघायला शिकवण्याची गरज कधी आउटडेटेड होणार नाही. म्हणून तुम्ही कालातीत आहात.

शंकर पाटील, जयवंत दळवी, रमेश मंत्री आदिंनी आम्हाला पोटभर हसवलंच होतं. तुमचा विनोद आणि कोट्या आम्हाला कितीही आवडत असल्या तरी तुमचा यूएसपी तेवढाच नव्हता.

तुम्ही आम्हाला हात धरून ग्रामीण, दलित आणि इतर साहित्याच्या अंगणात नेलंत, चाप्लीनचे सिनेमे, आनंदवन, शांतिनिकेतन दाखवलंत, खानोलकर, मर्ढेकर सोपे करून सांगितलेत. विनोबा आणि गांधीजी समजावून सांगितलेत. तुम्ही केलेले विविध क्षेत्रातल्या माणसांचे गुणगानपर व्यक्तिचित्रण हा आमच्यासाठी तत्कालीन सांस्कृतिक विश्वाचं दस्तऐवजीकरण केलेला खजिना आहे. आमच्या चंद्रमौळी घरांच्या एकेका गवाक्षा-खिंडारातून बाहेरचे विश्वरूप दर्शन तुम्ही घडवलेत.

आणि इतरांच्या सुखदुःखांशी समरस होऊनही आमच्या जगण्याची आम्हाला लाज वाटली नाही. आमची लहानपणे, भाबड्या श्रद्धा, सणासुदीतले आनंद हे तुमच्या देखील स्मरणरंजनाचा भाग होते. तुमच्याशी घट्ट सूर जुळण्याचे ते खूपच मोठ्ठे कारण आहे.

शेवटपर्यंत तुमचा हात असाच हातात राहो.

* * *

 दैनिक सकाळ- ०८ ११ २०१८

Leave a Reply

This Post Has 7 Comments

  1. छान लेख! खरंच पुल हेअनेक व्यक्ती व व्यक्तमत्त्वांना सामान्यांशी जोडणारे पूल आहेत. शिकवण्याची ते एक उत्तम शैलीच आहेत.

  2. खूप छान पुल वाचतच आमची पीढी मोठी झाली .लेखामधे लिहील्याप्रमाणे त्यांच्या प्रत्येक व्यक्तीरेखेचा हात धरुनच आजुन पण चालतो आहोत.

  3. सातव्या वर्गात आमचे भ्रमण मंडळ हा धडा आजही विसरता येत नाही

  4. नंतर उपास ह्या धड्यातून पुलंच्या स्वतःवरही विनोद करुन लोकांना हसवण्यासाठी कमीपणा न मानण्याची मिष्किल वृत्ती दिसून आली. पुल म्हणजे ग्रेटच..!!!

  5. जगणे इतकेही किचकट आणि क्लिष्ट नाही जितके आपण मानतो हे पुलदेंनीच शिकवले. शाळेत अंतू बर्व्यावरचा धडा शिकलो आणि पुलंची ओळख झाली

  6. अप्रतिम लेग…👍👍👍👍

  7. फारच छान पु ल हे महाराष्ट्राचे दैवत होते व्यक्ती आणि वल्ली काय लिहलय अन्तु बर्वा ग्रेटच