आज पुन्हा राजा विक्रमादित्य याने प्रेत उतरवून खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाकडे चालू लागला तेव्हां प्रेतात लपलेला वेताळ म्हणाला…

राजा ही गोष्ट आहे कोल्हापूर येथील न्यू पॅलेस परिसरात राहणार्‍या बाजीराव सयाजीराव पाटील याची. बाजीराव पाटीलने एम.बी.ए. केले व सध्या एका मल्टीनॅशनल कंपनीत एरीया सेल्स मॅनेजर आहे. कामातील कष्टाळू आणि धाडसी स्वभावामुळे बाजीराव लवकर ए.एस.एम. झाला. कंपनीचे टारगेट्स पूर्ण करत असताना त्याने त्याच्या लाईफ टारगेट्सचे सुद्धा प्लॅनिंग केले आहे. दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आणि आता त्याला यावर्षी स्वत:च्या हक्काच्या घरात राहायला जायचे होते. लोन देण्यासाठी बँक तयार होती पण त्याला एक भिती सतावत होती. वर्षांपूर्वी त्याचा बॉसचा, शेखर जाधवचा नवी मुंबईत फ्लॅट असलेली सोयायटी अनाधिकृत ठरवून पाडून टाकली होती. शेजारी असलेल्या ६-७ सोसायट्या सुद्धा पाडण्यात आल्या होत्या. तब्बल सात वर्षांनंतर त्या इमारती अनाधिकृत ठरवण्यात आल्या होत्या. बिल्डर स्किम करून पैसे घेऊन मोकळा झाला होता आणि आता घरही नाही वर बँकेचे पैसे भरावे लागत होते. याच टेंशनमध्ये बॉसने जॉब सोडला आणि मुंबईला परत गेला.

बाजीराव स्वत: फ्लॅट घेण्याच्या विचार करत होता. कंपनीच्या कामाच्या बाबतील डॅशिंग असणारा बाजीराव आता टेन्स मध्ये होता. आपण फ्लॅट घेतला आणि तो काही वर्षांनी अनधिकृत ठरवण्यात आला तर? कितीही मोठा बिल्डर असला तरी खरी माहिती सांगत नाही हे त्याला अनेकांच्या बॉसच्या अनुभवावरून त्याला कळाले होते. आपणही असेच फसलो गेलो तर या विचाराने त्याला काही सुचत नव्हते.

सांग राजन, काय करावे बाजीराव पाटीलनं? घर घेऊ इच्छिणार्‍या लोकांना खात्रीशीर माहीती मिळणार नाही का?

राजन, माझ्या प्रश्नाचे उत्तर माहीत असूनदेखील तू मौन राहिलास तर तुझ्या डोक्याचे अनेक शकलं होतील हे लक्षात ठेव, वेताळ गंभीरपणे म्हणाला…

राजा विक्रमादित्याने क्षणभर विचार केला व म्हणाला…

वेताळा, बाजीराव पाटील याची गोष्ट ऐकली, बाजीरावची अडचण रास्त आहे पण त्यावर उत्तरही आहे.

रियल इस्टेट क्षेत्रात असणारी मागणी आणि मिळणार्‍या नफ्यामुळे या क्षेत्रात काही वाईट प्रवृत्तीची माणसे आली आहेत. बिल्डर-प्रमोटर्स अनाधिकृत जागांवर प्रकल्प करतात आणि प्रशासनातील काही अधिकारी त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात. लोक कर्ज काढून फ्लॅट घेतात आणि मग कधी-कधी आठ-दहा वर्षांनी कळते की आपण राहात असलेली बिल्डिंग अनधिकृत आहे. नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड या शहरांसह महाराष्ट्रात अशी लाखो घरे अनाधिकृत ठरवण्यात आली आहेत. नागरीकांची आयुष्याची पुंजी घरात गुंतलेली असते म्हणून मग सरकारलाही अप्रिय निर्णय घ्यावे लागतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्र शासनाच्या स्थावर संपदा विनियम व विकास कायद्यास अनुसरुन, महाराष्ट्र शासनाने, स्थावर संपदा क्षेत्रांचे नियमन होण्यासाठी, ‘महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण’ (Maharashtra Real Estate Regulatory Authority) (MahaRERA) ची स्थापना केली आहे. सदर प्राधिकरण हे स्थावर संपदा क्षेत्रातील लाभार्थी, प्रवर्तक व अभिकर्ता इत्यादींच्या हितांचे संरक्षण त्याचप्रमाणे स्थावर संपदा क्षेत्रातील निरोगी, पारदर्शक, कार्यक्षम, स्पर्धात्मक वाढ व उन्नतीसाठी प्रयत्न करणार आहे. या महारेराच्या संकेत स्थळावर प्रवर्तकांकडून सर्व वाणिज्यिक व रहिवास स्थावर संपदा प्रकल्पांची माहिती जाहीर करणे, स्थावर संपदा प्रकल्पांची नोंदणी करणे, स्थावर संपदा अभिकर्त्यांची नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी केल्याशिवाय कोणताही बिल्डर-प्रमोटर्स त्यांच्या स्थावर संपदा प्रकल्पाची किंवा त्यातील भागाची जाहिरात, विक्रीची, लाभार्थ्याच्या नावे नोंद करणे, भूखंड, सदनिका किंवा इमारत खरेदी करण्यासाठी आमंत्रित करु शकणार नाही. महारेरा कायद्याप्रमाणे प्रवर्तकाने प्रकल्पाची नोंदणी न केल्यास, त्याचे विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येते. प्रकल्पाच्या नोंदणीसह प्रकल्पाची त्रैमासिक प्रगतीची माहिती प्राधिकरणाच्या संकेत स्थळावर नोंदवायची आहे. स्थावर संपदा प्रकरणी वित्तीय शिस्त असण्यावर सुद्धा भर दिला जातो. महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाकडे नोंदविलेला नोंदणी क्रमांक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर तसेच प्रकल्पाची जाहीरात, माहिती पुस्तिका व प्रकाशित केल्या जाणाऱ्या सर्व कागदपत्रांवर ठळकपणे नमूद कराव्या लागतात. नोंदणीकृत प्रकल्पाबाबतचा मंजूर नकाशा, आराखडा, सोई-सुविधा, वस्तू, उपकरणे इत्यादींची सविस्तर माहिती महारेरा च्या संकेतस्थळावर नागरीक पाहू शकतील व त्याव्दारे नागरीक योग्य तो निर्णय घेऊ शकतील.

बाजीराव पाटीलने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात महारेराचा लाभ घ्यावा आणि आपली अडचणी सोडवावी असे म्हणत राजा विक्रमादित्याने आपले बोलणे थांबवले.

राजा, खरं तर मला या गोष्टीशी काहीही घेणे-देणे नाही. तुझ्या उत्तरामुळे माझे समाधानही झाले खरे पण तु मौनव्रत सोडलेस, आता मला जावे लागेल. असे म्हणून वेताळ मोठमोठ्याने हसत प्रेतासह गायब झाला आणि पुन्हा झाडावर लोंबकळू लागला.

लेखक- चंद्रदेव कुंभार; सौजन्य- MH +ve  

Leave a Reply

This Post Has 5 Comments

 1. छान माहितीपूर्ण कथा. परंतु हा इतका अलीकडचा लेख इथे छापणे आपल्या संपादकीय मनोगतातील व्यक्त उद्दिष्टास छेद देते असे मला वाटते.

  1. भिडे साहेब नमस्कार,

   आपला थोडा गैरसमज झाला आहे. पुनश्चवर दर बुधवार व शनिवारी सकाळी प्रसिद्ध होणारे सशुल्क लेख हे उद्दिष्टाला धरूनच ( जुने, दर्जेदार व कालसुसंगत )असतात. मात्र ते सोडून दर गुरुवारी संध्याकाळी आपण सोशल-मिडीया या सदराअंतर्गत, त्या आठवड्यात फेसबुक वा व्हॉट्सअप अथवा वृत्तपत्रांच्या वेब एडिशन्स वर गाजलेले/बरेच शेअर झालेले/ माहितीपूर्ण, चांगले लेख आपल्या सर्व वाचकांसाठी निःशुल्क प्रसिद्ध करतो. ” आजची विक्रम वेताळाची गोष्ट ” हा असाच खूप शेअर झालेला व माहितीपूर्ण लेख असल्याने आपण तो निवडला होता.

   प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

 2. खुप छान। गोष्ट रूप देऊन फारच छान लेख ऊपयुक्त झालाय।

 3. महत्वाच्या विषयाची अत्यंत सोप्प्या शब्दात माहिती
  अभिनंदन

 4. सध्याच्या काळानुरुप प्रश्न आणि त्याच्या सुयोग्य कायदेशीर उत्तराबद्दल एकविसाव्या शतकातील वेताळ व विक्रम ह्यांचे अभिनंदन .
  नेहमीच्या वापरातील मराठी शब्दांऐवजी केलेला इंग्रजी शब्दांचा वापर काही प्रमाणात रसभंग करतो ते टाळायला हवं होतं .