मी आपला सावकाश चाललो होतो, तेवढ्यात ते मला घाईघाईनं जाताना पाठमोरे दिसले. पत्रकार एकेकाळी वापरायचे तसली झोळी खांद्याला अडकवून ते भराभरा चालत होते. ते माझ्याच काय संबंध महाराष्ट्राच्या आणि जिथे कुठे मराठी माणसं असतील त्या सगळ्यांच्या एवढे परिचयाचे आहेत की मागून, पुढून, डावीकडून, उजवीकडून, टॉप अँगलने कुठल्याही बाजूनं दिसले तरी ओळखता येतात. मी त्यांना हाक मारली,

‘अहो, पुलं…’

पुलं थांबले आणि त्यांनी वळून पाहिलं.

‘अहो, थांबा ना, एवढी कसली घाई?’

‘घाई? अहो संबंध राज्यात दर दिवसाला पंधरावीस कार्यक्रम तरी असतात माझी स्मृती जागवण्याचे. सगळीकडे पाच पाच मिनिटं जाऊन येतो म्हटलं तरी दिवस पुरत नाही.’

‘खरं आहे, तुम्ही विष्णूचे अवतार असतात तर बरं झालं असतं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अवतार गेले असते. एका कार्यक्रमाला राम, एका कार्यक्रमाला कृष्ण…’

‘कसलं बरं झालं असतं? अहो एखाद्या कार्यक्रमाला नृसिंह गेला असता आणि त्याला कार्यक्रम आवडला नसता तर त्यानं वक्त्याला थेट मांडीवर आडवा घेऊन फाडला असता, नाही तर खांद्यावर घेऊन खांब फोडून त्यात घेऊन गेला असता वक्त्याला. आणि त्याची जी काय दशा झाली असती त्यालाच दशावतार म्हणावं लागलं असतं. मी देशपांडेच बरा. बाकी माझे कपडे पाहिले की सुनिता मला ‘काय अवतार आहे’ म्हणते तेवढं पुरे.’

‘हिंदी भाषेतही तुमच्यावर एक मालिका आली आहे. ती पाहिली का हो तुम्ही?’

‘पाहिली म्हणजे काय? परवा नारायण आला होता भेटायला. माझे पायच धरले. अगदी डोळ्यात पाणी आणून म्हणाला, ‘मला त्या हिंदी लोकांच्या लग्नात पाठवू नका, मला त्यांच्यातलं काहीच माहिती नाही. मराठी माणसांच्या लग्नात राबायला काही वाटत नाही. व्याही कधी रूसतो, पंगतीत कोणाला मान द्यायचा, चांगला आंतरपाट कुठं मिळतो, चिमट्याची नथ घरात कुठे ठेवलेली आहे ते सगळं मला माहिती असतं. पण या लोकांचं मला काहीच कळत नाही. परवा मी गेलो तर माझ्या हाती एका बाईनं भरलेलं ताट दिलं, म्हणाली, भगवानको भोग लगा आव…मला काहीच कळलं नाही.  फक्त देवालाही भोग चुकले नाहीत एवढंच कळलं’

‘पण मालिका काय, सिनेमे काय चंगळच चालली आहे तुमची!’

‘यालाच तर माणसाची शंभरी भरणे म्हणतात. आपल्या घरात एखादी खुंटी अगदी मोक्याच्या जागी असते. कोणीही येतो आणि त्या खुंटीवरच सगळं अडकवतो. कधी शर्ट, कधी पँट, कधी भाजीपाल्याची पिशवी, कधी पोराचं दप्तर तर कधी दांड्याची छत्री. एवढंच कशाला, घरी आलेल्या पाहुण्यांचं आगाऊ कार्टंही खुर्चीवर चढून त्याच खुंटीला लोंबकळतं. तशी माझी खुंटी झालेली आहे. कोणीही काहीही अडकवतं.’

‘अहो, इतर लेखकांना स्वतःच्या पुस्तकांची नाव सांगावी लागतात, तुम्ही भाग्यवान, जिवंतपणीच दंतकथा बनलात..’

‘म्हणूनच माझं चित्र काढताना पुढचे दोन दात ठळक काढतात बहुधा सगळे. माझं लेखन कसं फालतू आहे, मध्यमवर्गीय आहे असंही काही म्हणतात. माझ्यावर तसा जिवंतपणीच अनेकांचा दात होता. त्या अर्थानं मी जिवंतपणीच दंतकथा झालो, असं म्हणायचं आहे का तुम्हाला?’

‘तुम्ही लिहिलेली पुस्तकं तर झालीच, तुम्ही लिहिलेली पत्र, तुमची भाषणं, तुमची सही दिसली रे दिसली की तो कागद छापायचा, असा सपाटाच सुरू आहे. अजूनही तुमचं अप्रसिध्द साहित्य मिळतंच आहे लोकांना पुस्तकं करण्यासाठी…’

‘मी वाण्याकडे पाठवलेली सामानाची यादी, धोब्याकडे दिलेली कपड्यांची यादी, प्लंबरकडून लिहून घेतलेला हिशेब, डायरीत लिहून घेतलेले कुणाकुणाचे पत्ते, अनेकांनी कार्यक्रमांना बोलावून न दिलेल्या मानधनाचे आकडे, सुनिता एकदा, फक्त एकदाच हं, पंधरा दिवस बाहेरगावी गेली होती तेव्हा, खिचडी कशी करावी हेही मी तिच्याशी बोलून लिहून ठेवलं होतं…असं बरंचसं साहित्य अजून अप्रकाशित आहे.’

‘आणि मेहतांनी तर तुमच्या पुस्तकांच्या स्वस्त आवृत्त्याही काढल्या होत्या, त्याही खपल्या..’

‘मेहतांचं काही सांगू नका मला. खपतात म्हटल्यावर ते माझ्या मराठी पुस्तकांचेच मराठी अनुवादही छापतील.’

‘एवढं लिहिलंत, एवढं बोललात, तरी अजून काही लिहायचं राहून गेलं असं वाटतं का?’

 

‘हो राहिलं आहे ना. मी मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास लिहिला होता. पण अनेक लेखकांचे पाळलेले समीक्षक असतात. किंवा काही लेखक साटंलोटं करून एकमेकांच्या साहित्याविषयी चांगलं लिहितात. अशा साहित्याचा इतिहास, म्हणजेच मराठी वाङमयाचा पाळीव इतिहास लिहायचा राहून गेलाय.’

‘तुमचं ते निवडक पुलं आज आलं असतं तर आम्ही त्याला स्टँडअप कॉमेडी शो म्हटलं असतं..’

‘हो? आपण मराठीत म्हणतो ना, अरे तुला जर वेळ नसेल तर एकदा उभ्या उभ्या येऊन जा ना, तसं मग मला लोकांनी म्हटलं असतं, अहो आम्हाला वेळ नाही, तुम्ही जरा उभ्या उभ्या हसवून जा ना.’

‘कोणाच्याही शंभरीचे एवढे कार्यक्रम झाले नाहीत, होणारही नाहीत. लेख, पुरवण्या, मालिका, चित्रपट, नाटके आणि गाण्यांचे कार्यक्रमसुध्दा..तुम्हाला छान वाटत असेल ना?’

‘तुला माझी म्हैस कथा माहिती असेलच. ती म्हैस म्हणजे मी आहे आणि तिच्या आचळाखाली पन्नास शंभर लोक उकीडवे बसलेले आहेत, मांडीत दुधाच्या चरव्या धरून…असं चित्र सुचतं मला. सरवटे असता तर त्यानं काढलं असतं, त्याला सांगतोच काढायला आज…’

असं म्हणंत पुलं गायब झाले. हा लेख लिहिणं म्हणजेही मांडीत चरवी धरून दुभत्या म्हशीच्या आचळाखाली बसणंच वाटलं मला…पण मग ते विसरून मी पुलंची स्मृती जागवणाऱ्या कार्यक्रमाला जाऊन बसलो. पुलं पहिल्याच रांगेत बसलेले होते. पण लोकांना ती खुर्ची रिकामी दिसत होती. समोरचा वक्ता बोलत असताना पुलं नृसिंहावतार घेतील की काय असं उगाचंच वाटत राहिलं मला..

तंबी दुराई

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 22 Comments

 1. पु ल वरील लेख विनोदी पाहीजेच तेवढा नक्की आहे पु ल म्हटलकी हसू हे ठरलेल लेख ऊत्तम जमला आहे

 2. मला मात्र आजचा हा लेख म्हणजे हल्ली बोकाळलेल्या पुलोत्सवासारखी टाकलेली एक काडी वाटते. पुल की पुलं ? पुरे करा हे पुलस्मरण असे म्हणावे.
  मंगेश नाबर

  1. ‘ पु. ल. ‘ असे लिहिणे योग्य आहे.

 3. फारच सुंदर

 4. सुंदर ! मराठी साहित्याचा गाळीव इतिहास हा एका दिवाळी अंकात आला होता तो छापाल का ? काही गोष्टी आठवतात.
  त्यात लिहिले होते. पूर्वी दंडकारण्यात पहिला धडा राक्षस मुलांसाठी पहिला धडा होता
  काका, उठा हा राम आला, त्याचा फडशा पाडा

  हो पण आज सर्वांच्या भावना नाजूक झाल्या आहेत. तेंव्हा सांभाळा

 5. सुंदर. समाजमानस मस्त पकडलंय शब्दांत.

 6. लेख खूप छान झाला आहे.मागील२/३लेख अपेक्षाभंग करणारे होते.आजच्या लेखाने परत सूर गवसल्याचे जाणवले व आनंद झाला.

 7. एकदम मस्त

 8. सुंदर लेख..पुलंच्या नांवाने विनोद,किस्से वगैरेंना उधाण आले आहे.त्यांच्या नांवाने कांहीही खपवले जात आहे.मजा आली.

 9. मजा आली! हिंदी मालिका अकदीच ‘नमुनेदार’ होती. पण या निमित्ताने तरूणाई पुन: पु.ल. अनुभवतेय, हे ही नसे थोडके!!

 10. झणझणीत