(२) ‘आयतं’

‘अब्रू’तील ‘अ’ हा मूळच्या ‘आ’ ह्या उपसर्गाचा संकोच आहे, व हा संकोच ‘अक्कल’, ‘अदमी’, ‘अडका (पैसा-अडका)’ इत्यादि शब्दांतही आढळतो असे ‘अब्रू’ शब्दाची व्युत्पत्ति देताना दर्शविले आहे, त्या वेळी ह्या बाबतीतला अधिक विस्तार पुढल्या लेखांत करू असे आश्वासन दिले होते; तरी प्रथम उपरिनिर्दिष्ट विस्तार थोडक्यात करून नंतर ‘आयतं’ ह्या शब्दाकडे वळू.

‘अक्कल’ म्हणजे ‘ज्ञान म्हणजे ‘बुद्धी’, ‘आकलनशक्ती’. हा अर्थ व्युत्पत्तिदृष्ट्या पाहणे झाल्यास, ‘अक्कल’ ह्या शब्दाच्या घटक शब्दांकडे लक्ष देणे जरूर आहे. आणि हे ‘अक्कल’ शब्दाचे घटक शब्द ‘अ’ ‘क्‌’ आणि ‘कल्‌’ असे आहेत. पैकी अ हा ‘आ’ ह्या उपसर्गाचा दर्शक आहे. ‘क्‌’ हा उगाच मध्ये घुसला आहे. आणि ‘कल’ हा संस्कृत ‘कल्‌’ म्हणजे कळणे’ ‘समजणे’ ह्या धातूपासून झाला आहे. ‘कळणे’ ह्यामध्येही ‘कल्‌’ हाच धातू आहे. ह्याप्रमाणे, व्युत्पत्तिदृष्ट्या ‘अक्कल’ ह्याचे ‘आकल’ असे अधिक सुबोध रूप ठरते. ‘आकलन करणे’ ह्या शब्दसमुच्चयातील ‘आकलन’ हा शब्द आणि ‘अक्कल’ ह्याचे व्युत्पत्तिदृष्ट्या अधिक सुबोध असलेले ‘आकल’ हे रूप, ही दोन्ही ‘आ+कल्‌’ ह्याच धातूपासून झाली आहेत. हा सर्व प्रकाराचा योग्य विचार केल्यास, ‘अक्कल’ ह्या शब्दाचा ‘आकलनशक्ती’ हा अर्थ, व ह्याच शब्दाचा ‘आ+कल्‌’ ह्या धातूशी व्युत्पत्तिदृष्ट्या संबंध, न्याय्य आहे असेच ठरते, व म्हणूनच ‘अक्कल’ ह्या शब्दांतील ‘अ’ हा मूळच्या ‘आ’चा संकोच आहे असे म्हणणे संयुक्तिक दिसते.

‘अदमी’ हा शब्द संस्कृत ‘आत्मन्‌ (आत्मा)’ ह्या शब्दाशी संबद्ध आहे. ‘अदमी’ व ‘आत्मन्‌’ (आत्मा) ह्या दोहोंचाही अर्थ ‘मनुष्य’ असाच आहे.

‘अडका (पैसा-अडका)’ ह्या शब्दाचा अर्थ ‘धन’ असा आहे. आणि ह्या अर्थी ‘अडका’ ह्या शब्दाची व्युत्पत्ति पाहू गेले असता, ‘अडका’ हा शब्द संस्कृत ‘आ+दा’ ह्या धातूशी संबद्ध आहे असे आढळते. ‘दा’ ह्याचा अर्थ ‘देणे’, व ‘आ+दा’ ह्याचा अर्थ ‘घेणे’, ‘मिळविणे’ असा आहे. ‘धन’ ‘पैसा’ ह्या अर्थाचे शब्द ‘दा’ व ‘आ+दा’ ह्या दोन्ही धातूंपासून झालेले आढळतील. उदाहरणार्थ, ‘दा’ पासून ‘दाम’ ‘दमडी’, ‘Dollar’, ‘दिडकी’ वगैरे; व ‘आ+दा’ पासून ‘आदा’ (म्हणजे ‘मिळविलेला पैसा’) व प्रस्तुत ‘अडका’ हा शब्द. ‘दा’ व ‘आ+दा’ ह्या दोन्ही धातूंपासून ‘द्रव्य’ ह्या अर्थी शब्द बनावेत, हे ठीकच आहे. कारण ‘द्रव्य’ हा पदार्थच मुळी मुख्यत: ‘देव-घेवी’च्या व्यवहारासाठी आहे. असो.

‘अक्कल’, ‘अदमी’, व ‘अडका’ ह्यांतील ‘अ’ बद्दलचा इतका विस्तार केल्यावर आता ‘आयतं’ ह्या शब्दाच्या व्युत्पत्तिकडे वळू.

‘आयतं ताट वाढून पुढे ठेवलं तरी देखील बेटा नाखूषच’, ‘मला तो जिन्नस आयता मिळेल तर पाहिजे आहे’, ‘आयती लक्ष्मी घरी चालून आलेली त्याने डावलली’ वगैरे सारख्या वाक्यांत ‘आयतं’ ह्याचा अर्थ ‘प्रयत्न न करता प्राप्त झालेले’ असा आहे. (Secured) Without effort’ हा इंग्रजी शब्दसमूह ‘आयतं’ ह्या मराठी शब्दाशी बरोबर समानार्थ आहे. ह्या अर्थाच्या दृष्टीने ‘आयतं’ ह्याचे व्युत्पत्तिदृष्ट्या ‘आ’ आणि ‘यतं’ असे घटक अवयव पडतात. पैकी ‘आ’ हा येथे उपसर्ग नाही. ‘आ’ हा ‘अ’ ह्या संस्कृत नकारार्थी शब्दाचा विकास आहे. अर्थातच ‘आ’ ह्याचा येथे ‘नाही’ असा अर्थ आहे. आणि ‘यतं’ हा घटकशब्द संस्कृत ‘यत्‌’ म्हणजे प्रयत्न करणे ह्या धातूपासून झाला आहे. अर्थातच त्याचा अर्थ ‘यत्न’ ‘प्रयत्न’ असा आहे. आणि म्हणूनच ‘आयतं’ ह्याचा अर्थ ‘प्रयत्नाशिवाय प्राप्त झालेले’, ‘अनायासे मिळालेले’ असा व्युत्पत्तिदृष्ट्याही सिद्ध होतो. ‘अनायासं’ ह्या शब्दाची रचना देखील ‘आयतं’ ह्या शब्दाच्या रचनेसारखीच आहे. कारण ‘अनायासं ह्यांत तरी ‘अन्‌’ म्हणजे ‘नाही’ आणि ‘आयास’ म्हणजे ‘श्रम’, ‘प्रयत्न असेच घटक शब्द आहेत. ज्याकरिता आपणास काहीच श्रम पडत नाहीत त्यास आपण ‘अनायासं किंवा आयतं (मिळालेलं)’ असे म्हणतो. ‘आयतं’ ह्याचे व्युत्पत्तिदृष्ट्या जास्त सुबोध रूप ‘अयतं’ असे आहे हे येथे सांगणे नकोच.

मूळच्या ‘आ’चा ‘अ’मध्ये संकोच होऊन ‘अब्रू’ ‘अक्कल’ वगैरे शब्द बनले; व ह्याच्या उलट मूळच्या ‘अ’चा ‘आ’मध्ये विकास होऊन ‘आयतं’ हा शब्द बनला, ह्या दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून लक्षात ठेवण्यासारख्या आहेत.

‘आयतं’ ह्याचे जास्त प्रसृत रूप ‘आइत्तं’ असे आहे. ‘आता आइत्ता जेवायला येऊन उभा राहील’, ‘तुम्हाला काय होतंय्‌ आइतं आपलं नुसतं बोलायला’ वगैरे ठिकाणी हे रूप दृष्टीस पडते. ‘अक्कल’ ह्यांतील मधले अक्षर व ‘आइतं’ ह्या रूपांतील शेवटले अक्षर ह्या दोन्हीचे द्वित्त्व झाले आहे. असे व्दित्त्व पुष्कळ ठिकाणी आढळते.

लेखक- एन्‌. एच्‌. पुरंदरे;  अंक- विविध ज्ञानविस्तार; वर्ष- जून १९२६

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 5 Comments

 1. फार रंजक. असा व्युत्पत्तीचा विचार केला नव्हता. आजी ‘आइत्ता’ म्हणायची, तो अपभ्रंश वाटायचा.

 2. अतिशय दुर्बोध व न कळणारा लेख
  ह्या लेखाचे प्रयोजन काय? असे लेख पुन्हा येउ नये ही विनंती

 3. व्युत्पत्ती हा शब्द “view it aptly” या पासून झालाय.

  पुरंदरे हे आडनाव देखील “Pure in the Ray” या इंग्लंडच्या राणीने दिलेल्या पदवीचाच भ्रंश आहे.

  व्वा! अकलेचे तारे केवळ पुरंदरेंनाच तोडता येतात असे नाही. मला पण येतात की! असे म्हणून मी स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे.

 4. कृपया या पुस्तकातील लेख यापुढे प्रकाशित करू नयेत. हे फार अशास्त्रीय आहेत.

 5. हे जरा जास्तच ताणलय…. अक़ल किंवा अक़्ल (Aql) हा अरबी शब्द आहे. त्याचे मराठी रुपांतर अक्कल.. .. आदमी हा देखील अरबीच शब्द… आदमी म्हणजे आदम (Adam) च्या वंशातील- म्हणजे मानव..