(१) अब्रू

‘अब्रू’ ह्या शब्दाचा अर्थ ‘कीर्ती ’ असा मुख्यत: व्युप्तत्तिदृष्ट्या होतो. ‘अब्रूची चाड’, ‘अब्रूदार मनुष्य’, ‘बेअब्रू’ वगैरे ठिकाणी ‘अब्रू’ म्हणजे ‘कीर्ती ’ हाच अर्थ सरळ दिसतो. व्युप्तत्तिदृष्ट्या पाहिले असताही ‘अब्रू’ म्हणजे ‘कीर्ती ’ ह्याच अर्थाला बळकटी येते. कारण ‘अब्रू’ हा शब्द ‘अ’ आणि ‘ब्रू’ ह्या दोन घटक शब्दांपासून बनलेला आहे. पैकी ‘अ’ ह्या पहिल्या घटक शब्दाचा अर्थ ‘नाही’ असा येथे घ्यावयाचा नाही. एवढेच नव्हे, तर ‘तत्सादृश्यमभावश्च तदन्यत्वं तदल्पता। अप्राशस्त्यं विरोधश्च नअर्था: षट्‌ प्रकीर्तिता:।।’ ह्या संस्कृत श्लोकांत सांगितलेल्या ‘अ’च्या सहा अर्थांपैकी कोणताही अर्थ येथे संभवत नाही. कारण, ‘अ’ हा शब्द येथे ‘आ’ ह्या उपसर्गाचा दर्शक आहे. म्हणजे, ‘अब्रू’ ह्या शब्दाचे व्युप्तत्तिदृष्ट्या जास्त सुबोध रूप ‘आब्रू’ असे आहे.

अर्थातच ‘आब्रू’ ह्या रूपांत ‘अब्रू’ हा शब्द उपयोगांत होता किंवा नाही, हा निराळा प्रश्न आहे. परंतु अर्थाच्या दृष्टीने ‘अब्रू’पेक्षा ‘आब्रू’ हे रूप जास्त सुबोध ठरते. असो. ‘अब्रू’ शब्दाच्या ‘अ’ ह्या पहिल्या घटकावयवाचा ‘आ’ ह्या उपसर्गाशी अशा तऱ्हेने संबंध दाखविल्यावर, ‘ब्रू’ ह्या दुसऱ्या घटक शब्दाचा अर्थ पाहू. ‘ब्रू’ ह्याचा संस्कृतमध्ये ‘सांगणे’, ‘बोलणे’ असा अर्थ आहे, व म्हणूनच ‘ब्रू’ ह्याचा अर्थ ‘कीर्ती’ असाही होईल. कारण, ‘कीर्ती’ ह्या शब्दांत तरी ‘कृत्‌’ म्हणजे ‘सांगणे’, ‘बोलणे’ हाच धातू आढळतो. एवढेच नव्हे, तर ‘कीर्ती’ ह्याचा समानार्थक जास्त मराठी शब्द जो ‘बोलबाला’, तोही ‘सांगणे’, ‘बोलणे’ अशा अर्थाच्याच धातूपासून झाला आहे. फार काय, ‘कीर्ती’ ह्याचे समानार्थक इतरही बहुतेक सर्व शब्द ‘सांगणे’, ‘बोलणे, ह्या अर्थाच्याच धातूंपासून झाले आहेत. ही स्थिती ‘कीर्ती’च्या समानार्थक इंग्रजी शब्दांतही कोठे कोठे आढळते.

उदाहरणार्थ इंग्रजी ‘Prestige हा शब्द पाहावा. ह्याचे ‘pre’ व ‘stige’ असे दोन अवयव पडतात. पैकी ‘pre’ हा संस्कृत ‘प्र’ ह्या उपसर्गाचा दर्शक असून ‘प्र’चा अर्थ जो ‘प्रकर्षेण’ म्हणजे ‘अतिशय’ तोच ह्या ‘pre’चाही आहे. अथवा ‘प्र’चा अर्थ येथे ‘प्रशस्य’ म्हणजे ‘चांगले’ असाही संभवेल. ‘Stige’ ह्या दुसऱ्या अवयवांतही ‘sti’ हा एवढाच मुख्य भाग असून, ‘ge’ हा अधिक विस्तार आहे. ‘sti’ हा मुख्य भाग संस्कृत ‘स्तु’ ह्या धातूशी संबद्ध आहे. ‘स्तु’चा अर्थ ‘सांगणे’, ‘बोलणे’ असाच आहे. स्तुति हा शब्दही ‘स्तु’ म्हणजे ‘बोलणे’, ‘सांगणे’ ह्या धातूपासूनच आला आहे, हे सांगणे नकोच. अर्थातच ‘स्तु’चा अर्थ येथे आकुंचित बनून, ‘चांगले बोलणे’, ‘अनुकूल बोलणे’, ‘प्रशंसा करणे’ असा झाला आहे. त्याचप्रमाणे ‘कीर्ती’ ह्या शब्दांतील ‘कृत्‌’ धातूचाही अर्थ ‘स्तु’ धातूच्या अर्थाप्रमाणेच आकुंचित बनला व त्यापासूनच ‘कीर्ती’ म्हणजे ‘प्रशंसा’ वगैरे अर्थ झाला. ‘प्रशंसा’ या शब्दांतील ‘शंस्‌’ धातूचाही अर्थ ‘सांगणे’ असाच आहे. परंतु तोही आकुंचित बनून, ‘प्रशंसा’ शब्दाने दाखविलेला अर्थ त्यास प्राप्त झाला. असो.

‘अब्रू’ ह्यांतील ‘अ (आ)’ ह्या उपसर्गाचा अर्थ कोणताही विशिष्ट घेऊ नये. म्हणजे नुसत्या ‘ब्रू’चा जो अर्थ ‘कीर्ती’ तोच ‘अब्रू’ ह्याचाही होय. किंवा ‘आ’ म्हणजे ‘आनुकूल्येन’ असा अर्थ घेतल्यास चालेल.

ह्यानंतर ‘आब्रू’च्या ‘आ’चा ‘अ’ झाला व ‘अब्रू’ शब्द बनला, ह्या वरील विधानाच्या पुष्ट्यर्थ ‘आ’चा ‘अ’ झालेली एक दोन उदाहरणे पाहू. ‘अक्कल’, ‘अदमी’, ‘अडका (पैसा-अडका)’ वगैरे शब्दांची व्युप्तत्ति पाहू गेल्यास, त्यांत मूळच्या ‘अ’चा ‘आ’ झालेला दिसून येईल. ह्या बाबतींतील विशेष विस्तार पुढील लेखांत करू.

(टीप :- ‘अब्रू’ ह्या शब्दाची  व्युत्पत्ति देताना इंग्लिश ‘prestige’ ह्या शब्दाचे व्युत्पत्तिदृष्ट्या मी वर दिलेले स्पष्टीकरण प्रसिद्ध इंग्लिश डिक्शनऱ्यांत दिलेल्या स्पष्टीकरणापेक्षा अर्थात्‌ भिन्न आहे. परंतु मला, मी दिलेले स्पष्टीकरणच जास्त संयुक्तिक व अर्थाला धरून आहे, असे वाटते. ह्या बाबतीत कोणते स्पष्टीकरण जास्त ग्राह्य आहे, हे सुज्ञ वाचक आपल्याशी ठरवतीलच.)

लेखक- एन्‌. एच्‌. पुरंदरे;  अंक- विविध ज्ञानविस्तार; वर्ष- जून १९२६

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 5 Comments

 1. अरे किती काथ्याकुट! याचं कोणितरी विडंबन करायला हवं!! आधी असं वाटल्यावर १९२६ कडे लक्ष गेलं. नक्कीच त्यावेळी एका शब्दाच्या आऽऽब्र्रू साठी एवढं चर्वितचरण होत असेल. बाकी मजा आली. धन्यवाद.

 2. मुळात संस्कृतचा आणि अब्रू शब्दाचा काय संबंध?
  जुन्या एखाद्या संस्कृत ग्रंथात अब्रू शब्द आहे काय?
  तो सरळसरळ फारसी शब्द आहे हे उघड आहे.
  आणि आबरु असा शब्दप्रयोग असलेल्या ढिगाने रचना उपलब्ध आहेत.

 3. उत्तम विश्लेषण केले आहे. पण मूळ शब्द ‘आबरू’ असाच आहे. मराठीत त्याचा ‘अब्रू’ असा अपभ्रंश झाला अशी माझी धारणा आहे. यावर तज्ज्ञांनी कृपया प्रकाश टाकावा.

 4. माझ्या माहितीनुसार मराठीतील ‘अब्रू’ हा शब्द, फारसीमधील ‘आबरू’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. ‘आबरू’ या शब्दाचा अर्थ, प्रतिष्ठा, इज्जत, पत असा होतो.( By the way ..फारसी भाषेत ‘अब्रू’ किंवा ‘अबरु’ या शब्दाचा अर्थ ‘भुवई’ असा होतो.)
  या निमित्ताने पु.लं. चे एक भाषण आठवले.. त्यात ते म्हणतात (शब्दश: आठवत नाही. पण मतितार्थ असा) की ‘सहानुभूती’ हा शब्द ‘करुणा’ या अर्थाने वापरला जातो. प्रत्यक्षात या शब्दाची फोड ‘सह+अनुभूती’ अशी आहे.”
  त्यांना असे म्हणायचे आहे की दुस-याच्या मनात जी भावना आहे (आनंदाची अथवा दु:खाची) तीच मी अनुभवतो आहे. कार्यालयातील एकाला पदोन्नती मिळाल्याने तो पेढे द्यायला आला. तो अर्थातच खुश होता. तेव्हा मी गंमतीने (पु.लं.चाच आधार घेत) म्हटले की मलाही सहानुभूती आहे. तेव्हा तो एकदम बुचकळ्यात पडला आणि नाराजही झाला. मी पु.लं. ची गोष्ट सांगितली. ती काही त्याच्या पचनी पडली नाही. हा प्रयोग मी पुन्हा कधीही केला नाही !!

 5. अप्रतिम.मला शब्दांची. व्युत्पत्ती जाणून घ्यायला मजा वाटते.अब्रू. हा शब्द तद्भव आहे असं वाटले नव्हते.बेआब्रू वगैरे शब्दांमुळे अरबी,फारसीतून हा शब्द आला असेल असा अंदाज होता.लेखात उत्तम फोड करून सांगितली आहे.शांता शेळकेंचे ह्या विषयावर लेखन वाचल्याचे स्मरते.धन्यवाद.