महर्षी नारद भगवान श्रीविष्णूला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्याच नावाचा ‘नारायण नारायण’ असा मंजुळ जयघोष करीत आणि चिपळ्यांचा नाद आसमंतात उमटवित जाऊन पोचले. भगवान विष्णू शेषावर विराजमान होऊन गरमागरम चकल्यांचा आस्वाद घेत होते. नारदाचा आवाज ऐकल्या ऐकल्या माता लक्ष्मीने चकल्यांची आणखी एक थाळी भरायला घेतली होतीच, चकलीच्या तिखट स्वादाला अधिक चव यावी म्हणून थाळीत बेसनाचे दोन लाडूही ठेवले. नारदाने दोघांनाही नमन केले, शुभेच्छा दिल्या, शेषालाही अभिवादन केले आणि चकलीचा तुकडा तोडून मुखार्पण केला.

‘अहाहाहाह…काय स्वाद आहे.’

त्यांच्या तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडले. ते ऐकून शेषाला नारदाची थट्टा करण्याची लहर आली, आपला फणा अधिकच उंचावत तो म्हणाला,

‘महर्षी, चकली आणि लाडूची चव उत्तम असली तरी पोट सांभाळा, तुम्हाला ब्रम्हांडात फिरायचे असते, पोट बिघडले तर पंचाईत व्हायची.’

बेसणाच्या लाडूचा घास घेता घेता नारदाने शेषाकडे रोखून पाहिले आणि म्हणाले, ‘२४ तास खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या तुझ्यासारख्याला गोडाची आणि तिखटाची चव कशी कळणार रे?’

दोघांची ही नेहमीची जुगलबंदी वाढत जाणार हे ओळखून भगवान श्रीविष्णूंनी हस्तक्षेप करीत त्यांचा संवाद मध्येच थांबवला-

‘काय नारदमुनी, भारतवर्षाची काय खबर?’

‘चकलीत मोहन नेमके पडले आहे माते’ अशी चकलीची खुसखुशीत तारीफ करत नारदमुनी श्रीविष्णूकडे पाहात म्हणाले,

‘तेच तर सांगायला आलो होतो. कलियुगाची अखेर जवळ आली आहे. पुन्हा एकदा सगळीकडे रामराज्य स्थापन होणार आहे, धर्माची स्थापना होणार आहे.’

श्रीविष्णू चकित होऊन म्हणाले, ‘काय म्हणता मुनीवर? कालगणनेत माझी काही चूक झाली की काय? माझ्या गणिताप्रमाणे अजून बरीच वर्षे शिल्लक आहेत कलियुगाची.’

‘तपासून पाहा जरा, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आलो आहे. भारतवर्षात बघावे तिकडे भक्तीचा पूर वाहतो आहे. देवादिकांचे माहात्म्य ठायी ठायी ओसंडून वाहते आहे.’

‘सांगा तरी तुम्ही असे काय पाहून आलात?’

अलीकडेच पृथ्वीतलावर येऊन भारतवर्षाची खबरबात घेऊन गेलेल्या महर्षी नारदांनी डोळे मिटून स्मरणनोंदींची मनातल्या मनात उजळणी सुरू केली. माता लक्ष्मीही उत्सुकतेनं ऐकायला बसल्या.

नारदमुनींनी मिटलेले डोळे उघडले आणि म्हणाले, ‘एकेकाळी भारतवर्षात आणि जगात सगळीकडेच वास्तूंना, वस्तूंना, प्रकल्पांना मर्त्य मानवांची नावे दिली जात होती. आता मानवाने आपल्या या चुकीची दुरूस्ती केली असून सगळीकडे देवादिकांची नावे झळकू लागली आहेत. भारतवर्ष आणि तेथील महान लोक जे काही करतात त्याचीच जगभर पुनरावृत्ती होते हे आपणांस ठाऊक आहेच, त्यामुळे जगभरात लवकरच सगळीकडे हेच होताना दिसणार आहे. ही मला कलियुगाच्या अंताचीच लक्षणे वाटतात.’

भगवान श्रीविष्णू गोंधळून म्हणाले, ‘नीट सांगा, मला काही कळलं नाही. तुम्ही नेमकं काय पाहून आलात?’

‘ नारायण नारायण’ असा घोष करीत, चिपळ्यांचा पुन्हा एकवार नाद करीत नारदमुनींनी घसा साफ केला आणि म्हणाले, ‘मी भारतवर्षातील उत्तर परिसरात फिरायला गेलो होतो. त्या परिसरात योगी अवतरले आहेत, म्हणून मुद्दाम तिकडे गेलो होतो. तिथे काय पाहिले ते कथन करतो. ऐका ‘-

श्रीविष्णू आणि माता लक्ष्मीसोबत शेषही उत्सुकतेने ऐकू लागला.

‘विनाअश्व, वाऱ्याच्या वेगाने धावणारे वातरथ मानवाने आपल्या बुध्दीने तयार केले आहेत हे तुम्हाला ठावूक आहेच. असे वातरथ जेथून उड्डाण करतात आणि जिथे भूमीवर उतरतात त्या भागाला प्रभू रामचंद्रांचे नाव दिले गेले आहे आणि व्याधिग्रस्तांवर औषधोपचार होतात त्या वास्तूला राजा दशरथाचे नाव दिले गेले आहे एवढेच मला आधी कळले होते. प्रत्यक्षात मी जेंव्हा त्या राजा दशरथ औषधोपचार केंद्रात गेलो तेव्हा मला आणखी बरेच काही दिसले. ज्या स्त्रियांना किंवा पुरूषांना अपत्य होत नाही, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या केंद्रास राणी कौशल्या अपत्यप्राप्ती केंद्र असे नाव आहे. तिथे जे औषध दिले जाते, त्या औषधास पायस असे म्हणतात.’

‘ज्या स्त्रियांना पायसानेही अपत्यप्राप्ती होणार नाही त्यांच्यासाठी इतर काही उपायांची सोयही असून तसे उपचार करणाऱ्या केंद्रास ऋषी दुर्वास औषधोपचार केंद्र असे नाव आहे. येथील उपायांना उपचार म्हणण्याऐवजी वरदान असे म्हणतात.’

‘काही कारणाने अवयव शरिरापासून विलग झाले असतील तर ते जोडून देणाऱ्या विभागास घटोत्कच केंद्र असे नाव आहे. जडी-बूटी आणि औषधी वनस्पतींचे औषधोपचार करणारा विभाग द्रौणागिरी म्हणून ओळखला जातो.’

‘मग मी बाहेर पडलो आणि अधिक माहिती मिळवू लागलो.

कालौघात स्त्रियांचे प्रमाण अत्यल्प झाल्याने एकाच स्त्रिने अनेक पुरूषांशी विवाह करण्याची प्रथा आता रूढ झाली आहे. अशा समूहविवाहांना मान्यता देणारा कायदा योगींनी केला असून त्यास पांडवविवाह कायदा असे नाव दिले आहे.’

‘ज्या ठिकाणी स्त्रिया आपल्या नृत्याने रोमांचित करतात आणि सोमरसाचे सशुल्क वितरण होते त्या ठिकाणास इंद्र दरबार असे नाव दिले गेले आहे. एका तुरूंगातील पहारेकरी अपरात्री झोपा काढतात आणि कैदी पळून जातात अशी त्याची ख्याती होती. त्या तुरूंगास कंस कारावास असे नाव दिले गेले आहे.’

‘मी मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा क्षुधाशांतीसाठी एका गृहात गेलो तर तेथे मला न कळणाऱ्या भाषेत ‘अनलिमिटेड थाली’ असे काहीतरी लिहिलेले होते. यावेळी मात्र तिथे ‘भीम थाळी’ असे लिहिलेले होते. काही ठिकाणी मर्यादित भोजन दिले जाते परंतु त्याने क्षुधाशांती मात्र होते, त्यास आता द्रौपदी थाळी केंद्र असे म्हणतात.’

‘गुन्हेगारांना एकेकाळी फार क्रूर पद्धतीने गळ्याभोवती फास लटकावून आपल्या यमाकडे पाठवत असत. योगींनी त्यात बदल केला असून, नेम धरून एक चक्र हवेत फिरवले जाते व त्यास नियंत्रित करण्याची सोय आहे. ते चक्र फिरत फिरत अपराध्याच्या गळ्याशी जाते आणि कोणत्याही त्रासाविणा त्यांस यमसदनी धाडते. या केंद्रास ‘सुदर्शन चक्र धाम’ असे नाव आहे.’

‘एकेकाळी ज्यांस दूरचित्रवाणी संच असले काही तरी भंपक नाव दिले गेले होते त्यांस आता संजय संच म्हणतात. एखाद्यास तडीपार करण्याऐवजी अज्ञातवासात पाठवतात, केंद्रात ज्याचे राज्य आहे, त्याच्या नावाने राज्यात राज्य करताना एका आसनावर केंद्रातील प्रमुखाच्या पादुका ठेवण्याची पध्दत आली आहे.’

भगवान विष्णू हे ऐकून गोंधळले. खरेच कलियुगाची अखेर आली आहे आणि आपले गणित चुकले की काय? माता लक्ष्मीच्या चेहऱ्यावरही काळजीच्या रेषा उमटल्या. श्री विष्णूंनी डोळे मिटले आणि अंतर्ज्ञानाने ते भारतवर्षात पोचले, उत्तरेस गेले आणि आपल्या आरपार दृष्टीने पाहू लागले…त्यांच्या कानी एक घोषणा पडली…अयोध्येत प्रभू रामचंद्राचा भव्य पुतळा उभारण्यात येईल…

पुढचं सगळं ऐकता ऐकता, पाहता पाहता श्रीविष्णूच्या चेहऱ्यावर हास्य फुलत गेलं..ते मिश्कील स्वरांत नारदाला म्हणाले, ‘रामचंद्राच्या पुतळ्याची उंची निश्चितच कोणत्याही मर्त्य मानवाच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा अधिक असेल. हो ना?’

नारदाकडून काहीच उत्तर मिळाले नाही म्हणून श्रीविष्णूंनी डोळे उघडले आणि पाहतात तर नारदमुनी गायब झालेले होते. अवकाशातून त्यांचा निरोप घेतल्यागत आवाज आला. नारायण…नारायण..

श्रीविष्णूंच्या चेहऱ्यावर हास्य आलं आणि लक्ष्मीकडे हसून पाहात ते म्हणाले, ‘अडचणीचा प्रश्न आला की नारदमुनी प्रस्थान करतात. निमिषभर मला खरंच वाटलं होतं, आपली कालगणना चुकली की काय?

तंबी दुराई

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 10 Comments

 1. Lekh uttam. Eka thikanee Parvatee ase jhale aahe Laksh mee aaiwajee

  1. धन्यवाद. केले दुरुस्त. असेच लक्ष असू द्या…:-)

 2. सकाळमधील ब्रिटिश नंदी च्या ढिंग टांगच्या धर्तीवर लिहिण्याचा प्रयत्न. निरुद्दिष्ट! कल्पनाशक्तीचा फाजिल विलास!

 3. tambi durai has no guts. He is paid for joking on hindu religion. If he has any guts write about other religions. I doubt whether he is paid by opposition or foreign nations.

 4. फारसा दम नाही.विषयातच दम नाही .

 5. लज़्ज़तदार आणि नेहेमीप्रमाणे खुसखुशीत.

 6. नेहमीसारखाच खास तंबी दुराई टच !

 7. नेहमी प्रमाणे लई भारी तंबीदुराई

 8. मस्तच आहे विनोदी

 9. मस्त !